17/06/2024
*अनु. जमाती भरतीसाठी राजेंद्र सर...‘आगे बढो’ म्हणणाऱ्या तरूणांची फौज तयार झाली पाहिजे.!*
मी हिंगोलीचा राम ठोंबरे, पण ‘रामा, तू नागपूरला निघून ये’ असा ॲड.राजेंद्र मरसकोल्हे सरांचा निरोप आला व मी 06 जून ते 16 जून पर्यंत नागपूर मुक्कामी ‘आफ्रोट चेंबर’ मध्ये मुक्कामाला होतो. तिथे कार्यकर्त्याना राहण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. तिन मजली इमारतीत पहिल्या माळयावर ऑफ्रोट संघटनेचे ऑफीस आणि राजेंद्र सरांची छोटीषी पण स्वतंत्र कॅबिन आहे, दाराच्या षेजारी ‘ ॲड.राजेंद्र मरसकोल्हे, एमए,एमएड, बीजे, एलएलबी, एलएलएम(कॉन्स्टिट्यूशन अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ) ’ अशी छोटीशी नेमप्लेट लावली आहे. तिथे कायदयाची व इतर पुस्तक आहेत व काही चर्चा करायची असल्यास सर तिथे बोलवून चर्चा करतात. दुसऱ्या माळयावर हॉल आहे, त्या हॉलमध्ये स्पर्धा परीक्षेचे वर्ग आदिवासी तरूणांसाठी घेतले जातात, परीक्षेची भरपूर पुस्तक, मराठी साहित्य, इंग्रजी साहित्याची पुस्तकं, मासिक असे बरेच काही आहे आणि तिसऱ्या माळयावर राहण्याची सोय आहे, चौथ्या माळयावर टेरेस आणि त्यावर शेड आहे , वर खाली जाण्यासाठी चौथ्या मळ्यापर्यंत लिफ्ट आहे. सहा खोल्या विद्यार्थ्यासाठी आणि येणाऱ्या आफ्रोटच्या पाहुण्यांसाठी एक खास खोली ज्याला बाथरूम आणि संडास, गीझर, शॉवर, आरसा तसेच खोलीत लिहिण्या वाचण्यासाठी टेबल-खूर्ची, पुस्तकांसाठी शेल्फ, आणि कपडे ठेवण्यासाठी आलमारी, पंखा इ. सूविधा छान करून ठेवल्या आहेत. माझी तिथे मुक्कामाची दूसरी वेळ होती. राजेंद्र सरांचे घर आफ्रोट चेंबर च्या आधीच महिला बॅंकेजवळ आहे. त्या घरी मी नवीन किंवा कुणी परका आहे, असे मला कधीच वाटले नाही. सरांचे मुलं विचारतात, ‘‘राम भैया, पाणी दू,.. खाना खाओ’’... मी सरांच्या बोलविण्यावरून नागपगूरला येण्याचे कारण म्हणजे सरांच्या डोक्यात असलेला तरूणांच्या बेराजगारीचा आणि त्यांच्या नोकरीचा विचार...! त्यांनी इतक्या मेहनतीने 21 डिसेंबर 2029 चा शासन निर्णय जारी करण्यास शासनाला भाग पाडले. त्यात त्यांनी 15 जून 1995 सारखे बोगस आदिवासींना दिलेल्या सेवासंरक्षणाचे जीआर रदद् केले, आणि माझ्यासारख्या हजारो शिक्षित बेरोजगार तरूणांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. ज्या हजारो मुलांना 2020 नंतर विशेष भरतीत नोकरी लागली ती राजेंद्र सरांच्या आफ्रोट संघटनेच्या न्यायालयीन लढयामुळे...! आदिवासींना त्याची कदाचित हवाही नाही की, हे कोणत्या आदिवासी मंत्री व आमदार खासदारामुळे नाही, तर राजेंद्र मरसकोल्हे या अत्यंत साध्या, सरळ माणसामुळे त्यांना ही संधी मिळाली त्याचा त्यांना अजिबात गर्व किंवा अभिमान नाही. मात्र आदिवासी नेत्यांना, जनतेला आणि आदिवासींच्या इतर संघटनांना राजेंद्र मरसकोल्हे सरांची मेहनत समजून घेता आली नाही व नोकर भरतीसाठी सहकार्यही करता आले नाही. खरंतर राजेंद्र सर आदिवासी समाजासाठी विधानसभेत-लोकसभेत आमदार-खासदार म्हणून समाजाने निवडून दिले पाहिजे. राजेंद्र सर म्हणजे भन्नाट माणूस आहे, सरळ, स्पष्ट, बेफिकीर, रोखठोक, थोडं शिवराळ... ‘‘अबे रामा, भूक लागली रे’’ म्हणत सरळ टपरीवच्या आलूबोंडयावर भिडणारे आणि बोलल्यावर कुणाला वाईट वाटेल, राग येईल इ. गोष्टीची अजिबात चिंता न करणारा...! पण जे काम सरांनी केलं आहे त्याचा फायदा आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या पुढच्या पिढ्यांना मिळणार आहे, हे निश्चित. मला त्यांनी 21 डिसेंबर 2019 नंतर कोणत्या कार्यालयात किती पदांची भरती अधिसंख्य पदावर झाली त्याची माहिती घेण्याची जबाबदारी दिली होती. राज्यातून मंत्रालयीन विभाग, जि.