12/09/2025
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित पन्हाळा ते पावनखिंड शिवमृत्युंजय पालखी मोहीम
दिनांक : १० आणि ११ जुलै २०२५
मोहीम क्रमांक : १५३
सदस्य संख्या : ८४
पालखी प्रमुख : श्रीनिवास कऱ्हाडकर
शिवशौर्य ट्रेकर्सची सुरुवात झाली तीच कोणीही न केलेल्या पालखी मोहिमेने. सन २०१० सालापासून संस्थेच्या मोहिमेला सुरुवात झाली आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी तिथीप्रमाणे पावनखिंडीतल्या युद्ध भूमीला नतमस्तक होण्यासाठी शिवशौर्यची ही महामोहिम होतच असते आणि दर पाच वर्षानंतर पालखी मोहीम होत असते.
दिनांक १० जुलै रोजी महाराष्ट्रभरातून ८४ मावळे पन्हाळगडावरती एकत्र जमले. पन्हाळगड नगरपालिकेच्या मोरोपंत पिंगळे सभागृहात सर्वांचा डेरा पडला. सर्वांनी चहा नाश्त्याचा आस्वाद घेतला. पालखी प्रमुखांनी केलेल्या सूचनेनुसार सर्वजण पन्हाळगड फिरण्यास बाहेर पडले. त्यांच्याबरोबर होते इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत. शिवशौर्यचे हक्काचे इतिहास मार्गदर्शक. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ सर्व मावळे दरवर्षी घेत असतात. डॉ. श्रीदत्त राऊत प्रत्येक मुर्त्या, अवशेष, स्तंभ, शिलालेख, देवळं, तटबंदी, बुरुज, दरवाजे या बद्दल इत्यंभूत माहिती देतात. पन्हाळगड हा शासनमान्य हिल स्टेशन जाहीर असल्यामुळे तेथे गडाचे अनेक अवशेष सुस्थितीत आहेत तरीही काळाचा घाला कधीकधी तटबंदीला, बुरुजाला नुकसान पोहोचवत असतो. तरीही सगळ्या इतिहास प्रेमींच्या दृष्टीने हा किल्ला बऱ्यापैकी बराच शाबूत आहे.
सायंकाळी शिवशौर्य ट्रेकर्सच्या अध्यक्षा सौ. नम्रता सावंत यांनी संस्थेची ओळख करून दिली आणि यापुढे संपूर्ण पालखीचे नियोजन सूचना नियम शंका निरसन हे पालखी प्रमुख श्री. श्रीनिवास कऱ्हाडकर उर्फ गुरुजी करतील असे जाहीर केले. श्रीनिवास कऱ्हाडकर यांनी मोहिमेची रूपरेषा सांगितली. या ८४ जणांमध्ये अधिक तर नवखे होते त्यांना या मोहिमेबाबत कमालीचे कुतुहूल होते. पालखी मोहीम काय असते? तो थरार कसा असतो? हे कसं होऊ शकते? एवढ्या रात्रीच्या अंधारात एखादा ट्रेक, एखादी मोहीम ह्या प्रचंड उत्सुकतेपोटी ते या मोहिमेत सामील झाले होते. प्रत्येकाला तो रात्रीचा क्षण अनुभवायचा होता. ही उत्सुकता व आनंद आणि जोडीला हलकसं टेन्शन सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं आणि पालखी प्रमुख त्यांच्या सगळ्या शंकांचं निरसन करत होते. पालखी प्रमुखांनी मावळ्यांची तीन गटात विभागणी केली. त्यानंतर उपस्थित मावळ्यांची एकमेकांशी ओळख करण्यास सुरुवात केली. संस्थेच्या स्वयंसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपली ओळख करून दिली. श्रीदत्त राऊत यांनी स्वतःची ओळख करून दिली. आता वेळ होती इतिहासाच्या तासाची आणि श्रीदत्त सरांनी वर्गाचा ताबा घेतला. खरंतर तासात मोडणारा हा तास नव्हताच. इतिहासाचं दालनच खुलं झालं होतं. जेवण आलं म्हणून थांबवावं लागलं इतके सर्वजण त्यात मग्न झाले होते. इतिहासाचे अनेक कंगोरे उलगडत पावनखिंडीच्या इतिहासामध्ये स्वतःच अनेक प्रश्न समोरच्यांसमोर ठेवत इतिहासाचा कसा आणि कुठल्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा हेही त्यांच्या नजरेस आणून देत होते. एखाद व्याख्यान म्हटलं की समोरचा बोलत असतो आणि उपस्थित लोकं फक्त ऐकत असतात. अशाच पद्धतीची सर्व व्याख्याने असतात. पण श्रीदत्त सरांच तसं नाहीय. ते दुसऱ्यांना