01/08/2026
१७ वर्षे...
भटकंतीची, सेवेची आणि सामाजिक बांधिलकीची...!!!
आज श्री दुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्ट, ठाणे आपल्या सेवाभावी प्रवासातील १७वे वर्ष पूर्ण करत आहे.
सतरा वर्षांपूर्वी एक छोटासा विचार मनात रुजला... भटकंती केवळ आनंदासाठी नाही, तर समाजप्रबोधनासाठीही असावी. त्या विचारातून जन्म झाला श्री दुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्टचा.
"पर्यटनातून प्रबोधन" या ब्रीदवाक्याला साक्षी ठेवत गेल्या १७ वर्षांत हजारो पावलांनी गडकोट चढले, असंख्य ट्रेक्स, गडसंवर्धन मोहिमा, घाटवाटा आणि वारसा जपणारे उपक्रम राबवले. प्रत्येक भटकंतीतून इतिहास जपण्याचा, निसर्गावर प्रेम करण्याचा आणि सामाजिक जाणिवा रुजवण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने केला.
मात्र दुर्गसखाचा प्रवास फक्त डोंगर-दऱ्यांपुरता मर्यादित राहिला नाही...
"एक पाऊल मानवतेकडे" या ध्येयाने प्रेरित होत शहापूर तालुक्यातील किमान २५,००० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत शालेय शिक्षण साहित्य पोहोचविण्याचे भाग्य आम्हाला लाभले. अनेक शाळांना आवश्यक शैक्षणिक साहित्य, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आणि गरज पडेल तिथे माणुसकीचा हात पुढे करण्याचा प्रयत्न आम्ही केला. कारण आमच्यासाठी समाजसेवा हा उपक्रम नाही... ती आमची जबाबदारी आहे.
आज मागे वळून पाहताना जाणवतं... ही वाट सोपी नव्हती. पण प्रत्येक कठीण वळणावर आमच्या पाठीशी उभे राहिले ते आमचे दाते, हितचिंतक, स्वयंसेवक आणि दुर्गसखा परिवारातील प्रत्येक सदस्य.
तुम्ही दिलेला विश्वास, वेळ, श्रम आणि सहकार्य यामुळेच आज हजारो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले, अनेक उपक्रम यशस्वी झाले आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची ताकद आम्हाला मिळाली.
हे यश आमचं नाही... हे आपल्या सर्वांचं आहे.
तुमच्या विश्वासाचे ऋण आम्ही कधीच फेडू शकणार नाही... आणि खरं सांगायचं तर त्या ऋणातून आम्हाला कधीच मुक्त व्हायचंही नाही. कारण हाच विश्वास आमच्या पुढच्या प्रत्येक पावलाची प्रेरणा आहे.
या १७व्या वर्धापन दिनानिमित्त श्री दुर्गसखा परिवारातील प्रत्येक सदस्य, दाते, हितचिंतक, स्वयंसेवक आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक आभार...!!!
चला... पुन्हा एकदा नव्या उमेदीने,
"पर्यटनातून प्रबोधन" आणि "एक पाऊल मानवतेकडे" हा विचार मनाशी बाळगत, गडकोटांची ओळख जपत आणि समाजसेवेचा दीप अधिक तेजाने प्रज्वलित करत पुढील प्रवास सुरू ठेवूया.
श्री दुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्टच्या १७व्या वर्धापन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!!
आपलाच,
-: श्री दुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्ट, ठाणे :-
#श्रीदुर्गसखा #पर्यटनातूनप्रबोधन #एकपाऊलमानवतेकडे