Sahajeevan Seva Mandal

Sahajeevan Seva Mandal Sahajeevan Seva Mandal is a Non Profit social organisation working on various social fronts for last 40 years.

10/07/2025
09/06/2025

*शिवराज्याभिषेक दिनाचे महत्व*
आज दिनांक ९ जून,२०२५-- आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शके १९४७ तिथीनुसार शिवराज्याभिषेकास ३५१ वर्षे पूर्ण झाली.
आपण सर्वजण शिवजयंती नित्य नियमाने गल्लीगल्लीत साजरी करतो. रायगडावर दर वर्षी हनुमान जयंतीला शिवपुण्यतिथीही साजरी करण्यात येते. ही जयंती व पुण्यतिथी साजरी करणं आवश्यक नाही का? नाही, ते दिवस साजरे करणं आवश्यक आहेच; पण मग या दोन्ही तिथी साजऱ्या करत असताना, शिवराज्याभिषेक दिन दिमाखात का साजरा करायचा? काय आहे या दिवसाचे एवढे महत्व?
या दिवसाचे महत्व जाणून घ्यायचे असेल, तर शिवजन्मापूर्वीचा ३५०/४०० वर्षांचा गुलामगिरीचा इतिहास डोळसपणे पाहावा लागेल, आठवावा लागेल!
शिव जन्मापूर्वी कशी होती आपल्या देशाची परिस्थिती? कशी होती महाराष्ट्राची परिस्थिती? एकामागोमाग एक होणाऱ्या इस्लामिक आक्रमणांमुळे आपला वैभवसंपन्न भारत देश - हा हिंदुस्थान पारतंत्र्यात खितपत पडला होता. इस्लामिक धर्मांधतेने धुमाकूळ घातला होता. तलवारीच्या जोरावर जबरदस्तीने धर्मांतरण सर्रास चालू होतं. इस्लामिक आक्रमणाचा पहिली बळी पडली होती आमच्या आया बहिणींची अब्रू! दुसरी बळी पडली होती आमची सोमनाथ, अयोध्या, काशीविश्वेश्वर, मथुरा, द्वारका यांसारखी असंख्य मंदिरे-आमची श्रद्धास्थाने! लाखो निरपराध माणसांच्या केवळ हिंदू म्हणून झाल्या कत्तली! लाखो स्त्रियांच्या झाल्या दिवसाढवळ्या विटंबना! केवळ हिंदूंना पवित्र म्हणून गाईवासरांच्या होत होत्या कसायांकडून हत्या! निष्पाप बाप्यांचा भरत होता गुलामांचा व्यापार आणि सुंदर सुंदर तरुणींची होत होती जबरदस्तीने बादशहांच्या आणि खानांच्या जनानखान्यात भोगदासी म्हणून रवानगी! सगळे बादशाह सारखेच - एकाच माळेचे मणी -एकाला झाकावा की दुसऱ्याला काढावा! सगळेच गाझी! 'कुफ्र शिकन' 'बुद शिकन' म्हणजे काफ़िरांना मारणारा, मूर्ती तोडणारा अशी बिरुदावली मोठया अहंकारात मिरवणारे अनेक पातशहा आणि त्यांचे सरदार हे अक्षरशः धुमाकूळ घालत होते!
कोणी लढा दिला का या इस्लामी आक्रमणाविरुद्ध? काहींनी निश्चित दिला - पण स्वतःच्या राज्यापुरता! शेजारच्या राज्यावर आक्रमण होत असेल, तर गेले का कोणी त्याच्या मदतीला? संघटितपणे प्रतिकार फारसा कुठे दिसलाच नाही! आणि अवघ्या काही वर्षात ही सुवर्ण हिंदूभूमी अगदी अलगद इस्लामी आक्रमकांच्या पारतंत्र्यात पडली! ३५० वर्षे ही गुलामगिरी एवढी नसानसात भिनत गेली की, आपलं कोण आणि परकीय कोण याचं समाजाला भानही राहिलं नाही!
त्या वेळच्या समाज रचनेनुसार - ती चुकीची की बरोबर या वादात शिरत नाही - ज्यांच्यावर रक्षणाची जबाबदारी होती, ते क्षत्रिंय, ते मराठे सरदार केवळ आपापली वतने सांभाळत होते, त्यासाठी एकमेकांत भांडत होते आणि न्याय मागायला बादशहाकडे जात होते! हे कोण? हे राजे माने! हे कोण? हे राजे शिर्के! हे कोण? हे राजे घोरपडे! हे कोण? हे राजे सुर्वे! हे कोण? हे राजे निंबाळकर!असे असंख्य राजे राजे राजे!