बोलत करायला, प्रश्न विचारायला लावणारे इतिहासाचे वक्ते आहेत. उपस्थित लोकांनी त्यांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले. त्यांना उत्तरे सुद्धा समाधानकारक मिळत होती. तत्पूर्वी संस्थेचे काही सदस्य नरवीर शिवा काशीद यांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करून आले. आठ-सव्वा आठ वाजेपर्यंत सर्वांची जेवणं उरकली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा पॅक नाश्ता सर्वांना वाटला गेला. टोप्या दिल्या गेल्या आणि प्रत्येक गटाची विशेष खूण म्हणून प्रत्येक गटाला विशिष्ट रंगाचा एक बँड हातात बांधण्यासाठी दिला जेणेकरून तो मावळा कुठल्या गटात मार्गक्रमण करणार आहे हे लगेच लक्षात यावे. सर्व मावळे संपूर्ण तयार होऊन संभाजी महाराज मंदिरापाशी पोहोचले. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी तयार होती. श्रीदत्त राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या स्थानापन्न मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. एक छोटा मावळा पार्थ खेडेकर याने महाराजांची गारद दिली आणि प्रचंड जयघोषात पालखी मोहीम सुरू झाली. ताराराणी बाई साहेबांनी बांधलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर गडावर आहे. त्या मंदिरात पालखी पोहोचली. शिवप्रतिमेला फुलं अर्पण करून आणि हनीफ नगारजी कुटुंबीयांकडून मोहिमेस शुभेच्छा दिल्या गेल्या.
पालखी मोहिमेला सुरुवात झाली. पन्हाळगडावरील गल्ल्या गल्ल्यांमधून प्रचंड जयघोषात पालखी पुढे सरकत होती. पन्हाळ्यावरती आलेले पर्यटक, गडावरील स्थानिक नागरीक आपल्या खिडकीतून, दरवाजातून ही रात्रीची पालखी निघण्याचा सोहळा पाहत होते. पालखी बाजीप्रभूंच्या पुतळ्यापाशी पोहोचली. पन्हाळगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी श्रीफळ वाढवून, बाजीप्रभूंना पुष्पहार अर्पण करून मोहीम मार्गस्थ केली. या सोहळ्यास पन्हाळ्यावरील ज्येष्ठ असे श्री. गुळवणी देखील उपस्थित होते. पन्हाळगडाच्या पाठीमागच्या बाजूला राजदिंडी आहे. हे गडाचे शेवटचे टोक. हीच ती राजदिंडी जिथून छत्रपती शिवाजी महाराजांची आणि शिवा काशीद यांची पालखी गडउतार झाल्या होत्या. याच ठिकाणी महाराजांनी शिवा काशीद याचा निरोप घेतला होता. त्या दोंघांचे निरोपाचे संभाषण काय झाले असेल? दोघांच्याही मनात काय कालवाकालव झाली असेल? अश्रूंचे बांध फुटले असतील तीच ही तीन जागा. एक मिनिटं डोळे बंद करून त्या जागेला मनोमन नमस्कार करून मावळे गडउतार होऊ लागले. आता साधा रस्ता नव्हता. दगड धोंड्यांचा होता. वाटेत येणारी झाडाची फांदी बाजूला करत मार्गक्रमण सुरु होतं. पायथ्याच्या गावात तुरुकवाडीतील गावकऱ्यांनी पालखीचे मनोभावे स्वागत केले. तेथील स्थानिक रहिवाशी कृष्णाची चिले याच्या घरातल्या सुवासिनींनी पालखीचे औक्षण केले. स्वतः कृष्णा आणि त्याचा मुलगा शिवबा हे पालखी मोहिमेत सहभागी झाले आणि दिशादर्शक किंवा मदतनीस या नात्याने ते पालखीच्या पुढे पुढे चालत राहीले. आता ४० मावळे मसाई पठाराच्या दिशेने गेले आणि उर्वरित मावळे पन्हाळगडावरील सभागृहात मुक्कामाला आले. पावसाचे नामोनिशान नव्हते. आकाश निरभ्र होते. पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश पसरला होता. या चंद्राच्या प्रकाशात आता पालखीचे मार्गक्रमण सुरू होते. लांबपर्यंत पसरलेलं म्हसाई पठार त्यावरून जाणारी पालखी, हे दृश्य पाहून प्रत्येक मावळ्याला या मोहिमेत