13/05/2024
आजपासुन श्रीलक्ष्मी नृसिंह नवरात्र महोत्सवाची घटस्थापना.....
श्रीमद् आद्य शंकराचार्य आणि कुमारील भट्ट यांची भेट ते तुषानील घेत असताना होते. आचार्य त्यांच्याशी शास्त्रार्थाची इच्छा करीत असताना भट्टपाद त्यांना आपले शिष्य मंडनमिश्रांसोबत शास्त्रार्थ करायला सांगतात. आचार्य शिष्यांसहीत मंडनमिश्रांकडे शास्त्रार्थासाठी गेले.मंडनमिश्रांचा पूर्वपक्ष आचार्यांनी खोडून काढला. मंडनमिश्र पराभव मानणार तोच अर्धांगिनी म्हणुन सरस्वतीने सर्वसंमतीने या शास्त्रार्थात भाग घेत कामशास्त्राबद्दल एक अवघड प्रश्न टाकला.आचार्यांनी सरस्वतीला थोडा वेळा मागितला व आचार्य आणि शिष्यगण या कामशास्त्रातील प्रश्नाचे उत्तर कसे मिळवावे?ते पण या यतिवेषात ; या विवंचनेत असताना पराकायाप्रवेश हा मार्ग त्यांना सुचला.अमरुक राजाच्या देहात आचार्यांंनी प्रवेश केला..त्या राजाचे त्याचे वागणे बदलले; हे मंत्री व त्याच्या पत्नीच्या लक्षात आले. हा राजा नसून कोणी तरी यति असला पाहिजे व त्याच्या देहाचा शोध घेतला पाहिजे असे मंत्र्यांना वाटले व ते आचार्यांच्या देहाचा शोध घेत होते. दुसरीकडे पद्मपाद व इतर शिष्य अमरुक राजाच्या दरबारात आले आणि आचार्यांना त्यांच्या शास्त्रार्थाची आठवण करुन देऊ लागले.लगेच आचार्यांनी तो राजाचा देह सोडला..मात्र इकडे आचार्यांचा देह राजाच्या सैनिकांस मिळाला व त्या देहास ते पंचतत्त्वात विलीन करणार तोच आचार्य सावध झाले...
श्रीमत्पयॊनिधिनिकॆतन चक्रपाणॆ भॊगीन्द्रभॊगमणिराजित पुण्यमूर्तॆ ।
यॊगीश शाश्वत शरण्य भवाब्धिपॊत लक्ष्मीनृसिंह मम दॆहि करावलम्बम् ॥
या स्तोत्राने भगवान नृसिंहाची आळवणी केली आणि त्याच्या प्रभावाने राजाचे सैनिकच पंचतत्त्वात विलीन झाले. हा सगळा अद्भुत प्रकार पाहून शिष्यांनी श्रीलक्ष्मी नृसिंह व आचार्यांच्या चरणी दंडवत घातले.पुढे कामशास्त्राबद्दलच्या सगळ्या प्रश्नांची आद्य शंकराचार्यांनी उत्तरे दिली व मंडनमिश्रांचे सुरेश्वराचार्य झाले.
व्यासो वेत्ति शुको वेत्ति राजा वेत्ति न वेत्ति वा।श्रीधरः सकलं वेत्ति श्रीनृसिंह प्रसादतः॥
श्रीमद्भागवताचा योग्य अभिप्राय भगवान् श्री बादरायण व्यास,श्री शुकदेवजी जाणतात राजा परीक्षित जाणतात वा नाही यात संदेह आहे. परंतु भगवान नृसिंहाच्या कृपेने " श्रीधराचार्य " (श्रीधर स्वामी )यांनी श्रीमद्भागवताचा अभिप्राय समजून सम्पूर्ण जगताला श्रीमद्भागवताच्या अभिप्रायाचे दान दिले.
अशीच श्रीलक्ष्मीनृसिंह कृपा तुम्हा आम्हावर व्हावी या उद्देशाने या दोन प्रसंगाचे स्मरण नित्य करीत राहावे.
डॉ.श्रीधर म.देशमुख
आजपासुन श्रीलक्ष्मी नृसिंह नवरात्र महोत्सवाची घटस्थापना..... श्रीमद् आद्य शंकराचार्य आणि कुमारील भट्ट यांची भेट .....