26/03/2026
"गीतरामायणाची ७१ वर्षे!"
(गीतरामायणामागील गदिमांची प्रेरणा,गदिमांच्याच शब्दात...)
गीतरामायण कलाकृती यंदा ७१ व्या वर्षात पदार्पण करत आहे.१ एप्रिल १९५५ रोजी पुणे आकाशवाणीवर गीतरामायणाच्या पहिल्या गीताचे प्रसारण झाले होते.मराठी भाषेत अशी अजोड कलाकृती आता परत होईल असे वाटत नाही,महाकवी ग. दि.माडगूळकर यांच्या लेखणीतून उतरलेली व सुधीर फडके यांनी स्वरसाज दिलेली ही कलाकृती.गीतरामायणाची प्रेरणा गदिमांना कशी मिळाली हे त्यांच्याच लेखणीतून....
"गीतरामायणाचे रामायण!"
....ग.दि.माडगूळकर
महाकवी वाल्मीकीने रामायण लिहिले. आपल्या अनुभूतींच्या आणि प्रतिभेच्या बळाने अनेक घटना, अनेक स्वभावचित्रे,अनेक रसांच्या रंगच्छटा निर्माण करून,भावभावनांचे उद्रेक उभे केले.माणसांच्या मनांतील सुखदु:खांची एक सौंदर्यमयी गाथा गुंफली.शब्दांच्या सामर्थ्याने एक आगळे विश्वच आकाराला आणले.प्रत्यक्षाहून उत्कट अशी नवी निर्मिती केली.तेवढ्यावर ते थांबले नाहीत.त्यांनी ते काव्य आपल्या शिष्यांना पढवले.श्रीरामाच्या राजसूय यज्ञाचा सुयोग्य समय गाठून रामायण गायन करण्यासाठी त्यांनी कुश-लवांना अयोध्येला पाठविले.अयोध्येत जमलेले अगणित श्रोते आणि स्वत: श्रीराम ते काव्य ऐकून बेहोष झाले असतील.ब्रह्मास्वादसहोदर मानला गेलेला आनंद त्यांना लाभला असेल.तेव्हा वाल्मीकीच्या अंतरातला कवीही तृप्त झाला असेल,कृतकृत्य झाला असेल.
निर्मितीच्या आनंदापेक्षा सुज्ञ रसिकतेला वेडे करून टाकण्यातला आनंद अधिक मोठा असतो का? या दोन्ही आनंदात कोणता आनंद मोठा,हे निश्चित समजण्यासाठी एखाद्या अधिकारी पुरुषाशीच आपला सुखसंवाद झाला पाहिजे.'स्वान्तसुखाय रघुनाथ गाथा' लिहिणाऱ्या तुलसीदासांच्या आत्मकथनातच अशा प्रश्नांचे उत्तर लाभायचे. प्रकाशण्यातला आनंद मोठा की प्रकाशाने दिपलेले जग पाहण्यातला आनंद मोठा, हे एखाद्या साहित्यभास्करालाच विचारले पाहिजे. मी काय सांगू? वाड्मयीन निर्मिती आणि तिचे हेतू याविषयी वादातीत सिद्धांन्त मांडणे ही गोष्ट अवघड आहे.माझ्यासारख्या सामान्य कलाकाराच्या तर ती आवाक्याबाहेरची आहे.'बोलिले बोलावे, म्हणिले म्हणावे'असाच हा काहीसा प्रकार होतो आहे.वाड्मयीन निर्मितीमागचे हेतू शोधून काढण्याचा एक धोपट मार्ग मला सुचतो आहे.मला वाटते,आपण तो चोखाळावा.
माझे 'गीतरामायण' आपल्या आवडीचे आहे.त्याच्या श्रवणाने,वाचनाने आपल्याला आनंद झालेला आहे.माझ्या कृतीला आपण कलाकृती मानले आहे.म्हणून तिच्या निर्मितीमागची कारणे धुंडाळण्याचा प्रयत्न आपल्या साहचर्याने करण्याचाच माझा विचार आहे.