सर्वजण निरनिराळ्या बादशहांच्या दरबारात हुजरेगिरी करण्यात धन्यता मानत होते! मोंगल, आदिलशाही, कुतुबशाही,निजामशाही, इमातशाही बरीदशाही अशा अनेक पातशाह्यांपैकी एखादी बुडवायला किंवा एखादी वाचवायला आपापसातच झुंजत होते! सर्व ठिकाणी लढणारे होते मराठेच! त्यांच्यासाठी मरणारे होते मराठेच! आपण एखादी पातशाही बुडवू शकतो, किंवा एखादी पातशाही वाचवू शकतो, तर मग आपणच का नाही पातशहा बनायचं? असा विचारही कोणाच्या मनास शिवत नव्हता! ज्यांच्यावर समाजाला दिशा देण्याची जबाबदारी त्या काळात होती, ते आमचे धर्ममार्तंड पंडित - ते काय करत होते? ते काही उपदेश करत होते की नाही? छे! छे!! छे!!! त्यांना वेळच नव्हता! गोदावरीच्या पैलतीरावर दिवसा ढवळ्या स्त्रिया भ्रष्ट केल्या जात असताना, गोदावरीच्या ऐलतीरावर पोथ्या उलट्या पालट्या करून या पंडितांची एका गहन प्रश्नांची चर्चा चालू होती! कोणता प्रश्न तो? - संन्याशाच्या मुलाची मुंज करावी की न करावी! तर काही जण हातात पळीपंचपात्री घेऊन तिरिमिरीने आपापसात भांडत होते- नाशिकला येणाऱ्या भाविकांपैकी ऋग्वेदियांचे पिंडदान कोणी करायचं आणि यजुर्वेदीयांचे पिंडदान कोणी करायचं! आणि याचा निर्णय बादशहा करणार!
समर्थांच्या शब्दात सांगायचं तर---
"तीर्थक्षेत्रे मोडिली,
ब्राह्मणस्थाने भ्रष्ट जहाली I
सकळ पृथ्वी आंदोळली,
धर्म गेला II"
अशी स्थिती अवघ्या देशाची झाली होती!
साडेतीनशे वर्षांच्या या गुलामगिरीच्या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेकाचे महत्व अधोरेखित होतं! हिंदू राजा होऊ शकतो ही कल्पनाच जिथे कुणी करू शकत नव्हतं, तिथे पांच पातशहांच्या उरावर टिच्चून हिंदूसाम्राज्य महाराजांनी उभं करून दाखवलं! सोपं होतं का ते? या स्वराज्य यज्ञात अठरा पगड जातीच्या हजारोंच्या समिधा स्वखुशीने स्वाहा झाल्या! कोण होती ही समिधा अर्पण करणारी माणसं? कोणी मराठा होते, कोणी कुणबी होते, कुणी न्हावी होते,कुणी महार होते, कुणी रामोशी होते, कुणी मांग होते, कुणी ब्राह्मण होते, कुणी शेतकरी होते तर कुणी अजून काही होते! या सर्व 'सामान्यांच्या'त असलेलं 'असामान्यत्व' महाराजांनी जागृत केलं आणि ते राष्ट्र कार्यासाठी जोडलं! चारित्र्याच्या बाबतीत त्यांनी स्वतःसह आपल्या सवंगड्यांसमोर रामाचा आदर्श ठेवला तर शत्रूला नामोहरम करण्याचा बाबतीत त्यांनी कृष्णाचा आदर्श समोर ठवला! अनेक महत्वाच्या युद्धात महाराजांनी स्वतः भाग घेतला होता. अनेक वेळी मगराच्या मगरमिठीत, वाघाच्या जबड्यात, किंवा सिंहाच्या गुहेत महाराज स्वतः घुसले आणि अत्यंत कुशल युद्धनीतीने तर कधी कुशाग्र बुद्धिबळाचे डाव खेळून महाराज सहीसलामत बाहेर पडले! हे सर्व त्यांनी स्वतःकरिता केलं का? नाही! "हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा" असे महाराज नेहमी म्हणत असत! त्यावेळच्या जनमानसानुसार, 'राजा' असल्याशिवाय रयत राज्य मानत नाही, तिला भरवसा वाटत नाही. महाराजांनी प्रथम सामान्यांच्या अंतःकरणात स्थान मिळवलं व केवळ एक उपचार म्हणून स्वतःस राज्याभिषेक करून घेतला व हिंदू साम्राज्य निर्माण केलं! होय! हे हिंदुसम्राज्यच होतं! महाराजांच्या सैन्यात असलेल्या काही मुस्लिम सैनिकांची वा अधिकाऱ्यांची नांवे सांगून 'महाराज कसे सर्वधर्मसमभाव असणारे होते, किंवा गर्भित अर्थ असा की त्यांचं राज्य हिंदवी साम्राज्य नव्हतं', असं सांगण्याची टूम सध्या सुरू झाली आहे. होय! महाराज खऱ्या अर्थाने सर्वधर्मसमभाव मानणारे होते, पण ते बावळट नव्हते बरं! जबरदस्तीने देवळं पाडून उभारलेल्या मशिदी पाडण्याच्या त्यांच्या आज्ञा आहेत! अरबस्तानातून गलबताने कोकणात येऊन बाटवाबाटवी