Think Maharashtra

Think Maharashtra महाराष्‍ट्रातील प्रज्ञा, प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्‍यासपीठ!

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ - महाराष्ट्राचे समग्र चित्र

ग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजाती

ल सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामतील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.

वेबसाइट हे कोणतीही माहिती तत्क्षणी जगभर पोचवण्याचे साधन आहे. वर्तमानपत्र, रेडिओ, टि.व्ही. चॅनेल्सच या माध्यमांच्या तुलनत वेबसाईटची माहिती साठवण्याची क्षमता मोठी आहे. त्यास ऑडिओ, व्हिडीओ अशा इतर माध्यमांची जोड देऊन माहिती अधिक परिणामकारतेने सादर करता येते. तसेच त्यात कोणताही मजकूर शोधून मिळवता येतो. तो कधीही सुधारता येतो. म्हणून 'व्हिजन महाराष्ट्रा'ने उद्दीष्टांच्या पूर्ततेसाठी इंटरनेट हे माध्यम निवडले.

वाढत्या ‘ग्लोबल’ वातावरणात ‘लोकल’ स्वरूप झपाट्याने नष्ट होत असल्याची भावना जगभर, प्रांतोप्रांती व देशोदेशी आहे. आपणास ‘थिंक महाराष्ट्र’मार्फत महाराष्ट्रीय समाजापुरता त्या भावनेचा आदर करून आपल्या प्रदेशाचे व संस्कृतीचे संचित जपण्याचे उपक्रम हाती घेता येऊ शकतील आणि तसे काम करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांचे कार्य समाजासमोर सातत्याने मांडता येईल. ही अभूतपूर्व कल्पना आपल्या काळात निर्माण झाली व विकास पावली याबद्दल प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल! कारण 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' हे मॉडेल ठरू शकेल व त्या धर्तीवर 'थिंक कर्नाटक', 'थिंक पंजाब', 'थिंक बंगाल', एवढेच काय 'थिंक स्वीडन', 'थिंक कोरिया' यांसारखे प्रयत्न त्या त्या समाजात आकार घेऊ लागतील.

‘थिंक महाराष्ट्र’ प्रकल्पाची व्याप्ती क्षितिजाएवढी आहे. कारण या प्रकल्पात महाराष्ट्रातील चांगुलपणा आणि प्रज्ञाप्रतिभा यांच्यामध्ये दुवा साधायचा आहे. त्या दृष्टीने वेबपोर्टलवर तीन प्रकारे माहितीचे संकलन केले जाते.

१. मराठी कर्तृत्वाची नोंद - समाजातील सर्वसामान्य माणसे त्यांच्या कर्तृत्वाने समाज घडवत असतात. परंतु अशा माणसांची उपेक्षा होते. दुसरीकडे लता मंगेशकर, शरद पवार, माधुरी दीक्षित-नेने, सचिन तेंडुलकर अशा सेलिब्रिटींची नावे समाजाचे कर्तृत्ववान प्रतिनिधी म्हणून घेतली जातात. त्या व्यक्तींना आदर्श म्हणून पाहिले जाते. प्रत्यक्षात असे अनेक आदर्श गाव-खेड्यांपासून शहरांपर्यंत विखुरलेले आहेत. त्यांच्यावर प्रसिद्धीचा लाईमलाइट पोचू न शकल्याने ते अज्ञात राहतात. सेलिब्रिटींसोबत मराठी समाजातील सर्व कर्तृत्ववान मंडळींची माहिती संकलित करून ती 'थिंक महाराष्ट्र'वर मांडली जात आहे. यामुळे सर्वसामान्यांतील आगळ्यावेगळ्या कर्तृत्वाची नोंद तर होईलच, पण सोबत सर्वसामान्यांमध्ये दडलेली ताकद-ऊर्जा व्यक्त होईल. त्यातून महाराष्ट्रीय समाजातील आत्मविश्वास जागा होऊन महाराष्ट्रीय माणसाचा न्यूनगंड नाहीसा होईल असा विश्वास आहे.

