Srushti Foundation, Roha, Raigad. सृष्टी फाउंडेशन, रोहा

  • Home
  • India
  • Roha
  • Srushti Foundation, Roha, Raigad. सृष्टी फाउंडेशन, रोहा

Srushti Foundation, Roha, Raigad. सृष्टी फाउंडेशन, रोहा Srushti Foundation, Roha, Raigad.
सृष्टी फाउंडेशन, रोहा

रोहे नगरिच एक उत्तुंग प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आमचे स्नेही मगर्दर्शक सन्मानीय *सुखद राणे* याना सुवर्ण महोत्सवी (५०)जन्म...
13/01/2022

रोहे नगरिच एक उत्तुंग प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आमचे स्नेही मगर्दर्शक सन्मानीय *सुखद राणे* याना सुवर्ण महोत्सवी (५०)जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा आपणास उदंड आयुष्य लाभो हीच श्री.धावीर महाराजांच्या चरणी प्रार्थना...!!
त्यांच्या जन्मदिनानिमित्त घेतलेला कार्याचा आढावा

*जन्म* - शुक्रवार १३ जानेवारी १९६७

*ठिकाण* - वाडिया हॉस्पिटल, मुंबई

*शिक्षण* - बालवाडी ते चौथी, ●सरस्वती विद्या मंदिर उल्हासनगर ४, जिल्हा ठाणे
●पाचवी ते दहावी, कानसई हायस्कुल, अंबरनाथ, जिल्हा ठाणे
●रबर टेक्नॉलॉजि शिक्षण, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंबरनाथ, जिल्हा ठाण

*नोकरी* -
●१९८४ ते १९९० पुणे
●१९९० ते २०११ निरलॉन, धाटाव, रोहा
●२०११ ते २०१३ व्यवसाय सल्लागार
●२०१३ ते २०१७ रायडर ट्रान्स, इंदूर, मुख्य व्यवस्थापक

*नोकरीतील विशेष उल्लेखनीय*
१) १९८४ साली लॅब असिस्टंट पदापासून सुरवात करून पुढे ज्युनियर सुपरवायझर, सिनियर सुपरवायझर, असीस्टंट मॅनेजर, मॅनेजर ते आज इंदूरच्या कंपनीचे प्रमुख अशी वाटचाल
२) व्यवस्थापना मधील माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी समूहातील फ्रांस आणि ऑस्ट्रीया देशातील कंपन्यांचे अभ्यास दौरे
३) समूहातील चीन देशात असणारा कारखाना उभारणीसाठी दौरे आणि मोलाचे योगदान

*छंद*
१) दुर्गभ्रमण, गिर्यारोहण
२) सायकलिंग
३) लिखाण
४) सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग
५) गडकिल्ल्यांचे छायाचित्र प्रदर्शन आणि व्याख्यान

*छंदांमधील विशेष उल्लेखनीय कार्य*

१) दुर्गभ्रमण, गिर्यारोहण
●१९८५ ते आज पर्यंत गेली ३२ वर्षे सक्रिय सहभाग.
●१९८९ ठाणे जिल्ह्यात निसर्ग गिरिभ्रमण संस्थेची स्थापना.
●१९९० रोहे शहरात गिर्यारोहणाची मुहूर्तमेढ रोवली.
●२००० रोहे शहरात सृष्टी फाउंडेशन संस्थेची स्थापना.
●सह्याद्री मधील १५० किल्ल्यांची भटकंती.
●२५ वर्षे युथ क्लब महाड सोबत रायगड प्रदक्षिणेत सहभाग.
●किल्ल्यांच्या माहितीचे आणि छायाचित्रांचे संकलन.
●रायगड जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये आणि शाळांमध्ये व्याख्याने आणि छायाचित्र प्रदर्शने.
●जिल्ह्यातील प्रमुख दैनिके आणि विशेषांकात किल्ल्यांविषयी लेख.
●तरुणांच्या सहभागासाठी विशेष योगदान.