करून, मुली पळवणाऱ्या मुस्लिम चाच्यांना त्यांचे हातपाय तोडून, त्याच गलबतातून महाराजांनी त्यांच्या देशात हाकलून दिलं आहे! गोव्यातील पाद्री गोव्यात जबरदस्तीने धर्मांतरण करतात हे लक्षात आल्यावर, त्यांना पकडून, त्यांची मुंडकी तोडून त्यांची शवे त्यांनी गोव्यात परत पाठवून दिली आहेत! त्यामुळे सर्वधर्मसमभावाच्या नांवाखाली हिंदूंच्या सहिष्णुतेचा सध्या जो अंत पहिला जात आहे, तसा कोणताही तथाकथित सर्वधर्मसमभाव महाराजांच्या विचारात व कृतीतही नव्हता! शिवाजी महाराज म्हणजे केवळ महाराष्ट्राचे असा संकुचित विचारही चुकीचा आहे. 'हा संपूर्ण भारत हे एक राष्ट्र आहे आणि ते आपलं आहे' असा सुस्पष्ट विचार महाराजांचा होता हे एका गोष्टी वरून स्पष्ट होते. महाराजांची मुलूखगिरी चालू असताना कोकणातील सुभेदार रावजी सोमनाथ यांनी महाराजांना विचारले की, आज हा मुलुख घेतला, उद्या तो गड घेतला, हे कुठवर चालणार? शेवटचे लक्ष्य काय? त्यावर महाराजांनी दिलेले उत्तर लक्षात घेण्यासारखं आहे. महाराज म्हणाले,"सिंधू नदीच्या उगमापासून ते कावेरी नदीच्या दक्षिण तीरापर्यंतचा सारा मुलुख आपला! तो मुक्त करावा, तीर्थक्षेत्रे मुक्त करावी ऐसा मानस आहे!" म्हणजे हिमालयापासून तामिळनाडू पर्यंत म्हणजे अगदी कन्याकुमारी पर्यंत सर्व मुलुख हे 'एक राष्ट्र' आहे व ते मुस्लिम आक्रमकांपासून मुक्त करायचे आहे, ही स्पष्ट कल्पना महाराजांची होती! त्यामुळे शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरते संकुचित ठेवणे अत्यंत चुकीचे आहे.
शिवराज्याभिषेकाच्या महत्वास अजून एक आयाम आहे. जन्म आणि मृत्यू हे कोणाच्याच हातात नाही. कोण कोणत्या जातीत, कुणाच्या पोटी जन्म घेईल, हे कुणाच्याच हातात नसतं. तसंच मृत्यू कोणास केव्हा येईल हे देखील कुणाच्या हातात नाही. माणसाच्या हातात असतं ते जन्म आणि मृत्यू या मधील जीवन कसं जगायचं, त्यात कसं कर्तृत्व निर्माण करायचं! शिवाजी महाराजांनी त्यांना मिळालेल्या उण्यापुऱ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात असं कर्तृत्व निर्माण केलं की अवघ्या जगाने तोंडात बोटे घातली! स्वातंत्र्य मिळवण्याची शपथ घेतली, पण नुसती शपथ घेऊन थांबले नाहीत, तर घेतलेल्या शपथेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत अव्याहतपणे अखंड परिश्रम घेतले! शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने राष्ट्रीय चारित्र्य निर्माते होते! यशवंतराव चव्हाण यांनी एका भाषणात असं म्हटलं होतं की, शिवाजी महाराज नसते, तर कदाचित पाकिस्तान आपल्या दारापर्यंत येऊन थडकले असते! यातच सारं आलं! शिवाजी महाराजांच्या या कर्तृत्वाचा अत्युच्च क्षण म्हणजे त्यांचा झालेला राज्याभिषेक! म्हणून शिवजयंती किंवा शिवपुण्यतिथीपेक्षाही या शिवराज्याभिषेक दिनाचं महत्व अधिक आहे!
त्यामुळे शिवजयंती साजरी करणं जसं आवश्यक आहे, शिवपुण्यतिथीस रायगडावर जाऊन आदरांजली वाहणं जसं आवश्यक आहे, तेवढंच, किंबहुना त्याहून जास्त आवश्यक आहे ती शिवराज्याभिषेकाचे महत्व समजून घेण्याची! तो दिवस जागोजागी, गल्लोगल्ली धडाक्यात साजरा करण्याची आणि त्यानिमित्ताने त्यांच्या गुणांचा किमान लक्षांश आपल्यात निर्माण करून घेऊन, 'राष्ट्र प्रथम' हा विचार सदैव मनात जागृत ठेवण्याची!
आपण सर्वांनी शिवराज्याभिषेकाचे महत्व ओळखून, हे शिवराज्याभिषेकाचे ३५२ वे वर्ष काही विधायक संकल्प करून धुमधडाक्यात साजरे करू या!

