24/09/2024
आजचा दिवस भ्रमंतीचा..!
मागील दोन-तीन दिवसांपूर्वी व्हाट्सॲपवर किल्ला स्वच्छता मोहिमेच्या संदर्भात माहिती वाचण्यात आली होती. या अंतर्गत एका एनजीओच्या वतीने किल्ला परिसर स्वच्छ करण्यात येणार होता. मुळात ही संकल्पना मला खूप भावली आणि या मोहिमेत सहभागी होण्याचा संकल्प केला. त्या अनुषंगाने मी आणि माझा मित्र प्रसाद आम्ही दोघांनी नियोजन करून रविवारी या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे ठरवले. या मोहिमेत साल्हेर किल्ल्याची निवड करण्यात आल्याने एक वेगळीच ओढ आम्हाला लागली होती. कारण आपल्या तालुक्यातील एक अत्यंत महत्वाचा आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणून साल्हेरचा ओळख असून हा किल्ला पाहण्याची आधीपासून इच्छा होतीच, शिवाय छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत जाऊन समृद्ध इतिहासाच्या पाऊलखुणा देखील अनुभवण्यास मिळणार होत्या. एकंदरीतच मी साल्हेरला कधी गेलो नव्हतो आणि आम्हा दोघांना साल्हेर किल्ला बघण्याचे कुतूहल हे होतंच, त्यामुळे हा योग जुळून आल्याने विशेष उत्सुकता मनात संचारली होती.
या किल्ला स्वच्छता मोहिमेसाठी सकाळी सात वाजेची वेळ आम्हाला एनजीओ मार्फत देण्यात आली होती. परंतु आम्हाला घरातून निघण्यासाठीच सात वाजले, तरीही इच्छाशक्ती असल्याने आम्ही कुठलाही विचार न करता लखमापूर येथील साई इंटरनॅशनल स्कूलपासून प्रवास सुरू केला. त्यांनतर सटाणा- मुंजवाड- चौंदाणे- दहिंदुले- केळझर धरण आरम नदि बॅकवॉटर परिसर मार्गे आम्ही साल्हेरवाडी येथे पोहोचलो. या प्रवासादरम्यान आम्ही रस्त्याने बरेच फोटो देखील टिपले. वातावरणात निसर्गाने अगदी मुक्तपणे आपल्या सौंदर्याची उधळण केली होती, हिरवी झालर पांघरलेल्या या धरणी मातेचे सौंदर्य मोबाईलमध्ये कैद करत साल्हेरवाडी म्हणजेच साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात आम्ही पोहोचलो. मुळात गावात पोहोचल्यावर तेथील पर्यटकांची गर्दी पाहून आम्ही भारावून गेलो. या काळात असंख्य पर्यटक येथील निसर्गाची सुंदरता आणि किल्ल्याची भव्यता पाहायला आवर्जून येत असतात, याबद्दल याआधी फक्त ऐकले होते, आज मात्र साक्षात्कार झाला.
इतर पर्यटकांप्रमाणे आम्ही देखील आमची कार गर्दीत जागा शोधून एका ठिकाणी पार्क केली आणि एका छोट्याशा हॉटेलमध्ये जाऊन चहा नाष्टा केला. तसेच येथील काही लोकांच्या आम्ही भेटीगाठी घेऊन एकूणच विविध विषयांवर चर्चा केली. यातील काही लोक किल्ला सर करून खाली उतरत होते, त्यांनाही भेटून त्यांचा अनुभव जाणून घेतला. विशेष म्हणजे नुकतेच युनेस्को ने आपल्या जागतिक पर्यटन स्थळांच्या यादीत साल्हेरचे देखील नाव समाविष्ट केले आहे. त्यानुसार युनेस्कोची टीम लवकरच येथे अभ्यासासाठी दाखल होणार आहे. ही एक सटाणा (बागलाण) तालुका वासियांसाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे या अनुषंगाने भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन देखील किल्ला संवर्धनासाठी प्रचंड मेहनत घेत आहे, याचीही प्रचिती येथे आली.
बऱ्याचशा संस्था, एनजीओ या ठिकाणी विविध मोहिमेसाठी आलेल्या होत्या. त्यामध्ये स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण तर काही संस्था या माहिती घेण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान येथील सर्व माहिती जाणून घेत आणि थोडी विश्रांती घेतल्यानंतर आम्ही किल्ला सर करण्यासाठी पुढे सरसावलो. यातील पहिला टप्पा आम्ही व्यवस्थितपणे पार केला आणि पहिल्या टप्प्यानंतर आम्हाला सपाटी लागली. या ठिकाणी वन विभागामार्फत बऱ्याच ठिकाणी चबुतरे बांधले होते. जवळच एक भलामोठा पाण्याचा टाका दृष्टीस पडला त्या तळ्याची संपूर्ण स्वच्छता करून घेतली.येथून वर बघितल्यावर किल्ल्याचे टोक हे ढगांनी वेढलेले असल्यामुळे स्पष्ट दिसत नव्हते. पण बऱ्याचशा लोकांना तिथे भेटल्यावर समजले की, ते येथे रात्रीपासून आले होते आणि किल्ल्यावरच त्यांनी मुक्काम करत हा परिसर आणि साल्हेर किल्ल्यावरील सौंदर्य डोळ्यात सामावले होते. अनेक दुर्गप्रेमी हे किल्ल्यावर मुक्कामाच्या तयारीनेच येत असतात. दरम्यान काही लोक अजूनही किल्ला सर करण्यासाठी पुढे पुढे सरसावत होते तर काही लोक खाली उतरत होते. त्यामुळे या ठिकाणी खूप गर्दी पाहायला मिळत होती.