२) सायकलिंग
●१९८२ ते १९९० सायकल स्पर्धांमध्ये सहभाग
●१९९२ मुंबई कन्याकुमारी मुंबई ४००० कि.मी. सायकल प्रवास. उद्देश - इंधन वाचावा पृथ्वी वाचवा प्रचार
●१९९५ अष्टविनायक दर्शन ६०० कि.मी. सायकल प्रवास. उद्देश - ग्रामीण जीवन आणि संस्कृती अभ्यास
●२०१३ इंदूर मुंबई रोहा ८०० कि.मी. सायकल प्रवास. उद्देश - शून्य कचरा जीवनशैली प्रचार

३) लिखाण
●दैनिक रायगड टाइम्स - प्रासंगिक आणि वृत्त संकलन
●दैनिक पुढारी - पुरवण्या आणि दिवाळी विशेषांक
●दैनिक लोकमत - प्रासंगिक आणि वृत्त संकलन
●साप्ताहिक क्रांतिवादी - सह्याद्रीच्या पाऊलवाटा स्तंभ लेखन
●दुर्ग भ्रमंती अनुभव

४) सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम
●१९९३ च्या किल्लारी भूकंपात उध्वस्त झालेल्या गावांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम केले
●रोहे शहरात झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या संमेलन आयोजनात सक्रिय सहभाग, यातून उभ्या राहिलेल्या स्पंदन संस्थेच्या उभारणीत मोलाचे योगदान.
●रोहे शहरात झालेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलन आयोजनात सक्रिय सहभाग, यातून उभ्या राहिलेल्या कोमसाप रोहा शाखेची अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळत आहे.
●दादर मुंबई येथे झालेल्या कोमसाप रौप्य महोत्सव संमेलन आयोजनात सक्रिय सहभाग.
●पहिले मराठी एव्हरेस्ट वीर सुरेंद्र चव्हाण यांचा सृष्टी फाउंडेशन तर्फे रोहे शहरात सत्कार.
●रसिकहो या ७०० सदस्य असणाऱ्या सांस्कृतिक चळवळीत गेली १० वर्षे सक्रिय सहभाग.
●रोटरी क्लब या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सामाजिक संस्थेच्या रोहा शाखेचे संस्थापक सदस्य
●रोहे नगरपरिषद शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आयोजन सुकाणू समिती सदस्य

५) गडकिल्ल्यांचे छायाचित्र प्रदर्शन आणि व्याख्यान
●२४ डिसेंबर १९९८ एस एस निकम हायस्कुल, माणगाव
●०८ जून १९९९ सी.डी. देशमुख कॉलेज रोहा, एन.एस.एस. कॅम्प, आर.आई.आर.सी. हॉल धाटाव
●०१ डिसेंबर २००२ आई.पी.सी.एल. टाऊनशिप
●०६ फेब्रुवारी २००३ लक्ष्मी शालिनी महिला महाविद्यालय पेझारी, एन.एस.एस. कॅम्प, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक वडघर, माणगाव
●१४ नोव्हेंबर २००३ निरलॉन स्टाफ कॉलनी, धाटाव
●२९ नोव्हेंबर २००३ कोमसाप शाखा मुरुड, दरबार हॉल मुरुड
●२० नोव्हेंबर २००४ कोमसाप शाखा महाड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर शहर सभागृह महाड
●२९ जानेवारी २००५ कल्पतरू मित्र मंडळ नाते, श्री.स.अ.म. विद्यालय नाते
●२९ डिसेंबर २००५ सी.डी. देशमुख कॉलेज रोहा, एन.एस.एस. कॅम्प, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक वडघर, माणगाव
●१५ ऑगस्ट २००६ सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय शहाबाज, प्राथमिक शाळा शहाबाज
●२८ ऑगस्ट २००९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ रोहा
●जे.एम.राठी स्कुल रोठ
●२१ डिसेंबर २०१२ सी.डी. देशमुख कॉलेज रोहा, एन.एस.एस. कॅम्प,
●३१ डिसेंबर २०१२ टाटा विद्यालय भिरा
●१४ जानेवारी २०१६ अभिनव रोहा, मारुती चौक रोहा
●०१ मे २०१६ रोहा अष्टमी नगर परिषद शतकोत्तर सुवर्ण महोत्सव, जेष्ठ नागरिक सभागृह रोहा
●०७ सप्टेंबर २०१६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आमडोशी रोहा
●२८ डिसेंबर २०१६ पढवण वाली पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे, पढवन माध्यमिक विद्यालय, पढवन, तळा

