Lokshahi Jagar Manch

Lokshahi Jagar Manch लोकशाही भारतासाठी संवाद, संघटन आणि संघर्ष करणाऱ्या तरुणाईचे, सर्वांचे व्यासपीठ.

आज १७ डिसेंबर. आजपासून थोर राष्ट्रवादी विचारवंत प्रा. डॉ. स. ह. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष आरंभ होत आहे. त्यानिमित्...
17/12/2023

आज १७ डिसेंबर. आजपासून थोर राष्ट्रवादी विचारवंत प्रा. डॉ. स. ह. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष आरंभ होत आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी हा परिचयपर लेख –

‘सह’जीवन
लेखक : भूषण देशपांडे, अकोला

स. ह. देशपांडे यांचा जन्म महाराष्ट्रात शिरवळ येथे इ.स. १९२४मध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण शिरवळातच झाले. पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर तेथील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून त्यांनी बी.ए. पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पदवीनंतर मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात त्यांनी एम.ए. केले. पुढे डॉक्टरेट मिळवली. विद्यापीठातच कृषि-अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाची नोकरी करून इ.स. १९८४ साली ते निवृत्त झाले.

राष्ट्रवाद हा सहंच्या अभ्यासाचा आणि जीवनभरच्या चिंतनाचा विषय होता. हिंदुत्वाच्या संकल्पनेची व्यापक फेरमांडणी करणारे ‘धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टीतून हिंदुत्वविचाराची फेरमांडणी’ हे पुस्तक त्यांनी लिहिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असणारे स. ह. पुढे संघाशी वैचारिक मतभेद झाल्यामुळे संघातून बाहेर पडले. दिवाळी अंकासाठी लिहिलेल्या ‘हिंदू संस्कृतीतील आशय कोणता?’ ‘सावरकर प्रणीत हिंदुत्वविचाराचा पारमार्थिकांनी केलेला पराभव’, ‘मुस्लिम प्रश्न’ या लेखांतून त्यांचे ‘सावरकर ते भाजप : हिंदुत्वविचाराचा चिकित्सक आलेख’ हे अभ्यासपूर्ण पुस्तक साकारले. याशिवाय ‘संघातले दिवस आणि इतर लेख’, ‘किबुट्झ : नवसमाज निर्मितीचा एक प्रयोग’ आदी पुस्तके त्यांनी लिहिली. समाजप्रबोधन पत्रिकेचे संपादनही त्यांनी चार वर्ष केले.

स. ह. देशपांडे यांनी भारतीय एकात्मता केंद्र, ज्ञानप्रबोधिनी पुणे या संस्थेचे प्रमुखपद काही काळ भूषविले. सातव्या मराठी अर्थशास्त्र परिषदेचे ते अध्यक्ष होते. ‘ग्रामायन पुणे’ या संस्थेचे ते एक संस्थापक सदस्य होते. सहंनी आपले कार्यक्षेत्र केवळ लेखन-वाचनापुरते मर्यादित न ठेवता ठाणे जिल्ह्यातील आदिवासींना, मिरजमधील दलितांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळवून देऊन सहकारी शेतीचा प्रयोग राबवला. याशिवाय त्यांनी मराठी विश्वकोशात कृषीविषयक लेखन केले. ‘भारतीय शेती’ हा त्यांचा आणखी एक अभ्यासपूर्ण ग्रंथ. ‘शारद्वत आणि इतर व्यक्तिचित्रे’ या पुस्तकातून त्यांनी अत्यंत चित्तवेधक अशी व्यक्तिचित्रणे लिहिली.

तार्किक मांडणीचा दिग्गज, सौम्य, शांत वावर असणारा तरीही कडक, ठाम विचारवंत अशी स. ह. देशपांडे यांची ओळख होती. ग्रामीण विकासासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपासून ते साहित्यातल्या अनेक दिग्गजांनी देशपांडे यांचा प्रेमळ सहवास अनुभला असेल. शांतपणे तार्किक मांडणी करत एखाद्या समस्येची उकल करणाऱ्या, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे साक्षीदारही अनेक जण झाले असतील. कोणत्याही कामात झोकून द्यायचे, या एकाच वृत्तीने स. ह. देशपांडे यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले. याच झोकून देण्याच्या वृत्तीने अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी शिक्षणाची वाट धरली ती अखेरपर्यंत. नित्य चिंतन, लेखन, मनन करण्यात ते गुंतलेले असत. याच अभ्यासूपणाने त्यांनी ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात काम केले. त्याच समरसतेने अध्यापनही केले. कोणत्याही वेळी विद्यार्थी त्यांच्याकडे अडचणी घेऊन येत. ज्येष्ठ विचारवंत डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे यांच्या अभ्यासगटात सहंचे व्यक्तिमत्त्व घडत गेले. याच अभ्यासगटातून द. मा. मिरासदार, शंकर वैद्य, अर्जुनवाडकर, सरोजिनी वैद्य यांसारखी व्यक्तिमत्त्वे घडली. आपल्या गुरुंचा वारसा सहंनी त्याच नेटाने पुढे चालविला. विद्यार्थ्यांना ग्रामीण विकासात सहभागी करून घेण्यासाठीचा अभिनव उपक्रम त्यांनी मुंबई विद्यापीठात सुरू केला. या विषयावर त्यांनी अनेक कार्यशाळा घेतल्या. विविध सामाजिक कार्यांमध्ये त्यांनी समरसून सहभाग घेतला. खेड्यांच्या विकासासाठी विविधांगांनी झटणारे कार्यकर्ते त्यांनी उभे केले. ग्रामीण विकासाच्या संदर्भात त्यांनी विपुल लेखन केले. या माध्यमातून लोकांपर्यंत खेड्यांच्या विकासाचा प्रश्न जावा अशी त्यांची कळकळीची भावना होती. मधुकर देवलांच्या सांगलीतल्या म्हैसाळ येथील प्रकल्पातही त्यांचा मोलाचा वाटा होता. दलित समाजाला सहकारी शेती तत्त्वातून सुस्थितीत आणायला हवे असे विचार केवळ मांडून न थांबता त्यासाठी हिरीरीने ते काम करत राहिले. ग्रामायन, महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्था, ग्राममंगल यांसारख्या संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. हिंदुत्व आणि राष्ट्रवाद हे त्यांचे विशेष अभ्यासाचे विषय. या आवडीच्या विषयांवर भान हरपून बोलणाऱ्या त्यांना ज्यांनी ऐकले ते भाग्यवान ठरावेत. मराठीप्रमाणेच इंग्रजी भाषेवरही त्यांचे प्रभुत्व होते. मराठी भाषेचे संशोधक स. गं. मालशेही त्यांच्या विद्यार्थ्यांना भाषाभ्यासाकरता सहंचे लेख वाचायला देत असत.

