27/01/2026
पुणे:
*५ दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांच्या संपाला प्रचंड प्रतिसाद*
पुणे, दि. २७/०१/२०२६ :
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांच्या नेतृत्वाखाली आज देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी ५ दिवसांचा बँकिंग आठवडा तात्काळ लागू करावा, तसेच इतर दीर्घकाळ प्रलंबित सेवासंबंधी मागण्यांसाठी एकदिवसीय संप पुकारला होता.
या संपाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्यामुळे बँकिंग व्यवहार मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले.
UFBU चे कन्व्हिनर श्री. विठ्ठल माने यांनी सांगितले की, पुणे येथे एसबीआय ट्रेझरी ब्रँच, पुणे येथे सुमारे ४०० बँक कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. यावेळी काम जीवन समतोल, कामगारांचा सन्मान तसेच शासन व प्रशासनाकडून दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी यासाठी तीव्र घोषणा देण्यात आल्या.
या आंदोलनाला प्रमुख नेते श्री. सतीश टाके ,श्री संतोष गदादे श्री. महेश ननवरे, श्री. प्रमोद शिंदे, श्री. धोंडिराम गायकवाड, श्री. राजेश मुळे, श्री. शिवप्रसाद भांबरे, श्री. कल्याणकर, श्री. कृष्णा बोरूकर, श्री. सचिन वायकर, श्री. अमोल तांबे, श्री. श्री शिरीष राणे, श्री. अल्ताफ मुलानी, श्री. गोपी कृष्णा, श्री. मनोहर, श्री. लोकेश कुमार, श्री. मिनिनाथ नेरल ,श्री महादेव फरांदे,श्री विजय पाटील यांनी संयुक्तपणे आपली भूमिका मांडली.
नेत्यांनी सांगितले की, भारत डिजिटल झाला असून बँकिंग सेवा २४×७ उपलब्ध आहेत, मात्र बँक कर्मचारी अजूनही जुनाट ६ दिवसांच्या कामकाज पद्धतीत काम करण्यास बाध्य आहेत. सरकारी कार्यालये आणि कॉर्पोरेट क्षेत्रासह अनेक क्षेत्रांत आधीच ५ दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांची ही मागणी पूर्णपणे न्याय्य व फार पूर्वीच मान्य होणे आवश्यक होती.
युनियन प्रतिनिधींनी स्पष्ट केले की, ५ दिवसांचा बँकिंग आठवडा लागू केल्यास उत्पादकता कमी होणार नाही, तर उलट कार्यक्षमता, जबाबदारी, कर्मचारी कल्याण आणि ग्राहक सेवा अधिक सक्षम होईल. मात्र सरकार व इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांनी वारंवार दिलेल्या आश्वासनांनंतरही अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
UFBU ने इशारा दिला आहे की, जर मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेतला गेला नाही, तर येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.
हा संप शांततेत पार पडला. मात्र सरकार व बँक व्यवस्थापनांना एक ठाम संदेश देण्यात आला.
विठ्ठल माने
Convenor UFBU, पुणे