31/07/2026
कलापिनीत “गुरुवंदना” कार्यक्रम साजरा
कलापिनी, तळेगाव दाभाडे इथे गुरुपौर्णिमा आणि कै. पुष्पलता अरोरा स्मृतिपुष्प गुरुवंदना २०२६ हा गुरुपौर्णिमे निमित्त केलेला कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात राखी भालेराव यांनी पाहुण्यांचे व प्रेक्षकांचे स्वागत करून झाली. त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री रविंद्र धारणे, डॉ. अनंत परांजपे, कार्याध्यक्षा अंजली सहत्रबुद्धे, उपाध्यक्ष अशोक बकरे, सहसचिव विनायक भालेराव या मान्यवरांच्या हस्ते नटराज पुजन करण्यात आले. नंतर कलापिनोचे उपाध्यक्ष श्री अशोक बकरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर कुमारभवन च्या मुलांनी “गुरूने दिला ज्ञानरुपी वसा “ आणि नयना डोळस यांनी नवे शब्द घालून तयार केलेले “ नादातून या नाद निर्मितो, श्री राम जय राम जय जय राम “ ही दोन गीते सादर केली. समीर महाजन आणि प्राची गुप्ते यांनी ही गीते या मुलांकडून तयार करून घेतली होती. यानंतर ज्योती गोखले यांचे “कबंध “ आणि केतकी लिमये यांचे “ माझी कुणाला किंमतच नाही “ या दोन एकपात्री सादर करण्यात आल्या.
लीना परगी यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देऊन त्यांचे स्वागत केले . उपाध्यक्ष अशोक बकरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर डॉ. परांजपे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की कलापिनी मधे बाल भवन गेल्या २५ वर्षापासून सुरू आहे. इथे पाच पाच रंगमंच उपलब्ध आहेत. तसेच बाल भवन, कुमार भवन, युवामंच, स्वाथ योग, महिलामंच या विविध माध्यमातून सगळ्या वयाच्या लोकांना इथे खूप काही शिकण्यासारखे आहे त्यांचा लाभ सगळ्यांनी घ्यावा.
गुरुपौर्णिमेनिमित्त आपण दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा करत असतो. श्री प्रतिक मेहता हे मुलांना प्रोत्साहन पर भेट वस्तू देत असतात. गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भेट वस्तू देऊन कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वतीने निरंजन थिटे, श्रीमय कुलकर्णी, गार्गी लंबाते आणि सुचिर देशमुख यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. सर्वांनी आपल्या मनोगतात आपण कलापिनीच्या बाल भवन, कुमारभवन मुळे घडलो, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला शिकलो व याचा फायदा पुढे कॉलेज जीवनामध्ये खूप झाला असे सांगून कलापिनी बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर प्र. पाहुणे रवींद्र धारणे म्हणाले की कलापिनी ही संस्था एका गुरुकुलसारखी संस्था आहे, इथे आलेला प्रत्येक जण सर्व काही शिकून तयार होतो. एखादी संस्था ५० वर्षे टिकून राहण्यासाठी खूप अडचणीना सामोरे जावे लागते त्या सगळ्या अडचणी योग्य व्यक्तीची निवड करून त्याच्यावर जबाबदारी टाकून ती अडचण दूर करण्याचे काम डॉ. परांजपे यांनी केले आणि करत आहेत. महर्षी व्यास यांच्या इतकेच महत्त्वाचे गुरु आपल्याला लाभले आहेत त्यांचा आणि त्यांच्या तील कलागुणांचा आपण लाभ करून घेतला पाहिजे आणि ही संस्था अशीच पुढे गेली पाहिजे असे सांगून त्यांनी कलापिनीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षासाठी खूप शुभेच्छा दिल्या. यानंतर कलापिनी मधे नव्यानेच सुरू होणाऱ्या “ संस्कृत पठण वर्ग” या बद्दल ची माहिती माधव आपटे यांनी दिली. त्यांनी सर्वांकडून मनाचे श्लोक म्हणून घेऊन या वर्गाची सुरुवात केली. त्याना पुष्प गुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच श्री संजय साखळे यांनी तळेगाव मधील काही निवडक व्यक्तिमत्व ज्यांनी तळेगावचे नाव खूप उंचीवर नेऊन ठेवले आहे अशा ७ दिवंगत आणि ८ विद्यमान व्यक्तींचे व्यक्तिचित्रण त्यांच्या “अस्तोदय “ या पुस्तकात केले आहे त्त्यांचाही सत्कार या प्रसंगी करण्यात आला आणि सर्वांना पुस्तक विकत घेण्यासाठी आवाहन करण्यात आले. यानंतर कलापिनीच्या युवा मंच ने वसंत कानिटकर लिखित “ बेईमान “ या नाटकातील एक प्रसंग नाट्यवाचन स्वरूपात सादर केला. सर्वांनी हे नाटक प्रत्यक्ष रंगमंचावर पाहायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली. विनायक भालेराव यांनी सर्वांचे आभार मानले आभार मानले.
कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी बाल भवन प्रमुख मधुवंती रानडे आणि बाल भवन प्रशिक्षिका यांनी उत्तम रीतीने पार पाडली. त्यांना लीना परगी,कलापिनीचे कार्यकर्ते आणि महिला मंच मधील सदस्यांची साथ मिळाली. ध्वनी संयोजन दिपाली जोशी, फोटोग्राफी हितेश शिंदे तर आसन व्यवस्था किशोर कसाबी यांनी पहिली. सरते शेवटी लाडूचा प्रसाद देऊन आणि श्लोक म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली .