01/06/2026
पुस्तक वाचनाचा उपक्रम
"वाचाल तर वाचाल" हा संदेश आपण ट्रक आणि रिक्षाच्या मागे सतत वाचतो. मिरज संस्कार भारती ने तो कृतीत आणून सिद्ध करून दाखवला आहे.
संस्कार भारती पश्चिम प्रांत मातृशक्ती संयोजिका राज्यश्री शिखरे यांच्या संकल्पनेतून साहित्य विधे कडून पुस्तक वाचन हा उपक्रम सुरू आहे.
कोरोनापूर्वी प्रत्यक्ष एकत्र जमून स्वलिखित साहित्य जसे की लेख, कविता, पुस्तक आणि इतरही पुस्तकांचे वाचन - समीक्षण सुरू होते. या उपक्रमाला उत्तम प्रतिसादही लाभला होता. पण कोरोनामुळे प्रत्यक्ष वाचन ठप्प झाले आणि कोविड नंतर ऑनलाईन वाचन सुरू केले आणि ते सर्व वाचकांच्या पसंतीस उतरले आहे.
आज पर्यंत बाबा आमटे, स्वामी विवेकानंद, एक होता कार्व्हर, गोपिकाबाई ( बाजीराव पेशवे यांच्या मातोश्री ), त्याचबरोबर अध्यात्मिक, ललित लेख, कथासंग्रह यांचे अविरत वाचन सुरू आहे. त्याला छान प्रतिसाद मिळतो आहे. वाचक आणि श्रुती यांची संख्या वाढत चालली आहे.
सोमवार ते शनिवार4.15 ते 4.45 वाचन होते. समूह मोठा होत चालला आहे. श्रोत्यांमध्ये मिरज, सांगली, कोल्हापूर, पुणे, बेळगाव, बेंगलोर, हैदराबाद अशा गावांमधून संख्या वाढत चालली आहे.
संस्कार भारतीच्या वाचन संस्कृतीचा आलेख चढता होत आहे.