03/07/2025
*शिवशाश्वत फाउंडेशनच्या वारकरी आरोग्य सेवेची 'तपपूर्ती'*
यंदा सलग 12 व्या वर्षी साडे आठ हजार वारकऱ्यांना मोफत उपचार
सांगली / येथील शिवशाश्वत फाउंडेशनने आषाढी वारी पालखी मार्गावर आयोजित केलेले, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी मान्यताप्राप्त 'धन्वंतरी मोफत वारकरी आरोग्य सेवा शिबिर' नातेपुते येथे नुकतेच मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या संपन्न झाले. गेल्या ११ वर्षांपासून अखंड चालू असलेल्या या उपक्रमाने यावर्षी १२ वर्षांचा टप्पा पूर्ण केला. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर, वारकऱ्यांच्या आरोग्याच्या गरजा ओळखून, या शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात आळंदीहून पंढरपूरकडे पायी निघालेल्या ८५०० हून अधिक वारकऱ्यांना विविध प्रकारच्या मोफत आरोग्य सेवांचा लाभ मिळाला.
वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शिवशाश्वत फाउंडेशन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अग्रेसर राहिले. या शिबिरात वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी,औषधोपचार, तसेच व्रणांवर प्राथमिक उपचार अशा विविध निःशुल्क सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
या शिबिरामध्ये फाउंडेशनच्या अनेक अनुभवी डॉक्टर्स, आणि स्वयंसेवकांनी या समाजोपयोगी उपक्रमासाठी आपले मोलाचे योगदान देत दिवसभर अखंडित सेवा दिली. विशेषतः महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वैद्यकीय पथकाची व्यवस्था करण्यात आली होती.
डॉ सम्रजिता थोरात, डॉ अश्विनी खोत, डॉ अपर्णा डोंगरे, डॉ महेश करे, डॉ महेशकुमार ढाणे, डॉ संजय हेगाणा, डॉ अमर पागे, डॉ अनिता पागे, डॉ संजीव किनिंगे, डॉ प्राजक्ता ढोपे, डॉ विजया शेंडगे, कु तेजस्विनी दबडे,डॉ भिवा भाळे, डॉ शुभांगी गोरे, डॉ अमृता पाटील, श्रीमती सुरेखा गायकवाड या वैद्यकीय पथकाने सेवा बजावली. तर संजय वाघमोडे, सुनिल भुजबळ, राहुल कुलकर्णी, अक्षय गोरे, सागर शेंडे, संतोष वाघमोडे,ओंकार गोरे, निलेश शेंडे, रोहित गोरे, विशाल पेडकर, हृषिकेश ठोंबरे, अक्षय गोरे,सागर पवार,अविनाश गोरे, नाना आदलिंगे व सीए गोविंद डोंगरे यांनी स्वयंसेवक म्हणून योगदान दिले.
संपूर्ण शिबिराचे सुसूत्र नियोजन, शिस्तबद्ध सेवा वितरण आणि सेवाभावना यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.अशा प्रकारच्या आरोग्य शिबिरांमुळे वारीतील गरजूंना मोठा आधार मिळतो आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडते असे मत अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केले.
"वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आयोजकांना आत्मिक आनंद देते" असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष डॉ शिवकांत पाटील यांनी केले.
शिबिराच्या सांगता समारंभात, 'तपपूर्ती सोहळ्या'चे आयोजन केले गेले. यावेळी विविध भागांतून सहभागी झालेल्या डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी, स्वयंसेवक, स्थानिक नागरिक यांना सन्मानपत्र व हुबळी येथील राष्ट्रध्वज बनविणाऱ्या अधिकृत खादी ग्रामोद्योग संघातून मागविलेल्या 'तिरंगा माला' ने सन्मानित करण्यात आले. तसेच श्री चिदंबर मगदूम यांनी दिलेले 200 रेनकोट्स वारकऱ्यांना वितरित करण्यात आले
यावेळी सचिव डॉ प्रविण गोरे यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या देणगीदार, औषध कंपन्या, स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था, आणि माउलींच्या सेवेस वाहिलेल्या प्रत्येक सेवकाचे मनःपूर्वक आभार मानले. या शिबिरामुळे हजारो वारकऱ्यांची पंढरपूर वारी अधिक सुखकर होण्यास मदत झाली असून, शिवशाश्वत फाउंडेशनच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.