प. न.प. महानगर पालिका इ. मधून माहिती गोळा केल्यावर त्या प्राप्त आकड्यांचा उपयोग करून एक रिट याचिका स्वतः सरांनी माझे समक्ष लुकेश राउतला डिक्टेट करून ड्राफ्ट करून घेतली. उच्च न्यायालयातील वकील ॲड संतोष मराठी यांच्याशी माझी व चंद्रपुरचे विजय कुमरे भेट करून दिली, ती याचिका विजय कुमरे अध्यक्ष चंद्रपूर आफ्रोट आणि माझे नावाने केली आहे. लवकरच उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करणार असून 21 डिसेंबर 2019 नंतरची रखडलेली अनुसूचित जमातीची पदभरती व शासनाच्या विविध विभागात रिक्त असलेल्या गड अ,ब,क,ड च्या 66,844 जागा हा आकडा राजेंद्र सरांच्या मेहनतीने पहिल्यांदाच जगापुढे आला आहे. यात 100 टक्के सर आमच्यासारख्या बेरोजगार आदिवासी तरूणांना न्यायिक लढाईतून न्याय मिळवून देतील व सरकारला ही भरती करण्यासाठी वाद्य करतील याची मला खात्री पटली आहे. खरंच सर्व सुशिक्षित आदिवासी बेरोजगार युवकांनी सरांचे आभार मानले पाहिजेत, त्यांनी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग, नवी दिल्ली येथे बोगस आदिवासींच्या अभ्यासासाठी स्थापन केेलेल्या वर्कीग गृप मध्ये सदस्य म्हणून काम करताना अत्यंत महत्वाचे केेलेले काम म्हणजे जगदिश बहिरा निकालानंतर पद भरतीचा अप्रत्यक्ष आढावा त्यांनी राज्याचे मुख्य सचिवांना आणि सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांना कमीशन पुढे हजर राहण्यास भाग पाडून त्यांच्या कडून शपथपत्रावर रिक्त पदांचा आढावा लेखी स्वरूपात घेतला. व आदिवासी समाजापुढे पहिल्यांदाच अनुसूचित जमातीच्या किती जागा आहेत याचा अंदाज लोकांना आला. त्या नंतर इतर संघटना त्या आकड्यांचा रेडीमेड वापर करून पेपर बाजी करण्यात स्वतःला धन्य मानतात, पण त्याचा रितसर पाठपुरावा करण्याचे भान त्यांना कालही नव्हते आणि ते भान त्यांनी आजही ठेवले नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. आमदार- खासदार, मंत्री नसतानाही त्यांनी न्यायिक लढा स्वबळावर उभा केला, त्याचा बरेच लोकं हेवा करतात, जात पडताळणी समितीच्या बोगस आदिवासींना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्यांची बारीक नजर आहे. त्यांचे सर्व पुरावे त्यांनी जमा केेले आहेत व त्याचा ते योग्य वेळी स्पोट करतील यात शंका नाही. राजेंद्र मरसकोल्हे यांनी खरंच माझ्यासारख्या सुशिक्षित बेरोजगार आदिवासी तरूणाच्या भविष्याचा खऱ्या अर्थाने विचार केला आणि आम्हाला हजारोच्या संख्येने शासकीय नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे, नवीन उमेद दिली, त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत... सर मी तुमच्या सोबत आहे, मी प्रत्यक्ष अनुभव घेउन पाहुन आलेेले काम हिंगोलीत सर्वांना सांगणार आहे, आफरोट lसंघटनेशी ज्यांना जोडता येईल त्यांना नक्की जोडणार आहे, सर तुम्ही आमच्या तरूणांसाठी जे निस्वार्थपणे केले, त्याचा मला अभिमान वाटतो. आफ्रोट संघटनेला कायदेशीर लढाईसाठी जी तातडीची आर्थिक मदत पाहिजे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न माझ्यापरीने व हिंगोलीकरांच्या मदतीने करणार आहे, बस..सर तुम आगे बढो....!
*राम ठोंबरे,*
हिंगोली.
दिनांकः 17 जून 2024
मो. 8007317780