05/01/2023
महाराष्ट्र राज्य स्थापनेचे हे ६३ वे वर्ष. खरं तर कागदोपत्री ६३ वर्ष पण आपल्या राज्याचा इतिहास त्याहीपेक्षा जुना आहे.
हा तोच महाराष्ट्र आहे जिथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी सुराज्य घडवले. हा तोच महाराष्ट्र आहे ज्याला फार जुनी संत परंपरा आहे. हा तोच महाराष्ट्र आहे जिथे टिळक, सावरकर, फुले, आंबेडकर असे क्रांतिकारक आणि समाज सुधारक जन्माला आले आणि या सगळ्यांनी आपल्याला सर्वधर्मसमभाव शिकवला. स्वाभिमान शिकवला. आपल्या मातीवर प्रेम करायला शिकवलं. त्यांच्या विचारांवर आजही महाराष्ट्र स्वाभिमानाने ताठ उभा आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राने या देशाच्या इतिहासात आपली ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
हाच महाराष्ट्राचा दैदीप्यमान इतिहास बघून संयुक्त महाराष्ट्राचे एक शिल्पकार आचार्य अत्रे म्हणतात की 'माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे, बाकीच्या राज्यांना फक्त भूगोल आहे'
"महाराष्ट्र" या नावाचा इतिहास काहीही असला तरी आर्थिक, सामाजिक, राजकीय, साहित्यिक, ऐतिहासिक, भौगोलिक अशा सर्व अंगांनी आपला महाराष्ट्र इतका समृद्ध आहे की आपल्या महाराष्ट्राची ओळख ही एक "महान राष्ट्र" म्हणूनच आहे आणि ती तशीच सर्वत्र रूढ व्हायला हवी.
आज १ मे २०२३... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!