©विश्वास कृष्ण सहस्रबुद्धे.

28/05/2025

*"ओम नमोजी आद्या"*
ओम नमोजी आद्या I
घे ओवियांच्या नैवेद्या I
दे राष्ट्र - संजीवन - विद्या I
राष्ट्र रूपा II
वीरा! तूच गणेशू I
आर्य- संस्कृती- प्रकाशू I
हाती लखलखे परशू I
देशभक्तीचा II
तुझिया हाती अंकुशू I
तो विज्ञान निष्ठा उन्मेषू I
वेदांताचा महारसू I
मोदक मिरवे II
एके हाती दंतू I
जो स्वभाविता खंडितू I
तो भ्रांत - मत - संकेतू I
भ्रमिष्टांचा II
हिंदु समाज उद्धरण I
पारतंत्र्याचे निखंदन I
विज्ञान देवाचे पूजन I
खंडन दुष्ट रूढींचे II
राजकारणाचे हिंदुकरण I
हिंदुजगाचे सैनिकीकरण I
ऐशा राष्ट्रीय व्रतांचे उद्बोधन I
केलेसी विनायका!
'जो क्रियावान तोची पंडित' I
ही सदुक्ती केलीस सार्थ I
चंदनापरीस देशार्थ I
झिजलासी II
अगा! कृतिशूरा उदारा I
समर्थ श्रेष्ठ क्रांतिकारा I
तुझ्या ध्येयाचा ध्रुवतारा I
कधीही ढळला ना II
अगा!पांडित्य-महासागरा I
परमोज्ज्वल इतिहासकाराI
हिंदुतेच्या स्मृतिकारा I
चरित्र तुझे अद्भुत II
येता तातडीची घडी I
इंग्रेजांवर करण्या कडी I
मारिली सागरांत उडी I
निर्भयतेने रणमर्दा II
झाली प्रदीर्घ जन्मठेप-शिक्षा I
तरी न सोडिली दिव्य-दीक्षा I
जणु सुवर्णाची अग्निपरीक्षा I
घेतली दैवाने II
अशाच परीक्षांनी दारुण I
उजळले तव चारित्र्य-सुवर्ण I
तयाचाच मुकुट जाण I
रुचला हिंद-देवीला II
सूर्य न पराजित मेघ-डंबरे I
तशीच आपदा-घनांधकारे I
तुझी न लोपली कार्य-मंदिरे I
तेजस्वी प्रकाशमंत II
अंदमानच्या अंधेरीत I
निर्मिले अमर साहित्य I
शुद्धी-संघटना-कार्यात I
यशस्वी झालास तू II
असो नासिक-पुण्यपतन I
शत्रू-राजधानी लंडन II
किंवा भयप्रद आंदमान I
वीरव्रत न सोडिले II
रत्नागिरीत स्थानबद्ध I
असताही तू वीर प्रबुद्ध I
अंध-श्रद्धांशी तुवा युद्ध I
अखंड केले II
जातीभेद उच्छेदन I
करुनी समता-संस्थापन I
झालासी गा मूर्तिमान I
'पतित पावन मंदिर' ! II
इटालीचा रामदास मॅझिनी I
तैसाच तू महाराष्ट्र-भवनी I
शुद्ध राष्ट्रीयतेची संजीवनी I
दिधली तू भारतीयां II
तुझी तेजोमय लेखणी-वाणी I
जैसी चैतन्य-मंदाकिनी I
की शिवरायाची भवानी I
तलवार ती II
तरीही तू साहित्यिका I
सांगितले की 'लेखणी टाका I
बंदुका उचला' प्रसंग बांका I
राष्ट्रावरी येताची II
"कारण जेव्हा जेव्हा राष्ट्र I
होते शस्त्र -बळे संरक्षित I
तेव्हाच शास्त्रे संवर्धित I
होती सूज्ञहो ! निश्चये II"
'स्वातंत्र्य समरा'चा तू लेखक I
युद्धशास्त्राचा अभ्यासक I
अनेक क्रांति वीरांते प्रेरक I
झालासी तू II
गो-मातेस नव्हे, नरसिंहास I
पूजावे शौर्यशील होण्यास I
मानबिंदू न मानावे पशूस I
नरोत्तम हो! II
ऐशा पथ्यकारक स्पष्टोक्ती l
वदलास तू कुशाग्र-मती l
लोकेषणेस्तव लोक- स्तुती l
मानिली निंद्य ll
अगा गो-क्षीर जरि जाहले l
तरि पथ्यासी नाही घेतले l
विष होवोनिया दिधले l
विषम-ज्वरी ll
तेवो अहिंसा 'भाई भाई वाद'l
करिती दुर्बळांचा उच्छेद l
हे कथिले त्वां सिंहनादl
करोनियाll
जैशा जाति-भेदाच्या भिंती l
तैसीच सद्गुण- विकृती l
राष्ट्राते निश्चये करिती l
खंड विखंडित ll
ऐसे तुझे परखड विचार l
तैसाच होता तव आचार l
उक्ति-कृतींतील अंतर l
कोठेही ना जीवनी ll
'देशाचे होईल विभाजन'l
'आसाम समस्या अति दारुण'l
ऐसे भावि भय - सूचन l
द्रष्टेपणाने केले तू ll
परी 'नळी फुंकिली सोनारे l
इकडून तिकडे गेले वारे ' l
तैसे तव द्रष्टेपणाचे इशारे - l
वाया गेले ये देशी ll
परंतु आता या पुढे तरी l
सावधान व्हावे सत्वरी l
ऐसी सद्बुद्धी देवो हरी l
तुझिया पुण्य प्रभावे ll
आसिंधु-सिंधु-पर्यंत l
हा भारत देश विख्यात l
तया पितृभू-पुण्यभू l
मानतसे जोll
त्यालाच मानावे हिंदु l
(इतर ते दुग्ध-कुंभी विष-बिंदू!) l
ह्या व्याख्येचा आनंदू l
काय वर्णावा? ll
बोलले श्रद्धानंद सन्मती l
'ह्या व्याख्येत मंत्र-शक्ती l
जणू वैदिक ऋषींची स्फूर्तीl
सामावली दिसे ’ ll
एक भाषा,एक देश l
एक लिपी,एक आवेश l
भिन्नतेतही अधिवास l
असो राष्ट्रिय ऐक्याचा ll
शस्त्रास्त्र-सज्ज भारत व्हावा l
देश-शत्रूंचा न चालो कावा l
वैभवाचा वर्षाव व्हावाl
लोकसत्ताक भारती ll
हे तुझे स्वप्न साकार l
आज ना उद्या पूर्ण होणार l
कारण,हुतात्म्यांचे रुधिर l
कधी न वाया जातसे ll
'लोकमान्यां'च्या शिष्योत्तमा l
तुजला द्यावी कोणती उपमा? l
हारिले तुवा नैराश्य-तमा l
हिंदु-भूमीच्या ll
आज तुझा जन्मशताब्दि-दिन!l
आत्मा तुझा पुण्यपावन l
आजला देवो आशीर्वचन
विजीगिषु युवकांते ll..........................................
(संपादकीय अग्रलेख- लोकसत्ता
कै.विद्याधर गोखले.
स्वा. सावरकर जन्म शताब्दी निमित्त
दिनांक २९ मे, १९८३)

