07/03/2026
Testimony by
दिल ना लिया, दिल ना दिया, तो बोलो ना बोलो क्या किया…
आ के दुनिया में भी अगर प्यार ना किया तो क्या किया…
रोटरीमध्ये येऊन जर आपण RLI चे प्रशिक्षणच घेतले नाही, तर मग खरंच रोटरीत येऊन आपण काय केलं? जवळपास दहा वर्षे मी रोटरीमध्ये आहे. या काळात विविध कार्यक्रम, सभा, प्रकल्प आणि जुन्या रोटेरियनकडून मिळालेली माहिती यामुळे रोटरीबद्दल बरीच माहिती मिळाली, पण ती सगळी थोडीफार, तुटक आणि अपुरीच होती. पण RLI चे हे प्रशिक्षण केल्यानंतर एक गोष्ट मनापासून जाणवली, ‘हे प्रशिक्षण आधी का केलं नाही!’. थोडंसं वाईट वाटलं. पण असंही वाटलं कि ‘देर आए दुरुस्त आए’.. आता तरी रोटरीकडे व्यापक आणि योग्य दृष्टीकोनातून पाहायला शिकायला मिळालं, हीच मोठी गोष्ट आहे.
दि रोटरी लीडरशिप इन्स्टिट्यूट तर्फे दिनांक ६ व ७ मार्च रोजी RLI – Part 1 आणि Part 2 या दोन दिवसीय नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्या वतीने हा कार्यक्रम विशेष मुलांची शाळा ‘स्वयं’ येथील रो. मोतीभाई दोषी मेमोरियल हॉल, कसबा बावडा येथे अतिशय उत्साहात पार पडला. कोल्हापूर शहरासह डिस्ट्रिक्ट ३१७० मधील अनेक क्लबमधील रोटेरियन या प्रशिक्षणात सहभागी झाले होते.
या प्रशिक्षणात रोटरी म्हणजे नेमकं काय, रोटरीची जगभरातील रचना कशी आहे, क्लब कसा चालतो, नेतृत्व कसं करायचं, प्रभावी सेवा प्रकल्प कसे उभे करायचे, सदस्य कसे वाढवायचे, टीमवर्क कसं तयार करायचं अशा अनेक विषयांवर खूप छान आणि सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले.
पहिल्या दिवशी रोटरीचे जागतिक स्वरूप, नेतृत्वाचे वेगवेगळे पैलू, नैतिकता, ‘फोर-वे टेस्ट’चे महत्त्व, रोटरी फाउंडेशनची भूमिका आणि समाजासाठी टिकाऊ सेवा प्रकल्प कसे राबवायचे यावर चर्चा झाली. क्लबमधील सदस्य अधिक सक्रिय कसे राहतील आणि रोटरीचे काम अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत कसे पोहोचेल याबद्दलही अनेक छान कल्पना समजल्या.
दुसऱ्या दिवशी रोटरीमध्ये असलेल्या विविध संधी, सदस्यवृद्धी, क्लबमधील संवाद, टीम बिल्डिंग आणि नेतृत्वाच्या विविध शैली यावर सविस्तर मार्गदर्शन झाले. रोटरी फाउंडेशनच्या माध्यमातून ‘Doing Good in the World’ हे ब्रीद प्रत्यक्षात कसे उतरवायचे, विविध ग्रांट्सचा उपयोग करून मोठे आणि शाश्वत सेवा प्रकल्प कसे उभे करायचे याबद्दलही खूप उपयुक्त माहिती मिळाली. रोटरीच्या सात प्रमुख सेवा क्षेत्रांमध्ये काम करून समाजात दीर्घकालीन बदल कसा घडवता येतो हेही स्पष्ट झाले.
या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन रो. बिनॉय, रो. सी. एम. बेंद्रे, रो. राजेश सुराणा आणि रो. साहिल गांधी यांनी अत्यंत अनुभवातून आणि सोप्या शैलीत केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे प्रेसिडेंट रो. अभिजित भोसले, पास्ट प्रेसिडेंट रो. शैलेश देशपांडे, पास्ट प्रेसिडेंट रो. संदीप साळोखे तसेच प्रेसिडेंट इलेक्ट रो. डॉ. भूषण शेंडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
रोटरी क्लब होरायझन, कोल्हापूर तर्फे प्रेसिडेंट रो. सीए सुमित बिरंजे, प्रेसिडेंट इलेक्ट रो. सागर बकरे आणि प्रेसिडेंट नॉमिनी रो. संदीप पवार यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला.
एक गोष्ट मात्र नक्की, प्रत्येक रोटेरियनने आयुष्यात किमान एकदा तरी RLI चे प्रशिक्षण जरूर घ्यावे. कारण रोटरी म्हणजे फक्त मीटिंग, प्रोजेक्ट किंवा फोटो एवढंच नसून त्यामागे एक मोठं तत्त्वज्ञान, व्यवस्थित रचना आणि जगभरात बदल घडवणारी शक्ती आहे, हे या प्रशिक्षणातून खऱ्या अर्थाने समजतं.
थोडक्यात सांगायचं तर..
रोटरी, रोटरॅक्टमध्ये असाल आणि RLI केले नसेल… तर अजून वेळ गेली नाही!
पुढची बॅच दिसली की लगेच नाव नोंदवा.
नाहीतर म्हणावं लागेल – “आ के दुनिया में भी अगर RLI ना किया तो क्या किया…” 😄
रो. सागर बकरे
प्रेसिडेंट इलेक्ट २०२६-२७
रोटरी क्लब होरायझन, कोल्हापूर