22/02/2025
प्रेस नोट
महान वैज्ञानिकांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी – डार्विनच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर
मुंबई(खारघर) : चार्ल्स डार्विन (१२ फेब्रुवारी), गॅलिलिओ गॅलिलिओ (१५ फेब्रुवारी) आणि थोमस एडिसन (११ फेब्रुवारी) यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त बावीस प्रतिज्ञा सत्य विज्ञान सामाजिक फाउंडेशन आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीने १६ फेब्रुवारी रोजी विज्ञाननिष्ठ विचारांचा जागर करणारा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विज्ञानाच्या महत्त्वावर प्रकाश टाकत, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कसंगत विचारसरणी समाजात अधिकाधिक रुजवण्याची गरज व्यक्त केली. प्रकाश पारखे, प्रसेनजीत खंडारे आणि सुप्रसिद्ध लेखक श्याम पेठकर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपले विचार मांडले.
चार्ल्स डार्विन: उत्क्रांतीवाद आणि प्रमाणआग्रहाचा विचार
चार्ल्स डार्विन यांनी आपल्या “On the Origin of Species” (1859) या ग्रंथाद्वारे जगासमोर उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला. त्यांनी सप्रमाण दाखवले की सजीव नैसर्गिक निवडीद्वारे (Natural Selection) हळूहळू उत्क्रांत होत असतात, आणि हा एक शास्त्रीय, तर्कसंगत आणि सत्यशोधन करणारा सिद्धांत आहे. त्यांच्या संशोधनामुळे मानव आणि इतर प्राण्यांचा उगम एका नैसर्गिक प्रक्रियेतून कसा झाला यावर वैज्ञानिक आधार मिळाला.
डार्विन यांचा विचार म्हणजे प्रमाणआग्रह (Empiricism) आणि सत्यशोधन – ते केवळ श्रद्धा आणि परंपरांवर विश्वास ठेवत नसत, तर वस्तुनिष्ठ निरीक्षण, प्रयोग आणि प्रमाणांवर भर देत. त्यांचा विचार आधुनिक विज्ञानाचा कणा आहे, पण दुर्दैवाने भारतासारख्या देशात त्यांच्या विचारांना शिक्षण व्यवस्थेतून काढण्याचा प्रयत्न होत आहे, हे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे विज्ञानप्रेमींनी या विरोधात आवाज उठवण्याची गरज आहे, असे वक्त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये
संस्थेचे अध्यक्ष अरविंद सोनटक्के यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, “भारतासारख्या देशात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे आणि विज्ञाननिष्ठ चळवळ बळकट करणे ही काळाची गरज आहे. आज शिक्षण व्यवस्थेतून चार्ल्स डार्विन यांचा उत्क्रांतीवाद वगळण्यासारख्या घटनांमुळे समाजातील विवेकवादाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे विज्ञानप्रेमींनी एकत्र येऊन वैज्ञानिक दृष्टिकोन बळकट करावा.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शंकर दयाळ होते. सूत्रसंचालन ओघवत्या शैलीत राजू रोटे यांनी केले. तसेच, सामाजिक कार्यकर्ते भारत पवार, प्रमोद चुनचूनवार, मुनावर देशमुख, यु आर सिंग यांचीही विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी कमेश कांबळे यांनी सांभाळली.
यावेळी उपस्थित वक्त्यांनी वैज्ञानिक संशोधन, अंधश्रद्धांचे निर्मूलन, आणि विज्ञाननिष्ठ समाज घडवण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. “विज्ञान ही प्रगतीची गुरुकिल्ली असून, वैज्ञानिक विचारसरणीचा प्रचार व प्रसार करणे हे प्रत्येक विवेकवादी नागरिकाचे कर्तव्य आहे,” असा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला.
विज्ञाननिष्ठ विचारांचा प्रचार – काळाची गरज
सध्याच्या परिस्थितीत अंधश्रद्धा, जातीयता आणि अवैज्ञानिक विचारांना खतपाणी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करून तर्कशुद्ध विचारसरणीला चालना दिली पाहिजे. चार्ल्स डार्विन, गॅलिलिओ आणि एडिसन यांसारख्या वैज्ञानिकांचा वारसा जपला पाहिजे, तरच भारत खऱ्या अर्थाने वैज्ञानिक प्रगती करू शकेल, असे या कार्यक्रमातून ठळकपणे अधोरेखित करण्यात आले.