स्थूलमानाने हिंदुत्ववादी विचारवंत असलेले स. ह. संघ आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांवरही टीकास्त्र सोडण्यास कचरत नसत. बुद्धीप्रामाण्य की संस्थागत निष्ठा असा प्रश्न समोर आला की ते अत्यंत निर्भीडपणे बुद्धीप्रामाण्यवादी भूमिकेला अग्रक्रम देत आणि त्यापायी निष्ठावान लोकांचा विरोध झेलण्याची त्यांची तयारी असे. कुठल्याही इझमशी अनावश्यक निष्ठा न बाळगता राष्ट्रवादाला प्राधान्य देऊन स्वतंत्र बुद्धीने समीक्षा करणारे जे फारच थोडे लेखक झाले त्यात सहंचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

सहंविषयी त्यांचे प्रकाशक दि. ग. माजगावकर लिहितात, “ते हाडाचे अभ्यासक होते. म्हणूनच ऐन तारुण्यात रा. स्व. संघाचे स्वयंसेवक असूनही त्या विचारसरणीच्या कुंपणात ते बंदिस्त झाले नाहीत. किंवा त्या विचारप्रणालीच्या कार्यक्षेत्राच्या मर्यादा जाणवल्यावर उलट्या टोकाला जाऊन दुसऱ्या विचारप्रणालीच्या आहारी गेले नाहीत; कारण प्रत्येक प्रणालीची आपापली बलस्थाने असतात आणि मर्यादाही असतात, हे ते जाणून होते. डाव्या-उजव्या विचारप्रणालीतील योग्य तत्त्वांचा ते मेळ घालू इच्छीत होते. त्यांच्या मनात रा. स्व. संघ परिवाराचे मुखपत्र ‘विवेक’ आणि समाजवादी परिवाराचे ‘साधना’ या दोन्हींबद्दल समान आस्था होती. दोन्ही ठिकाणी ते अधूनमधून लिहीत असत. या पलीकडे आणखी म्हणजे ते संगीताचे जाणकार होते. संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास त्यांनी केलेला होता. नृत्य, चित्र, शिल्प या अभिजात कलांचे ते उत्तम निरीक्षक होते.

मुळात अर्थशास्त्र या विषयाचे प्राध्यापक असलेले स. ह. उत्तरायुष्यात ‘भारतीय राष्ट्रवादा’च्या तत्त्वज्ञानाची मांडणी करण्यात आकंठ बुडाले. धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे आपले तत्त्वज्ञान मांडताना, मुस्लिम समाजाची कडवी धर्मनिष्ठा राष्ट्रवादाच्या आड येते आणि याची बीजे त्यांच्या धर्मात आहेत, असे ते निःसंदिग्धपणे म्हणत असत. पण म्हणून हिंदूंनी कडवे धर्मनिष्ठ होणे, हा त्या समस्येवरचा उपाय नाही; हेही ते तितकेच ठासून सांगत असत. रूढ असलेल्या डाव्या-उजव्या कोणत्याच विचारसरणीच्या चौकटीत त्यांची ही मांडणी बसत नव्हती. त्यामुळे कोणत्याच बाजूकडून त्यांना भरघोस प्रतिसाद मिळाला नाही. तरीही खुर्चीचा मानसन्मान, निरनिराळी पदे, कशाच्याही मोहात न गुंतता ते आपली धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाची भूमिका ठामपणे, अखंडपणे जनमानसात रुजविण्याच्या प्रयत्नात राहिले.”

थोर सावरकर अभ्यासक आणि साक्षेपी विचारवंत प्रा‌. शेषराव मोरे यांनी आपला ‘विचारकलह : भाग २’ हा ग्रंथ सहंनाच अर्पण केला आहे. अर्पणपत्रिकेत ते लिहितात, ‘वेगळ्या वाटेने व कोणाच्याही मार्गदर्शनाविना आम्ही एकटेच चालत निघालो. ती वाट योग्य दिशेने चालली आहे हे ज्यांच्यामुळे आम्हाला कळाले व पुढची वाटचाल सुलभ झाली ते प्रकांडपंडित व बुद्धिवादी विचारवंत डॉ. स. ह. देशपांडे यांना हा ग्रंथ अर्पण.’

साहित्यिक म्हणून सहंनी विविध प्रकारचे लेखन केले. परंतु भारतीय राष्ट्रवाद हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय होता. हिंदुत्वविचाराची नव्याने फेरमांडणी करण्याचे शिवधनुष्यही त्यांनी उचलले. त्यांनी लिहिलेली ‘काही आर्थिक, काही सामाजिक’, ‘विश्वनाथ खैरे यांचा संमतविचार आणि नवी भारतविद्या’, ‘हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व’, ‘व्यक्ती आणि प्रकृती’, ‘Polity, Society and Economy’, ‘अमृतसिद्धी : पु. ल. समग्र दर्शन’, ‘संघाच्या इतिहासातला एक अल्पज्ञात अध्याय’ ही पुस्तके गाजली.

असे विविधांगी लेखन करणाऱ्या या प्रतिभासंपन्न लेखक, मर्मज्ञ रसिक आणि बुद्धिवादी विचारवंताचे २९ जुलै २०१० रोजी निधन झाले. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीस माझे विनम्र अभिवादन!
*****

पाकिस्तानच्या शरणागतीचे यशोनाट्य!भारतीय सैन्याच्या माऱ्यापुढे पाकिस्तानी सैन्य पूर्णपणे हतबल झाले होते. पाकिस्तानी सैन्य...
16/12/2023

पाकिस्तानच्या शरणागतीचे यशोनाट्य!

भारतीय सैन्याच्या माऱ्यापुढे पाकिस्तानी सैन्य पूर्णपणे हतबल झाले होते. पाकिस्तानी सैन्याचे मनोधैर्यही खचले होते. भारतीय भूदलाने ढाका वेढले होते. नौदलाने पूर्व पाकिस्तानच्या सर्व बंदरांची नाकेबंदी केली होती. वायुदलाचे अखंड बॉम्बहल्ले सुरू होते. त्यामुळे पाकचा पराभव अटळ होता...

१६ डिसेंबर १९७१, सकाळच्या वेळी ढाक्यातील पाकिस्तानी सैन्याच्या मुख्यालयाकडे पांढरा झेंडा लावलेल्या जीपमधून भारतीय सैन्याचे कॅ. हितेश मेहता आणि कॅ. निर्भय शर्मा सुसाट निघाले होते. त्यांच्याकडे त्यांचे वरिष्ठ अधिकारी जन. नागरा यांनी पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानी सैन्याचे मुख्यधिकारी जन. नियाझी यांच्यासाठी दिलेला निरोप होता, ‘‘प्रिय अब्दुल्ला, मी इथवर पोचलो आहे. खेळ खतम झालाय. मी सुचवतो की तुम्ही शरण या. मी तुमची काळजी घेईन.’’

नियाझी हादरले. त्यांच्या डोळ्यांसमोर गेल्या २-३ दिवसांचा घटनाक्रम नाचू लागला. १४ तारखेला सकाळी पूर्व पाकिस्तानचे गव्हर्नर अब्दुल मलिक यांच्याबरोबर सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा होती. भारतीय गुप्तहेर खात्याने आमंत्रणाचे सिग्नल बरोबर पकडले. वायुदलाने अर्ध्या तासाच्या आत चार ‘मिग २१’ विमाने पाठवली. गव्हर्नर हाऊसवर ३२ रॉकेटचा मारा झाला. जमलेल्या उच्चपदस्थांपैकी कोणी बळी पडला नाही तरी सगळे हादरले होते.

