07/07/2026
" *सेवाध्यास- ज्ञान प्रबोधिनी आनंदी शिक्षण प्रकल्प वर्ष दुसरे २०२६-२७ "*
अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणणाऱ्या आनंदी शिक्षण या उपक्रमाची सुरवात खालील ५ शाळांमध्ये झाली .
१.महापालिका शाळा नंबर ६.टाकळी रोड ,
२.सारडा प्राथमिक शाळा,पेठ भाग ,सांगली
३.महापालिका शाळा नंबर ६
४.दत्त प्राथमिक विद्या मंदिर , नृसिंहवाडी
५.महापालिका शाळा नंबर ६,चांदणी चौक ,सांगली
सविस्तर माहिती नक्की वाचाच.......
विद्यार्थी चांगला घडला तरच चांगले राष्ट्र घडू शकते, हे ओळखूनच आज सेवाध्यास अनाथ, गरजू,होतकरू विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, खंबीर पणे त्यांच्या पाठीशी उभी आहे.
त्यांना शिक्षणासाठी लागणारे साहित्य असेल ,त्यांची शैक्षणिक फी असेल,त्याचे उत्तम करिअर घडवण्यासाठी ,विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ञांचे मार्गदर्शन त्यांना मिळावे, यासाठी सेवाध्यास विशेष कार्यरत आहे .
या प्रवासात आम्हाला एक महत्त्वाची गोष्ट प्रकर्षाने जाणवली—
गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, शैक्षणिक शुल्क किंवा आर्थिक मदत देणे आवश्यक आहेच; पण त्याचबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
कारण काही विद्यार्थी घरच्या किंवा आजूबाजूच्या परिस्थितीमुळे अभ्यासापासून दूर जातात, प्राथमिक अभ्यासाचा पाया कच्चा राहिल्याने पुढे शिक्षणाबद्दलची गोडीच कमी होत जाते आणि शिकणं त्यांच्यासाठी आनंददायक राहत नाही आणि
हीच गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शालेय संकल्पना सोप्या पध्दतीने शिकवणारी,त्यांच्या कौशल्यांचा विकास करणारी अशी एखादी शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांपर्यंत पोचावी असा विचार सेवाध्यास ने केला .
आणि अशा शिक्षण पद्धतीच्या शोधात असतानाच पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनी या संस्थेने विकसित केलेल्या आनंदी शिक्षण या प्रकल्पाची माहिती सेवाध्यासला मिळाली.
या शिक्षण पद्धतीचा विद्यार्थ्यांवर होणारा सकारात्मक परिणाम लक्षात घेऊन सेवाध्यास ने ज्ञानप्रबोधिनी च्या मदतीने हा प्रकल्प सांगली परिसरात राबविण्याचा संकल्प केला आणि
२०२५ _२६ या शैक्षणिक वर्षात हा प्रकल्प महानगरपालिका शाळा क्रमांक ६, टाकळी रोड, मिरज आणि सावईकर प्राथमिक शाळा, वडर कॉलनी, सांगली येथे वर्षभर यशस्वी रित्या राबविण्यात आला.
विद्यार्थ्यांना केवळ शिकवणे नव्हे, तर त्यांना शिकण्यात गुंतवून ठेवणे हा या सत्रांचा मुख्य उद्देश होता.
वर्गात आणि मैदानावर घेतलेल्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडींचा बारकाईने विचार करण्यात आला.
त्यांच्या भावविश्वाशी जोडणारे शब्द, गोष्टी आणि अनुभव वापरून शिकण्याची प्रक्रिया अर्थपूर्ण बनवली.
गाणी, कविता आणि आजूबाजूच्या वस्तूंच्या साहाय्याने सत्रे रंजक ठेवली गेली.
विविध खेळांमधून गणिताच्या संकल्पना सहज समजावून सांगितल्या, तर सभोवतालच्या गोष्टींमधून अक्षरओळख विकसित केली.
संगीत आणि कवितांच्या माध्यमातून मुलांचे लक्ष वेधून घेत, त्यांच्यात अभ्यासाची गोडी हळूहळू रुजवली.
चित्रांच्या माध्यमातून चर्चा घडवून आणणे, विद्यार्थ्यांना मोकळेपणाने बोलते करणे, तसेच काही निवडक वस्तूंवर आधारित गोष्टी तयार करायला प्रवृत्त करणे—या उपक्रमांनी त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि अभिव्यक्तीला चालना दिली.
अशा अनेक प्रयोगशील आणि सहभागात्मक पद्धतींमुळे शिकणे हा मुलांसाठी आनंददायी अनुभव ठरला.
सेवाध्यासने या उपक्रमासाठी सामाजिक सेवेची जाणीव असलेले, मुलांशी छान संवाद साधू शकणारे व त्यांच्या भावनांची समज असलेले शिक्षक मानधन तत्त्वावर नियुक्त केले, त्यांना ज्ञानप्रबोधिनी कडून आवश्यक प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात आले.
प्रबोधिनीने उपलब्ध करून दिलेले सराव आणि शिक्षकांसाठीचे मार्गदर्शक पुस्तक यांचा अत्यंत परिणामकारक वापर करण्यात आला.
या प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष परिणाम जाणून घेण्यासाठी आम्ही शाळेला भेट दिली.
तेथे मुख्याध्यापक आणि पालक यांच्याशी संवाद साधला.
मुलांशी संवाद साधून त्यांच्या वर्तनातील अपेक्षित बदल आणि शाळेबद्दलची वाढती ओढ याचे मूल्यमापन केले.
अभिप्राय सकारात्मक मिळाला असून मुलांमधील बदल स्पष्टपणे जाणवले.
या यशस्वी प्रतिसादामुळे आमचा उत्साह वाढला असून, आम्ही या शैक्षणिक वर्षात हा उपक्रम जास्तीत जास्त शाळांमध्ये सुरू करण्याचा संकल्प केला ,तसा हा उपक्रम खर्चिक असल्याने थोडी काळजी होती पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमच्या मित्र परिवारानेच याचे शिवधनुष्य उचलले आणि बघता बघता या प्रकल्पासाठी तब्बल २ लाख रुपये उभे राहिले ,आणि आम्ही हा उपक्रम आता ५ शाळांमध्ये सुरू केला आहे.
आमच्या या कार्याला आजवर जी मोलाची साथ लाभली, ती तुमच्यासारख्या सेवाभावी मित्रांची, समाजातील सुसंस्कृत व्यक्तींची आणि सेवाध्यासच्या पुरस्कर्त्यांची—यासाठी आम्ही आपल्या सर्वांचे मनःपूर्वक ऋणी आहोत.
आम्हाला शाळांमध्ये उपक्रमा साठी संधीदिल्या बद्दल मुख्याध्यापक ,श्री गावडे सर,चौगुले मॅडम, पेटकर मॅडम,गोरे मॅडम,कुंभार मॅडम , सहकारी शिक्षक सुशांत निकम सर यांचे मनःपूर्वक आभार .🙏
तुमच्या या सहकार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उजळू शकते , मूल शैक्षणिक प्रवाहात राहिली तर बाल गुन्हेगारी ,व्यसनाधिनता याला सुद्धा आपोआपच आळा बसेल.दुर्लक्षित शाळांची घडी बसण्यास मदत होईल.
आपण सर्वजण एकत्र आलो, तर शिक्षणाची ही ज्योत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल, यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.
भविष्यात प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. यथा शक्ती असेच सहकार्य करत रहा..
धन्यवाद🙏
सेवाध्यास परिवार