गीतरामायणाच्या निर्मितीचे मूळ बीज खूप जुने आहे.मी अकरा-बारा वर्षांचा मुलगा होतो.माणदेशातील एका अज्ञात खेड्यात आमचे कुटुंब नांदत होते.त्या गावातला निसर्ग सौंदर्यसमृद्ध नाही हे मी अनेकदा आपल्याला सांगितलेच आहे.तिथे जे काही होते त्यातही काही निराळी सुंदरता असते,ही गोष्ट वेगळी.साहित्य,वाड्मय हे शब्दही त्या खेड्यात कुणाला माहीत नव्हते.उभा गाव निरक्षर.सात-आठ कुटुंबे ब्राह्मणांची होती.एक-दोन वतनदार पाटलांची.
त्यात दहा-वीस लिहिणारे-वाचणारे होते,पण त्यांच्या वाचनाला रसिकतेचा वारा नव्हता.व्यवहार व परमार्थसाधना इतकीच त्यांच्या वाचनाची व्याप्ती होती.लेखणीचा निर्मितीशी सुतराम संबंध नव्हता.आमच्या घरात पोथ्या-पुस्तके होती.आईला देवाधर्माचे वेड होते. घरातल्या कामाचा रामरगाडा सांभाळून मिळेल त्या वेळी ती रामरायाचे नाव घ्यायची. संतांच्या वचनांचे पाठ तर 'दळिता कांडिता' तिच्या मुखी असायचे. गावात कुणी पुराणिकही नव्हता, कथेकरी नव्हता. साहित्यसदृश असे काही कानी पडायचे ते आईच्या तोंडून.
सुगीच्या आसपास काही लोककलाकार घराबाहेर पडायचे. भिक्षेच्या मिषाने त्या खेड्यात यायचे. त्यांच्या तोंडूनही कथाकाव्यासारखे काही तरी ऐकायला मिळायचे. जात्यावरच्या या ओव्या मात्र ओसंडून वाहत होत्या. त्या ओव्यांतले स्नेहोदात्त भाव आणि सुप्त आकांक्षा त्या वयातही मला ऐकायला आवडत.गावातल्या प्राथमिक शाळेत त्या वेळी मी काही तरी शिकत होतो. सोनार मास्तरांनी शिकवलेल्या कवितांपेक्षा जात्यावरच्या ओव्या अधिक चांगल्या असत.गोपाळतात्या म्हणून आमच्या नात्यातले एक गृहस्थ होते. ते कुठे तरी बाहेरगावी नोकरीला होते. पेन्शन घेऊन की रजा काढून कुणास ठाऊक, ते गावी आले.गावच्या मारुतीच्या देवळात त्यांनी 'राम विजया'चे वाचन सुरू केले. आईबरोबर मीही ते ऐकायला जाऊ लागलो.
समईचा पिवळा प्रकाश, रसाळपणे वाचणारे तात्या, कान देऊन ऐकणाऱ्या म्हाताऱ्याकोताऱ्या देवाचे, नाव निघाले की हात जोडण्याची त्यांची लकब, या साऱ्या गोष्टी मला प्रिय वाटत. गोपाळतात्यांच्या तोंडून श्रीधराचा 'रामविजय'मी समग्र ऐकला. पांडवांची कथाही ऐकली. कोवळी जिज्ञासा जागी झाली. तात्यांना मी अनेक प्रश्न विचारले. त्यांनी आपुलकीने उत्तरे दिली. मला नवे ज्ञान मिळाले.
माझ्या गावापासून कोसा-दीड कोसावर माणनदीच्या काठी नाझरे नावाचे एक गाव आहे. तिथे एक श्रीधरस्वामी होऊन गेला. त्यानेच 'रामविजय', 'पांडवप्रताप' ह्या पोथ्या रचल्या. त्या श्रीधरस्वामींच्या जिव्हेवर म्हणे रामदासांनीच श्रीकार लिहिला होता. रामकथेइतक्या औत्सुक्यानेच मी श्रीधरस्वामीविषयीच्या कथाही ऐकल्या. त्यातल्या दोन कथांनी मला जणू पछाडून टाकले. कसे कुणास ठाऊक, पण रात्रीच्या वेळी निळ्या आभाळाखाली चांदण्या मोजीत अंगणात पडलो असताना एकाएकी माझ्या मनात आले, 'आपणही श्रीधरासारखी पोथी रचावी.' तशी पोथी रचणे फार अवघड काम आहे असे त्या वेळी मला वाटले नाही. आई ओव्या रचीत होती. गावातल्या मराठणीही रचीत होत्या. रामाची गोष्ट तर माहीत होती. माझ्या मनातला हा विचार माझ्याकडून प्रत्यक्षात आला नाही.येणे असंभाव्यच होते. गावातल्या खाला नावाच्या एका मुसलमानणीने माझे ते काम आधीच करून टाकले होते. सारी 'रामकथा' तिने ओव्यांत ओवली होती.