*निगडित संस्था*
●अध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषद, रोहा शाखा
●संस्थापक, सृष्टी फाउंडेशन, रोहा, रायगड
●संस्थापक सदस्य, स्पंदन नाट्य संस्था, रोहा, रायगड
●संस्थापक सदस्य, निसर्ग गिरिभ्रमण, ठाणे
●संस्थापक सदस्य, रोटरी क्लब रोहा शाखा
●संस्थापक सदस्य, रसिकहो परिवार, रोहा, रायगड

*पुरस्कार आणि सन्मान*
●मुंबई मराठी पत्रकार संघाचा पर्यावरण विषयी लिखाणासाठी डहाणूकर पुरस्कार
●दुर्गभ्रमण छंदात विशेष उल्लेखनीय कार्यासाठी रोहे शहरात झालेल्या कोमसाप केंद्रीय साहित्य संमेलनात रायगडचे गुणवंत पुरस्काराने सन्मानित.
●इंदूर ते रोहा सायकल प्रवास करताना शून्य कचरा संकल्पना प्रचार करण्यासाठी कुंडलिका नागरी पतपेढी रोहा तर्फे विशेष सन्मान.
●इंदूर ते रोहा सायकल प्रवास करताना शून्य कचरा संकल्पना प्रचार करण्यासाठी जेष्ठ नागरिक संघ रोहा तर्फे विशेष सन्मान तसेच अभिनव रोहा संस्थेच्या वतीने डॉ.चिंतामणराव देशमुख जयंती निमित्ताने गड किल्ले माहिती संवर्धन प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विशेष पुरस्कार.
शुभेच्छुक - ऍड.हर्षद राम साळवी
(संस्थापक/अध्यक्ष-अभिनव रोहा)

https://youtu.be/0jTNz9xVBJ8 गडदुर्ग अभ्यासक, रायगड भूषण पुरस्कार प्राप्त सुखद राणे यांच्या सोबत सुरेल गप्पांचा 'सुखद' ट...
11/10/2021

https://youtu.be/0jTNz9xVBJ8
गडदुर्ग अभ्यासक, रायगड भूषण पुरस्कार प्राप्त सुखद राणे यांच्या सोबत सुरेल गप्पांचा 'सुखद' टप्पा, अनुभूती गडदुर्ग भ्रमंतीची, अनुभवा सलाम रायगडच्या 'माऊथ टू माऊथ' या विशेष कार्यक्रमात .! पाहावी अशाच मुलाखती फ़क्त सलाम रायगड'वर..! संकलन : अक्षय जाधव, रोहा विशेष सहाय्य : रविंद्र कान्हेकर, सामी डबीर, सुयोग जाधव

टीप : कृपया इयरफोन किंवा हेडफोन लावून ऐकावे

दुर्ग अभ्यासक सुखद राणे यांच्या सोबत दुर्ग 'भ्रमंती'

*मनःपुर्वक आभार!*🙏🙏*आदरणीय खासदार मान. नामदार श्री. सुनीलजी तटकरे साहेब व मान. नामदार कु. आदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड...
16/08/2021

*मनःपुर्वक आभार!*🙏🙏
*आदरणीय खासदार मान. नामदार श्री. सुनीलजी तटकरे साहेब व मान. नामदार कु. आदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड* यांच्या प्रमुख उपस्थितीत व *आमदार मान. श्री. अनिकेतभाई तटकरे* यांच्या संकल्पनेतून *७५ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमीत्त रोह्यातील विविध ७५ सामाजिक संस्थांना ध्वजारोहणाचा मान रोहा अष्टमी नगर परिषदेकडून देण्यात आला. अत्यंत नियोजनबद्ध एकाच वेळी ठरलेल्या वेळेत ७५ झेंडे फडकवुन भारतमातेला मानवंदना देण्यात आली. आजच्या अभुतपूर्व सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रातील गडकिल्ले यांचा अभ्यास करणाऱ्या रोहे अष्टमी शहरातील "सृष्टी फाउंडेशन" या आपल्या संस्थेस ७४ क्रमांकाच्या ध्वजस्तंभावर ध्वजारोहण करण्याचा सन्मान मिळाला त्याबद्दल आयोजकांचे मनापासून धन्यवाद त्याच बरोबर या सोहळ्यास उपस्थित राहणारे, घरातून निघूनही ऐनवेळी पावसामुळे पोहचू न शकलेले आणि महत्वाच्या कामांमुळे मनात असूनही येऊ न शकलेल्या आपल्या परिवारातील सर्वांचे मनापासून आभार, आपल्या सर्वांमुळे हा सोहळा दिमाखदार झाला, सर्वांचे पुन्हा एकदा आभार*🙏🏻🙏🏻
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*महावटवृक्ष - पेमगिरी*१६-१७ मे २०१९ काही कामानिमित्त खेड मंचर भागात होतो, नियोजित वेळापत्रकात थोडा मोकळा वेळ उपलब्ध होता...
21/05/2019