28/05/2025

सुप्रभात!
आज दिनांक २८ मे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिन! २८ मे,१९८३ हा दिवस सावरकरांचा जन्मशताब्दी दिवस. या जन्मशताब्दी दिनाचे औचित्य साधून, दैनिक 'लोकसत्ता' या वर्तमानपत्राचे तत्कालिन संपादक आणि थोर साहित्यिक, नाटककार,लेखक, पत्रकार कै.विद्याधर गोखले यांनी ज्ञानेश्वरांच्या
'ओम नमोजी आद्या I श्री वेद प्रतिपाद्या I
जय जय स्वयं वेद्या I आत्मरूपा II'
या भक्तिरचनेच्या नादावर आणि तालावर, दिनांक २९ मे, १९८३ या दिवशी लोकसत्तेत संपादकीय लिखाणाचे जे दोन रकाने असतात, ते संपूर्ण पानाचे दोन रकाने भरून, ओवीबद्ध अग्रलेख लिहून स्वातंत्र्यवीर सावरकरांना एका आगळ्या वेगळ्या स्वरूपात आदरांजली वाहिली!
महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारताच्या किंवा कदाचित सर्व जगाच्या पत्रकारितेच्या इतिहासात काव्यात लिहिलेला हा एकमेव अग्रलेख असावा! ज्यांनी त्यावेळी तो वाचला असेल, त्यांना पुन:प्रत्ययाचा आनंद मिळावा म्हणून आणि ज्यांनी वाचला नसेल, त्यांना माहिती व्हावे म्हणून, तो अग्रलेख जसाच्या तसा पाठवत आहे.

13/11/2024

*..........विनम्र आवाहन........*
*सस्नेह नमस्कार!*
*सहजीवन सेवा मंडळ,कल्याण संचालित किल्ले दुर्गाडी त्रिपुरोत्सव समितीच्या वतीने कार्तिक शुद्ध १५ शके १९४६, शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर, २०२४ रोजी त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने किल्ले दुर्गाडी येथे सायंकाळी ६.०० ते रात्री १०.०० या वेळेत दीपोत्सव (त्रिपुरोत्सव) आयोजित केला आहे. सायंकाळी ५.३० वाजता श्री दुर्गादेवीची महाआरती होऊन त्रिपुरोत्सवास प्रारंभ होईल.*
*तरी सहजीवन सेवा मंडळाच्या सर्व सदस्यांना अशी विनंती करण्यात येते की, त्यांनी सायंकाळी ६.०० ते १०.०० या वेळेत या उत्सवास उपस्थित राहावे. तसेच, आपल्या परिसरातील सर्व माता भगिनींनाही या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करावे.*
*आपला स्नेहांकित,*
*विश्वास कृष्ण सहस्रबुद्धे,*
*चिटणीस,*
*सहजीवन सेवा मंडळ, कल्याण.*
🙏🙏

*-----इले्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक कचऱ्या पासून मुक्त होऊ या------*सहजीवन सेवा मंडळ व कै.बापूराव आधारकर प्राथमिक शाळा यांच...
02/09/2024

*-----इले्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक कचऱ्या पासून मुक्त होऊ या------*
सहजीवन सेवा मंडळ व कै.बापूराव आधारकर प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने 'ई कचरा' संकलन केंद्राच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट, २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता शाळेच्या इमारतीत संपन्न झाला.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री मधुकरराव फडके, खजिनदार श्री विकास गोखले चिटणीस श्री विश्वास सहस्रबुद्धे व कार्यकारणी सदस्य श्री वैभवराज रिसबूड हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे, संस्थेचे सन्माननीय सदस्य श्री. कैलासजी देशपांडे व श्री. विक्रांत कदम सर हेही या कार्यक्रमास उपस्थित होते. शाळेच्यावतीने मुख्याध्यापिका सौ. अंजली रजपूत मॅडम, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सतीश भोईर सर, अन्य शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. इयत्ता सातवी व आठवी मधील विद्यार्थी हे उद्याचे भावी नागरिक आहेत हे लक्षात घेऊन, हा कार्यक्रम इयत्ता सातवी आठवी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापिका सौ. अंजली रजपूत मॅडम यांनी केली. मंडळाचे अध्यक्ष माननीय मधुकरराव फडके, तसेच, मंडळाचे सदस्य श्री. कैलासजी देशपांडे यांनी 'ई कचरा' संकलन व त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट याचे महत्त्व पर्यावरणाच्या दृष्टीने किती आवश्यक आहे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाच्या वेळातच उपस्थित सदस्य व विद्यार्थी यांनी 'ई कचरा' बीनमध्ये जमा करून, उपक्रमाचा शुभारंभ केला.
🙏🙏🙏

07/05/2024

Dear discerning Mothers, Sisters, and Brothers,
The polling day for the Lok Sabha is fast approaching. There is a possibility that confusion has risen in the minds of many people whether to vote or not. This could be because of various reasons:

(1) Our MP does not meet us,
(2) He / She has not performed as desired,
(3) Politics (especially in Maharashtra) has become unethical,
(4) Some might feel "my vote is a waste anyways, as the writing is on the wall" etc.

However, it should be remembered that if a party enjoying power at the Centre is not doing well, we can change that power structure; Or, can retain, if the existing government at the Centre is doing good. In my opinion, there is no wisdom in not going to vote, or using NOTA as an option is purely being in a denial mode. We must exercise our right to vote!

