महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा स्थापन करण्या पाठीमागे साताऱ्याची साहित्यिक चळवळ वाढावी आणि सातारा तालुक्यासह संपूर्ण जिल्हात निकोप साहित्यक वातावरण निर्माण व्हावे एवढाच स्वच्छ हेतू होता. आम्ही आरंभशूर नाही तर प्रत्येक उपक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यासठी प्रयत्न करणारे प्रामाणिक कार्यकर्ते आहोत, सुरवाती पासून आमच्या कामगिरीवरून दिसून येईल. पहिल्या वर्षापासून सातारा परिसरात साहित्यिक वातावरण
निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो. सुरवाती पासून आत्तापर्यंत चळवळ अधिक वृद्धिगत आम्हाला यश आले आहे. आम्ही दर वर्षी जे जे उपक्रम सुरु केले, ते ते सर्व उपक्रम पुढील वर्षीही यशस्वीपणे आयोजित केले आहेत. दर वर्षी त्या उपक्रमामध्ये काही स्तुत्य उपक्रमांची भरच पडली आहे, हे आम्ही आपल्याला अभिमानाने सांगू इच्छीतो.
सातारा जिल्हात जशी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे, तशीच नाट्य आणि साहित्यिक परंपराही मोठी आहे. साहित्यासम्राट न. चिं. उर्फ नरसिंह चिंतामण केळकर, कवी बा. सी. मर्ढेकर, राजकवी यशवंत, ना. ह. आपटे, कवी गिरीश, कवी विहंग, रघुनाथ पांडुरंग उर्फ दादासाहेब करंदीकर, डॉ. भीमराव उर्फ बाबासाहेब रामजी आंबेडकर, चंडीराम हरी पळणिटकर, समाजभूषण बाबूराव गोखले यांच्यासारख्या दिग्गज साहित्यिकांची परंपरा साताऱ्याला लाभलेली आहे. या सर्वांसारख्याच अनेक दिग्गज आणि मान्यवरांचे वास्तव्य सातारा शहर व तालुक्याला लाभलेले आहे. त्याचा आम्हाला अभिमान वाटतो.
साताऱ्याला असणारा साहित्यिक चळवळीचा समृद्ध इतिहास वृद्धिगत करण्याची जबाबदारी समस्त सातारकरांची आहे. हा वारसा पुढे न्यायाचा असेल तर तो कोणी एकटा घेऊन जाऊ शकत नाही. त्यासाठी पंढरपूरच्या आषाढी वारीला जशी भाविकांची दिंडी निघते आणि सर्वच वारकरी त्यामध्ये जात-धर्म-पंथ विसरून सहभागी होतात, अगदी तसेच सार्वजन साहित्यिक चळवळ वृद्धिगत करण्यासाठी पुढे आले पाहिजेत, अशी आमची आग्रही भूमिका आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेची स्थापनेनंतर आणि तिला रीतसर महाराष्ट्र साहित्य परिषदेने मान्यता दिल्यानंतर सातारा शहरात साहित्यिक वातावरण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ज्या वेळी सर्वत्र काळोख पसरलेला आसतो, त्यावेळी एका पणतीने दिलेला उजेडही मोठी आशा दाखवणारा ठरतो. अगदी तश्याच पद्धतीने एका पणतीचा उजेड देण्याचे काम आम्ही केले आहे. त्यास सातारकरांनी आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांनी आम्हाला पाठींबा दिला आमचे कौतुक केले. त्या बद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, सुसंस्कृत राजकारणी आणि साहित्यिक स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून महाराष्ट्रातील पहिला मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय शाहूपुरी शाखेने घेतला आणि सातारा पँटर्न म्हणूनही तो उदयास आणला आहे. त्यासाठी सातारा नगरपालिकेने दिलेले आर्थिक पाठबळ अतिशय मोलाचे ठरले आहे. मराठी भाषा पंधरवड्याचा कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येत आहे आणि असा कार्यक्रम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर जिथे जिथे मराठी माणसे राहतात तिथे तिथे व्हावा ह्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. हिंदी भाषा पंधरवड्याच्या धर्तीवर मराठी भाषा पंधरवडा शासनाने साजरा करावा यासाठी आम्ही पाठपुरावा आणि प्रयत्न करत आहोत.
शाहूपुरी शाखेतर्फे दर महिन्याला वाङ्मय मंडळांची संकल्पना मांडून तीही यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दि. १ ऑगस्ट २०१२ पासून वाङ्मय मंडळांच्या कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला आणि अव्याहतपणे हा उपक्रम दर महिन्याला सुरु आहे. त्यामुळे साताऱ्यातील कोणत्याही व्यक्तीला पुस्तकावर, साहित्य कृतीवर मोकळेपणाने चर्चा करण्यासाठी व्यासपीठ मिळाले आहे. ही सर्व जबाबदारी परिषदेचे मार्गदर्शक आणि सदस्य किशीर बेडकिहाळ सांभाळत आहेत. हा उपक्रम यशस्वी करण्यापाठीमागे त्यांचा मोलाचा वाटा असून त्यांचे सर्व श्रेयही त्यांचेच आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ यांनी आम्हाला सातत्याने पाठबळ दिले आहे. आमच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी ते आमच्या बहुतांशी कार्यक्रमाला हजर आसतात. एवढा कार्यक्षम जिल्हा प्रतिनिधी सातारा जिल्हाला मिळाल्याने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळत आहे. त्यांनी आम्हाला नेहमी सहकार्य केले असून त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरेच आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विविध उपक्रमांना विविध प्रकारचे सहकार्य मा. आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, संतोष यादव, प्रसन्न देशमुख, सलीम कच्छी, शिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी यांच्या सह विविध सहकारी संस्था आणि मान्यवरांनी दिले आहे. साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाहक नंदकुमार सावंत यांच्या सह दि गुजराथी अर्बन को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीच्या सर्व चमूने जोमाने आणि उत्साहाने शाखेच्या सर्वच कार्यक्रमांना सहकार्य ते यशस्वी केले आहेत. त्यांच्या सर्व चमूचा मी अत्यंत आभारी आहे. तसेच या सर्व कार्यक्रमांनसाठी सहकार्य करणारे कवी प्रमोद कोपर्डे, डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, पी.एन.जोशी, विश्वास दांडेकर, डॉ. राजेंद्र माने, अँड.मुकुंद सारडा यांच्यासह अनेक मान्यवरांचा आणि संस्थाचा हातभार आम्हाला लाभला आहे.
पारदर्शक कारभार करण्यावर आमचा भर राहिलेला आहे. त्यामुळे शाहूपुरी शाखेचा जमा-खर्चाचे लेखापरीक्षणही आम्ही चार्टर्ड अकौंटटमार्फत करून घेत आहोत. त्यासाठी चार्टर्ड अकौंटट अभिजित दिवेकर यांचे आणि दिशा विकास मंचचे संस्थापक-अध्यक्ष सुशांत मोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याचबरोबर साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि सभासदांनीही सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाची साथ दिली आहे. साहित्य क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, आमचे पाठीराखे, साहित्य परिषदेचे पदाधिकारी यापुढेही ते आम्हाला पाठींबा, आशीर्वाद देतील याचा विश्वास वाटतो.
विनोद कुलकर्णी,
अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य
परिषद पुणे, शाखा शाहूपुरी (सातारा)