माझा विचार तिथेच राहिला. पुढे वडिलांच्या नोकरीच्या गावी शिक्षणासाठी राहिलो. तिथेही मी आईबरोबर असंख्य कथाकीर्तने ऐकिली. दामोदरबुवा रिसबूडकर म्हणून एक कीर्तनकार होते.त्यांची रामावरची कीर्तने ऐकून मी खुळावल्यासारखा झालो. स्वच्छ वाणी आणि नेटका अभिनय यांच्या साहाय्याने 'रामकथे'चे निरूपण करता करता ते एकदम संगीताच्या साम्राज्यात जायचे.
राम जानकीला उद्देशून म्हणाले-'
असा प्रस्ताव करून ते चटकन रामाच्या म्हणण्याचे 'गाणे'च करून टाकीत.गायनास प्रारंभ करीत. मी थक्कच होऊन जाई. रामाच्या म्हणण्याचे गाणे करण्याची किमया तरी आपल्याला यावी असे मला तेव्हा वाटले, पण घडले काहीच नाही.श्रीधरासारखी ओवी आणि रिसबूडकरांसारखे गाणे रचावे, या मनच्या इच्छा तशाच राहून गेल्या. पुढे औंध येथे माध्यमिक शिक्षणासाठी आल्यावर मला हवी ती हवा मिळाली. त्या लहानशा गावात फार मोठे ग्रंथालय होते. साऱ्या ललितकलांची साधना फार मोठ्या निष्ठेने केली जात होती. एक कविमंडळ होते.आमचे एक शिक्षक कवी शशांक नावाचे नामवंत कवी होते. औंधाच्या राजाजवळ फार अव्वल दर्जाची रसिकता होती.ते स्वत: फार उत्तम कीर्तने करीत.
पदरी कीर्तनकार बाळगीत. विद्वानांना,साहित्यिकांना मुद्दाम पाचरण करून त्यांची व्याख्याने करीत. तिथे मी खूप ऐकले. नवरात्र मंडपातली व्याख्याने ऐकली. मराठी साहित्यातील असंख्य पुस्तके वाचली, समजावून घेतली. साहित्य सभामंडळांतील साहित्यचर्चा ऐकल्या.आपणही लिहिले पाहिजे असे वाटू लागले.इंग्रजी सहाव्या इयत्तेमध्ये किंवा मॅट्रिकमध्ये असतानाच माझी पहिली कविता प्रसिद्ध झाली. ती अभंग वृत्तात होती. त्या वेळी 'विषमता' हा तिचा विषय होता :
दगडाच्या देवा, दह्याच्या घागरी ।
अस्पृश्याच्या घरी, ताक नाही ।।
पाळीव पोपट, गोड फळे त्याला |
आणि अस्पृश्याला कदान्न का? ||
कीर्तनात ऐकलेले तुकोबाचे अभंग,राजदैवताच्या देवळात पाहिलेला दह्यादुधाचा अभिषेक, माडगूळच्या महारवाड्यात पाहिलेली महार-चांभारांची दैन्यावस्था, तुकड्यालाही महाग असणारे स्वत:चे कळाहीन जीवन, या साऱ्या गोष्टींचा ठसा ओबडधोबड अवस्थेत का होईना, त्या कवितेत उमटला.रामचरित्रावर लिहिण्याची इच्छा आतल्या आतच राहिली होती.
औंधचे राजेसाहेब स्वत: चित्रकार होते.'चित्ररामायण' नावाचा एक चित्रसंग्रह त्यांनी स्वत: सिद्ध केला होता. अवघे रामचरित्र चित्रांच्या माध्यमाने सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. माझ्या मनालाही त्या चित्रांचे पुनर्निर्माण करण्याची ओढ होती. रामाची थोरवी,दशरथाचे दुबळेपण, लक्ष्मणाची निष्ठा,सीतेचे दु:ख हे विषय आता मला उमगू लागले होते. बाळपणी अद्भुत म्हणून आवडलेले रामचरित्र आता वेगळ्याच कारणांसाठी आवडू लागले होते.