गव्हर्नरसाहेबांनी आपला बाडबिस्तरा इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये हलवला. नियाझींनी आपले मुख्यालय ढाका युनिव्हर्सिटीमध्ये हलवले. दुसऱ्या दिवशी त्यावरही विमानांनी रॉकेटचा मारा केला. चोहो बाजूंनी भारतीय सैन्यदलाने ढाक्याची कोंडी केली होती. त्यात हे अखंड हवाई हल्ले! धीर सुटलेले नियाझी पाकिस्तानचे अध्यक्ष याह्याखान यांच्याकडे युद्ध थांबवण्याची पुन्हा पुन्हा मागणी करत होते. अखेर याह्याखानांनी १४ तारखेला दुपारी ३ वाजता परवानगी दिली. ताबडतोब नियाझी आणि त्यांचे सहकारी जन. राव फर्मान अली अमेरिकेचे कॉन्सुल जनरल स्पीराक यांच्याकडे गेले. अमेरिकेला युद्धबंदी घडवण्यासाठी मध्यस्थी करायची विनंती केली. आशा होती की युद्धबंदीच्या वाटाघाटी आणि विशेषतः युनोत प्रकरण गेले की काश्मीरप्रमाणे वर्षानुवर्षे प्रकरण चिघळत ठेवता येईल. परंतु आता भारतीय सैन्य ढाक्याच्या वेशीवर आले होते. खेळ खरोखरच संपला होता.

जनरल नागरा आणि नियाझी यांची एकमेकांशी वैयक्तिक ओळख होती. काही वर्षांपूर्वी जन. नागरा कराचीमध्ये भारतीय वकिलातीचे सैनिकी सल्लागार असताना नियाझींशी त्यांची चांगली जानपहचान झाली होती. नियाझींनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला जनरल नागराना सन्मानाने आणण्यासाठी पाठवले. जनरल नागरा व नियाझी यांची भेट होताच नियाझींचा बांध फुटला. अश्रूंना वाट देत ते म्हणाले, ‘‘पिंडीमें (रावळपिंडी) बैठे हुए हरामजादोने मरवा दिया!’’

दरम्यान, १५ तारखेला पाकिस्तानने केलेली युद्धबंदीची याचना अधिकृतपणे भारतीय लष्करप्रमुख जन. माणेकशा यांना मिळाली. त्यांनी १५ तारखेच्या संध्याकाळी पाचपासून १६ तारखेला दुपारी तीनपर्यंत युद्ध तहकुबी मान्य केली. १६ तारखेला सकाळी जन. माणेकशांनी भारतीय सैन्याच्या पूर्व विभागाचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जन. जेकब यांना फोन केला. मेजर जन. जेकब हे एक अतिशय कर्तबगार सेनानी होते. पूर्व पाकिस्तानातील वेगवान विजय हा त्यांनी केलेल्या परिपूर्ण नियोजन आणि तयारीचे फलित होते. जन. माणेकशा फोनवर मेजर जन. जेकबना म्हणाले, ‘‘जेक, जा आणि शरणागती मिळवा.’’ मेजर जन. जेकबना परिस्थितीचा अंदाज असल्याने त्यांनी आधीच शरणागतीचा मसुदा बनवून जन. माणेकशांना पाठवला होता. मेजर जन. जेकबनी विचारले, ‘‘तो ठीक आहे का?’’ जन. माणेकशांचा मेजर जन. जेकबवर भरवसा होता. ते एवढेच म्हणाले, ‘‘तुम्हाला माहितीये काय करायचे ते. जा.’’

१६ तारखेला दुपारी साडेबाराच्या सुमाराला मेजर जन. जेकब त्यांचे मदतनीस कर्नल खारा यांच्यासह ढाक्याच्या तेजगाव विमानतळावर उतरले. पाकिस्तानी सैन्यातर्फे त्यांना विमानतळावरून घेऊन जाण्यासाठी ब्रिगे. सिद्दीकी हजर होते. मेजर जन.जेकबना थेट नियाझींच्या ऑफिसमध्ये नेण्यात आले. नियाझींसोबत पाकिस्तानच्या तिन्ही दलांचे सर्व महत्त्वाचे अधिकारी तसेच जन. नागरा हास्यविनोद करत बसले होते. मेजर जन. जेकब आत शिरताच एकदम शांतता पसरली. मेजर जन. जेकब जन. नागरांना बाहेर घेऊन गेले. त्यांना भराभर सूचना केल्या. प्रथम पुरेशी भारतीय फौज ढाक्यात यायला हवी म्हणजे शहरात शांतता आणि सुव्यवस्था नांदेल. शरणागतीच्या सोहळ्याची त्यांनी तयारी करायची होती. सोहळा जनसमुदायासमोर रेस कोर्स मैदानात करायचा होता. भारतीय सैन्याचे पूर्व विभाग प्रमुख जन. अरोरा येतील त्यांना दोन्ही सेनादलांतर्फे मानवंदना द्यायला हवी. मैदानात टेबल आणि फक्त दोन खुर्च्या असू देत. इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये युनो, रेड क्रॉस आणि पूर्व पाकिस्तानचे सरकारी अधिकारी मुक्कामाला आहेत. त्यांना पुरेसे संरक्षण मिळायला हवे. आणि हे सर्व २ ते ३ तासांत व्हायला हवे.

जन. नागरांना कामाला लावून मेजर जन. जेकब परत नियाझींच्या ऑफिसमध्ये आले. त्यांनी कर्नल खारांना शरणागतीचा मसुदा वाचून दाखवायला सांगितला. खोलीत निःशब्द शांतता पसरली. नियाझींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते उद्‍गारले, ‘‘तुम्हाला कोणी सांगितले की मी शरणागती पत्करतोय? तुम्हाला फक्त युद्धबंदी आणि सैन्यमाघारीसंबंधी चर्चा करायला बोलावले होते!’’ बाकीचे पाकिस्तानी अधिकारीही च्यावच्याव करू लागले. वेळ थोडा होता. मेजर जन. जेकबनी नियाझींना एका बाजूला घेतले. त्यांना सांगितले की, ‘‘जर तुम्ही शरण आला नाहीत तर तुम्ही सर्व आणि तुमची कुटुंबे, कुणाच्याही संरक्षणाची जबाबदारी मी घेऊ शकत नाही. पण तुम्ही शरण या, मी जबाबदारी घेईन.’’ हा कुटुंबांच्या संरक्षणाचा मुद्दा त्यांनी पुन्हा पुन्हा ठसवला. ते मग म्हणाले, ‘‘मी तुम्हाला ३० मिनिटे वेळ देतो. विचार करा. नाही म्हणालात तर मी बॉम्बहल्ल्यांना आणि शस्त्रांच्या भडीमाराला पुन्हा सुरुवात करीन.’’ हे बोलून मेजर जन. जेकब बाहेर व्हरांड्यात गेले.

त्या १४ दिवसांत भारतीय सैन्याने पाकिस्तानला आकाश, पाणी आणि जमीन तिन्ही क्षेत्रांत चीतपट केले होते. पण आता मेजर जन. जेकब खेळत होते मानसशास्त्रीय युद्ध. युनोने युद्धबंदी लादायच्या आत शरणागती मिळवणे गरजेचे होते. तसे बघायला गेले तर आत्ताशी भारतीय सैन्याची आघाडीची तुकडी ढाक्याच्या हद्दीवर पोचत होती. नियाझींनी कडवा प्रतिकार करायचे ठरवले असते तर ढाक्यात सहज ८-१५ दिवस भारतीय सैन्याला ते झुंजवू शकत होते. प्रश्न होता मनोधैर्याचा. भारतीय भूदलाने ढाका वेढले होते. नौदलाने पूर्व पाकिस्तानच्या सर्व बंदरांची नाकेबंदी केली होती. वायुदलाचे अखंड बॉम्बहल्ले सुरू होते. पराभव अटळ होता. परंतु त्याहून जास्त भीती होती स्वतःच्या पापांनी निर्माण केलेल्या भुतांची!