*महावटवृक्ष - पेमगिरी*
१६-१७ मे २०१९ काही कामानिमित्त खेड मंचर भागात होतो, नियोजित वेळापत्रकात थोडा मोकळा वेळ उपलब्ध होता, मोकळा वेळ म्हणजे जवळपास असणाऱ्या किल्ल्यांना भेट देणे आलेच, त्या नुसार १६ मे रोजी इंदुरी मधील दाभाडे गढी आणि चाकण मधील संग्रामदुर्ग सोबत देहू मधील भंडारा डोंगर, तुकाराम महाराज मंदिर आणि गाथा मंदिर यांना भेट देऊन अवसरी गाठले होते, १७ मे रोजी संध्याकाळी कार्यक्रम असल्याने दिवस मोकळा होता, या वेळेत शिवनेरी लेण्याद्री आणि ओझर भेटीचे नियोजन केले होते, सकाळी सहा वाजताच अवसरी सोडले, नारायणगाव सोडले आणि एके ठिकाणी नाष्टा करण्यास थांबलो, नाष्टा करून पुढे निघालो आणि लक्षात आले की आपण चुकलो, जुन्नर साठी नारायणगाव मधून जावे लागते, पण आम्ही चांगलेच पुढे आलो होतो, नियोजनात वेळ मिळाल्यास संगमनेर जवळील पेमगिरी येथे असणारा शहागड बघण्याचे मनात होते, आता संगमनेरच्याच वाटेवर आहोत तर आधी पेमगिरी गाठण्याचे ठरले, पेमगिरी हे रोह्यातील निरनिराळ्या संघटनांमध्ये माझ्या सोबत सक्रिय असणाऱ्या ललित डुबे याचे गाव, ललितने त्याच्या पेमगिरीचे खूप कौतुक केले होते, तिथे असणाऱ्या शहागड संदर्भात माहिती दिली होती, त्याच बरोबर गावात एक वडाचे प्राचीन झाड असल्याचे त्याने सांगितले होते, वडाच्या झाडाची ललितने अगदी भावनिक होऊन माहिती दिली होती, मजल दरमजल करीत आम्ही पेमगिरीत आलो, ठरल्या प्रमाणे शहागडास भेट दिली, किल्ला बघून गावात आलो तर वाटेत थोड्या थोड्या अंतरावर पेमगिरी महावटवृक्ष असे दिशादर्शक फलक दिसू लागले, कुणालाही न विचारता आम्ही वटवृक्षाच्या जवळ येऊन पोहोचलो, प्रथम दर्शनीच लक्षात आले की हे वडाचे झाड नसून खराखुरा महावटवृक्ष आहे, वटवृक्षाचा अवाढव्य पसारा बघून खरंतर हबकलोच होतो, जगभर फिरलो पण असा महावटवृक्ष पहिल्यांदाच बघत होतो, ललित माहिती सांगताना इतक्या उत्सुकतेने का सांगायचा याचा प्रत्यय येत होता, पेमगिरी मधील हा महावटवृक्ष म्हणजे खरोखर निसर्गाचा चमत्कारच आहे, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी महावटवृक्षाचे मनोभावे दर्शन घेतले आणि मनोमन ललित डुबे चे आभार मानत आम्ही पेमगिरी मधून प्रस्थान केले

अंधारबन ट्रेक - रविवार, दि. १२ फेब्रुवारी २०१७गुजरात पासुन कर्नाटक पर्यंत पसरलेल्या उंच सह्याद्रि डोंगर रांगांनी घाट आणि...
21/02/2017

