दिनांक २१ फेब्रुवारी २०१५ रोजी आम्ही औपचारिकपणे "शनिवार कट्टा" स्थापन केला.आप्त-जिवलगांच्या मांदियाळीत आणि पुण्याचा सांस्कृतिक चेहरा असलेले सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व,ज्यांनी "कट्टा" संस्कृती पुण्यातून जगाच्या पाठीवर नेली असे मा.उपमहापौर,पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष आणि आमचे पितृतुल्य मार्गदर्शक आदरणीय डॉ.सतीश देसाई आणि पुण्याचा लाडका RJ,प्रतिथयश अभिनेता आणि माझा प्रिय मित्र सुहृद वार्डेकर या दोन दिगज
्जांच्या शुभहस्ते कट्ट्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी पुण्यातल्या किंवा पुण्याबाहेरच्या,कोणत्याही वयोगटातल्या आणि कुठल्याही क्षेत्रात प्रेरणादायी कार्य केलेल्या नामवंत पाहुण्यांना या कट्ट्याला निमंत्रित करून त्यांच्याशी अगदी मनमोकळ्या आणि अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम असतो.गेल्या दीड वर्षात म्हणून ज्या मान्यवर मंडळींचा सहवास लाभला त्यात महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे,ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेशजी तेंडुलकर,ज्येष्ठ साहित्यिक प्रा.द.मा.मिरासदार,अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी कार्याध्यक्षा डॉ.सौ.माधवी वैद्य,ज्येष्ठ उद्योगपती-क्रिकेटपटू आदरणीय श्री.माधवराव आपटे,नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गूढ मृत्यूचे रहस्य उकलणारे ज्येष्ठ पत्रकार श्री.अनुज धर(दिल्ली),सुप्रसिद्ध अभिनेत्री-निर्माती-दिग्दर्शिका सौ.मृणाल कुलकर्णी,पुरंदरे प्रकाशनचे श्री.अमृतराव पुरंदरे,भारतच नव्हे तर जगातल्या अनेक उच्चपदस्थ व्यक्तींच्या डोक्यावर ज्यांची पुणेरी पगडी विराजमान झाली आहे असे "मुरुडकर झेंडेवाले" संचालक श्री.गिरीशजी मुरुडकर आणि शतकोत्तर वाटचालीकडे कूच करणारे पुण्यातले पहिले रंगकर्मी "बेडेकर पेंटर्स"चे संचालक श्री.श्रीकांतजी बेडेकर आदी दिगज्जांचा यात समावेश आहे!
गेल्या दीड वर्षातील कट्ट्याच्या प्रगतीचा आलेख अतिशय सुखद आणि अधिक जोमाने कार्य करण्याची स्फूर्ती देत आहे.पहिल्या दिवसापासून ते या तारखेपर्यंत ज्यांनी हा उपक्रम वृद्धिंगत करण्यात भक्कम आणि मोलाची साथ दिली त्या सर्व संस्थापक सदस्यांच्या प्रती "शनिवार कट्टा" अतीव कृतज्ञ आहे! भविष्यात या वैचारिक चळवळीच्या माध्यमातून जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचण्याचा आणि अनेक विधायक उपक्रम राबवण्याचा शनिवार कट्ट्याचा मानस आहे!
-वरुण राजीव पालकर,
संस्थापक अध्यक्ष