17/06/2026
*सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्पाचा विद्यार्थी सत्कार व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न*
सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प आयोजित इयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच कॅरम व बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षीस वितरण कार्यक्रम शनिवार, दि. १३ जून २०२६ रोजी मोरया उद्यान, विद्यानगर, टिंगरे नगर, पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास ८४ विद्यार्थी, २९ शिक्षक, समन्वयक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुणे व मुख्य वक्ते मा. प्रा. श्री. अनिल कुमार चौहान (संस्थापक, PACIS आंतरराष्ट्रीय शाळा व ज्युनिअर कॉलेज, लोहगाव) यांचे संस्थेचे संस्थापक सदस्य व संचालक श्री. विजय शिवले सर यांच्या हस्ते रौप्यमहोत्सवी "सुराज्य" पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी येरवडा भाग सहसेवा प्रमुख श्री. प्रदीपजी मोदी, संस्थापक सदस्य श्री. निलेश ओव्हाळ, कोअर कमिटी सदस्य श्री. मुकुंद अय्यर तसेच इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. दीपक सागर यांनी केले. त्यांनी संस्थेचे विविध उपक्रम, दहावी-बारावी शिक्षणाचे महत्त्व आणि आगामी योजनांची माहिती दिली. त्यानंतर श्री. अक्षय गाडे यांनी "आम्ही गड्या डोंगरचे राहणार" हे प्रेरणादायी गीत सादर करून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला.
यानंतर दहावी विशेष वर्ग, अभ्यासिका तसेच बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. दहावी विशेष वर्गातील निखिल जगदाळे (८२%), साई गायकवाड (८१.८०%) आणि स्वराज गवळी (७६%), अभ्यासिकेतील अदिती राठोड (९२%), महेश्वरी भोसले (८९%) आणि शगुन किरडे (८२.२०%), तर बारावीतील तेजल मोरे (७८%), वैष्णवी सातपुते (७२%) आणि सायली म्हस्के (७२%) या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच दहावी विशेष वर्गासाठी योगदान देणाऱ्या शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना शालेय बॅग, वह्या, फोल्डर व इतर शैक्षणिक साहित्य भेटस्वरूपात प्रदान करण्यात आले.
यानंतर प्रमुख वक्ते मा. प्रा. श्री. अनिल कुमार चौहान यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया, करिअर निवड, जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि योग्य दिशेने वाटचाल याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी स्वतःच्या अनुभवातून अनेक प्रेरणादायी उदाहरणे देत विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा व ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा संदेश दिला.
त्यानंतर भव्य क्रीडा महोत्सवांतर्गत आयोजित कॅरम व बुद्धिबळ स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. स्पर्धांची प्रस्तावना व माहिती श्री. निंगप्पा यातनूर यांनी दिली.
कॅरम स्पर्धा (छोटा गट)
विजेता – विग्नेश गवळी
उपविजेता – आरव आराडे
उत्तेजनार्थ – रोनित कदम
कॅरम स्पर्धा (मोठा गट)
विजेता – स्वराज गवळी
उपविजेता – सम्राट त्रिभुवन
उत्तेजनार्थ – अर्चिता नायक
बुद्धिबळ स्पर्धा
विजेता – सम्राट त्रिभुवन
उपविजेता – स्वराज गवळी
सर्व विजेत्यांना ट्रॉफी प्रदान करून गौरविण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्राची बावस्कर यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. हेमंत कुसंगे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थी, शिक्षक व उपस्थित मान्यवरांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
– सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प
#सुराज्य