08/01/2026
2025 मध्ये पुणे अंतर्गत एकूण 79 मृत्युपश्चात अवयवदान यशस्वीरीत्या पार पडले. ही कामगिरी केवळ संख्येपुरती मर्यादित नसून, समाजात अवयवदानाबाबत वाढत असलेली जाणीव आणि संवेदनशीलतेचे स्पष्ट प्रतीक आहे.
या पवित्र अवयवदानामुळे 200 पेक्षा अधिक गरजू रुग्णांना नवजीवन मिळाले. मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसे, हृदय यांसारखे महत्त्वाचे अवयव प्रत्यारोपणासाठी उपलब्ध झाल्याने अनेक रुग्णांना आयुष्याची दुसरी संधी मिळाली. मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी हे दान आशेचा किरण ठरले आहे.
अत्यंत दुःखाच्या क्षणी दात्यांच्या कुटुंबीयांनी घेतलेला हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी असून, एक दाता अनेक जीव वाचवू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ZTCC पुणे, वैद्यकीय तज्ज्ञ, समन्वयक आणि सहभागी रुग्णालयांच्या व संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही संपूर्ण प्रक्रिया यशस्वी होऊ शकली.
Komal New Life Foundation ,समाजाच्या प्रत्येक स्तरावर अवयवदान जनजागृती करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. शाळा-महाविद्यालये, सामाजिक संस्था, औद्योगिक क्षेत्र तसेच सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून अवयवदानाचा संदेश पोहोचवण्याचे कार्य संस्था करत आहे, ज्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडून येत आहे.
अवयवदान म्हणजे अमरत्व — आजचा निर्णय उद्याचे जीवन वाचवू शकतो.