अंधारबन ट्रेक - रविवार, दि. १२ फेब्रुवारी २०१७

गुजरात पासुन कर्नाटक पर्यंत पसरलेल्या उंच सह्याद्रि डोंगर रांगांनी घाट आणि कोकण एकमेकांपासुन दूर केले आहेत. उंचावरील घाटमाथ्यापासुन खाली कोकणात येण्याकरता या सह्य पर्वतांवर अनेक ठिकाणी 'घाट' मार्ग व पायवाटा आहेत. अशीच एक घाटमाथ्यावरील 'पिंपरी' पासुन (ताम्हीणी-लोणावळा रस्त्यावरील खेडे) कोकणातील 'पाटणुस' (टाटाच्या भिर्‍याजवळील विज निर्मिती केंद्रालगतचे गांव) पर्यंत उतरलेली पायवाट आहे. ह्या कडेकपारीतुन, दर्‍यांच्या कडेकडेने, अनेक ओढे-नाले व जलप्रपात उल्लंघुन, घनदाट जंगलातुन नेणार्‍या मार्गावरचा ट्रेक म्हणजेच 'अंधारबन ट्रेक' !!

ह्या सुंदर ट्रेकबद्दल ऐकुन होतो, थोडे वाचलेही होते. त्यामुळेच 'युथ क्लब'-महाड च्या मीत्रांकडुन ट्रेकला येता काय ? नव्हे याच असा सांगावा आल्यावर ठरवले की ही संधी चुकवायची नाही आणि लगेच हो म्हणालो !

आमच्या रोह्याच्या 'सृष्टि प्रतिष्ठान' समुहात विचारले तेव्हा सुरुवातीस थंडा प्रतिसाद होता. पण सख्खे शेजारी आशीष शहा ह्या उत्साही माणसाने दहा जणांना तयार केले आणि नंतर सृष्टिचे सुखदजी राणे स्वतः येत आहेत कळल्यावर आणखी दहा निघाले !

असे एकवीस जण रोह्याहुन सकाळी सहाला निघालो व ताम्हीणी घाटाच्या सुरुवातीस असलेल्या, ठरलेल्या धाब्यापाशी थांबलो. येथे आम्हाला महाड, पेण, पनवेलचेही सभासद येउन मिळाले. चहा-नाष्ता करुन आम्ही साठ 'ट्रेक वीर' पुढे निघालो.

लोणावळा रस्त्यावरील 'पिंपरी' गांवाच्या अलीकडे असलेल्या तलावाशेजारील ठरलेल्या ठिकाणी गाड्यांतुन उतरलो. येथे प्रत्येकाने स्वतःचा थोडक्यात परिचय करुन दिला, समुह मार्गदर्शकांकडुन सुचना मिळाल्या व साडे नउला 'अंधारबन ट्रेक' सुरु झाला.

'सोपा' प्रकारातील ह्या ट्रेकची सुरुवात सपाट वाटेने झाल्याने सगळे रमत-गमत चालले होते. दर्‍यांच्या कडेकडेने, इंग्रजी 'यु' च्या आकाराची वळणे घेत जाणार्‍या वाटेने जाताना खाली खोलवर कोसळत जाणारे डोंगर व दाट हिरवी वनराई यांचे दृष्य भीषण तरीही नयन रम्य होते. अशाच एका 'यु' आकाराच्या वळणावर लांबवर, खाली कोकणातील 'भिरा धरणा'चे बॅक वाॅटर स्पष्टपणे दिसले.

एकच्या सुमारास 'हिरडी' हे तुरळक लोकवस्तीचे खेडे लागले. एव्हढ्या संपुर्ण ट्रेकवर हे खेडे सोडल्यास कुठे मनुष्य वस्ती लागत नाही की पिण्याचे पाणी मिळत नाही.

तसे पावसाळ्यांत येथे पाण्यांनी वाहणारे, जागोजाग लागणारे असंख्य ओढे-नाले लागतात. पण मुळात भर पावसाळ्यांत असे ओढे ओलांडणे कठीणच नाही तर धोकादायकी ठरु शकते. तेव्हा पावसाळ्यात हा ट्रेक करणे अशक्यच. पावसाचा जोर कमी झाला की, पंधरा आॅगस्ट नंतर हा ट्रेक करणारेही आहेत. आदर्श काळ म्हणजे सप्टेंबर-आक्टोबर महिने.