सामील झाल्याचा आनंद, अभिमान वाटत होता. म्हसाई देवीला नमन करून पालखी पुढे मार्गस्थ झाली. शहरी मावळ्यांना ना थकवा ना शीण. निघाल्या पासूनचा तोच जोम टिकून होता. पठार सोडून जंगलातील उतरण सुरु झाली. ही उतरण थेट कुंभारवाडी गावात येवून संपली. त्यानंतर मात्र सपाट चाल होती. मध्यरात्री ३ वाजता खोतवाडीत पहिली तुकडी दाखल झाली. लगेचच दुसरी तुकडी पालखी घेऊन मार्गाला लागली. हा टप्पा सतत चढ उताराचा, शेताच्या बांधावरून चालण्याचा, जंगलाचा असा होता. गावातील घरांनी देवाची पालखी आल्याप्रमाणेच पालखीचे स्वागत केले. शिवरायांच्या मूर्तीला फुले वाहिली. पालखीच्या भोईंचे पाय धुवून औक्षण केले. डोळ्यात पाणी येईल असाच क्षण होता. चिखल तुडवत जंगल पार करेपर्यंत सकाळी ८.३० वाजता माळेवाडी गावात पालखी पोहोचली. मोहिमेची तिसरी तुकडी तिथे तयारच होती. पालखीचे खांदे पालट झाले. ताज्या दमाचे भोई होते. पालखी वेगाने पुढे सरकू लागली. पाटेवाडी गावात पालखीचे स्वागत झाले. प्रत्येक घराच्या समोर औक्षण होत होते. तिसरा टप्पा जास्तीत जास्त गर्द जंगलाचा आहे. खळाळत्या ओढ्यांचा आहे. त्या निसर्ग सोहळ्यातून बाहेर पडूच नये असं वाटतं. दिवसा उजेडी निसर्गाचे चैतन्यमयी रूप डोळ्यात साठवत होते. शेतीची सुरु असलेली कामे जवळून पाहता येत होती. नांगर हातात धरण्याची हौस भागवली जात होती. म्हाळसवडे गावाआधी लागणाऱ्या ओढ्यात कल्ला करून पालखी पांढरपाणी येथील डांबरी रस्त्यावर आली. सिद्धी जौहरच्या फौजेबरोबर बांदल सेनेची इथेच पहिली चकमक उडाली होती. या गावातून दोन रस्ते फुटतात. एक सरळ अणुस्कुरा घाटाकडे जातो तर दुसरा उजवीकडे विशाळगडाच्या दिशेने. दुपारी २ वाजता मालाईवाड्यात सर्वजण जेवायला एकत्र जमले. जेवण झाल्यावर पालखी निघाली. आता आमची महामोहिम अंतिम टप्प्यात आली होती. अखेर अर्ध्या-पाऊण तासात आम्ही पावनखिंडीत पोहोचलो. "याचसाठी केला होता अट्टाहास" बाजींच्या रक्ताने पावन झालेली हीच ती गजापूरची घोडखिंड...आमच्या शिवमृत्युंजय मोहिमेचा परमोच्च क्षण. रणभूमीवर एक प्रतीकात्मक ढाल तलवारीचा स्तंभ आहे. अनेक किल्ल्यांवरचे पाणी जे खऱ्या अर्थाने तीर्थ आहे, ते तीर्थ आणि भारतातील अनेक नद्यांचे पाणी एकत्रित करून याच तीर्थाने रणभूमीवर अभिषेक केला गेला. ३६५ वर्षांपूर्वी याच मातीवर रक्ताचा अभिषेक झाला होता. आजही स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या बांदल वीरांचे आत्मे तिथे नक्कीच असतील. कौतुकाने हा सोहळा पाहत असतील. म्हणत असतील कालानुरूप पेहेराव बदलले आहेत, पण आमच्या सारखे मावळे आजही जिवंत आहेत. जलाभिषेकानंतर पूजन झाले. आरती झाली. तेथील पवित्र माती सर्वांच्या कपाळी लावली गेली. बाजीप्रभूंचे थेट वंशज १४वी पिढी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या सोबत होती. शाहूवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकही आवर्जून हजर होते. या मान्यवरांच्या हस्ते मोहिमेतील सर्व मावळ्यांचा प्रशस्तीपत्र आणि दांड पट्ट्याची छोटी प्रतिकृती देऊन गौरव करण्यात आला आणि शिवमृत्युंजय पालखी मोहीमेची यशस्वी सांगता झाली.
अनेक दिवसांची अविश्रांत मेहनत सत्कारणी लागली. शिवशौर्य हे आमच्या संस्थेचं नुसतं नाव नाही तर आपली शिवशौर्य संस्कृती जपली जावी, टिकून राहावी, आणि पुढील अनेक पिढ्या शिवसंस्कारात घडाव्यात म्हणून हा खटाटोप. हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.
जय शिवराय...!!!