गेली ८ महिने पाकिस्तानी सैन्याने बंगाली जनतेचा अनन्वित छळ केला होता. लाखो लोकांची कत्तल केली होती, जवळजवळ १ कोटी नागरिक (ज्यात ८० टक्के हिंदू होते) बेघर होऊन भारताच्या हद्दीत निर्वासितांचे जिणे जगत होते. जाळपोळ, स्त्रियांवरील अत्याचार, लुटालूट याचा कहर झाला होता. पाकिस्तानी सैन्य व्यावसायिक सैन्य राहिले नसून लुटारूंची टोळी बनले होते. वरपासून खालपर्यंत बेसुमार मद्यपान आणि नैतिक अधःपतनाने अधिकाऱ्यांचे मानसिक धैर्य, कडवेपणा नष्ट झाला होता. सूडाने पेटलेला जनसमुदाय, स्वतंत्र बांगला देशाकरता लढणारी मुक्तिवाहिनी पाकिस्तानी सैन्याची त्यांच्या कुटुंबीयांसकट राखरांगोळी करायला टपून बसले होते.

बरोबर अर्ध्या तासाने मेजर जन. जेकब आत गेले. आत स्मशानवत शांतता होती. टेबलावर शरणागतीचा मसुदा तसाच होता. ‘‘तुम्ही हा मसुदा स्वीकारलात का?’’ त्यांनी नियाझींना विचारले. काही उत्तर आले नाही. तोच प्रश्न तीनदा विचारला. तरी काही उत्तर नाही. मग मेजर जन. जेकब यांनी ते कागद उचलले आणि हातात उंच धरून म्हणाले, ‘‘मी गृहीत धरतो, हे तुम्हाला मान्य आहे.’’ नियाझींच्या गालावरून अश्रू ओघळू लागले. मेजर जन. जेकब यांचे काम फत्ते झाले होते.
दुपारी सुमारे साडेचार वाजता भारताच्या सैन्यदलाच्या पूर्व विभागाचे प्रमुख जन. जगजितसिंग अरोरा, सौ. अरोरा, वायुदलाचे एअर मार्शल देवन, नौदलाचे ॲडमिरल कृष्णन, ले. जन. सगतसिंग आणि इतर अधिकारी विमानतळावर उतरले. मे. जन. जेकब नियाझींना घेऊन त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. सगळा ताफा रेसकोर्स मैदानावर गेला. तेथे अफाट जनसमुदाय जमला होता. पाकिस्तान व भारतीय सैन्याने जन. जगजितसिंह अरोरांना मानवंदना दिली. नियाझी आणि जन. अरोरा मग टेबलापाशी बसले. शरणागतीच्या कागदपत्रांवर सह्या झाल्या. गालावरून अश्रू ओघळणाऱ्या नियाझींनी आपले रिव्हॉल्व्हर जन. अरोरांना अर्पण केले. ९३००० सैनिकांसोबत नियाझी भारताचे कैदी बनले. सर्व भारतीयांना पिढ्यान्‌पिढ्या वर्षानुवर्षे स्फूर्ती देणारा तो प्रसंग होता. आपण नुसते युद्ध जिंकलो नव्हतो तर लाखो लोकांना अत्याचारापासून मुक्ती दिली होती, बेघर झालेल्यांना त्यांची हक्काची घरे मिळवून दिली होती, एका स्वतंत्र देशाची निर्मिती केली होती.

मूळ लेख : https://www.esakal.com/global/nitin-mane-writes-successful-drama-of-pakistan-surrender-in-1971-war-snk94

भारतीय संविधानाचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त...
06/12/2023

भारतीय संविधानाचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन...

त्या निमित्ताने जाणून घेऊयात त्यांच्या विषयी काही महत्वाच्या गोष्टी...

१. प्रज्ञावंत बाबासाहेबांनी संपादित केलेल्या पदव्या :

डॉ. आंबेडकरांनी तब्बल ३२ पदव्या संपादित केल्या होत्या. यामध्ये बीए, एमए, पीएचडी (अर्थशास्त्र), एमएससी (Provincial Decentralization of Imperial Finance in British India), बॅरिस्टर इन लॉ, डीएससी (The Problem of the Rupee – Its origin and its solution), एलएलडी (HIS achievements, Leadership and authoring the constitution of India), डी.लिट. या काही महत्वाच्या पदव्या आहेत.

२. डॉ. आंबेडकरांनी लिहिलेले महत्वाचे ग्रंथ :

Caste in Hindu (1916), The problem of Rupee (1923), Annhilation of Caste (1935), Federation Versus Freedom (1939), Ranade, Gandhi and Ginnah (1943), Communal Deadlock and a Way to solve it (1945), What congress and Gandhi have done to the untouchables? (1945), Pakistan or Partition of India (1945), State and Minorities (1947), Maharashtra as a Linguistic state (1948), The untouchable (1948), Who were shudra (1945), Buddha and his Dhammas (1957).

३. डॉ. आंबेडकरांनी सुरु केलेली वर्तमानपत्रे :

मूकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), समता (१९२८), जनता (१९३०), प्रबुद्ध भारत (१९५६, जनताचे नामांतर).

४. महत्वाचे सत्याग्रह / आंदोलने :
महाडचे चवदार तळे सत्याग्रह, (२० मार्च १९२७), मनुस्मृती दहन (२५ डिसेंबर १९२७), शेतकऱ्यांची चळवळ (१९२८), पर्वती देवालय प्रवेश (१९२९), काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह (१९३१), पुणे करार (१९३२), येवला परिषद (१९३५), बौद्ध धर्मात प्रवेश (१४ ऑक्टोबर १९५६), बावीस प्रतिज्ञा.

५. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या महत्वपूर्ण संस्था/संघटना :

बहिष्कृत हितकारिणी सभा (१९२४), समता सैनिक दल (१९२७), स्वतंत्र मजूर पक्ष (१९३६), शेड्युल कास्ट फेडरेशन (१९४२), पिपल्स एज्युकेशन सोसायटी (१९४५), भारतीय बौद्ध महासभा (१९५५).

६. बाबासाहेब आंबेडकरांच्या गाजलेल्या घोषणा :
‘मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो, ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही’.
‘जे आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाहीत’
‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’
‘स्वातंत्र, समता, बंधुता शिकवणाराच धर्म मला प्रिय वाटतो’
‘जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे’

७. बाबासाहेबांना मिळालेले पुरस्कार / सन्मान :

१९५५ मधील काठमांडू येथील जागतिक बौद्ध परिषदेत ‘बोधीसत्व’ ही उपाधी प्रदान, १९९० मध्ये ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला.

८. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू :

चित्रकार : बी. आर. मडिलगेकर यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले होते. बाबासाहेबांना व्हायोलिन वाजवण्याचीही आवड होती.
पत्रकार : ‘ज्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो त्यासाठी वर्तमानपत्र त्यांचा आवाज होऊ शकते असे सांगणाऱ्या’ बाबासाहेबांचे नाव तत्कालीन ब्राह्मणेतर पत्रकारितेत अग्रस्थानी घेतले जाते.
राजकारणी : बाबासाहेब भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तसेच ते स्वतंत्र भारताचे पहिले मजूर मंत्रीही होते.
अर्थतज्ज्ञ : ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या त्यांच्या ग्रंथातून प्रेरणा घेऊन १९३५ साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली.
तत्वज्ञ : स्वातंत्र, समता आणि बंधुता या तत्वांवर विश्वास ठाम विश्वास असणाऱ्या बाबासाहेबांनी हीच तत्वे राज्यघटनेत समाविष्ट केली.

