Sinnar Nagar Parishad

Sinnar Nagar Parishad Sinnar Muncipal Corporation - Sinnar Dist. Nashik Maharashtra

28/04/2025

सिन्नरचा सुपुत्र पहिले बाजीराव पेशवे हे मराठी मातीला पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं.

छत्रपती संभाजी महाराजांच्या नृशंस हत्येनंतर महाराष्ट्रभूमीत जो जाज्वल्य यज्ञ उसळला, त्या यज्ञातुन निघालेले तेजस्वी अमृत म्हणजे थोरला बाजीराव पेशवा. त्या सत्तावीस वर्षाच्या धगधगत्या स्वातंत्र्य समरातून जे युद्धकौशल्य मराठ्यांना गवसले, ते संपुर्ण पचवून त्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा रणनायक समरधुरंधर म्हणजे थोरला बाजीराव पेशवा.

वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी आपल्या वडिलांसह दिल्लीच्या वेशीवर काही एका निश्चयाने उभा राहिलेला बाजीराव हे एक वेगळंच रसायन होतं.

विसाव्या वर्षी पेशवेपदाची वस्त्रे स्वीकारणाऱ्या बाजीरावाच्या मनात आपल्या उद्दिष्टांबद्दल किंचितही किंतु नव्हता. आपल्याला काय करायचं आहे हे ठरवू शकणारे डोके आणि जे ठरवलं ते राबवू शकणारे हात, दोन्ही गोष्टी बाजीरावकडे होत्या.

कोणत्याही युद्धात वैयक्तिक शौर्यापेक्षाही सैन्याचे संचलन जास्त महत्वाचे असते. युद्धातील विजय रणांगणावर लढून मिळवण्यापेक्षा शत्रूसैन्याची कोंडी करून मिळवणे जास्त सोयीचे आणि परिणामकारक असते. मात्र अशी जीवघेणी कोंडी करण्यासाठी कमालीचे कौशल्य, भान आणि अनुभव लागतो.

शिवराय किंवा बाजीरावासारखे सेनानायक बहुदा हे सगळं आईच्या पोटातूनच शिकून येतात. शिवरायांनी न लढता जिंकलेली उंबरखिंडीची लढाई आणि बाजीरावाने निजामाला पळवून, तडफडवून, पाण्यासाठी लाचार करत जिंकलेली पालखेडची लढाई हा व्यूहयुद्धातील मास्टरपीस समजला जातो.

अनेक युद्ध पाहिलेल्या व जिंकलेल्या पन्नाशीच्या निजाम असफजहाँला विशीतल्या बाजीरावाने ज्या पद्धतीने पळवून आणि दमवून हरवलं, ते बाजीराव नावाच्या चतुर सेनानायकाबद्दल व संयमी माणसाबद्दल खूप काही सांगून जातं.

बाजीरावाने आपल्या छोट्याश्या कारकिर्दीत लढलेल्या सगळ्या लढाया जिंकल्या, हे जितकं महत्वाचं आहे त्यापेक्षा त्याने मराठी साम्राज्य मध्य आणि उत्तर भारतात कायमस्वरूपी रुजवलं हे जास्त महत्वाचे आहे. बाजीरावानंतर कोणत्याही पेशव्याला आपले राज्य असे रुजवता आले नाही. अटकेपार गेलेले मराठे अवघ्या एका दशकात पुन्हा बाजीरावाने जिंकलेल्या भागात येऊन थांबले.

बाजीराव मला जास्त आवडतो तो दुसऱ्या कारणाने, बाजीरावाने साम्राज्यापेक्षाही माणसं रुजवली. शिंदे , होळकर, पवार आणि इतर कित्येक घराणी बाजीरावाने पेरली. मराठी स्वराज्याचे साम्राज्य ह्याच सुभेदारांनी, सरदारांनी केले. समाजाच्या सर्व थरांतून बाजीरावाने नेते घडवले. जो स्वतः आपल्या शक्तीबद्दल आश्वस्त असतो तोच असे नैतृत्व उभे करू शकतो. बाजीरावानंतर मधवरावांचा लहानसा अपवाद वगळता कोणत्याही पेशव्याला हे असे माणूस रुजवणे जमले नाही. बाजीरावानंतर उदयाला आलेले सगळे मोठे सरदार एखादा दुसरा अपवाद वगळता पेशव्यांचे नातेवाईक होते.

बाजीराव हा सैनिकाच्या घोड्याशेजारी घोडा दौडवणारा सेनानी होता. माधवरावांचा किंचित अपवाद वगळता, त्यानंतर कोणत्याही सत्ताधारी पेशव्याने हे केले नाही. हळूहळू पेशवेपद व ओघानेच छत्रपतींची गादी कमकुवत होतं गेली. मराठी साम्राज्याचे संघराज्य झाले. मराठा स्वराज्य लोकांच्या मनातून विरत गेलं, त्याची निव्वळ दौलत झाली.

28 एप्रिल 1740 साली अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी बाजीराव पेशवे कालवश झाले. बाजीरावांच्या मृत्यूबरोबरच छत्रपतींनी पाहिलेल्या स्वप्नाबरहुकूम असलेली मराठा साम्राज्याची वाटचाल मंदावली. बाजीरावांच्या मृत्यूनंतर नानासाहेबांच्या काळात मराठी साम्राज्य विस्तारले जरूर, पण त्या विस्ताराला बाजीरावांसारखी मोठ्या स्वप्नाची पार्श्वभूमी नव्हती.

छत्रपतींचा आणि बाजीरावाचा अकाली , अल्पावयात झालेला मृत्यू हे ह्या महाराष्ट्रभूमीचे ऐतिहासिक दुर्दैव आहे.

Address

Nagarpalika Road
Sinnar
422103

Telephone

2551-220029

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sinnar Nagar Parishad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share