02/09/2026
मराठी भाषा आणि मराठी भाषिकांशी गैरवर्तन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी
मुंबई, दि. १ सप्टेंबर २०२६ :
महाराष्ट्र संरक्षण संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज बोरिवली प्रादेशिक परिवहन कार्यालयास (RTO) भेट देऊन मराठी भाषेच्या सक्तीच्या अंमलबजावणीदरम्यान मराठी भाषा व मराठी भाषिकांशी गैरवर्तन, शिवीगाळ अथवा मारहाणीचे प्रकार करणाऱ्या संबंधित अमराठी भाषिक वाहनचालकांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले.
मराठी भाषा ही महाराष्ट्राची राजभाषा असून, महाराष्ट्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने स्थानिक कायदे, नियम आणि प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. मराठी भाषेच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेदरम्यान काही व्यक्तींकडून मराठी भाषेचा अवमान करणे, मराठी भाषिकांशी उद्धटपणे वागणे तसेच कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणारे प्रकार घडत असल्याचे संघटनेने निवेदनातून निदर्शनास आणून दिले.
मराठी भाषा शिकण्याच्या किंवा वापरण्याच्या नियमांना विरोध करणाऱ्या तसेच मराठी भाषिकांशी गैरवर्तन, धमकी, शिवीगाळ किंवा मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर संबंधित घटनेची चौकशी करून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे भारतीय कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी संबंधित प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात आणि मराठी भाषिक नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
निवेदन देताना उपस्थित पदाधिकारी
यावेळी महाराष्ट्र संरक्षण संघटना, महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष धर्मेंद्र घाग, कार्याध्यक्ष रविंद्र राजे कुवेसकर, उपाध्यक्ष अनिल हातेकर, तसेच स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीचे सरचिटणीस अमरेश पाथरे, मिलिंद प्रधान, नितीन खेतळे, विजय औटी, संजय धुरी, यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्रात मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी भाषिक नागरिकांचा सन्मान राखला जावा, तसेच कोणत्याही भाषिक व्यक्तीविरुद्ध भेदभाव न करता कायद्याचे समान पालन व्हावे, हीच संघटनेची भूमिका असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
महाराष्ट्र संरक्षण संघटना, महाराष्ट्र राज्य
#मराठी #महाराष्ट्र #रिक्षा
धर्मेंद्र चंद्रकांत घाग
महाराष्ट्र संरक्षण संघटना - महाराष्ट्र राज्य
मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती