15/05/2026
लालवंडीत (ता. नायगाव) ‘सबसॉइलर’ व ‘मोबाईल श्रेडर’ची प्रात्यक्षिके; संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन.
“शेतीमध्ये शाश्वत प्रगती साधायची असेल, तर केवळ पारंपरिक पद्धतींवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. सगरोळी (ता.बिलोली) येथील कृषी विज्ञान केंद्र व रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या “हवामान अनुकूल शाश्वत विकास प्रकल्पा” अंतर्गत लालवंडी (ता.नायगांव) येथील प्रक्षेत्रावर दि. 14 मे रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी त्यांनी जमिनीतील कडक थर फोडून पाण्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी ‘सबसॉइलर’ यंत्राचा तसेच पिकांच्या अवशेषांचे जागीच सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करण्यासाठी ‘मोबाईल श्रेडर’चा वापर अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मोठी मदत होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्राच्या डॉ. प्रियंका खोले यांनी ‘ट्रॅक्टरचलित श्रेडर’ व ‘सबसॉइलर’ या यंत्रांचे शेतात प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. जमिनीतील कठीण थर फोडल्यामुळे पाण्याची मुरण्याची क्षमता वाढते, तर पिकांचे अवशेष न जाळता त्याचे बारीक तुकडे करून जमिनीत मिसळल्यास नैसर्गिक खत तयार होऊन जमिनीची सुपीकता वाढते, अशी माहिती त्यांनी दिली.
यंदाच्या हवामान अंदाजाच्या पार्श्वभूमीवर ‘एल निनो’च्या संभाव्य परिणामांचा सामना करण्यासाठी आवश्यक कृषी उपाययोजनांबाबतही शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे, पाणी बचतीच्या संवर्धन पद्धती अवलंबणे तसेच खतांचा संतुलित वापर करून पिकांची जोमदार वाढ साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख, लालवंडीचे सरपंच प्रकाश जोंधळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, उपविभागीय कृषी अधिकारी गिते, तालुका कृषी अधिकारी दिपेश देवरे, डॉ. माधुरी रेवणवार, सर्जेराव ढवळे, व्यंकट शिंदे, संतोष तेलंगे, संदीप पुयड, शिवम गायकवाड, दिनेश शिंदे, नारायण मोरे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.