९. बाबासाहेबांच्या कार्याबद्दल फारशा चर्चिल्या न गेलेल्या गोष्टी :

दुसऱ्या महायुद्धानंतर भारताची आर्थिक घडी बसवण्यात बाबासाहेबांचे मोठे योगदान होते. त्यासाठी नेमलेल्या रिकन्स्ट्रक्शन कमिटी ऑफ काऊन्सिलचे (आरसीसी) सदस्य होते. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्यावर सिंचन आणि विजेच्या प्रश्नांबाबत जबाबदारी सोपवली होती., ‘दामोदर नदी खोरे’ आणि ‘सोने नदी खोरे’ प्रकल्प तसेच देशातील सर्वात मोठ्या ‘हिराकुड धरण’ प्रकल्पाचे काम बाबासाहेबांच्या अखत्यारित झाले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी)च्या स्थापनेत बाबासाहेबांचा मोठा वाटा होता. ‘जय भीम’ या घोषणेनंतर देशात ‘जय हिंद’ ही घोषणा सुरु झाली.

१०. बाबासाहेबांचे लेखन :

भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे प्रचंड लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. पूर्ण झालेले एकूण २२ ग्रंथ आणि पुस्तिका, १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ, १० निवेदने किंवा साक्षीपुरावे, १० शोधनिबंध, लेख आणि परीक्षणं इतके प्रचंड लिखाण डॉ. आंबेडकरांनी केले आहे. विशेष म्हणेज त्यांनी हे सर्व लिखाण इंग्रजीतून केलेले आहे.

लोकशाही जागर मंच तर्फे विनम्र अभिवादन...

मूळ लेख :
https://www.loksatta.com/desh-videsh/did-you-know-these-10-special-things-about-dr-babasaheb-ambedkar-1800809/

भारतीय संविधानाचा स्वीकार ज्या दिवशी केला गेला तो दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर. दरवर्षी हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केल...
26/11/2023

भारतीय संविधानाचा स्वीकार ज्या दिवशी केला गेला तो दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर. दरवर्षी हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस राष्ट्रीय कायदा दिन म्हणून पण ओळखला जातो. १९४९ मध्ये यादिवशी भारतीय संसदेने अधिकृतपणे संविधानाचा स्वीकार केला. २६ जानेवारी १९५० पासून संविधान देशात लागू झाले. १९ नोव्हेंबर, २०१५ रोजी केंद्रीय सामाजिक आणि सशक्तीकरण मंत्रालयाने २६ नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ ला आदेश काढून ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.

संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्ये रुजवणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा एकमेव उद्देश आहे. आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. भीमराव आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही संविधान दिन साजरा केला जातो.

लोकशाही जागर मंच तर्फे समस्त भारतीयांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....

'आम्हाला दया नको, समान वागणूक हवी'आम्हाला दया नको तर समान वागणूक हवी, असे तृतीयपंथी समाजसेविका अमित उर्फ आम्रपाली मोहिते...
20/09/2023

'आम्हाला दया नको, समान वागणूक हवी'

आम्हाला दया नको तर समान वागणूक हवी, असे तृतीयपंथी समाजसेविका अमित उर्फ आम्रपाली मोहिते यांनी 'स्व-' रूपवर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिकेच्या "श्रीमकांचा बाप्पा" उपक्रमात बोलताना व्यक्त केले. यावेळी आम्रपाली यांच्या हस्ते गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

आम्रपाली यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना तृतीयपंथी समाजाच्या व्यथा मांडल्या. "तृतीयपंथींना सहानुभुती नव्हे तर समान वागणुकीची गरज आहे. ते ही आपल्या समाजातील एक घटक आहेत हे मान्य करून त्यांना आपलेपणाने स्वीकारा. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्या", असे आम्रपाली यांनी सांगितले.

आम्रपाली सावली सोशल फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. तृतीयपंथींच्या न्याय हक्कासाठी काम करताना त्यांनी पुणे शहरात सहा ठिकाणी गरीब मुलांसाठी 'फुटपाथ शाळा' सुरु केल्या. आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी १४५ गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उभा केला, तसेच १९२ लोकांना छोटे व्यवसाय सुरु करून दिले आहेत.

'स्व-' रूपवर्धिनी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ संजय तांबट, संस्थेच्या जेष्ठ पूर्णवेळ कार्यकर्त्या पुष्पाताई नडे यांनी आम्रपाली मोहितेंचा भारतीय संविधानाचा सरनामा देऊन सन्मान केला.

 #स्तुत्य_उपक्रम  ्यावी_असा_कार्यक्रम'स्व'- रुपवर्धिनी अभ्यासिका व  स्पर्धा परीक्षा केंद्र आयोजित             "श्रमिकांच...
18/09/2023

#स्तुत्य_उपक्रम ्यावी_असा_कार्यक्रम

'स्व'- रुपवर्धिनी अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा केंद्र आयोजित

"श्रमिकांचा बाप्पा"

⭐प्रमुख उपस्थिती⭐

तृतीयपंथी समाजसेवक अमित मोहिते
(सावली सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष)
यांच्या हस्ते गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होइल.

🟠 कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये
अमित मोहित यांचा जीवन संघर्ष (संवाद) आणि प्रश्न उत्तरे
०🔸 पुणे येथील फुटपाथवर राहणाऱ्या मुलांसाठी शाळा चालवितात.
०🔸 मुलांना शिक्षणासाठी आर्थिक साहाय्यता, रुग्णांना मोफत अन्नछात्र.
० 🔸दिव्यांग बांधव यांच्यासाठी उल्लेखनीय कार्य.

मंगळवार, दि.19 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11वाजता

▶️ ठिकाण.
' स्व ' रूपवर्धिनी अभ्यासिका हॉल
22/1 मंगळवार पेठ पारगे चौक, पुणे 411011

संपर्क: किसन ताकमोडे - 9850270614

लोकशाही जागर मंच तर्फे आयोजकांचे हार्दिक अभिनंदन...
समाजातल्या सगळ्या गटांना सोबत घेऊन वाटचाल करणारे असे अनेक उपक्रम आणखी राबवले जावेत अशा शुभेच्छा...

