18/04/2026
स्वनिल फाऊंडेशनचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
स्वनिल फाऊंडेशनचा 15 वा वर्धापन दिन स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध लेखक, बालकारणी राजीव तांबे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या संचालक स्मिता पाटील यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी संस्थेच्या गेल्या वर्षांतील कार्याचा आढावा घेत उपस्थितांना संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली.
स्वनिल फाऊंडेशनच्या संचालकपदी निवडीबद्दल ॲड. स्वाती देशपांडे - यादवाडकर यांचे स्वागत करण्यात आले.
संस्थेचे काम अधिक व्यवस्थात्मक पद्धतीने पुढे नेण्यासाठी संजीव कुलकर्णी, प्रीती पाटकर, डॉ. गीता मांढरे, पौर्णिमा देशमुख, नेहा देशपांडे यांची महत्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यात आली. या नव्या पदाधिकाऱ्यांची ओळख, स्वागत आणि सत्कार करण्यात आला.
यानंतर प्रोजेक्ट ऑफिसर गीता मांढरे, पौर्णिमा देशमुख आणि नेहा देशपांडे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचे प्रेझेंटेशन सादर केले. संस्थेच्या वेबसाईटचे उद्घाटन गाथा आणि सुहृदा यांच्या हस्ते झाले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी चर्चेत सहभाग घेत स्वनिल फाऊंडेशनच्या कार्याबाबत आपली मते मांडली. तसेच भविष्यात संस्थेसोबत कशा प्रकारे सहकार्य करता येईल याविषयीही चर्चा केली.
संस्थेशी अनेक वर्षांपासून जोडलेल्या शुभांगी तांबडे, योगिता हलुंडे, रत्नाली मुंदडा, स्वाती वावळ या पालकांनी स्वनिलच्या कार्याचे कौतुक करत, मुलांच्या जडणघडणीत या उपक्रमांचा मोठा सकारात्मक परिणाम झाल्याचे नमूद केले. “आमची मुले आज २२-२३ वर्षांची झाली असली तरी त्यांच्या बालपणी स्वनिलच्या उपक्रमांचा मोठा फायदा झाला,” असे त्यांनी सांगितले. पुढेही संस्थेच्या कार्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दर्शवली.
यावेळी बोलताना स्वनिल वेलविशर कौन्सिलचे राजीव तांबे यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील दरी कमी करणारे अभ्यासक्रम आवश्यक असल्याचे सांगितले. “शिक्षण हे खेळाच्या माध्यमातून देणे गरजेचे आहे. मुलांचे मूल्यांकन करण्याऐवजी त्यांना मूलभूत संकल्पनांकडे नेणाऱ्या ऍक्टिव्हिटीजवर भर द्यावा,” असे ते म्हणाले. मल्टीडायमेन्शनल थिंकिंग विकसित करण्यासाठी पाठ्यपुस्तकांवर आधारित उपक्रमांची गरज त्यांनी अधोरेखित केली.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या कार्यकर्त्या नूतन इंगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे येथील राज्य शाळा मानक प्राधिकरण कार्यक्रम सहायक सूर्यकांत शहाणे, सेवा सहयोग फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश घाटपांडे, स्वनिल वेलविशर कौन्सिलचे प्रसाद मिरासदार, सी. ए योगेश जोशी, ॲड. मयुरा सेवेकरी, कोडवर्ज आय टी सोल्युशन्सचे प्रमुख वैभव मोगरेकर, प्रणाली गिरमे, शरयू जगताप, आयटीचच्या वृषाली तळपे, ॲड महादेव शिंदे, टीम मेंबर कविता उमराणी, मितीका पातूरकर, तन्वी शहाणे, सीमा, गिरीश चौधरी आदींसह अन्य पालक व हितचिंतक उपस्थित होते.