02/04/2026
मानव सेवेचे व्रत महान
आजन्म जपावे कर्तव्य भान!
१६ वर्षांपासून अविरत सेवा संकल्पाची यशस्वी परंपरा
भेगाळल्या पावलांना मायेच्या फुलांचे पांघरूण
🙏🇮🇳 जय भारत! जय मानव! 🇮🇳🙏
मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था, नाशिक ही “मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा” आणि “विश्वगुरू भारत” या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन कार्यरत आहे. मानवतावादी दृष्टिकोन जपत समाजातील वंचित घटकांपर्यंत प्रेम, आधार आणि मदतीचा हात पोहोचवण्याचे पवित्र कार्य संस्था सातत्याने करत आहे.
या सेवायज्ञाचा एक भाग म्हणून, दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात दुर्गम आदिवासी भागात जाऊन सेवा उपक्रम राबविण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी(हरसूल) या आदिवासी गावाला भेट देऊन तेथील बंधू-भगिनी व चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची फुले उमलविण्यात आली.
या प्रसंगी गरजू बांधवांना बूट, चप्पल, पिशव्या, बिस्किट पुडे, कॅलेंडर, मानधन पेपर तसेच महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. आरोग्य जागृतीसाठी ब्रश, टूथपेस्ट यांसारखी आवश्यक साहित्ये देण्यात आली. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवाळी येथे कचराकुंड्यांचे वितरण करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक केशव गावित सर, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमात मानवधन संस्थेतील विद्यार्थ्यांनी व पालकांनी दिलेले सहकार्य अत्यंत प्रेरणादायी ठरले.
तळपत्या उन्हात अनवाणी फिरणाऱ्या या आदिवासी बांधवांना साधे चप्पल-बूटही मिळत नाहीत, ही वास्तवाची वेदना आहे. दुसरीकडे सधन समाजात विपुलता आहे. ही विषमता कमी करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून प्रयत्न करणे, हीच खरी समाजसेवा आहे.
“शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही” — या विचाराने प्रेरित होऊन आपल्या मुलांना उत्तम शिक्षण द्या, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करा.