'हिरडी' गांवातील एका विशाल वृक्षाच्या छायेत सगळे विसावले. येथे 'पोळी-भाजी-ठेचा' असे साधेसे पण रुचकर असे जेवण झाले, ताजे तवाने झालो ! गावात घरे बरीच दिसली पण वावर असलेली घरे कमीच दिसली. अनेकजण पोटा-पाण्या करता शहरांत विखुरलेली आहेत. जवळील गांवात जायचे असेल तर अथकपणे दोन-अडीच तास चालण्या शिवाय पर्याय नाही. एकतर घाटावरील 'पिंपरी' गांवात जायचे किंवा खाली कोकणात 'पाटणुस'ला ! पावसाळ्यात तर हे खेडे जायचे-यायचेे मार्ग बंद झालेल्या एखाद्या निर्जन बेटासारखे होत असणार ! येथे रहाणार्‍यांचे जीवन फार कष्टदायी आहे हे उघडच आहे !!

हिरडी गांवापासुन जवळच रोह्याची 'जिवनदायी' असलेल्या 'कुंडलिका' नदिचे उगम स्थान आहे असे समजले व चौकशी करुन तीथे कसे जायचे ते विचारुन घेतले व आम्ही मोजकेच दर्शनाला निघालो.

शंकराचे स्थान आहे, वर पत्र्याचे छप्पर आहे, समोर नंदी आहे, देवळापुढे छोटा तलाव आहे, छोटेसे आहे पण नक्कीच प्राचीन स्थान असावे. महादेव मंदिर प्रवेशद्वाराच्या डावीकडे, नंदीला समांतर असे छोटे कुंड आहे. या कुंडात असलेल्या गोमुखातुन पाण्याची संतत धार कुंडात पडत असते, हि धारा म्हणजेच 'कुंडलिका' नदिचा उगम असे सांगीतले जाते. हे पाणी स्वच्छ आणि चविष्ट होते. शंकराच्या पिंडीला नमन केले, कुंडातील पाणी जवळील बाटल्यांत 'तीर्थ' म्हणुन घेतले आणि 'हर हर महादेव ! शंभो शिवशंकर !!' चा गजर करुन पुढचा मार्ग अनुक्रमला.

'हिरडी' सोडले की लगेचच उतार सुरु होतो तो थेट 'भिरा धरण' येई पर्यंत. खाच खळगे व बारीक गोल दगडांनी भरलेल्या या वाटेवर काहींनी थोडे घसरुनही घेतले ! वाटेत आम्हाला तळकोकणातुन चढुन परत 'हिरडी'कडे जाणारे सत्तरी पार केलेले एक वृद्ध जोडपे भेटले. एव्हढ्या कष्टांतही त्या दोघांच्या चेहर्‍यावरील समाधानी, शांत व सहज भाव आश्चर्य चकीत करुन गेले !

भिरा धरण यायच्या आधी एक खोल ओढ्यावर पावसाळ्यांतील पाण्यातही ओलांडता यावा म्हणुन दोन मोठ्या चपट्या (बहुतेक विज तारांवाहक) खांबांचा एकमेकाला जोडुन मोडकातोडका पुल बनवला आहे. ओढा सुकला होता पण त्या डगमगणार्‍या खांबांवरुन जाणे भितीदायक वाटले. वरुन येणारे एक-दोन बहाद्दर गडी होतेच पण बाकी सर्वांनी ओढ्यातुनच रस्ता पार करणे पसंद केले.

ट्रेक करतांना ट्रेकरकडे पुरेशी शारीरीक क्षमता हवी, तंदुरुस्त शरीर ही प्राथमीक गरज आहे पण तेव्हढे पुरेसे नाही तर तंदुरुस्त मनही हवे. अनेक वेळा खंबीर मन हे डळमळलेल्या शरीरास ट्रेक पुर्ण करण्यास मदत करत. याचे जिवंत उदाहरण आमच्या 'अंधारबन ट्रेक' मध्ये बघण्यास मिळाले ते म्हणजे पेणचे धारप दांम्पत्य आणि नागोठण्याचे श्री. मंदार परांजपे !!

