24/03/2026
*आशादीपचा महिला दिन कार्यक्रम*
दिनांक १८ मार्च, २०२६
आशादीप- अपंग, महिला-बाल विकास संस्थेतर्फे महिला दिन विशेष कार्यक्रम १८ मार्चला साजरा झाला. दीपप्रज्वलनानंतर ईश्वरी पांडे हिच्या सरस्वती स्तवनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.
डॅा. वृंदा जोगळेकर यांनी कार्यक्रमाच्या संचलनाच्या सुरवातीला एका रंजक गोष्टीद्वारे सांगितले की स्वतः स्वतःची जवाबदारी घेणे ही फार मोठी उपलब्धी आहे. सध्याच्या मुली स्वतंत्र विचार करत स्वतःची लढाई लढत लक्ष्य साध्य करत आहेत. महिला दिवस हा महिलांचे सशक्तीकरण, त्यांचे हक्क व स्त्री-पुरुष समानता याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि तसेच महिलांचे यश, त्यांचा संघर्ष आणि समाजातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे.
स्वागत समारंभानंतर, प्रास्ताविकात डॅा. प्रतिमा शास्त्री यांनी उपस्थितांचे स्वागत करत सांगितले की महिलांचे क्षितीज व कार्य वाढत आहे. दिव्यांग महिलांमध्येही परिस्थिती बदलत आहे. यापूर्वी महिला दिनी श्रीमती नंदिता त्रिपाठी, श्रीमती मंगला समर्थ यांना संस्थेतर्फे सन्मानित केले गेले होते हे सांगितले. संस्थेच्या कार्याची संक्षिप्त माहिती त्यांनी दिली.
'आशादीप'तर्फे यंदाच्या महिला दिन कार्यक्रमाचे औचित्य साधून दृष्टिबाधित कु. माला शंकरबाबा पापळकर, सहाय्यक महसूल अधिकारी, नागपूर यांना कै. गौरी शिरखेडकर स्मृती पुरस्कार आणि आशादीप संस्थेतर्फे शेला, मानपत्र व स्मृती चिन्ह प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार प्रमुख अतिथी सौ. सुवर्णा पांडे, सी. पी. टी. पी. संचालक, वनामती, नागपूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याआधी सत्कारमूर्ती कु. माला पापळकर यांना अर्पण करण्यात येणाऱ्या मानपत्राचे वाचन सौ. अपर्णा कुळकर्णी यांनी केले.
कु. माला पापळकरांनी या पुरस्कारानंतर आशादीपने केलेल्या या सन्मानाने त्यांना व शंकरबाबा पापळकरांना खूप आनंद झाला आहे हे सांगितले.
याप्रसंगी बोलतांना प्रमुख अतिथी श्रीमती सुवर्णा पांडे यांनी दृष्टीबाधित माला विपरीत परिस्थितीत तिच्या ध्येयापर्यंत पोचली व तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण केली याचे कौतुक केले. महिला दिनी योग्य व्यक्तीचा सन्मान होत आहे याबद्दल आनंद व्यक्त केला. आशादीप बरोबर लेखनिकाच्या माध्यमातून त्यांच्या कार्यालयाचे संबंध आधीच जुळले आहेत असं सांगून त्यांनी आशादीप संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
‘आशादीप' संस्थेकडून ईश्वरी पांडेला तिच्या पुढच्या आव्हानात्मक जलतरण कामगिरीसाठी शुभेच्छा व सहाय्य म्हणून डॉ. प्रतिमा शास्त्री यांच्या हस्ते २०,००० रूपये देण्यात आले.
