Be the first to know and let us send you an email when शिवअस्मिता सामाजिक संस्था posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
।। मराठा तितुका मेळवावा , महाराष्ट्रधर्म वाढवावा ।।
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यांत, रानावनांत भक्कम असे वाढलेले एक कल्पवृक्ष ; ज्याच्या पोलादी मुळांनी अवघ्या दिल्लीच्या तख्तालाही हादरा दिला, ज्या कल्पवृक्षाने आपल्या भव्यदिव्य कार्याने महाराष्ट्रभूमी पावन केली, लाखो स्वकीयांचे उध्वस्त झालेले संसार या कल्पवृक्षाच्या छायेने बहरून आले. परकियांच्या जाचाविरुद्ध आवाज उठविण्याची ताकद या 'लोककल्याणी' राजाने आपल्या रयतेला दिली. "आपली रयत हेच आपले दैवत" हे तत्व अखंड मनाशी बाळगून श्री शिवप्रभूंनी एका 'लोककल्याणी स्वराज्याचा' पायंडा घातला.
शिवाजी महाराज या महाराष्ट्रात जन्मले व आभाळाएवढे कार्य करून या पवित्र मातीतच काळाच्या पडद्याआड गेले. याचा तुम्हा-आम्हाला सार्थ अभिमान आहे. गेली ४०० वर्षे या राजाविषयी अनेक शिवप्रेमींनी विपुल कार्य केले आहे. तरीही हा विषय अजूनही अनेकांना स्फूर्ती देतच आहे. श्री शिवछत्रपती हे लाखो-करोडो स्वकीयांचे श्रद्धास्थान आहेत. या श्रद्धेविषयी बोलायचे झाले तर असे की मनुष्य हा स्वभावत:च श्रद्धावान असतो. कशावर तरी, कुणावर तरी त्याची भक्ती, श्रद्धा असतेच. अगदी नास्तिक माणूसही एखाद्या नास्तिक पंथाच्या तत्वज्ञानावर अगदी आस्तिक माणसाच्या देवावरच्या श्रद्धे इतकीच श्रद्धा ठेवतो.
महाराष्ट्रातील लोकांची शिवरायांविषयीची श्रद्धा हे महाराष्ट्राचे एक बलस्थान आहे. परंतु या बलस्थानाचा चुकीच्या मार्गाने वापर होऊ नये, शिवरायांच्या ऐतिहासिक वारशाला तडा जाऊ नये तसेच शिवरायांचे महाराष्ट्रातील पावित्र्य व त्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या करोडो स्वकीयांच्या मनाच्या आदरार्थ "शिवअस्मिता सामाजिक संस्थेची" संकल्पना अंमलात आणली गेली.
प्रत्येक राष्ट्राची अस्मिता त्याच्या इतिहासानेच घडत असते. हि सतत जागी राहिली तरच राष्ट्राचे मन तरुण राहते, कर्तुत्व फुलते. त्याचा उत्साह, महत्वकांक्षा कधीही मंदावत नाही. अस्मिता म्हणजे प्राण. प्राण नसेल तर देहाचे काय होईल? अस्मिता नसेल तर राष्ट्राचे काय होईल? आपल्याकडे अनेकांना असे वाटते की, इतिहासाविषयी प्रेम व अभिमान बाळगणे म्हणजे जुनाटपणा, प्रतिगामीपणा !!! जगातील पुरोगामी राष्ट्रेसुद्धा इतिहासाविषयी असले वेडगळ गैरसमज बाळगत नाही. परंतु हे वेडगळ पीक आपल्याकडे मात्र जोमाने फोफावते.
याच विचारांचा मुळापासून नयनात करण्याच्या अनुषंगाने 'शिवअस्मिता' प्रत्येक जणांत पेरणे गरजेचे आहे. ही अस्मिताच त्या मनुष्यदेहातील स्वदेश, स्वधर्म प्रेमाला बाहेर काढेल. आणि याच विचारांशी एकरूप राहूनच "शिवअस्मिता" अखंड कार्यरत राहील. ।। जय शिवराय ।।