तैवान मराठी मंडळ — या वर्षी महाराष्ट्रातून तैवानमध्ये नोकरी, व्यवसाय व शिक्षणानिमित्त आलेल्या हरहुन्नरी व्यक्तींनी स्थापन केले. तैवानमध्ये येणाऱ्या मराठी लोकांना आपलं एक हक्काचं व्यासपीठ मिळावं हा आमचा शुद्ध हेतू आहे. इथे येणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचा आमचा प्रयास असून परदेशात राहूनही आपल्या लोकांना घरपण लाभावं, यासाठी आम्ही विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम राबवत असतो.
तैवान मध्ये विद्यार्थी, संशोधक आणि व्यावसायिक कारणास्तव येणाऱ्या भारतीयांची संख्या मोठी असून यात मराठी लोकांची संख्या देखील अमुलाग्र आहे. संस्कृती हा आपल्या जीवनातील महत्वाचा भाग असून, ती जपणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे. त्यासाठी तैवान मराठी मंडळातर्फे दरवर्षी अनेक सांस्कृतिक कार्य्रक्रमांचं आयोजन करण्यात येतं. त्यामध्ये दिवाळी, गणेशोत्सव, होळी, मकरसंक्रांती, गुढी पाडवा असे विविध सण साजरे करण्यात येतात. दैनंदिन जीवन जगत असताना, सामाजिक बांधिलकी जपणं हे देखील महत्वाचं असून त्याकरिता तैवान मराठी मंडळ नेहमी आपलं योगदान देत आलेलं आहे. महाराष्ट्रात आलेला पूर असो किंवा भारतातील कोरोना महामारी असो, तैवान मराठी मंडळाने महाराष्ट्रातील आपल्या बांधवाना मदत पाठवत आपला खारीचा वाटा उचलला आहे.
“एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ”, या उक्तीप्रमाणे एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होत, भारतीय तसेच तैवानच्या सामाजिक क्षेत्रात योगदान देत, तैवान मराठी मंडळ आपले कार्य करत आहे