17/09/2023
हैद्राबाद मुक्ती संग्राम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर- सागर शिंदे भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले, परंतु काही संस्थाने...
17/09/2023

हैद्राबाद मुक्ती संग्राम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- सागर शिंदे

भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले, परंतु काही संस्थाने मात्र भारतात सामील झाली नाहीत. त्यातील एक मोठा भूप्रदेश व लोकसंख्या असलेले संस्थान म्हणजे हैद्राबाद संस्थान होते. निजामाचे जुलमी वर्चस्व असलेल्या या प्रदेशातील जनतेने मात्र निजामाविरुद्ध स्वातंत्र्यासाठी मोठा लढा उभारला. अनेक वीर या संघर्षात हुतात्मा झाले. १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजाम शरण आला आणि हैद्राबाद संस्थान स्वतंत्र भारतात समाविष्ट झाले. यावर्षी हैद्राबाद मुक्ती संग्रामाचे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य वर्ष आहे. आधुनिक भारताचे महान नेते भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांनी हैद्राबाद संस्थान हा मोठा भूप्रदेश आणि तेथील जनता स्वतंत्र व्हावी याकरिता मोठे योगदान दिले. अमृतमहोत्सवी वर्षात या स्वातंत्र्य लढ्याचे अनेक पैलू समजून घेणे महत्वाचे वाटते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ने निजामाला स्पष्ट विरोध दर्शवला होता. फेडरेशनचे तत्कालीन प्रांत अध्यक्ष स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब मोरे यांनी निजामाच्या विरुद्ध दलित समाजाला उद्देशून एक पत्रक काढले होते. त्यात म्हटले होते कि, “निजामाची पदच्युती व्हावी. लोकशाहीवर आधारलेली जबाबदार लोकशाही राज्यपद्धती निर्माण झाली पाहिजे. हे प्रत्येक आंबेडकर अनुयायाचे धोरण असावे. म्हणून अस्पृश्य जनतेने रझाकार संघटनेत जाऊ नये, तसेच मुसलमान धर्मातही प्रवेश करू नये.” या आवाहनास अनुसरून मराठवाड्यात ठिकठिकाणी झालेल्या निजामविरोधी संघर्षात अनेक दलित बांधवांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

मक्रणपूर परिषद :

निजामाच्या राज्यात भाषण स्वातंत्र्याला बंदी होती त्यामुळे डॉ.आंबेडकरांना सुद्धा भाषण करण्यास बंदी असल्याने हैद्राबाद राज्याच्या सरहद्दीलगत या सभा होत असत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्यातील दलित, वंचित घटकाला स्वाभिमानाने जगण्यासाठी प्रेरणा देणारी व निजामविरोधी पहिली जाहीर परिषद दि.३० डिसेंबर १९३८ या दिवशी मक्रणपूर (डांगरा), ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर येथे झाली. ही परिषद म्हणजे हैद्राबाद स्वातंत्र्य संग्रामातील ऐतिहासिक क्षण होता. या परिषदेत स्वातंत्र्यसेनानी व शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे नेते भाऊसाहेब बी. एस. मोरे यांनी डॉ. आंबेडकरांच्या भाषनाच्या अगोदर जय भीम या घोष वाक्याचा नारा दिला. हेच घोषवाक्य पुढे अभिवादानाचे, संघर्षाचे प्रेरणादायी प्रतिक बनले. या सभेत डॉ आंबेडकरांनी संस्थानातील शैक्षणिक सोयीचा अभाव, सामाजिक गुलामगिरी, वेठबिगारी व आर्थिक दुबळेपणा याचा आढावा घेतला. डॉ आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले, “१९३४ साली मी दौलताबाद चा किल्ला पाहण्यास गेलो असता, तेथील किल्ल्याजवळील हौदातील पाण्याने माझ्या सहकार्यांनी हातपाय धुतले तेंव्हा हौद बाटला म्हणून तेथील लहानथोर मुसलमान लोकांनी व दहा-बारा वर्षे वयाच्या एका मुस्लीम मुलीने आम्हाला एक तास शिव्या देऊन आमच्या आयाबाहीनिचा उद्धार केला.” निजामाच्या काळात मुस्लीमांकडून अस्पृश्यता पाळली जात असल्याचा अनुभव खुद्द डॉ. आंबेडकर व त्यांच्या सहकार्यांना घेतल्याचे लक्षात येते. बाबासाहेब त्यांच्या भाषणात पुढे म्हणतात, “दुसरे म्हणजे मी मुंबई व सी.पी. इलाख्यात अडचणीच्या वेळी मुसलमानांना मदत करतो, तेव्हा निजाम सरकारने व मुसलमानांनी आम्हाला मदत करावयास पाहिजे पण असे होत नाही उलट त्यांनी आम्हास सभाबंदी घालावी हे लाजिरवाणे आहे. या संस्थानात अस्पृश्यांसाठी शाळा नसाव्यात ही आश्चर्याची गोष्ट आहे. संस्थानात एकच असपृश्य मुलगा बी.ए. झाला आहे. पण सर अकबर हैदरी यांना शिफारस पत्र देऊनही व त्यांची स्वतः भेट घेऊनही त्यास नोकरी मिळाली नाही. निजाम सरकारची शिष्यवृत्ती घेऊन या संस्थानातील अनेक विद्यार्थी लंडनला शिक्षणासाठी गेले. पण त्यामध्ये केवळ एकच अस्पृश्य विद्यार्थी होता. कोल्हापूर व बडोदा संस्थानांप्रमाणेच हे संस्थान अस्पृश्यांना शिष्यवृत्ती देऊन लंडनला शिक्षणासाठी पाठवतील ही माझी आशा फोल ठरली. दलितांना उद्देशून बाबासाहेब पुढे म्हणाले, "तुमच्यावर अनंत बंधने आहेत. तुम्हाला भाषणस्वातंत्र्य व मिरवणूक स्वातंत्र्य नाही. तेव्हा मी तुमची दुःखें नाहीशी करण्याचा प्रयत्न करीन. येथील राज्य करण्याची पध्दत सदोष असल्यामुळे तुम्ही आतून काही करु शकत नाही पण मी बाहेरुन जरूर करीन, या परिषदेत पास झालेले सर्व ठराव सर अकबर हैदरी यांच्याकडे पाठवीन.”

मक्रणपूर परिषदेनंतर २३ फेब्रुवारी १९४१ रोजी मराठवाड्यातील महार मांग वतनदारांची परिषद धाराशिव जवळील व - सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यातील "तडवळा ढोकी" येथे आयोजित करण्यात आली. भालेराव गुरुजी हे या परिषदेचे संयोजक होते. तडवडा ढोकीचे दीवचंद कदम हे अध्यक्ष होते, तर बाबुराव बनसोडे हे स्वागताध्यक्ष होते. ही शैक्षणिक परिषद होती. या परिषदेत बाबासाहेबांनी दलितांच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक व शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेऊन दलितांना मार्गदर्शन केले. ते आपल्या भाषणात म्हणाले, "हैदराबाद संस्थान देशात श्रीमंत व मोठे संस्थान असूनही येथे अस्पृश्यांच्या शिक्षणाची सोय नाही. या ठिकाणी लाखो एकर जमिनी पडीत असूनही निजामाने त्या दलितांना दिलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दलितांचे कोणतेच प्रश्न सुटलेले नाहीत. आपले प्रश्न सरकारच्या कानावर घालण्यासाठी तुम्ही संघटीत झाले पाहिजे, बावन हक्क, गावकीची कामे व वेठबिकारी करणे बंद करा, मृत मांस खाऊ नका, आपल्या मुलामुलींना शाळेत पाठवा." निजामाच्या राज्यात दलितांची काय स्थिती होती हे बाबासाहेबांच्या तत्कालीन भाषणांच्या मधून लक्षात येते. हैद्राबाद संस्थानात ‘हैद्राबाद शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ हि संघटना कार्यरत होती. या संघटनेचे नेते होते जे.एच.सुबैय्या हि संघटना डॉ.आंबेडकरांच्या मार्गदर्शनाने सक्रीय होती. संस्थानांतील दलित वर्गाच्या समस्यांच्या विषयी संघटना कार्यरत होती. हैद्राबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन व्हावे हि मागणी या संघटनेने शेवट पर्यंत लावून धरलेली होती.

