05/08/2026
शताब्दी पूर्ण केलेल्या शिवाजी पार्क येथील मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा भवनाची झालेली दुरवस्था – जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून परिसर तात्काळ पूर्ववत करण्याबाबत.
मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे शिवाजी पार्कसमोरील ऐतिहासिक क्रीडा भवन (म्युनिसिपल जिमखाना) हे मुंबईच्या क्रीडा परंपरेचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे. महानगरपालिकेनेच लावलेल्या माहिती फलकानुसार या वास्तूची स्थापना 26 एप्रिल 1926 रोजी झाली असून 26 एप्रिल 2026 रोजी या वास्तूने अभिमानाने शताब्दी वर्ष पूर्ण केले आहे.
एका बाजूला शताब्दी महोत्सवाचा गाजावाजा केला जातो आणि दुसऱ्या बाजूला त्याच वास्तूच्या परिसराची अक्षरशः कचराकुंडी करण्यात येते, ही बाब अत्यंत संतापजनक आणि मुंबईकरांचा अपमान करणारी आहे.
गेल्या काही दिवसांतील पावसानंतर शहरातील कोसळलेल्या झाडांचे बुंधे, फांद्या, लाकूड आणि इतर अवशेष या ऐतिहासिक क्रीडा भवनाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर टाकण्यात आले आहेत. संपूर्ण परिसर चिखलाने भरलेला असून दुर्गंधी, अस्वच्छता आणि निष्काळजीपणाचे चित्र पाहायला मिळत आहे. हा परिसर खेळाडू, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी असूनही त्याची अशी दुर्दशा का करण्यात आली आहे, याचे उत्तर मुंबई महानगरपालिकेने द्यावे.
प्रश्न असा आहे की – शंभर वर्षांचा इतिहास लाभलेल्या या वास्तूचा हा अपमान करण्याचा अधिकार कोणाला दिला?
जर झाडांचे अवशेष साठविण्यासाठी जागेची गरज होती, तर मुंबईत दुसरी कोणतीही जागा उपलब्ध नव्हती का? वारसा लाभलेल्या सार्वजनिक क्रीडा संकुलालाच डंपिंग यार्ड बनविण्याचा निर्णय कोणी घेतला? हा निर्णय कोणत्या अधिकाऱ्याच्या परवानगीने घेण्यात आला?
मुंबईकरांच्या कराच्या पैशातून उभारलेल्या आणि जपल्या जाणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूची अशी दुर्दशा करणे हे केवळ प्रशासनाचे अपयश नसून वारसा जपण्यातील गंभीर निष्काळजीपणाचे उदाहरण आहे.
त्यामुळे आम्ही मुंबई महानगरपालिकेकडे पुढील मागण्या करीत आहोत:
क्रीडा भवन परिसरातील झाडांचे बुंधे, फांद्या आणि सर्व अवशेष तात्काळ हटविण्यात यावेत.
संपूर्ण परिसराची युद्धपातळीवर स्वच्छता करून तो पूर्ववत करण्यात यावा.
हा निर्णय घेणाऱ्या व देखरेखीत निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यात यावी.
अशा ऐतिहासिक वास्तूंचा वापर भविष्यात कचरा किंवा अवशेष साठविण्यासाठी केला जाणार नाही, याबाबत स्पष्ट धोरण जाहीर करण्यात यावे.
या कार्यवाहीचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा.
मुंबई महानगरपालिकेने केवळ शताब्दीचे फलक लावून आपली जबाबदारी संपत नाही. त्या इतिहासाचा सन्मान प्रत्यक्ष कृतीतून दिसला पाहिजे. अन्यथा शताब्दी उत्सव हा केवळ दिखावा ठरेल आणि मुंबईकरांच्या भावनांची थट्टा ठरेल.
या गंभीर विषयाची तात्काळ दखल घेऊन त्वरित कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा नागरिकांच्या वतीने लोकशाही मार्गाने पुढील पाठपुरावा करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
आपली विश्वासू,
नेहा भगत
सामाजिक कार्यकर्त्या
MyBmc MNS Adhikrut