पाचला भिरा धरणापाशी पोचलो. तीनही बाजुंनी डोंगर, एका बाजुला धरण व मध्ये जलाशय ! आल्हाददायी वाटले ! धरणावरुनच चालत एक कि.मी. अंतरावरील 'पाटणुस' गांवात पोचलो. तेथे निरोपाचे चहा-पाणी झाले व सर्व ट्रेकवीर एक छान ट्रेक केल्याच्या आनंदात आपआपल्या मार्गाला लागले.....

P.L.Kunte

आज पासून दैनिक पुढारी रायगड आवृत्ती मध्ये माझे "इये देशीचे दुर्ग" हे नवीन सदर सुरु होत आहे. या सदरात दर सोमवारी एका किल्...
16/01/2017

आज पासून दैनिक पुढारी रायगड आवृत्ती मध्ये माझे "इये देशीचे दुर्ग" हे नवीन सदर सुरु होत आहे. या सदरात दर सोमवारी एका किल्ल्याची माहिती असेल

आपला स्नेही
सुखद राणे

१४ ते १६ ऑक्टोबर २०१६सहकाऱ्यांनोजानेवारी २०१५ मधे नाशिक चांदवड परिसरातील ४ किल्ले आपण पाहिले होते. सातारा फलटण परिसरातील...
27/10/2016

१४ ते १६ ऑक्टोबर २०१६
सहकाऱ्यांनो
जानेवारी २०१५ मधे नाशिक चांदवड परिसरातील ४ किल्ले आपण पाहिले होते. सातारा फलटण परिसरातील किल्ले बघण्याच्या निमित्ताने मोठ्या कालावधी नंतर आपण मोठ्या मोहिमेचे नियोजन केले आणि १४ ते १६ ऑक्टोबर दरम्यान सातारा जिल्ह्यातील ६ किल्ले बघुन ही मोहीम आपण यशस्वी केली.

वाई तालुक्यातील चंदनगड आणि वंदनगड, फलटण जवळील संतोषगड, दहिवडी तालुक्यातील वारुगड, माण तालुक्यातील महिमानगड, तर खटाव तालुक्यातील वर्धनगड असे छत्रपति शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले इतिहासाचे साक्षीदार असलेले किल्ले आपण पाहिले. त्याच बरोबर चंदन वंदन जवळील किकली येथील पाषाण शिल्पकलेचा अजोड नमूना असणारे पुरातन महादेव मंदीर आणि संभाजी महाराजांचे पुत्र शाहु महाराज यांनी बांधलेली शेरी लिंब येथील सुप्रसिद्ध बारामोटेची विहीर या दोन ऐतिहासिक ठिकाणांनाही भेट दिली. रोहा ते रोहा ८०० किमी चा विक्रमी प्रवास हे या मोहिमेचे वैशिष्टय.

या संपूर्ण मोहिमेची जबाबदारी आपले जेष्ठ मार्गदर्शक दिलीप खापे साहेबांकडे होती. आमच्या मुक्कामाची आणि जेवणाची व्यवस्था खापे साहेबांच्या घरीच होती. सोई सुविधांचे नियोजन करण्यासाठी खापे वहिनी जातीने उपस्थित होत्या, एवढी चोख व्यवस्था की काय सांगू. पहाटे उठल्या बरोबर गरम गरम चहा, आंघोळीला कडकडीत गरम पाणी, शाकाहारी मांसाहारी यथेच्छ भोजन, कोजागिरीला खास काजू बदाम यांची रेलचेल असणारे मसालेदार दुध, किती लिहु, खापे साहेबांनी पाहूणचार कसा असावा याचे उदाहरण दाखवले आहे. त्यांच्या पाहूणचाराने आम्ही पार दबुन गेलो. साहेब हा पाहूणचार आम्ही कधीच विसरु शकत नाही, तसेच हा पाहूणचार आमच्यावर उधार राहीला. आता पुढची वेळ आमची. सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानतो. साहेब खुप खुप आभार.