२. स्वयंसेवी संस्था व व्यक्ती यांच्या निरलस कार्याचा आढावा - महाराष्ट्राची ताकद कार्यकर्त्यांत आहे असे गांधीजी म्हणत. कर्नाटकाला सात ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले तर त्या काळात महाराष्ट्राला सात मॅगसेसे अॅवार्ड मिळणे स्वाभाविक ठरले. 2014 मध्येही महाराष्ट्राला दोन मॅगसेसे पुरस्कार लाभले! महाराष्ट्रभर स्वयंसेवी संस्थांचे जाळे आहे. त्यांचे काम, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे अर्थकारण ह्यांचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा मांडू शकलो व त्या क्षेत्रातील घडामोडी नित्य कळवू शकलो तर ते महत्त्वाचे काम होईल. संस्थांनाही अधिक बळ लाभेल. महाराष्ट्रात स्वयंसेवी पद्धतीने व्यक्तिगत व संस्थात्मक रीत्या बरेच मोठे सामाजिक कार्य होत असते. जर ते काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवू शकलो तर भोवतालच्या बजबजपुरी माजलेल्या परिस्थितीत किती चांगल्या आणि विधायक गोष्टी घडत आहेत हे दिसून येईल. यातून लोकांमध्ये आश्वासकता निर्माण होईलच, पण सोबत त्या कार्यातून व्यक्त होणारा सर्वात महत्त्वाचा घटक, चांगुलपणा, तोही लोकांना भावेल. एवढे मोठे सामाजिक काम होत असताना त्याचा समाजावर हवा तसा प्रभाव दिसून येत नाही. उलट, कार्यकर्त्यांची उपेक्षा होते. याप्रकारे व्यक्ती व संस्था यांच्या कामाचा आलेख सातत्‍याने समाजासमोर मांडला तर त्याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण होईल.

३. मराठी समाज व संस्कृती यांच्या वैभवाचे डॉक्युमेन्टेशन - महाराष्ट्राच्या गावोगावचे सांस्कृतिक वैशिष्ट्यं वेगवेगळे आहे. ते सारे वैभव प्रवाहित होत आपल्यापर्यंत येऊन पोचले आहे. उद्या ते टिकेल याची शाश्वती नाही. ते काळाच्या ओघात नामशेष होण्यापूर्वी आपण त्यांचे लिखित, फोटोग्राफी, व्हिडीओ आणि ऑडिओ रेकॉडींग अशा माध्यमांमध्ये त्यांचे डॉक्युमेन्टेशन केले तर ते उद्याच्या पिढ्यांना उपलब्ध करून देता येईल. याचा फायदा वर्तमान अभ्यासकांना आणि भविष्यातील समाजाला होईल. या उद्देशाने 'थिंक महाराष्ट्र'वर 'वैभव' या विभागात महाराष्ट्रातील गावोगावच्या ग्रामदेवता, यात्रा-जत्रा, येथील कला आणि कलाकार, प्रथा, परंपरा, किल्ले , बाजार, खाद्यसंस्कृती, सण-उत्स,व, गावांची माहिती, वन्यावैभव, प्राणीजीवन अशा विविध त-हेने माहिती संकलित करून मांडली जाते.

'थिंक महाराष्‍ट्र' प्रकल्‍पाबद्दल सविस्‍तर माहिती घ्‍या - https://www.thinkmaharashtra.com/about-think-maharashtra/

Address

15, Vardhaman Industrial Estate, Old Agra Road
Thane
400601

Opening Hours

Monday 10:30am - 7pm
Tuesday 11am - 7pm
Wednesday 10:45am - 7pm
Thursday 11am - 7pm
Friday 11am - 7pm
Saturday 11am - 7pm

Telephone

+919892611767

Alerts

Be the first to know and let us send you an email when Think Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Think Maharashtra:

Shortcuts

Share