एकंदरीतच किल्ल्याची जी उंची आहे ती आम्ही सर करू शकणार किंवा नाही याबद्दल शंका होती. शिवाय आम्ही कुठलीही तयारी न करता फक्त आनंद घेण्यासाठी आणि येथील माहिती जाणून घेत किल्ल्याची शक्य तेवढी स्वच्छता करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आलो होतो. येणाऱ्या काळात नक्कीच आम्ही पूर्ण तयारीनिशी येऊ आणि संपूर्ण साल्हेर किल्ला हा सर करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा एक भाग असलेल्या या किल्ल्यावरील सर्व गोष्टींची प्रत्यक्षात पाहणी करून सर्व गोष्टींचा अनुभव घेऊ.
या प्रवासादरम्यान रस्त्याने आम्हाला बरेचसे आदिवासी गाव नजरेस पडले. येथील डोंगररांगा, छोटी मोठी धरणे, तळे, ओसंडून वाहणारे निसर्गसौंदर्य आणि येथील शुद्ध हवा हे सर्व अनुभव मनाला अतिशय सुखावणारे होते. आम्ही त्या ठिकाणी सकाळी दहा वाजता पोहोचलो होतो. दरम्यान दहा वाजेपासून तर बारा वाजेपर्यंत आम्ही साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी वेळ घालवला आणि किल्ल्यावरील पहिल्या सपाटीपासून आम्ही खाली परतलो. त्यानंतर आम्ही साल्हेर किल्ल्याला वळण घेऊन ताहाराबादकडे जाणाऱ्या रस्त्याने परतीचा प्रवास सुरू केला. विशेष म्हणजे रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीचा असल्याने परतीचा प्रवास देखील सुखावह ठरत होता. पुढे आम्हाला वाघंबा गाव लागले, त्या गावाकडूनही साल्हेर किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता आहे, असं तेथील ग्रामस्थांकडून आम्हाला समजलं. पण सुंदर रस्ता, पायवाट आणि निसर्गाचे सानिध्य हवे असेल तर किल्ल्यावर जाण्यासाठी साल्हेरवाडी हाच सुंदर पर्याय आहे, असे आम्हाला जाणवले. वाघंब्याच्या मार्गाने देखील तुम्हाला निसर्गाचे सौंदर्य अनुभवण्यास मिळते, परंतु येथून वर जाणारा मार्ग हा थोडा खडतर असल्याचे तेथील ग्रामस्थांकडून समजले. दरम्यान परत येताना आम्ही चाफ्याचा पाडा आलियाबाद या मार्गाने येत होतो आणि सभोवतालचा परिसर देखील मोबाईलच्या माध्यमातून टिपत होतो. एकंदरीतच या टप्पा किल्ला भेट दौऱ्यादरम्यान खूप सुंदर फोटो आम्ही आमच्या मोबाईलमध्ये संग्रहित केले आहेत.
त्यानंतर हरणबारी धरणाकडे जाण्यासाठी आमचा पुढील प्रवास सुरू झाला. येथे पोहोचून. तेथील निसर्गसौंदर्य देखील कॅमेऱ्यात कैद करून येथील माहिती संकलित केली आणि ताहाराबाद - सटाणा मार्गे आम्ही लखमापूरला पोहोचलो. जाताना आम्ही कारचा वापर केला त्यामुळे पूर्ण परिसर न्याहाळता आला. खूप वेगळा अनुभव या भेटीतून आम्हाला आला. मुळात सध्या पावसाळा ऋतू सुरू असल्याने येथील परिसर अगदी फुलून उठल्याने आणि सर्वत्र धुक्याचे साम्राज्य पसरल्याने आम्ही काश्मीरमध्येच आलो असल्याचा भास वेळोवेळी होत होता. एकूणच नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विचार करता आपणास जर अत्यंत सुंदर परिसर आणि मनमोहक नजारा अनुभवायचा असेल तर नक्कीच साल्हेर किल्ल्याला भेट द्यावी, असे मला वाटते. तरी प्रत्येकाने या ठिकाणी आवर्जून यावं आणि आपला वेळ देऊन येथील समृद्ध इतिहास जाणून घ्यावा आणि निसर्गसौंदर्य डोळ्यात साठवून आपली पर्यटनवारी सार्थकी लावावी.