विद्यालयीन शिक्षण अटकले. वृद्ध झालेल्या वडिलांची नोकरी गेली. भावंडांची अवस्था पाहून जीव तिळतिळ तुटू लागला. घरी राहवेना म्हणून बाहेर पडलो. रानभैरी झालो, वनवासी झालो. हे वनवासाचे दुःख रामासारख्या मर्यादा पुरुषोत्तमाला चुकले नाही, मग आपण कोण, या विचाराने पुष्कळदा काळजावर फुंकर घातली. रामायणावर लिहिण्याची इच्छा पुन्हा एकदा उद्भवली व ओसरलीही.दारिद्र्याचे विनामूल्य मनोरथही फळास आले नाही. दोरी तुटलेल्या पतंगासारखा दिशाहीन भरकटलो. आई-वडिलांना धीर दिला पाहिजे, भावंडांच्या पालन-पोषणाची जबाबदारी घेतली पाहिजे, ही जाणीव मनाला सतत होती. पण करतो काय? कुठे पायच टेकेना.
भटकता भटकता पुण्यात पोचलो.खचलेल्या मनाने, मळक्या कपड्याने आणि उपाशी पोटाने पुण्याच्या रस्त्यातून भटकत असताना अचानकपणे वडिलांचे एक मित्र भेटले. त्यांचे नाव कै. रामकृष्णपंत पराडकर. त्यांनी मायेने विचारपूस केली, तेव्हा ओठांतून शब्द फुटला नाही. डोळ्यांतून धारा वाहू लागल्या. पंतांनी मायेने पाठीवरून हात फिरविला. घरी नेले. आसरा दिला. घराविषयीची कर्तव्ये मनात एकसारखी सलत होती. करता काही येत नव्हते. वेळ रिकामा होता. वाचनाचे व्यसन लागले होते. पंतांच्या घरी त्या व्यसनपूर्तीची साधने पुष्कळ होती.
ते मोरोपंत कवींचे वंशज. मोरोपंतांच्या काव्याचे प्रकाशन करण्याचा उद्योग यांनी केला होता. 'केकावली', 'संशय रत्नमाला', 'हंसकाकीय आख्यान','कर्ण-शल्यांचे संभाषण' इत्यादी पंतांची प्रकरणे पूर्वी वाचनात आली होती. इथे त्यांचे 'आर्याभारत' सापडले. 'अष्टोत्तर शतरामायण'ही गवसले. त्यातले पुष्कळसे साहित्य मी वाचून काढले. रामचरित्रावर लिहिण्याची इच्छा पुन्हा बळावली; पण लिहितो कसला कपाळ! एक अक्षरदेखील लिहिले नाही.
कोल्हापुरात आलो. चित्रपट व्यवसायात प्रवेश मिळविला. पोट भरण्याची आणि पाठ टेकण्याची सोय झाली. मग मात्र लिहिण्याची ऊर्मी आवरता आली नाही.माझ्यासारखेच कवितावेडे मित्र माझ्याभोवती जमू लागले. उद्योगाचा वेळ वजा करून बाकीचा सारा समय वाचन,लेखन, चर्चा यातच जाऊ लागला.१९४० सालाच्या आगेमागे माझ्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. अप्पासाहेब 'फडक्यांसारख्या साहित्यकारांनीही प्रतिसाद दिला. उमज वाढीला पडली.सर्व पातळींवरच्या साहित्याविषयी आप्तभाव वाटू लागला. मंगळवार तालमीत चालणाऱ्या भेदिक गाण्यांच्या मैफलीही आम्ही लोकांनी चुकविल्या नाहीत. पुढच्या पंधरा वर्षांच्या काळात पुष्कळ लिहिले.नाटक, चित्रकथा, गीते, कथा,आत्मकथने, प्रवासवर्णने, संगीतिका,कविता- नाना माध्यमांत लिहीत राहिलो.लिहिणे हा जीवन व्यवसायच केला.