We should remember that we are going to vote for the Lok Sabha this month; not for assembly or local body elections. We are going to elect MPs, not MLAs and Corporators. Who gets power at the Centre will be determined by your votes. Therefore, we should think about what the roles of a Central Government are. Do not think about whether the road connectivity in front of my house has improved, whether there are traffic jams on my way to the railway station. Let us about those points think during our municipal or assembly elections!
Lok Sabha elections decide the future of this country. Therefore, while casting vote in the Lok Sabha elections, voting on regional, linguistic, local issues, as well on issues such as what the local MP has done in the constituency, is not only wrong, but it will be dangerous for the future of the country and, alternatively, for one's own future. If the country is safe, we are safe! So while voting in the Lok Sabha elections think of the following:
1. Security of our Country
2. Corruption free Central Government
3. Competent National Leadership
4. International Relations
5. Welfare schemes at Country level
6. Economy of our country
7. Infrastructure
8. Self-Awareness and Self-Reliance
Taking these points into consideration, voting should be done considering who is the best among the available options to carry out the work properly on these issues!
Let's think, who is the best among the available options based on the above points? Let's take a proper review of all the good and bad events that have happened in the country since Independence and decide carefully in who’s hands the Country and our own future will be safe!
©Vishwas Sahasrabuddhe

05/05/2024

सर्व सुजाण माता-भगिनी आणि बंधूं नो!
लोकसभेसाठी मतदानाचा दिवस जवळ येत आहे. अनेकांच्या मनात मतदान करावे की न करावे या विषयी संभ्रम निर्माण झाला असण्याची शक्यता आहे. त्याची विविध करणे असू शकतात. जशी की,
(१) आमचा खासदार आम्हाला भेटत नाही,
(२) हवे तसे काम केलेले नाही,
(३) राजकारणाचा (विशेषत: महाराष्ट्रातील) चिखल झाला आहे,
(४) कोणी 'आमचे मत फुकट गेले ' या नुकत्याच प्रसारित झालेल्या कवितेच्या प्रेमात पडल्यामुळे 'कशाला मतदान करायचे?' अशी मानसिकता झाल्याने इत्यादी इत्यादी.......!
मात्र, लक्षात ठेवावे की, आपल्याच मतांमुळे केंद्रातील सत्ता जर आपल्याला आवडली नसेल,तर ती सत्ता आपण बदलू शकतो; किंवा, आहे ती केंद्रातील सत्ता चांगली वाटत असेल, तर ती टिकवू शकतो. त्यामुळे, माझ्या मते, मतदान न करणे, किंवा, NOTA चा वापर करणे यात काहीच शहाणपणा नसून, हा शुद्ध 'नाकर्ते'पणा आहे. त्यामुळे मतदानाचा आपला अधिकार आपण बजावायलाच हवा!
आपण लक्षात ठेवावे की, आपण या महिन्यात लोकसभेसाठी मतदान करणार आहोत; विधानसभेसाठी किंवा नगरपालिकेसाठी नाही. आपण खासदार निवडणार आहोत, आमदार नाही, नगरसेवक तर नाहीच नाही. आपल्या मतांमुळे केंद्रात सत्ता कोणाची हवी हे ठरले जाणार आहे. तर मग केंद्र सरकारची कामे कोणती याचाच विचार करायला हवा. माझ्या घरासमोरचा रस्ता सुधारला आहे का, रेल्वे स्थानकाकडे जाताना वाहतूक खोळंब्यामुळे उशीर होतो आहे का, याचा विचार करायला नको. तो विचार आपण नगरपालिकेच्या/महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी करू या!
लोकसभा निवडणूक ही देशाचं भवितव्य ठरवत असते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदान करताना प्रादेशिक, भाषिक, स्थानिक मुद्द्यांवर, तसेच, मतदारसंघात खासदाराने काय स्थानिक कामे केली इत्यादी मुद्द्यांवर मतदान करणे केवळ चुकीचेच नव्हे, तर देशाच्या व पर्यायाने स्वतःच्या भवितव्यासाठी घातक ठरेल. देश सुरक्षित तर आपण सुरक्षित!त्यामुळेलोकसभा निवडणुकीत मतदान करताना: -
१. देशाची सुरक्षा
२. भ्रष्टाचार मुक्त केंद्र शासन
३. सक्षम राष्ट्रीय नेतृत्व
४. आंतरराष्ट्रीय संबंध
५. देशपातळीवरील कल्याणकारी योजना
६. देशाची अर्थव्यवस्था
७. पायाभूत सुविधा
८. 'स्व'त्वाची जागृती व स्वावलंबित्व
हे मुद्दे विचारात घेऊन, या मुद्द्यांवर योग्य काम करण्यासाठी सर्वोत्तम उपलब्ध (best amongst the Available) पर्याय कोण आहे, याचा विचार करून मतदान करायला हवे!
तर मग विचार करू की, वरील सर्व मुद्द्यांसाठी उपलब्ध पर्यायांमध्ये कोण सर्वोत्तम आहे? त्यामुळे १९४७ पासून आजपर्यंतच्या सर्व कालावधीतील देशात घडलेल्या सर्व बऱ्या-वाईट घटना यांचा सम्यक आढावा घेऊ या आणि विचारपूर्वक ठरवू या की देश आणि त्यामुळे आपले स्वत:चेही भवितव्य कोणाच्या हाती सुरक्षित आहे ते!
©विश्वास कृष्ण सहस्रबुद्धे.

