13/01/2026
शांतीवनचं काम वंचितांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारं.. #अनिकेत_आमटे.
अनाथ, वंचित आणि उपेक्षितांसाठी सुरू असलेल्या शांतीवनच्या कामाचा एक मॉडेल व्हावं आणि उपेक्षितांच्या आयुष्यात चांगलं काहीतरी घडावं, असे उद्गार आज शांतीवन येथे संपन्न झालेल्या दीपक नागरगोजे लिखित पुस्तकांच्या प्रकाशन समारंभात काढले.
शांतीवनचे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. दीपक नागरगोजे यांनी ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरील A LIFE IN BO***GE A LIFE IN DARKNESS या इंग्रजी पुस्तकाचा आणि हिरवं सपान या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन समारंभ आयोजित केला होता. या पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिकेत आमटे यांच्या हस्ते शांतीवन येथे संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. अशोक भाऊ तांगडे होते. कार्यक्रमास इन्फंट इंडियाचे डॉ. पृथ्वीराज बारगजे, डॉ. जागृती बारगजे, सोनदरा गुरुकुलमचे अश्विन भोंडवे, प्रा. भास्कर बडे, सर्पराज्ञी प्रकल्पाचे सिद्धार्थ सोनवणे, उचल फाउंडेशनचे सचिन खेडकर, सावलीचे नितेश बनसोडे, विवेक पाखरे अजिनाथ गवळी, तत्त्वशील कांबळे, संतोष वारे, गोवर्धन दराडे आदी प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तर लक्ष्मण खेडकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे आदिवासी भागात लोक बिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासींची सेवा करणारे श्री. अनिकेत प्रकाश आमटे पुढे बोलताना म्हणाले की, सामाजिक काम करणं ही सोपी गोष्ट नाही. यासाठी स्वतःपासून करण्याची तयारी ज्याच्यात आहे तोच हे काम करू शकतो. बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या शांतीवनचं काम दीपक नागरगोजे आणि सहकाऱ्यांच्या परिश्रमातून वंचितांच्या आयुष्यात खूप मोठे बदल घडून आणत आहे, याचा आम्हा सर्वांना मनस्वी आनंद होतो. बाबा आमटे यांचा विचार, दाखवलेला रस्ता आणि काम करण्याची दिलेली प्रेरणा यामुळे प्रभावित होऊन हे काम २५ वर्षांपूर्वी या दुर्गम भागात सुरू झालं आणि हजारो वंचित उपेक्षित जीवांना आधार देणार ठरलं. याचा २५ वर्षातला प्रवास खडतर आहे आणि म्हणूनच तो वंचितांच्या आयुष्यात आनंद पेरणारा ठरला आहे.
याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. अशोक तांगडे यांनी ऊसतोड कामगारांचे प्रश्न आणि त्यावर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी कुठले प्रयत्न केले पाहिजेत याचं विवेचन केलं. अनेक किस्से आपल्या भाषणात सांगून हा प्रश्न किती गंभीर आहे याची मांडणी केली.
#दीपक_नागरगोजे यांनी दोन्ही पुस्तकांचा सारांश तसेच त्यातून ऊसतोड कामगारांचे प्रश्न आणि त्यावर शोधण्यात येणारी उत्तर याचा सर्वदूर प्रचार-प्रसार व्हावा आणि या ऊसतोड कामगारांच्या आयुष्य बदलण्यासाठी त्यातून काही प्रयत्न व्हावेत, असा हेतू असल्याचे आपल्या भाषणात सांगितले. तर हिरवं सपान पुस्तकाच्या माध्यमातून मराठवाड्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखता याव्यात यासाठी शांतीवनच्या माध्यमातून करण्यात आलेले प्रयोग लोकांपर्यंत पोहोचावेत आणि याप्रमाणे शेती करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी करावा. त्यातून आत्महत्या करण्याचे विचार मनामध्ये येणार नाहीत तर शेतकऱ्यांचा शाश्वत विकास होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमानंतर शांतीवन मध्ये नव्याने बांधण्यात येणाऱ्या हेमंत वर्षा या इमारतीचे भूमिपूजन श्री अनिकेत आमटे यांच्या हस्ते करण्यात आले.
#अनिकेत_आमटे
#शांतीवन