यानंतर आशादीपतर्फे कु. माला पापळकरांची मुलाखत सौ. अपर्णा कुळकर्णी यांनी घेतली. या मुलाखतीत माला यांनी शंकरबाबा पापळकरांनी त्यांना आपल्या नावाची ओळख देत पालकत्व स्वीकारून, अतिशय प्रेमाने लहानाची मोठी केले याबद्दल त्यांचा खूप आदर व अभिमान आहे हे सांगितलं. मालाच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे श्री. शंकरबाबा पापळकरांना ज्या दिवशी पद्मश्रीचा मान मिळाला त्याच दिवशी मालाचा MPSC पास झाल्याचा निकाल कळला हा होय. मालाने त्यांचे MPSC कोचिंग सेंटरचे शिक्षक श्री. अमोल पाटील यांनाही धन्यवाद दिले. क्लास बरोबरच ब्रेलमधील पुस्तके, अभ्यासक्रमावर आधारित you tube audio वाचत अभ्यास पूर्ण केला हे मालाने सांगितले. या हुद्यावर पद ग्रहण करतांना त्यांना आनंद खूप होता पण मनात थोडं दडपण होतं की आपल्याला जबाबदारीने काम करून बाबांचं नाव पुढं आणायचं आहे. तसेच सध्याच्या कार्यालयात सहकारी अतिशय छान सहाय्य करतात हे मालाने सांगितले.
मालाने पुढे सांगितले की २०१६ मध्ये IAS पास केलेल्या पहिल्या दृष्टीबाधित प्रांजल पाटीलची मुलाखत ऐकल्यापासून प्रेरणा घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास करायची तयारी त्या करत आहेत.
श्री. शंकरबाबा पापळकरांसाठी व त्यांच्या आश्रमासाठी त्यांच्याकडून जे जमेल ते त्या करणार आहेत. मालाला ईश्वरी पांडे व पल्लवी धमगाये या दृष्टीबाधित मुलींनी देखील प्रश्न विचारले व मालाने त्यांची योग्य उत्तरे दिली. मुलाखतीच्या शेवटी जिद्द ठेवून, धीर न सोडता प्रयत्न केले तर स्पप्नं पूर्ण होतात. तसेच विविध परीक्षा देत राहा असा संदेश प्रेक्षकांतील दृष्टिबाधित व्यक्तींना माला पापळकरांनी दिला.
या मुलाखतीनंतर अध्यक्ष श्री. लालासाहेब पाटील यांनी अध्यक्षीय भाषण दिले. ते म्हणाले की दिव्यांग काय करू शकतात हे पाहून डोळसही थक्क होतात. अशा कार्यक्रमातून दृष्टिबाधितांना प्रेरणा मिळते असेही सांगितले.
सक्षम संस्थेच्या श्री. शिरिषजी दारव्हेकरांनी माला पापळकरांना 'लोकमान्य टिळक’ व ‘अहिल्याबाई होळकर’ या दोन पुस्तकांच्या ब्रेललिपी मधील प्रति भेट दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. शंकरबाबांच्या वझ्झर येथील आश्रमातील दृष्टीबाधित गांधारी पापळकर ने पसायदान सादर केले.
या कार्यक्रमाला पुरस्काराचे प्रायोजक श्री. विवेक शिरखेडकर आणि परिवार, मालाची सहकारी सौ. देशपांडे, रा. तु. म. नागपूर विद्यापीठातील मराठीचे प्रोफेसर डॉ. प्रदीप गावंडे, विद्यापीठ सिनेट सदस्य डॅा. मनमोहन बाजपेयी, शंकरबाबांच्या वझ्झर येथील आश्रमातून आलेल्या मालाच्या मैत्रिणी, पापळकर बाबांच्या मतिमंद मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक - श्री. अनिल पिहुरकर, सौ. प्रमिला लघाटे या बालगृहाच्या प्रभारी अधिक्षिका आणि ‘जिव्हाळा’ व इतर समाजसेवी संस्थांमधून काम करणारे श्री. अविनाश संगवई व त्यांचे बंधू, आशादीप सदस्य, कार्यकारिणी सदस्य, आशादीप स्नेही मंडळातील दृष्टिबाधित सदस्य अशी बऱ्याच जणांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन डॅा. वृंदा जोगळेकर, प्रमुख अतिथींचा परिचय गीता तारे व आभार प्रदर्शन सुप्रिया केकतपुरे यांनी केले.