09/07/2026
पालघर वैद्यकीय दौरा अहवाल ( २५ - २६ जून , २०२६)
स्थान: ऐना पाडा (सुतारपाडा, बेटांगळीपाडा, मुरबीपाडा माणपाडा , सुकापाडा ), पालघर जिल्हा, महाराष्ट्र
दिनांक: २५ आणि २६ जून, २०२६
यावेळेस आम्हाला पोस्ट टाकायला उशीरच झाला. पण ते बरेच झाले. त्यामुळे तोपर्यन्त आम्हाला एक नवीन माहिती कळाली की आमची औषधे त्वचारोगाच्या मुलांवर छान लागू पडत आहे.
२५ आणि २६ जून , २०२६ रोजी पालघरमधील ऐना पाड्यांना दिलेली आमची भेट, सामाजिक वैद्यकीयसेवेच्या माध्यमातून आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्याच्या आमच्या सुरू असलेल्या मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. 'ग्राममंगल' परिसराजवळ काम करत असताना सुतारपाडा, बेटांगळीपाडा, मुरबीपाडा आणि माणपाडा येथे वैद्यकीय शिबिरे घेतले. या वेळी अजून एका नवीन पाड्यावर म्हणजेच सुकापाडा येथे जाण्याची संधी मिळाली .
या भेटीला मागच्या महिन्यात ज्या रुग्णांना औषधे दिली होती, ते सर्व रुग्ण यावेळी उत्सूकतेने सांगायला आले, की "मला तुमच्या औषधाने बरे वाटले." या एका वाक्याचा आनंद खूपच सुखकर वाटला . आमच्या सततच्या आणि नियमित उपस्थितीमुळे, येथील स्थानिक लोक आता स्वतःहून पुढे येऊन वैद्यकीय मदत घेत आहेत.
यावेळी ज्या नवीन पाड्याला (सुकापाडा) येथे भेट दिली, त्यातील ग्राममंगलच्या अंगणवाडी शाळेत आम्ही गेलो होतो . तिथे ४ - ५ वर्षाच्या लहान मुलांना त्वचारोग झालेले बघायला मिळाले . तेथील मुलांना एकमुळे दुसऱ्याला असे अनेकांना एकाचवेळी त्वचारोग झाले आहेत, असे लक्षात आले . त्यांना औषधे दिले आणि या व्याधीची संक्रमकता पाहून PHC मध्ये देखील कळवले. वरती त्याच्या विषयीच मांडले आहे. आम्ही दिलेल्या आयुर्वेदिक औषधाने सर्वांच्या त्वचेवरील डाग निघून गेले आणि त्वचा नितळ बनली.
या उत्साहात आणखी भर म्हणजे, आमच्या दवाखान्याचे बांधकामाचे काम आता पूर्ण होत आहे. सध्या काही शेवटचे फिनिशिंगचे काम सुरू असून, आमच्या या कायमस्वरूपी उपचार केंद्राचे अधिकृत उद्घाटन आम्ही लवकरच करणार आहोत.
तसेच बेटांगळी पाड्यावर आमच्या सांगण्यावरून लहान मुलांनी प्लॉस्टिक गोळा केले आणि आपला पाडा स्वच्छ आणि प्लॉस्टिक मुक्त केला आणि पुढे तसाच ठेवतील असे आश्वासन दिले. यासाठी आम्ही त्यांना भेटवस्तु म्हणून बॅटबॉल दिला . मुले खूप खूश झाली आणि लगेच खेळायला लागली.
वैद्यकीय उपचारांच्या पातळीवर, आमच्या टीमने पाठ दुखीने त्रस्त असलेल्या एका पुरुष रुग्णावर 'विद्ध कर्म' (Viddha Karma) उपचार यशस्वीरित्या केले, ज्यामुळे त्यांना त्वरित आराम मिळाला. अशा अनेक रुग्णांना फक्त शमन औषधांनी देखील चांगला उपशय मिळाला आहे . या क्षेत्रीय (field) उपक्रमांनंतर, आम्ही आमच्या पुढील भेटींचे नियोजन आणि रूपरेषा तयार करण्यावरही भर दिला.
यावेळेस आम्हाला अजून एक गोष्ट झाली ती म्हणजे आम्हाला कंटकारी (रिंगणी) नावाची वनस्पती या भागात सापडली आणि पक्व अशी फळे असलेली ही वनस्पती काही प्रमाणात आम्ही गोळाही करू शकलो.
या शिबिरांमध्ये आम्ही येथील आदिवासी रहिवाशांना पूर्णपणे मोफत आणि संपूर्णत: आयुर्वेदिक औषधे दिली.
या आमच्या उपक्रमांसाठी आपले सहकार्य अतिशय मोलाचे आहे. आपल्याला यासाठी काही मदत करण्याची इच्छा असल्यास आम्हास जरूर कळवावे.
आमचा संपर्क - 9850815375 / 7709621753
अहवाल - सानिका गोळपकर