09/22/2026
🌺 A2MM गणेशोत्सव 🌺
कधी कधी आपल्या मातीपासून हजारो मैल दूर असलो, तरी एखादा ढोल-ताशांचा निनाद, ' गणपती बाप्पा मोरया!, चा जयघोष किंवा उकडीच्या मोदकांचा सुगंध मनाला क्षणात मायभूमीत घेऊन जातो. असाच एक मंगल, आनंदमय आणि भावस्पर्शी अनुभव शनिवार, १९ सप्टेंबर रोजी Farmington High School येथे झालेल्या A2MM गणेशोत्सवात सर्वांनी अनुभवला. ShivShardul Percussions पथकाच्या दमदार गजरात गणरायाचे आगमन झाले आणि क्षणातच Farmington High School चा परिसर मराठमोळ्या उत्साहाने भरून गेला. 🥁 विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या चिमुकल्यांनी स्वतःच्या हाताने घडवलेल्या गणेशमूर्ती घेऊन बाप्पांचे स्वागत केले. त्या छोट्या हातांनी केलेली गणपतीची प्रतिष्ठापना आणि भक्तिभावाने केलेली पूजा पाहताना जाणवले की परंपरा केवळ जपली जात नाही, ती प्रेमाने पुढच्या पिढीच्या हातात सोपवली जाते. ❤️
बाप्पांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या या दिवसात सुग्रास भोजनाचा स्वाद सर्वांनी आनंदाने घेतला नसता तरच नवल ! आपल्या घरच्या गणेशोत्सवाच्या आठवणी जागवणारा सुंदर उकडीचा मोदक, गरमागरम वरण-भात, पोळी, बटाटा भाजी, पंचामृत आणि सोबतीला मोदक आमटी ! अतिशय सात्विक आणि रुचकर अशा जेवणाला सर्वांची पसंती मिळाली.
🎶🎶 जेवणानंतर या भक्तिमय दिवसाला लाभली सुरांची सुंदर साथ—‘स्वर-रंग’ या कार्यक्रमामध्ये. 🎤 Austin, Texas येथून खास A2MM साठी आलेल्या गायिका Gore - Deshpande यांनी ‘ॐकार अनादी अनंत’, ‘मी राधिका’, ‘बोलावा विठ्ठल’ अशा भक्तिमय गाण्यांसोबतच , 'सुरत पिया की ' आणि नाट्यसंगीतातील विविध पदांचा सुंदर medley अशा वैविध्यपूर्ण, अवघड आणि भावसमृद्ध गीतांची निवड केली होती. प्रत्येक गीत त्यांनी विलक्षण सहजतेने आणि तितक्याच भावपूर्णतेने सादर केले. त्यांच्या गायनाला Giri Aigalikar यांच्या तबल्याची आणि Marathe यांच्या हार्मोनियमची सुरेल साथ लाभली. 🎶 Uma Kanade यांच्या ओघवत्या आणि समर्पक निवेदनाने या मैफलीतील प्रत्येक भाव अधिक खुलवला.
संगीताची मैफल संपली आणि पुन्हा सर्वांची पावले बाप्पांच्या चरणांकडे वळली. आरती आणि विसर्जनाच्या वेळी आरतीचा टाळ्यांचा नाद , ओठांवरचा “मोरया”चा जयघोष आणि मनात दाटून आलेली निरोपाची भावना—या सगळ्यांनी वातावरण भारावून गेले. बाप्पांना निरोप देताना जाणवले, की हा केवळ एका दिवसाचा उत्सव नव्हता; हा होता आपली संस्कृती, आपली भाषा, आपले संगीत आणि आपलेपणाची भावना पुन्हा एकदा जगण्याचा सोहळा. परदेशातील भूमीवरही मराठीपण मनात जिवंत ठेवणाऱ्या या उत्सवाने एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली—माती कितीही दूर असली, तरी संस्कृतीची नाळ मनाशी जोडलेली असेल, तर महाराष्ट्र आपल्यापासून कधीच दूर जात नाही.
बाप्पा आले… मनं जोडून गेले…आणि जाताना पुढच्या भेटीची आस देऊन गेले.
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!
शब्दांकन: Shrikant Bokil