दलित वर्गास बाबासाहेबांचे आवाहन -

पाकिस्तान आणि हैद्राबाद संस्थानातील दलितांच्या स्थिती बद्दल आणि मुस्लिमांकडून होत असलेल्या छळ आणि धर्मांतरा बाबत डॉ. आंबेडकर अतिशय जागृत आणि चिंतीत होते. याविषयी धनंजय कीर ‘डॉ बाबसाहेब आंबेडकर’ या चरित्र ग्रंथात पुढील प्रमाणे माहिती देतात, ” मुसलमानांची संख्या वाढावी म्हणून निजामच्या हैद्राबाद संस्थानमध्ये देखील दलित समाजातील लोकांना मुसलमान धर्माची दीक्षा दिली जात आहे असेही त्यांनी आपल्या पत्रकात म्हटले. त्यामुळे आंबेडकरांनी आपल्या लोकांस असा उपदेश केला की, 'पाकिस्तानमध्ये पेचात सापडलेल्या दलित समाजाने सापडेल त्या मार्गाने व साधनाने हिंदुस्थानात यावे, असे मी सांगू इच्छितो. दुसरी एक गोष्ट मला सांगावयाची आहे ती अशी की, पाकिस्तान किंवा निजामचे हैद्राबाद संस्थान यांतील मुसलमानांवर किंवा मुस्लीम लीगवर विश्वास ठेवण्याने दलित समाजाचा घात होईल. दलित वर्ग हिंदू समाजाचा तिरस्कार करतो म्हणून मुसलमान आपले मित्र आहेत असे मानण्याची वाईट खोड त्यांना जडली आहे. ती अत्यंत चुकीची आहे.' पाकिस्तान आणि हैद्राबादमधल्या दलित समाजाला इस्लाम धर्माच्या दीक्षेला त्यांनी केवळ जीव वाचविण्याच्या हेतूने बळी पडू नये, असा आंबेडकरांनी सल्ला दिला. ज्यांना बळजबरीने पाकिस्तानात किंवा हैद्राबादमध्ये इस्लाम धर्माची दीक्षा दिली होती, त्या दलित लोकांना त्यांनी असे आश्वासन दिले की, त्यांचे धर्मांतर होण्यापूर्वी त्यांना जसे वागविण्यात येई तशीच त्यांना येथे आल्यावर पुन्हा स्वीकृत करून घेऊन बंधुभावाची वागणूक मिळेल. हिंदूंनी त्यांचा कितीही छळ केला तरी त्यांनी आपले मन कलुषित करून घेऊ नये. हैद्राबादमधील दलित वर्गांनी निजामाची - जो उघडउघड हिंदुस्थानचा शत्रू आहे - त्याची बाजू घेऊन आपल्या समाजाच्या तोंडाला काळिमा लावू नये.' असा त्यांनी अस्पृश्य वर्गास इशारा दिला. पाकिस्तानमधील दलितवर्गीय लोकांना हिंदुस्थानात आणण्याची भारत सरकारने त्वरित व्यवस्था करावी, अशी त्यांनी भारताचे पंतप्रधान नेहरू यांचेकडे मागणी केली. निजामच्या हैद्राबाद संस्थानविरुद्ध भारतीय सरकारने जेव्हा दोन वर्षानंतर पोलीस कारवाई केली तेव्हा आंबेडकरांनी त्या कारवाईचे प्रमुख गृहमंत्री सरदार पटेल यांना मोठ्या नेटाचा पाठिंबा दिला.” ( संदर्भ - धनंजय कीर लिखित 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' चरित्र, पॉप्युलर प्रकाशन, पृ. क्र. ४४३)

हैद्राबाद संस्थानांत धर्मांतराची मोहीम

हैद्राबाद संस्थानांत धर्मांतराची मोहीमच सुरु होती. लेखक नरेंद्र चपळगावकर यांनी त्यांच्या ‘कर्मयोगी संन्यासी’ स्वामी रामानंद तीर्थ यांच्यावरील लिहिलेल्या ग्रंथात याबाबत माहिती दिली आहे. बहादूरखान याने १९२७ मध्ये हैदराबादेत ‘तबलीग’ म्हणजेच शुद्धीकरणाची मोहीम सुरु केली. शुद्धीकरनाचा सरळ अर्थ इतर धर्मियांना मुस्लीम करणे असा होत. या बहादूरखान ला निजाम उस्मानअलीने ‘नवाब बहादूरयारजंग’ असा खिताब दिला व जाहगीरही दिली. बहादूरखान ने धर्मांतराची मोहीम जोरकसपणे चालविली आणि निजाम नोकरदारांनी त्याला त्यासाठी मदत केली. शेकडो पगारी धर्मप्रचारकांची नेमणूक सुद्धा करण्यात आली होती. ब्रिटीश रेसिडेंट ने १ सप्टेंबर १९३६ रोजीच्या त्यांच्या पाक्षिक अहवालात लिहिले आहे कि, गेल्या दशकात २०,००० हून अधिक दलितांना मुस्लीम धर्माची दीक्षा देण्यात आली आहे. १९३६ साली धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्याच्या एकाच दौऱ्यात बहादूरयारजंग याने ५५० दलितांना मुस्लीम बनवले होते. हि आकडेवारी पाहता धर्मांतराची चळवळ किती व्यवस्थित सुरु होती हे लक्षात येते. हि धर्मांतर चळवळ धार्मिक, राजकीय हेतूने सुरु होती.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी -

प्रचंड अभ्यास आणि दूरदृष्टी असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर दलित वर्गाला स्पष्ट आवाहन करताना दिसतात कारण मुळात इस्लाम चा आणि इस्लामी राजवटींचा बाबासाहेबांचा सखोल अभ्यास होता. इस्लामिक पाकीस्तान किंवा निजामी हैद्राबाद मध्ये दलितांचे तसेच गैर मुस्लिमांचे कल्याण होऊ शकणार नाही हे स्पष्टच होते. इस्लाम च्या संदर्भात बाबासाहेबांनी "Pakistan or the Partition Of India" या ग्रंथात विस्तुत आणि तथ्यपूर्ण लिखाण केलेलं आहे व DR. BABASAHEB AMBEDKAR WRITINGS AND SPEECHES" या प्रकल्पाच्या अंतर्गत जे विविध खंड आहेत, त्यातील "Volume No. : 8" मध्ये हा ग्रंथ समाविष्ट केलेला आहे. इस्लामिक आक्रमणांचा हेतू बद्दल बाबासाहेब लिहितात, "ही मुस्लीम आक्रमणे केवळ लूट किंवा विजयाच्या लालसेपोटी केलेली नव्हती. त्यांच्या मागे आणखी एक हेतू होता... हिंदूंच्या मूर्तिपूजा व अनेकेश्वरवादावर प्रहार करणे आणि भारतात इस्लामची स्थापना करणे हे देखील या मोहिमेचे एक उद्दिष्ट होते याबद्दल मुळीच शंका नाही. " (संदर्भ खंड ८, पृ.क्र ५५ ) इस्लाम चे तत्व व त्यानुसार मुस्लिमांच्या निष्ठांच्या बाबत बाबासाहेब लिहितात, "इस्लाम हा मानवांमध्ये अगदी कठोर विभागणी करतो. इस्लाम हे एक बंदिस्त मंडळ आहे आणि मुस्लीम व गैर-मुस्लीम यांच्यात तो जो फरक करतो तो एक अतिशय वास्तविक व पराकोटीचा फरक आहे. इस्लामचे बंधुत्व हे मानवतेचे वैश्विक बंधुत्व नाही. ते केवळ मुस्लिमांसाठी मुस्लिमांचे बंधुत्व आहे. त्यात बंधुत्व आहे पण त्याचा फायदा हा इस्लामिक मंडळातील लोकांपर्यंत मर्यादित आहे. जे लोक या मंडळाच्या बाहेर आहेत त्यांच्यासाठी अवहेलना व शत्रुत्वाशिवाय काहीही नाही. इस्लामचा दुसरा दोष असा आहे की ती एक सामाजिक स्वयंशासनाची व्यवस्था आहे. ही व्यवस्था स्थानिक भूमीतील शासनसंस्थेशी सुसंगत नाही, कारण मुस्लिमाची निष्ठा ही त्याच्या निवासी देशावर नाही, तर त्याच्या धर्मावर असते. मुस्लिमांसाठी "पोषण करणारी भूमी हाच माझा देश" हा विचार अकल्पनीय आहे. त्यांच्यासाठी जिथे इस्लामची राजवट आहे तो त्यांचा देश आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, इस्लाम खऱ्या मुस्लिमाला भारताला आपली मातृभूमी म्हणून स्वीकारण्याची आणि हिंदूला आपले भाऊबंध मानण्याची परवानगी देऊ शकत नाही. त्यामुळेच बहुधा एक महान भारतीय पण सच्चा मुस्लीम असलेल्या मौलाना मोहंमद अली यांनी स्वतःला भारतात दफन करण्याऐवजी जेरुसलेममध्ये दफन करणे पसंत केले असावे." ( संदर्भ खंड ८, पृ.क्र. ३३१)