17/04/2024

*मनसे रावण ज्यो निकाले, राम उसके मनमें है!*
(रामनवमीच्या निमित्ताने)
आज आहे रामनवमी,प्रभू रामाचा जन्मदिवस! साऱ्या भारतीय समाज-मानसात आदर्शांच्या बाबतीत अत्युच्च शिखरावर असलेल्या प्रभू रामचंद्राची जयंती आज देशभर मोठ्या उत्साहात साजरी होत आहे!
राम हा जीवनाच्या सर्व क्षेत्रात, सर्व नात्यात आदर्श आहे. तो आदर्श पुत्र आहे, आदर्श बंधू आहे, आदर्श पति आहे, आदर्श पिता आहे, आदर्श शिष्य आहे, आदर्श मित्र आहे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो आदर्श राजा आहे, आदर्श राज्यकर्ता आहे!
आपल्या व्यक्तीगत जीवनाच्या व्यवहारात देखील राम हा जन्मापासून अंतापर्यंत व्यापलेला आहे!एखाद्याच्या घरी पुत्र जन्माला आला तर आपण म्हणतो "त्याच्या घरी राम जन्माला आला"! खेड्यात अजूनही दोन माणसे एकमेकांना भेटली की म्हणतात "राम राम"! एखाद्या गोष्टीत काही अर्थ उरला नाही तर आपण म्हणतो "त्यात काही राम उरला नाही"! एखाद्या समस्येवर हमखास उपाय असेल, तर आपण म्हणतो "रामबाण उपाय"! एखाद्याला स्वस्थ बसण्याचा सल्ला द्यायचा असेल, तर आपण म्हणतो "राम राम म्हणत बसा"! एखाद्याने अखेरचा श्वास घेतला की, आपण म्हणतो "त्याने अखेरचा राम म्हटला"! एवढेच नव्हे, तर त्याचे शव उचलताना व स्मशानभूमीपर्यंत नेताना आपण म्हणतो "श्रीराम जयराम जयजय राम!" मानवी जीवन व्यवहारात राम जसा जन्मापासून अंतापर्यंत व्यापलेला आहे, तसा तो आसेतू-हिमाचल व्यापलेला आहे! काश्मीरचा 'रामनाथ', हरियानाचा 'रामलाल', पंजाबचा 'रामसिंग', राजस्थानचा 'कुवर रामसिंह', बंगालचा 'रामकृष्ण', बिहारचा 'रामप्रसाद', उत्तर प्रदेशचा 'रामनरेश', ओरिसाचा 'रामबिहारी', मध्यप्रदेशचा 'रामसुंदरलाल', गुजराथचा 'राममल', महाराष्ट्राचा 'रामचंद्र', कर्नाटकचा 'रामप्पा', आंध्रप्रदेशचा 'रामय्या', तामिळनाडूचा 'रामस्वामी', तर केरळचा 'रामचंद्रन्'! जन्मापासून मरणापर्यनंत राम, काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत राम!
राम हा हिंदुत्व विचारांचा, हिंदूजीवनपद्धतीचा आदर्श आहे. आम्ही 'शत्रूविनाशाय' अशी प्रार्थना करत नाही, तर 'शत्रुबुद्धी विनाशाय' अशी प्रार्थना करतो! येथेही आमचा आदर्श रामच आहे! वालीचा वध करण्यापूर्वी रामाने वालीला अन्यायाचा मार्ग सोडून सुग्रीवास त्याचे राज्य परत करण्याची विनंती केली होती. म्हणजे शत्रूचा विनाश करण्यापूर्वी त्याने त्याच्या बुद्धीचा विनाश करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे 'वसुधैव कुटुंबकम्' ही संकल्पनाही आम्हा हिंदूंची आहे! या संकल्पनेमुळे दुसऱ्याच्या भूमीवर आमचा डोळा असत नाही. कारण या बाबतीतही आमचा आदर्श रामच आहे! रामाने वालीचा वध केला, पण त्याचे राज्य स्वतःस नाही घेतले, ते सुग्रीवास दिले. रावणाचा वध करून लंका जिंकली, पण स्वतःच्या राज्यास नाही जोडली, ती बिभीषणास दिली! शरणागतास रामाने नेहमी अभयच दिले आहे. अत्यंत शालीन, कुलीन, सालस, नेमस्त अशी रामाची मूर्ती जरी आपल्या डोळ्यासमोर येत असली, तरी तो 'कोदंडधारी' आहे, हेही लक्षात घ्यायाला हवे. अन्यायाचे, दुष्टशक्तीचे निर्दालन आणि सज्जनशक्तीचे संरक्षण करण्यास तो सदैव सिद्ध आहे! तसेच, रावणाचा पराभव एकट्याने करण्याचे सामर्थ्य स्वतःमध्ये असूनही त्याने वानरसेनेला बरोबर घेतले आहे, म्हणजे त्याने समाजाला बरोबर घेऊन दुष्ट शक्तीचा नाश केला आहे. येथे 'दुष्टशक्ती' विरुद्ध 'सज्जनशक्ती' जागृत करून ती कार्यान्वित करण्याचा त्याचा हेतू स्पष्टपणे दिसून येतो.
रामाने परिटाच्या संशयासाठी सीतेला दूर केले, वानर जातीला आलिंगन दिले, एका शबरी नांवाच्या भिल्लीणीने दिलेली उष्टी बोरे खाल्ली! होता का त्याच्या मनात तथाकथित उच्च-नीचतेचा भाव? मग आमच्या मनात कसा येतो? या हीन विकृती आम्ही गाडून टाकायला नकोत का?
