31/05/2025
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या बद्दल ही माहिती आपल्या सर्वांच्या संग्रही असणे व भावी पिढीस अवगत व्हावीच हे कर्तव्य!
🌺 मराठा साम्राज्याचे सुभेदार मल्हारराव होळकर यांची सून व होळकर घराण्याच्या महाराणी म्हणून अहिल्यादेवी विख्यात आहेत. ज्यांनी छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत छत्रपतींचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.
🌺 अहिल्यादेवींनी हिंदू धर्माची आणि मठ मंदिरांची वाताहत दुरुस्त करून स्वत्वाची पुनर्स्थापना केली. रयतेमध्ये स्वाभिमान व आत्मसन्मान निर्माण केला. राज्याच्या लष्करी शक्तीसोबत सामाजिक शक्तीला बळकट करण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले.
🌺अहिल्यादेवी भगवान शंकराच्या निस्सिम भक्त होत्या. आपल्या राजमुद्रेवर सुद्धा “श्री शंकराच्या आज्ञेवरून” असे शब्द त्यांनी कोरले होते. आपले राज्य शिव शंकराच्या आशीर्वादाने चालते आहे असे त्या मानत.
🌺 अहिल्यादेवी धार्मिक होत्या परंतु अंधश्रद्ध नव्हत्या. त्यांनी अन्यायी प्रथा, रूढी मानल्या नाहीत. पतीच्या निधनानंतर त्यांनी कर्तव्याला प्राधान्य दिलं, सती गेल्या नाहीत. हुंडा प्रथेसही विरोध केला.
🌺 धर्मकार्य करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या खासगी तिजोरीचा वापर केला. जनतेचा पैसा जनतेच्या कामात वापरला.
🌺 न्यायाच्या बाबतीत त्या इतक्या कठोर आणि प्रामाणिक होत्या की त्यांनी शिक्षा करताना आपल्या पतीला आणि मुलाला सुद्धा सोडले नाही. नियम सर्वांसाठी समान असे सूत्र त्यांनी जोपासले होते.
🌺 धार्मिक उत्थानासोबत त्यांनी शेती विषयक धोरण, जलनीती, टपाल व्यवस्था, उद्योग, साहित्य व कलांना प्रोत्साहन दिले.
🌺 अहिल्यादेवींनी 28 वर्ष दौलतीचा कारभार हाताळला पण एक पैचाही गैर व्यवहार होऊ दिला नाही. उत्तम प्रशासन व्यवस्था आणि काळानुरूप सुधारणा त्यांनी केल्या.
🌺 मुघलांनी केलेली जाचक कर पद्धती बदलून त्यांनी सुलभ केली. कर दिल्यावर पुन्हा कोणालाही त्रास होत नसे. नियमापेक्षा अधिक कर घेतला जात नसे. केल्यास अधिकाऱ्यास तत्काळ शिक्षा होई.
🌺 अहिल्यादेवींनी राज्यात ठिकठिकाणी आमराई उभारल्या. पशूंसाठी कुरणे, पक्ष्यांसाठी उभी पिके योग्य किंमत देऊन विकत घेतल्या. मुंग्यांना सुद्धा साखर टाकली जाई, पाण्यातील जलचरांना कणिकेचे गोळे टाकले जात. अशी हिंदुत्वाची व्यापक दृष्टी त्यांच्या जगण्यात व व्यवहारात दिसून येत होती.
🌺 पर्यावरण संवर्धनासाठी त्या काळी त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली. शेतकऱ्यांना 20 झाडे लावलीच पाहिजे असा दंडक होता. त्यापैकी 9 झाडे शेतकऱ्याच्या तर 11 सरकारी मालकीची असत.
🌺 नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून मूळ प्रवाहापासून एक प्रवाह वेगळा करून त्याचा उपयोग स्नान, कपडे धुणे, जनावरांना पाणी आदी कामास्तव केला जाई. त्यामुळे शेतीचे पिक भरपूर व सकस येई.
🌺 डोंगराळ भागातून भिल्ल व गोंड जमातीच्या लोकांना कर वसुलीचा (भिलकवडी) अधिकार दिला. प्रवाशांच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांना दिली. त्यामुळे डोंगरातून जाणाऱ्या लोकांची लूटमार पण थांबली व जनजाती बांधवांना रोजीरोटी व आत्मसन्मान पण मिळाला.
🌺 तत्कालीन परिस्थितीत एखादी निपुत्रिक व्यक्ती मरण पावली तर तिची संपत्ती सरकारजमा होई. अहिल्यादेवींनी हा नियम बदलून त्या विधवा स्त्रीला संपत्तीचा अधिकार दिला. सैन्यात स्त्रियांची स्वतंत्र पलटण उभी केली. वेळप्रसंगी त्या स्वतः त्याचे नेतृत्व करत.
🌺 राणी असतानाही त्यांनी काठपदर नसलेल्या साध्या पांढऱ्या महेश्वरी वस्त्राखेरीज दुसरे वस्त्र अंगाला लावले नाही. एका रुद्राक्षाच्या माळे शिवाय दुसरा अलंकार कधी घातला नाही. त्यांचा राजवाडा आणि महालसुद्धा कधी भव्य दिव्य दिसला नाही.
अशी साधे राहणीमान पण उच्च विचारसरणी असलेल्या राणी होत्या अहिल्यादेवी. ज्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्यकारभार हाकला. न्याय, नीती, कर्तव्याला सर्वोच्च स्थान दिले. म्हणून आज 300 वर्षानंतरही त्यांना ‘पुण्यश्लोक’ म्हणून सन्मान दिला जातो.
“वाहिले ते गंगाजळ, राहिले ते तीर्थ असे माणसाचे चारित्र्य असावे” असे अहिल्यादेवी म्हणत.
आयुष्यात थोडी जरी दुःखे आली तरी आजकाल लोक हताश होऊन जातात. परंतु अहिल्यादेवींच्या आयुष्यात दुःखाचे एकापाठोपाठ एक दुःखाचे डोंगर कोसळले आहेत. 29 वर्ष वयाच्या असताना पती खंडेरावांचे कुंभेरीच्या लढाईत निधन झाले. खंडेरावांच्या 9 पती सती गेल्या. पुढील सात वर्षातच मायेची सावली असलेल्या सासूबाईंचे निधन झाले. पुन्हा पाच वर्षांनी मल्हारराव होळकर निवर्तले. पुढच्या वर्षी एकुलता एक मुलगा मालेराव याचा मृत्यू झाला. असे एका पाठोपाठ एक धक्के त्यांनी सहन करत राज्यकारभार सुरळीत ठेवला.*
जी व्यक्ती धार्मिक आहे, सात्विक आहे आणि भारतीय विचार अंगिकारत आहे तिचे जीवन अनेकांचे जीवन प्रफुल्लित करते हे अहिल्यादेवींच्या चरित्रातून पुन्हा लक्षात येते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या 300 व्या जयंती वर्षपूर्तीनिमित विनम्र अभिवादन!
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