26/02/2026
दुधणी येथे नवीन अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन उत्साहात संपन्न🇮🇳
दुधणी (ता.सुधागड) :
ताडगाव ग्रामपंचायत हद्दीतील दुधणी गावामध्ये नवीन अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन बुधवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हा परिषद शाळेजवळ उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात संपन्न झाले. ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थांच्या उल्लेखनीय उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
दुधणी गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच अधिकृत अंगणवाडी केंद्राची सुविधा उपलब्ध झाली असून, हा गावाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. यापूर्वी हे केंद्र स्वरदिव्या वेल्फेअर फाउंडेशन, पुणे-रायगड यांच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात चालविण्यात येत होते. सातत्यपूर्ण पाठपुरावा व संबंधित विभागांशी समन्वय साधून जून २०२५ पासून महिला व बालविकास विभागा मार्फत PVTG अंतर्गत सदर अंगणवाडी केंद्रास मंजुरी मिळाली असून सध्या अंगणवाडी समाज मंदिर येथे सुरू आहे.
ताडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती करुणा भिमचंद्र साठे यांच्या पुढाकारातून व सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अंगणवाडी केंद्रास प्रशासकीय मान्यता मिळाली. तसेच नवीन इमारतीसाठी निधी सुप्रिम पेट्रोकेम लिमिटेड , आमडोशी, ता.रोहा, जी. रायगड यांच्या CSR निधीतून उपलब्ध झाला असून ग्रामपंचायतीतर्फे कंपनीचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
सदर कंपनीच्या माध्यमातून सुधागड तालुक्यातील अनेक आदिवासी व दुर्गम भागांतील ग्रामपंचायतींमध्ये अंगणवाडी केंद्रे तसेच स्त्री-पुरुष शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. त्याबद्दल मा. लता मोहिते (गटविकास अधिकारी – BDO), मा. तेजस्विता करंगुटकर (बाल विकास प्रकल्प अधिकारी) तसेच श्री. सचिन साठे यांनी कंपनीप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
“दुधणी गावासाठी आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली अंगणवाडीची मागणी आज प्रत्यक्षात साकार होत आहे. अंगणवाडी ही केवळ एक इमारत नसून आपल्या लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठीची भक्कम पायाभरणी आहे. शिक्षण, पोषण आणि चांगले संस्कार हीच गावाच्या प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे व सर्वांच्या एकजुटीमुळे हे शक्य झाले असून भविष्यातही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थ:
मा. लता मोहिते मॅडम (गटविकास अधिकारी – BDO),मा. तेजस्विता करंगुटकर मॅडम (बाल विकास प्रकल्प अधिकारी),श्रीमती करुणा भिमचंद्र साठे (सरपंच),श्री. सुभाष पाटील (कॉन्ट्रॅक्टर, सुप्रीम पेट्रोकेम लिमिटेड),श्री. सचिन साठे ,श्री. संतोष लाड,श्री. मंगेश देशमुख (सदस्य),श्री. पांडुरंग खताळ (माजी सरपंच),श्री. मधुकर नाईक (माजी सरपंच), श्री.नवनाथ देशमुख (माजी सदस्य), सौ. सोनाली जितेश साठे (अंगणवाडी सेविका),सौ. अनुराधा नीलेश साठे (आशा सेविका),श्री. केतन साठे,श्री.शैलेश साठे, श्री.चंद्रकांत शिद,श्री.अशोक वारगुडे, श्री. भिकाजी मेंगाल,श्री. दिलीप देशमुख,श्री. जानू झोरे, श्री. नीलेश वारगुडे,श्री.तुषार मेंगाळ,श्री.अरविंद खताळ,संतोष वाघमारे,वामन हिलम,आत्माराम पवार, सुनील मेंगाळ आणि तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते विधीवत भूमिपूजन करण्यात आले. उपस्थितांनी अंगणवाडी ही बालकांच्या सर्वांगीण विकासाची पहिली पायरी असल्याचे अधोरेखित केले. योग्य पोषण, प्राथमिक शिक्षण व सकारात्मक संस्कार यांच्या माध्यमातून गावाच्या भविष्यास भक्कम पाया मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ताडगाव ग्रामपंचायत व TKDK परिसर विकास संघर्ष समिती यांच्या वतीने सर्व मान्यवर, अधिकारी व ग्रामस्थांचे आभार व्यक्त करण्यात आले.
“विकासाला प्राधान्य, शिक्षणाला सर्वोच्च स्थान” हा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.