परीटाने संशय घेतला म्हणून रामाने सीतेचा त्याग करून सीतेवर घोर अन्याय केला, असे अनेकांना वाटते. केवळ सीतेचा विचार केला, तर ते खरेही आहे! पण येथे शेवटी रामाची अखेरची भूमिका कोणती होती हे लक्षात घेणे आवश्यक आहे! एकीकडे तो पुत्र आहे, एकीकडे तो बंधू आहे, एकीकडे तो पति आहे; पण त्याहीपेक्षा अखेर शेवटी तो एक राजा आहे, त्याची अखेरची भूमिका ही राज्यकर्त्याची आहे! त्यामुळे त्याचे शेवटचे पदकर्तव्य राज्यकर्त्याचे आहे, ज्यामध्ये 'जनतेच्या विश्वासास पात्र ठरणे' हे अभिप्रेत आहे -- कोणतीही किंमत मोजून! सीतेचा त्याग केल्यावर त्याने दुसरा विवाह तर केला नाहीच, पण त्याने सर्व सांसारिक सुखाचाही त्याग केला आहे, तो मृग-शैय्येवर निद्रा घेतो, मंचकावर नाही! राजकर्तव्य सोडल्यास, अत्यंत विरागी जीवन तो जगला आहे. कोणत्याही युग पुरुषांच्या बाबतीत आपल्याला हेच पाहायला मिळते. लोकमान्य टिळक असोत, क्रांतीवीर बाबाराव सावरकर असोत, की स्वातंत्र्यवीर तात्याराव सावरकर असोत, त्यांच्या वैवाहिक जीवनात त्यांच्या पत्नींचा वैयक्तिक विचार केल्यास, त्यांचेवर अन्यायच झाला आहे असे वरकरणी दिसते. पण अशा थोर पुरुषांच्या बाबतीत त्यांनी जे ध्येय स्वीकारले होते, त्याबाबतची 'कर्तव्ये' निभावताना अन्य नात्यांवर झालेल्या परिणामांचा विचार दुय्यमच ठरतो, कारण त्याचे परिणाम त्यांच्या पत्नींबरोबर त्यांनी स्वतःही भोगलेले असतात! रामाच्या बाबतीत 'सीतेवर त्याने अन्याय केला' ही टीका म्हणूनच अप्रस्तुत ठरते!
चित्रकुटावरील राम-भरत भेट ही तर राज्यकर्ते कसे असावेत याचा वस्तुपाठच आहे! भरत रामाला म्हणतोय "रामा! राज्य मला नको, तो तुझा अधिकार आहे,तूच राजा हो!", तर राम भारताला म्हणतोय,"नाही नाही, वडिलांची आज्ञा, मातेची इच्छा मला पाळलीच पाहिजे, राज्य तूच कर!" राज्यपदाबाबतची दोघांची ही केवढी निरपेक्ष बुद्धी! आम्ही जर का रामाला आदर्श मानत असू, रामराज्य जर खरोखरच अपेक्षित असू, तर राज्यपदाबाबतची ही निरपेक्ष बुद्धी प्रथम जोपासायला हवी, अंगिकारायला हवी! आणि राज्यकर्त्यांकडून तशी अपेक्षा ठेवत असू, तर कोणत्याही क्षेत्रात स्वतः काम करताना "मै नहीं, तूही" हा विचार आचरणात असायला हवा!
राम हा आम्हा भारतीयांना सर्व बाबतीत असा आदर्श आहे! रामाने राज्यकर्ता म्हणून 'पदकर्तव्य' निभावताना प्राणप्रिय पत्नीचाही त्याग केला. हा आदर्श आमचा असेल, तर कोणत्याही ठिकाणी - अगदी आपल्या कार्यालयातील कामात देखील त्या पदकर्तव्यास प्राधान्य द्यायला हवे, स्वतःच्या स्वार्थास नव्हे! नुसते अयोध्येत भव्य राम मंदिर उभे राहून उपयोगाचे नाही. आमच्या अस्मितेचे प्रतीक म्हणून त्याची आवश्यकता वादातीत आहेच, पण त्याचबरोबरीने किंवा त्याहीपेक्षा अधिक आमच्या हृदयमंदिरातील राम सदैव सक्रिय जागृत असणे अधिक महत्वाचे आहे!राम तुमच्यात आहे, माझ्यात आहे, चराचरात आहे, मनामनात आहे! एका चित्रपट गीतात म्हटलंय...
"राम तो घर घर मे है,
राम हर आँगनमे है I
मनसे रावण जो निकाले,
राम उसके मनमे है,
राम उसके मनमें है II"
त्यामुळे मला वाटते की आवश्यकता आहे, ती मनातल्या रावणाला गाडून टाकण्याची आणि मनातल्या निद्रिस्त रामाला 'जागृत' करण्याची! आजच्या रामनवमीच्या निमित्ताने आपण स्वतःपासून सुरवात करून, प्रथम स्वतःच्या मनातील राम 'जागृत' करण्याचा मनापासून प्रयत्न करू या! स्वतःसह समस्त भारतीयांच्या मनातला हा राम ज्यावेळी खरोखरीच जागृत होईल, तेव्हाच आपल्याला अपेक्षा करता येईल...
" रामराज्य या हिंदू भूमीवर
पुनश्च यावे, यावे लौकर I
सद्गुण वैभव नित्य निरंतर
सुवर्णभूमी सार्थ खरोखर!"

© विश्वास सहस्रबुद्धे.

॥ जय श्री राम ॥कल्याण पश्चिम मधील सर्व रामभक्तांना जाहीर अवाहन 🙏🏻दरवर्षी प्रमाणे सकल हिंदू समाजाची रामनवमी ची शोभायात्रा...
17/04/2024

॥ जय श्री राम ॥
कल्याण पश्चिम मधील सर्व रामभक्तांना जाहीर अवाहन 🙏🏻

दरवर्षी प्रमाणे सकल हिंदू समाजाची रामनवमी ची शोभायात्रा आपल्या शहरात निघणार आहे.

यात्रेचा मार्ग : दुर्गाडी चौक - लालचौकी - सहजानंद चौक - अहिल्याबाई चौक - टिळवचौक - पारनाका.

दिनांक १७.०४.२०२४
संध्याकाळी ४.४० वाजता दुर्गाडी चौक येथून सुरवात होईल तेथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे तसेच हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.

जय श्री राम 🏹🚩

निमंत्रक
सहजीवन सेवा मंडळ

Address

Kalyan
421301

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sahajeevan Seva Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share