22/07/2026
#सोलापुरातील_श्री_सिद्धेश्वर_तलाव_प्रदूषण_रोखण्यासाठी #वाईल्डलाईफ_कॉन्झर्वेशन_असोशिएश_संस्थेचा_पुढाकार
सोलापूर :
▪️सोलापुरातील गणपती घाट परिसरात दररोज अनेक दशक्रिया विधी पार पडतात. मात्र विधीनंतर कपडे, हार, नारळ, निर्माल्य तसेच अन्य पूजासाहित्य बाजूलाच असलेल्या श्री सिद्धेश्वर तलावात टाकले जात असल्याने तलावाच्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रदूषणामुळे तलावातील जैवविविधतेलाही मोठा धोका निर्माण झाला असून, मागील आठवड्यातच कासवासारख्या वन्यजीवांच्या मृत्यूच्या घटनाही घडत असल्याची बाब समोर आली आहे.
▪️या गंभीर पर्यावरणीय समस्येची दखल घेत वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशन, सोलापूर या पर्यावरणवादी संस्थेने जनजागृतीचा पुढाकार घेतला आहे. संस्थेच्या वतीने गणपती घाट परिसरात नागरिकांना प्रबोधन करणारे फलक लावण्यात आले आहेत. या फलकांद्वारे दशक्रिया विधीनंतर पूजासाहित्य, कपडे, हार, नारळ व निर्माल्य तलावात न टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
▪️संस्थेच्या मते, धार्मिक परंपरांचा आदर राखत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही प्रत्येक नागरिकाने स्वीकारणे गरजेचे आहे. तलावात टाकण्यात येणाऱ्या वस्तूंमुळे पाणी प्रदूषित होते, जलचर प्राण्यांचे जीवन धोक्यात येते तसेच तलावाचे सौंदर्यास हानी पोहचून नैसर्गिक संतुलन बिघडते. त्यामुळे पर्यावरणपूरक पद्धतीने निर्माल्य व इतर वस्तूंची विल्हेवाट लावणे ही काळाची गरज असल्याचे WCAS तर्फे नमूद करण्यात आले. यासाठी संस्थेचे अध्यक्ष अजित चौहान, सचिव संतोष धाकपाडे तसेच पर्यावरणप्रेमी सोमशेखर पाटील यांनी परिश्रम घेतले.
▪️पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत धार्मिक विधींसोबत पर्यावरण संरक्षणाची जाणीव ठेवून श्री सिद्धेश्वर तलाव स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Ajit Chauhan