09/03/2026
७ मार्च २०२६, शनिवार रोजी दादर माटुंगा कल्चरल सेंटर मधे ८ सारस्वत संस्थांनी मिळून एकत्र येऊन "सारस्वत कलाकार"चे दुसरे पर्व सादर केले. या सारस्वत संस्थांची नावे पुढीलप्रमाणे आहेत,जी एस बी टेम्पल ट्रस्ट, गौड ब्राह्मण सभा, सारस्वत विद्यार्थी सहायक मंडळी, कॅनरा सारस्वत एसोसिएशन, सारस्वत हितवर्धक मंडळ, आयस्को, सारस्वत प्रकाशन आणि सारस्वत चैम्बर.
सारस्वत चेंबरने पुढाकार घेऊन, जानेवारी महिन्यामध्ये सर्व सारस्वत कलाकारांना आवाहन करणारा वीडियो सोशल मीडिया वर पाठवला होता. ज्याला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि त्याचाच परिणामस्वरूपी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही जवळ जवळ २०० वीडियो आमच्या पर्यंत येऊन पोचले. गायन, नृत्य, चित्रकला, विविध वाद्यांचे वादन इतकेच नव्हे तर जादूचे प्रयोग, काव्य वाचन, कविता लेखन, अभिनय अशा अनेक विविध प्रकारच्या कलांचे वीडियो आले होते.
यातून निवडक कलाकार शोधून काढणे हे मोठे आव्हानच होते. पण त्यासाठी आपण ५ नामवंत आणि निष्णात व्यक्तींना निवडून एक परीक्षक गट तयार केला. यामधे सौ राधिका कुलकर्णी, सौ दिपाली कामत, श्री अवधूत रेगे, सौ सानिक प्रभू आणि सौ श्रद्धा सिनकर यांचा समावेश होता. २०० मधून शेवटी १७ कलाकार (४ गायक, ५ गायिका, २ कथ्थक नृत्यांगना, ३ भरतनाट्यम नृत्यांगना , २ तबलजी आणि १ संवादिनी कलाकार) निवडून हा कार्यक्रम करण्यात आला होता.
पद्मश्री पद्मजा फेणाणी- जोगळेकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या. प्रत्येक कलाकाराने आपली कला पद्मश्री पद्मजा ताई, त्यांच्या भगिनी उषा ताई, पती श्री सुनील जी आणि सभागृहातील जवळ जवळ ३०० प्रेक्षकांसमोर सादर केली. पद्मजा ताईंना मानवंदना म्हणून त्यांच्या गाण्यांची मेडले देखील सादर केली. पद्मजा ताईंबरोबर कलाकारांना मार्गदर्शनपर गप्पा मारताना त्यांनी सौ वैष्णवी कानविंदे पिंगे यांना, रियाझ आणि कष्ट करायला "नो एक्सक्युज" हेच यशाचे गमक असल्याचे ठळकपणे सांगितले. त्यांची बहीण सौ उषा ताई ही त्यांची पहिली गुरु असल्याचे देखील सांगितले. उषा ताईंनी लहानग्या पद्मजाला "कायम दर्जेदार आणि अर्थपूर्ण गाणीच गाण्याचा व्रत" पाळायला सांगितले आणि तेच व्रत आजही पद्मजा ताई काटेकोर पणे पाळतात , आणि त्याच बरोबर आवर्जून सांगतात की त्यांच्या यशाचे हेच गमक आहे. त्या आवर्जून हे देखील सांगतात की हे यश त्यांनी फिल्मी संगीताच्या कुबड्या न घेता मिळवलं आहे. त्या स्वतः मायक्रोबायोलॉजी मधे पदवीधर आहेत त्यामुळे कलाकारांमध्ये सुद्धा जी मंडळी इतक शिक्षण घेत गाणे शिकत आहेत त्यांना त्यांनी प्रोत्साहन दिले आणि सांगितले की शिक्षण कराच पण गाणे देखील चालू ठेवा. दोनही तुम्ही करू शकता आणि ते सांगताना त्यांना त्यांच्या माहेरच्या कुटुंबाचा आणि सासरच्या प्रत्येकाचा कसा भक्कम पाठिंबा पहिल्यापासूनच मिळत गेला तेही सांगितले.
कार्यक्रमात नंतर श्री समीर गोगटे (कलर्स या चैनल चे बिज़नेस हेड) यांनी देखील भविष्यातील उपलब्ध संधी आणि त्याचा करून घेता येणारा फायदा याबद्दल मार्गदर्शन केले. सोशल मीडिया प्रोफाइल वरून सुद्धा आज काल संधी मिळतात हे देखील सांगितले.
या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर सारस्वत कनेक्ट हा चैनल होता आणि त्यांनी हा कार्यक्रम जगभरातील प्रेक्षकांपर्यंत लाइव पोहोचवला.