28/07/2026
RCPK वर्षा सहल २०२६ – आनंद, मैत्री आणि अविस्मरणीय क्षण! ❤️
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी RCPK च्या जुलै महिन्यातील वर्षा सहलीची आम्ही सर्व Anns अगदी आतुरतेने वाट पाहत होतो. आणि खरंच सांगायचं तर, अपेक्षेप्रमाणे यंदाची सहलही एकदम झकास झाली!
सहल सुरू होताच उत्साहाला उधाण आलं. प्रवासाची उत्तम व्यवस्था, गाडीतल्या भन्नाट भेंड्या, खेळ, गप्पा, हास्याचे फवारे आणि धमाल-मस्ती यामध्ये वेळ कसा गेला हे कळलंच नाही. इतकी मजा आली की प्रवास कधी संपला हेच समजलं नाही!
स्थळी पोहोचल्यावर राजा सर्ज्याच्या बैलगाडीतून आमराई, चिक्कूच्या बागा आणि हिरव्यागार शेतांमधून मारलेला रम्य फेरफटका म्हणजे सहलीचं खास आकर्षण ठरलं. त्यातच पावसाने जणू आमच्यावर कृपाच केली. योग्य वेळी दिलेल्या उघडीपीमुळे निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य मनसोक्त अनुभवता आलं.
गोठ्यातील गाईंना चारा भरवताना आणि छोट्या वासरांना प्रेमाने कुरवाळताना मनाला एक वेगळीच शांतता, समाधान आणि आनंद मिळाला. शहरातील धकाधकीच्या जीवनात हे क्षण खरोखरच खास वाटले.
सिंगल सीटर आणि डबल सीटर ई-व्हेइकल्सची राईड म्हणजे सहलीचा 'फुल ऑन एंटरटेन्मेंट' भागच होता!
काही जणींचे ड्रायव्हिंग पाहून त्यांना थेट रेसिंग ट्रॅकवर पाठवावे असे वाटत होते, तर काहींच्या मजेदार स्टाईलमुळे सगळ्यांचे हसून हसून पुरेवाट होत होते.
“फोटो काढ!”, “व्हिडिओ शूट कर!”, “अगं, माझी अजून एक राईड बाकी आहे!” अशा आरोळ्यांनी संपूर्ण परिसर गजबजून गेला होता. उत्साह, धमाल आणि मनमुराद हसण्याने भरलेले हे क्षण सर्वांच्याच कायम आठवणीत राहतील!
पावसाळी वातावरणात घेतलेला रुचकर वाफाळता नाश्ता आणि स्वादिष्ट जेवण यामुळे सहलीची मजा आणखी द्विगुणित झाली. त्यानंतर कराओकेवर मनसोक्त गायन, डान्सची धमाल, मजेशीर खेळ, भरपूर फोटोसेशन, रिलॅक्सिंग मसाज आणि सतत चाललेल्या गप्पा... खरंच, अजून काय हवं?
दैनंदिन जबाबदाऱ्या, धावपळ आणि कामाच्या व्यापातून मिळालेला हा सुंदर विरंगुळा मनाला नवसंजीवनी देऊन गेला. मैत्रिणींसोबत घालवलेला दर्जेदार वेळ, मनमोकळं हसणं,आणि मैत्रीचे बंध अधिक घट्ट करणारे हे क्षण कायम स्मरणात राहतील.
या सुंदर, आनंदमय आणि अविस्मरणीय दिवसासाठी RCPK Cultural Committee चे मनःपूर्वक आभार. 🙏💐
अशाच सुंदर सहली, आनंदाचे क्षण आणि मैत्रीचे बंध अधिक दृढ करणारे कार्यक्रम भविष्यातही आयोजित होत राहोत, हीच मनापासून अपेक्षा!