या मोहिमेत विशेष कौतुक मयूर खापे, किरण देशपांडे आणि चंद्रकांत पाताडे यांचे. मोहिमेच्या पहिल्या दिवशी येऊ न शकलेले हे तिघे आपआपल्या मार्गाने साताऱ्यात येऊन दुसऱ्या दिवशी मोहिमेत सहभागी झाले. "इच्छा तेथे मार्ग" ही म्हण यांनी खरी करुन दाखवली.

रणरागिणी मावळ्या पूजा राणे आणि ममता गुरव यांनी मोहीमे दरम्यान दिवसभर लागणारा सुका खाऊ अर्थात थालीपीठ, ठेपले, अळुवड्या, बिस्किटे, गोळ्या, चॉकलेट, लिंब, चिवडा, वेफर्स, फरसाण, केळी, सफरचंद, खजूर, काजू, बदाम, मनुके, थोडक्यात काय तर किराणामालाचे दुकानच आणले होते. या सामानाची जबाबदारी पैलवान रमेश पाटिल आणि राहुल किणिकर यांनी घेतली होती, म्हणजे हमाली आणि खाणे दोन्ही. पूजा राणे आणि ममता गुरव यांचे विशेष आभार कारण सर्वांच्या खाण्या पिण्याची त्यांनी काळजी घेतलीच त्याही पेक्षा संपूर्ण मोहीम त्यांनी आपल्या गतीने पूर्ण केली.

फोटोग्राफर मयूर खापे यांनी अगणित फोटो काढून आपले कर्त्तव्य पार पाडले, त्यांना मॉडेल म्हणून राहुल किणिकर आणि उगवता स्टार किरण देशपांडे यांनी जिथे तिथे साथ दिली अगदी नको तिथे सुद्धा. मयूर संपूर्ण मोहिमेचे व्यवस्थित छायाचित्रण केल्या बद्दल धन्यवाद.

"रमेश और सुरेश" म्हणजे रमेश पाटील आणि सुरेश तांडेल यांनी आपआपल्या भूमिका चोख बजावल्या. रमेशने कायम पुढे राहून आघाडी सांभाळली तर सुरेशने आपले मौन व्रत यथा योग्य सांभाळले. विशेषतः चंदनगडाची वाट शोधण्यात आपण दोघांनी जी मेहनत घेतली त्या साठी आपले विशेष आभार.

राहुल आणि किरण आपले विशेष आभार हसत खेळत गप्पा मारत जोक सांगत वेळ प्रसंगी अवघड टप्प्यावर इतरांना आधार देत संपूर्ण टीम एकसंघ ठेवण्याचे मोलाचे काम आपण केले. आपली मोहिमेत उपस्थिति हीच सगळ्यांसाठी एनर्जी असते.

नेहमी प्रमाणे सुखद राणे यांनी आपले चला, आवरा, आटपा, निघा, बसु नका, उशीर झाला, पाय उचला हे शब्द नको तितक्या प्रमाणात जागो जाग वापरून कहर केला.

एकूणच
आरामशीर प्रवास,
आल्हाददायक वातावरण,
जिवाभावाचे सोबती,
ऐतिहासिक किल्ले,
योग्य नियोजन,
उत्तम पाहूणचार,
कोजागिरी पोर्णिमा,
मसाले दूध,
थोडी भंकस,
थोडी शिस्त,
एका उत्तम ट्रेक साठी हेच तर पाहिजे
या अविस्मरणीय ट्रेक साठी सर्वांना मनापासून धन्यवाद.

आपला
सुखद राणे

रायगड प्रदक्षिणा - २०१५दिनांक - २० डिसेंबर २०१५सहभाग - सृष्टी फाउंडेशन, रोहा, रायगडआयोजक - युथ क्लब, महाड
09/01/2016

रायगड प्रदक्षिणा - २०१५
दिनांक - २० डिसेंबर २०१५
सहभाग - सृष्टी फाउंडेशन, रोहा, रायगड
आयोजक - युथ क्लब, महाड

01/01/2016
24/12/2015

Srushti Foundation, Roha, Raigad.
सृष्टी फाउंडेशन, रोहा

Address

Roha
402109

Telephone

+919926272301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Srushti Foundation, Roha, Raigad. सृष्टी फाउंडेशन, रोहा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Srushti Foundation, Roha, Raigad. सृष्टी फाउंडेशन, रोहा:

Share