पोलीस ॲक्शन आणि डॉ. आंबेडकर :

हैदराबाद संस्थानावर भारत सरकारने कारवाई करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सरदार पटेल यांनी तत्कालीन कायदामंत्री असलेले डॉ. आंबेडकरांशी सविस्तर चर्चा केली होती. डॉ. आंबेडकरांचे मत असे होते कि, आपण जर सैन्य पाठविण्याचा निर्णय घेणार असाल, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे विपरीत परिणाम होतील. या घटनेची युनोमध्ये चर्चा होईल. भारताचे सैन्य हैदराबाद संस्थानात घुसले व त्यांनी हैद्राबाद संस्थानावर आक्रमण केले असे अनेक अर्थ निघू शकतील. डॉ. आंबेडकरांनी सूचना केली कि आपण सैन्य पाठवू, पण या कारवाईला ‘पोलिस ॲक्शन’ असे नाव देवू. डॉ. बाबासाहेबांच्या सूचनेचा सरदार पटेल यांनी स्वीकार केला. त्याअगोदर आंतरराष्ट्रीय न्यायालयात व युनोमध्ये हैदराबाद संस्थानाची बाजू मांडावी, म्हणून निजामाने डॉ. आंबेडकरांना विनंती केली होती. मात्र निजामाची विनंती धुडकावून लावत निजामाला युनोमध्ये प्रतिवाद करण्यासाठी यत्किंचितही जागा राहणार नाही, अशा रीतीने आंतरराष्ट्रीय कायद्याचा मागोवा घेत कायदेशीर बाजू सांभाळण्याचे काम डॉ.आंबेडकरांनी केले. सप्टेंबर महिन्यात भारताने सैन्य पाठवले, त्यापुढे निजामाचा टिकाव लागला नाही आणि निजाम शरण आला. १७ सप्टेंबर १९४८ या दिवशी हैद्राबाद संस्थान निजामाच्या जुलमी वर्चस्वातून मुक्त झाले.

समारोप –

निजामची राजवट संपली असली तरी त्या धर्मांध मानसिकतेच्या फुटीर शक्ती आजही टिकून आहेत व सक्रीय सुद्धा आहेत. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर केंद्र सरकार ने नुकतीच बंदी घातली. या संघटनेच्या अनेक म्होरक्यांना मराठवाड्यातून अटक झाली आहे. अनेक दंगली, हिंसक घटना व देशविघातक गतीविधी मध्ये या संघटनेचे लोक कार्यरत आहेत. AIMIM हा पक्ष आणि त्यांचे नेते मुक्तीदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणे टाळतात. १७ सप्टेंबर ला दरवर्षी छत्रपती संभाजीनगर येथे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुक्ती संग्राम दिनाचा कार्यक्रम होत असतो. छत्रपती संभाजीनगर चे एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील हे लोकप्रतिनिधी असूनही ते या कार्यक्रमाला गैरहजर राहताना दिसतात. तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश देताना दिसत नाहीत. डॉ.आंबेडकरांचा वारसा सांगणारे प्रकाश आंबेडकर यांनी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत AIMIM सोबत युती केल्याने इम्तियाज जलील खासदार झाले. परंतू प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर लोकसभा मतदार संघातून उभे राहिलेले असताना दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्वाचे विधान केले कि, “मुस्लीम मतं न मिळाल्यानेच आमचा पराभव” त्यानंतर त्यांनी युती तोडली. नुकतेच प्रकाश आंबेडकर यांनी अत्याचारी औरंगजेब च्या कबरीवर जावून फुले वाहिली व एक अर्थाने औरंगजेब चे उदात्तीकरण केले. यामुळे हैद्राबाद मुक्ती संग्रामात डॉ बाबसाहेब आंबेडकरांची भूमिका काय होती हे समजून घेणे आजही तितकेच महत्वाचे आहे.

भारतरत्न डॉ.आंबेडकरांनी धर्मांध निजामाला तसेच दलित, वंचित समाजाच्या होत असलेल्या इस्लाम धर्मांतराला विरोध केला. मराठवाड्यातील दलितांची स्थिती बिकट होती. निजामाकडून होत असलेले जुलूम, पिळवणूक, तसेच गरिबी, शिक्षणाचा प्रचंड अभाव आणि जातीय विषमता, भेदभाव अशी ही परिस्थिती बदलण्यासाठी स्वातंत्र्य आवश्यक होते. डॉ. आंबेडकरांनी छत्रपती संभाजीनगर शहरात शिक्षण संस्था सुरु केली. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या संघर्षात अनेक स्वातंत्र्यसेनानिंनी प्राणांची आहुती दिली. डॉ.बाबासाहेबांच्या निजाम विरोधी स्पष्ट भूमिकेमुळे अनेक दलित बांधवानी या मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात सहभाग नोंदवला. स्वामी रामानंद तीर्थ, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वामुळे धर्मांध निजामाच्या तावडीतून मराठवाडा स्वतंत्र झाला. भारत एक राहिला व येथील जनतेसाठी विकासाची दारे खुली झाली.

संदर्भ सूची –
1. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर', लेखक - धनंजय कीर, पॉप्युलर प्रकाशन.
2. DR. BABASAHEB AMBEDKAR WRITINGS AND SPEECHES - Volume No. : 8
3. ‘कर्मयोगी संन्यासी’, लेखक - नरेंद्र चपळगावकर, मौज प्रकाशन.
4. ‘बाबासाहेबांच्या चरित्र लेखांतील उणीवा’, लेखक – ज.वि.पवार, अस्मिता कम्युनिकेशन प्रकाशन.
5. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि मराठवाडा, लेखक – डॉ.सुधाकर नवसागर, सौरव प्रकाशन.
6. लेख – ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि हैद्राबाद स्वातंत्र्य संग्राम’, लेखक – डॉ.अनिल मुरलीधर कठारे.
7. ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीतून इस्लाम’, संकलक – भारत आमदापुरे, मर्वेन टेक्नोलॉजी.

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokshahi Jagar Manch posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Lokshahi Jagar Manch:

Share