13/04/2026
रविवार १२ एप्रिल २०२६-पुणे
आनंदी आनंद!
जे जे उत्तम उदात्त उन्नत तसे आम्हा व्हायचे...
उत्तुंग समाधानाने भारलेल्या आणि प्रतिभावंत मान्यवर विद्वान , ज्येष्ठ कलाकार, बुद्धिजीवी मार्गदर्शक आणि उत्तुंगला लोकाश्रय दिलेल्या कलासक्त रसिकांनी भरलेल्या पुण्यातील एम्. ई. एस. ऑडिटोरियम सभागृहात, उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्टचा ३१वर्षपूर्ती आनंदोत्सव पुरस्कार सोहळा आणि "देवस्वर-भावस्वर" सांगीतिक आदरांजली कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि हृद्य वातावरणात संपन्न झाला.
पूर्वार्धात, ज्येष्ठ गायिका कै. आशा भोसले ह्यांच्या निधनाचा खेद व्यक्त करून आणि पुण्यस्मृतीस श्रद्धांजली वाहून सुरू झालेल्या उत्तुंग वार्षिक पुरस्कार सन्मान प्रदान सोहळ्यादरम्यान, प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ पत्रकार, लेखक, व्यवस्थापन मार्गदर्शक आदरणीय डॉ.उदय निरगुडकर सर आणि पुरस्कार सोहळा समारंभाध्यक्ष ज्येष्ठ नेते डॉ. विनय सहस्त्रबुद्धे सर ह्यांच्या मौलिक मार्गदर्शनाने आणि वक्तृत्वाने उपस्थित रसिकांची मने जिंकली. अभिषेक खेडकर ह्याच्या सूत्रसंचालनाने आणि त्यानेच शब्दबद्ध केलेल्या मानपत्र वाचनाने, सर्व उत्तुंग पुरस्कार विजेत्या महनीय व्यक्तींच्या कार्याची महती, रसिकांच्या मनावर मोहर उमटवून गेली. विदुषी शैला दातार, श्री. पार्थ बावस्कर , ज्ञान प्रबोधिनी (पुणे) संस्था आणि डॉ.उदय निरगुडकर हे विविध क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या यंदाच्या उत्तुंग वार्षिक सन्मानाचे मानकरी होते.
तर उत्तरार्धात ,ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव काका आणि श्रीनिवास खळे काकांच्या काही प्रचलित आणि काही अप्रचलित गाण्यांच्या, नचिकेत देसाई, वेदश्री खाडिलकर-ओक, ओंकार खाडिलकर आणि शेफाली साकुरीकर ह्यांच्या गायन मैफिलीला दर्दी रसिकांनी प्रचंड दाद दिली. अभिजित जायदे, वासुदेव बापट, संपदा खरे-देशपांडे आणि तुषार दीक्षित ह्यांची अनुरूप साथसंगत आणि सुसंवादिका सौ.स्नेहल दामले ह्यांचे नेटके खुमासदार भावपूर्ण निवेदन सर्व कार्यक्रमाची रंगत वाढवण्यात महत्वाचे पैलू ठरले.
नेहमीप्रमाणे सुजित खांबे ह्यांची उत्तम ध्वनिव्यवस्था , एम. ई. एस सभागृह सर्व व्यवस्थापन मंडळाचे उत्तम तांत्रिक सहाय्य आणि उत्तुंग प्रतिनिधी मंडळातील आमच्या सर्व सहकारी मित्रमंडळींच्या परिपूर्ण सहयोगाने, एक सुनियोजित आणि सुस्वर संध्याकाळ आणि त्यामार्फत अनेक नव्या सांस्कृतिक क्षणांची पोतडी आम्हाला पुन्हा एकदा रसिकांसमोर रिती करता आली.
अजून काय हवं?