05/02/2026
https://youtu.be/qWwxwVXhoao?si=_KxxpZJH1xsa_1Vy
''गांधी म्हणाले होते, 'मला मारून कोणाला काय मिळणार आहे ते समजत नाही. पण, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी मी काही मरणार नाही. मी किमान १२५ वर्षे जगणार आहे.' आणि अखेर हे शब्द खरेच झाले. १५० वर्षे झाली तरी गांधी आहेतच. ते मरत नाहीत.''*
पुन्हा पुन्हा प्रयत्न करावा लागतो, तरी गांधी मरत नाही. हे काय प्रकरण आहे?
पूर्वी 'गांधी जिथे असतील तिथे' अशा पत्त्यावर पत्रं जायची आणि गांधींना ती मिळायची. अवघा देश पिंजून काढणारा हा माणूस आजही अजून देशभर फिरतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभर फिरत असतात, प्रत्येक ठिकाणी सोबत ते याच गांधींना घेऊन जातात. कधी गांधी बसलेल्या ट्रेनमध्ये ते बसतात. कधी गांधींच्या म्युझियमला भेट देतात. कधी गांधींचं एखादं पेंटिंग त्यांना कोणी भेट देतं. गांधींच्या देशातनं आलोय, असं ते जगभर सांगत असतात आणि गांधीही मिश्कील हसत मोदींबरोबर जग फिरत असतात. ऐन तारुण्यात फासावर गेलेला नथुराम नाहक मारला जातो आणि इथे हा वयोवृद्ध माणूस तर आणखी वयोवृद्ध होत जगभर भटकताना दिसतो.
तेव्हाचा देश, जिथे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार हे सारे एकत्र होते, अशा महाकाय देशाचा सर्वोच्च नेता होणं ही सोपी गोष्ट थोडीच आहे! अशा कालखंडात की जेव्हा दळणवळणाची साधनं नाहीत. संवादाची माध्यमं नाहीत. व्हाट्स अप,मोबाईल नाहीत आजच्यासारखं ना इमेज मेकिंग आहे ना कोणतं व्यवस्थापन! अशा काळात गांधी देशाचे नेते झाले. फक्त नेते नाही झाले, त्यांनी अवघा देश स्वतःसोबत उभा केला. देशासोबत स्वतःला उभं केलं. लोकांच्या शहाणपणावर विश्वास ठेवत गांधी घडत गेले आणि गांधींसोबत देश घडत गेला. गांधी हा या देशाचा चेहरा झाला.
गांधी हा काही 'थोर' वगैरे माणूस नव्हता. तो कोणताही ईश्वरी अवतार वा प्रेषित नव्हता. त्याचं असामान्यत्व हेच की तो निखळ, निरागस, प्रामाणिक असा सामान्य माणूस होता.
गांधी मजबूरी का नहीं, मजबूती का नाम है, एवढा तो बुलंद होत गेला. त्याला कोणापेक्षा मोठं व्हायचं नव्हतं. त्याला सतत स्वतःला मोठं करायचं होतं. उंच व्हायचं होतं. मातीत रुतलेले पाय आणि तरीही आकाशाकडे फैलावलेले हात, असा हा माणूस वाढत राहिला. या लहान चणीच्या माणसानं त्यातून असं विलक्षण तेज मिळवलं की नौआखालीत पेटलेल्या दंगलीत तो एकटा उतरला आणि अवतीभवतीच्या ज्वालांची पर्वा न करता निघाला. लॉर्ड माउंटबॅटननं तेव्हा गांधींना पत्र लिहिलं होतं. माउंटबॅटन म्हणतो, 'प्रिय गांधी, पंजाबात आमच्याकडे ५५ हजार सैनिक आहेत आणि तरीही दंगल आटोक्यात येत नाहीये. बंगालमध्ये आमच्या सैन्यात एकच माणूस आहे आणि तिथं मात्र दंगल पूर्णपणे शमलेली आहे. या 'वन मॅन बाउंड्री फोर्स'बद्दल मी कृतज्ञता व्यक्त करू शकतो का?'
अशा एका विलक्षण,असामान्य माणसाचं,ज्याच्याबद्दल जगभरातल्या बुद्धिवंतांनाही कौतुक वाटतं त्याचं पुनरमूल्यांकन होणं गरजेचे आहे. त्यासाठीच डॉ विवेक कोरडेंचे हे व्याख्यान शेअर करतोय.
स्वातंत्र्यसैनिक अनंत लक्ष्मण पाटील स्मृतिव्याख्यानाचे पाचवे पुष्प गांधी विचारांचे अभ्यासक डॉ विवेक कोरडे या.....