06/12/2025
मणिपूर ते महाराष्ट्र व्हाया मिलाफ
असीम फाउंडेशन आणि रेड शील्ड डिव्हीजन च्या राष्ट्रीय एकात्मता दौऱ्यामध्ये मणिपूर मधील बिष्णुपूर जिल्ह्यातील फुबाला आणि त्रांगलॉबी मधील महिलांसोबत कालची संध्याकाळ अनेकांच्या स्मरणात कायमची कोरली गेली. या महिलांचे काम समजून घेतानाच मणिपुरी आणि ओडिसी संस्कृतिक नृत्यांनी वातावरण एकदम भारावून टाकले!
भारताच्या इतिहासात आझाद हिंद फौजेच्या यशस्वी वाटचालीमध्ये मणिपूर मधील मोइरांग गावात पहिला तिरंगा फडकला होता. आज या गावापासून अगदी जवळच असलेल्या त्रांगलॉबी मधील महिला हातमागावर अतिशय सुंदर राष्ट्रध्वज बनवत आहेत. या राष्ट्रध्वजांचे औपचारिक अनावरण काल संपन्न झाले यावेळी ले. ज. विनायक पाटणकर (नि.), कर्नल उकिडवे, कर्नल प्रताप पवार(नि.), अनुरूप विवाह च्या डॉ. गौरी कानिटकर, हाऊस ऑफ आद्या च्या सायली मराठे, सकस अन्नपदार्थ च्या माधुरी सहस्रबुद्धे आणि प्रसिद्ध अभिनेते समीर धर्माधिकारी उपस्थित होते.
औपचारिक कार्यक्रमाला पुणेकरांनी भरभरून दिलेला प्रतिसाद, कार्यक्रमानंतर झालेल्या अनौपचारिक गप्पा आणि घरी राहायला घेऊन जाण्याचा आग्रह असणारा आपलेपणा हाच खरा मिलाफ!