पुढे पुण्यात आलो, स्थिरावलो. असंख्य अनुभव घेतले, असंख्य माणसे पाहिली.सुखकल्पनेच्या नाना तऱ्हा निरखिल्या.दुःखांच्याही अगणित अवस्था पाहिल्या.साऱ्या माणसांची सुखदु:खे सारखीच असतात. त्यांच्या परी वेगळ्या असतील,पण कळा त्याच. रामकथेवर लिहिण्याची कल्पना या सव्वा तपाच्या काळातही अनेकदा मनात चमकून गेली. ती कल्पना मनी यायला काही तात्कालिक कारणेही घडत राहिली. व्यावसायिक लिखाणासाठी 'सीतास्वयंवरा'च्या निमित्ताने अनेक रामायणे पाहावी लागली. तुळसीदासाचे 'रामचरित मानस' वाचले. मैथिलीशरण गुप्तांच्या रामचरित रचना अवलोकनात आल्या. साधुदास कवींचे रामावरचे लिखाणही वाचले. नरेंद्र शर्मांसारख्या संस्कारी कवीशी वाडूमयीन सुखसंवाद करण्याचा योग आला. रामचरित्रावरची रचना मात्र हातून झाली नाही.पुण्याला नभोवाणी केंद्र निघाले. सीताकांत लाड नावाचे माझे एक गोमंतकीय मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले. नभोवाणीसाठी काही सातत्याने लिहिण्याचा त्यांनी आग्रह केला.कातळाखालचा झरा एकदम वर उसळावा तशी रामायण लिहिण्याची इच्छा उसळली.संदर्भासाठी कुण्या एका रामायणाचे एक पृष्ठही न उघडता मी प्रथम गीत लिहिले. संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांच्या स्वाधीन करून टाकले
'स्वये श्री रामप्रभू ऐकती,
कुश-लव रामायण गाती'
पुढे प्रत्येक सप्ताहाला एक गीत, असे लिहीत गेलो. गीताचा प्रसंग, त्यातली नाट्यविषयक आवश्यकता, वृत्तयोजना,कशाकशासाठी म्हणून थांबावे लागले नाही. दर आठवड्याला एक गीत होत गेले. श्रोत्यांनी त्या गीतांना दिलेला प्रतिसाद हा केवळ अपूर्व म्हणावा लागेल.गीतरामायणाच्या लौकिकात संगीताचाही मोठा वाटा आहे. कुठल्याही गीताच्या लोकप्रियतेत तो असतोच. अगदी बालवयात मनोभूमीत पडलेले स्वप्नबीज अशा रीतीने प्रत्यक्ष वृक्षरूप झाले,फळाफुलाला आले.
श्रीधराची रामकथा कानी पडल्यावर तशी काही रचना करण्याची इच्छा मला का झाली यावर मीही पुष्कळ विचार केला.कपोलकल्पित वाटावी अशीच ही कथा आहे. माझी आई देवभोळी आहे. तिने एकदा सांगितले. “तुझ्या आठवणीत नाही. कदाचित तू त्याला पाहिलाही नसशील. तुझा एकुलता एक मामा रामदासी होता. ऐन तारुण्यात तो गोसावी होऊन गेला. खान्देशात कोणा खानापूर नावाच्या गावी त्याचा मठ अजूनही आहे.त्याची रामभक्ती तुझ्या ओठी आली असेल,दुसरे काय?. माझ्या आईने लावलेला शोध तिच्या श्रद्धेने समजावून घेतला तर समजण्यासारखा आहे. बुद्धीच्या गळक्या ओंजळीत तिच्या म्हणण्यातला एक थेंबही सामावणार नाही. कुणी सांगावे, तिचे म्हणणेही खरे असेल. भारतीय श्रद्धांनी भरतपूर्व काळातही कवी हा दैवी प्रतिभेचा पुरुष मानला आहे. आपण मात्र बुद्धीच्या भुकेने साहित्यनिर्मितीच्यामागच्या वस्तूंचा मागोवा घ्यायला निघालो आहोत. 'गीतरामायण'ही केवळ देवभोळी, भाबडी खटपट आहे की स्वतंत्र निर्मिती आहे? त्या निर्मितीमागची सारी सत्यकथा मी थोडक्यात निवेदन केली आहे.
मला वाटते, बालवयात रामायण आवडले ते केवळ अद्भुताच्या ओढीने. ओव्या लिहाव्याशा वाटल्या त्या बालसुलभ अनुकरणप्रियतेने. श्रवण-वाचनाने संस्कार झाले. रामकथेतील माणसांची सुखदु:खे स्वत:च्या अनुभूर्तीशी येऊन भिडली तेव्हा त्या अनुभूती प्रगटीकरणासाठी धडपडू लागल्या. योग्य समयी प्रत्यक्ष निर्मिती झाली. माझे हे लिहिणे माझ्याप्रमाणेच लोकांना आवडावे, ही अपेक्षा जवळजवळ प्रथमपासूनच माझ्या मनी होती.आणि घडलेही तसेच.