pune ckp community

pune ckp community Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from pune ckp community, Community Center, Flat no. 2, priyadarshani apt, samarth colony, Jalgaon.

15/03/2026

लगेगी आग तो आयेंगे कई मकान जद में, यहाँ सिर्फ हमारा मकान थोडी है! - राहात इंदोरी यांचा कुठल्याही काळात समर्पक ठरेल असा हा शेर आहे. आतंकवादी देश असलेल्या इस्राएल आणि अमेरिका यांनी आतापर्यंत शेकडो राजकारण्यांच्या जगभरात हत्या केल्यात. मोसाद ने तर अमेरिकेच्या प्रेसिडेंट J F केंनेडी यांनाही मारले आहे असे म्हटले जाते. केनेडी यांना मारणाऱ्या oswald याचा खून करणारा जॅक रुबी हा पोलिश ज्यू होता. केनेडी च्या खुनाचे रहस्य oswald च्या डेड बॉडी सोबत दफन झाले.महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी, होमी भाभा यांच्या ही हत्येच्या पाठीमागे CIA चा हात होता असे म्हटले जाते. महात्मा गांधी यांनी एकदा सर्वां समोर पाकिस्तान मध्ये जाऊन कायम स्वरूपी राहण्याचा विचार बोलून दाखवला होता,तसे घडले असतें तर अमेरिकेला, पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि भू- सामरिक क्षेत्रात आपल्या सोयीने वापरता आले नसते म्हणून महात्मा गांधींचा काटा काढायचे ठरवले गेले अशी एक कॉन्स्पिरेसी थेअरी आहे. खरी खोटी फक्त CIA जाणे. आज पर्यंतचा CIA आणि deep state असलेल्या अमेरिका सारख्या देशाचा इतिहास बघता ही थेअरी खरी असण्याची संभावना जास्त आहे. Deep state म्हणजे जो देश आपल्याच नागरिकांना मारून दुसऱ्या देशावर खापर फोडतो, ज्या देशाला स्वतःच्या देशातील नागरिकांच्या जीवाची किंमत नसते त्या देशाला deep state म्हणतात. 9/11 अटॅक हे त्याचे लाईव्ह उदाहरण आहे असे अनेकांचे मत आहे. जगभरातल्या nuclear सायंटिस्ट , मिलिटरी जनरल्स,राष्ट्रध्यक्ष, पंतप्रधान यांना pre emptive strike च्या नावाखाली मारणे हे या देशांना स्वतःचे लोक कल्याणकारी कर्तव्य वाटते. इराकी प्रेसिडेंट सद्दाम हुसेन तसेंच लिबिया चा प्रेसिडेंट गद्दाफी या वर अटॅक करण्यासाठी या देशा कडे विनाशकारी chemical weapons आहे असा एक खोटा रिपोर्ट MI5 यां गुप्त हेर संस्थे कडून काढून त्यां देशांवर अमेरिका त्याच्या धार्जिन्या इंग्लंड, फ्रान्स सारख्या 40 चोर सदस्य मंडळातील देशांनी हल्ला करून ते देश बेचिराख करून टाकले. Venezuela, सिरिया या देशांचाही आर्थिक नाकेबंदी, सामरिक हल्ला करून तसेच हाल केलेत. Venezuela सारख्या स्वतंत्र देशातील राष्ट्राध्यक्षाला तर रात्रीच्या वेळी झोपेत असताना बायको सहित उचलून नेले. प्रत्यक्ष nuclear weapon असलेल्या नॉर्थ कोरिया देशाकडे डोळे वटारून ही पाहायची यांची हिम्मत नाही. इराण हा भारताला इंडियन करन्सी ₹ मध्ये मागील कित्येक दशकापासून तेल विकत आहे, तसेंच या देशात त्यांना कंट्रोल करता येईल अशी सेंट्रल बँकिंग सिस्टिम नसल्यामुळे या देशाला axis of evil असे अमेरिका आणि त्याच्या 40 चोर युरोपीयन आणि इतर देशांकडून संबोधले जाते. इंडो चीन युद्धाच्या अगोदर पर्यंत भारतीय रुपया middle east मध्ये त्या देशांची अधिकृत करन्सी होती. चिंतामणी देशमुख RBI चे गव्हर्नर असतांचा त्यांची स्वाक्षरी असलेला एक रुपया आजही तिथल्या प्रत्येक देशातील सेंट्रल बँकेच्या करन्सी musium मध्ये ठेवलेला असतो. जगावर राज्य करण्यासाठी पेट्रोडॉलर करार करून डॉलर चा influence वाढवण्यासाठी त्या अनुषंगाने सर्व प्रथम भारताच्या आर्थिक ताकदीचे खच्चीकरण करण्यासाठी 1962 चे indochina युद्ध भारतावर अमेरिकेच्या नवमित्र झालेल्या चीन देशा कडून अमेरिके च्या गुपचूप सांगण्या वरून लादण्यात आले. त्या वेळेस अमेरिकेकडून कुठलीही हवाई मदत किंवा इतर मदत ( पॅराशूट, युद्ध सामग्री )भारताला केली गेली नाही. भारतीय करन्सी त्या वेळेस सोन्याशी इंटिरलिंक असल्यामुळे आणि युद्धात प्रचंड आर्थिक नुकसान झाल्यामुळे पुरेशा प्रमाणात करन्सी छापणे शक्य नव्हते म्हणून Middle east मधून भारतीय करन्सी काढून घेण्याचे ठरल्यावर चीन कडून युद्ध थांबवण्यात आले. या चीन कडून भारतावर लादलेल्या युद्धाच्या मोबदल्यात चीन च्या राजकीय,सामरिक,तांत्रिक,आर्थिक प्रगतीस अमेरिकेकडून सढळ हाताने मदत करण्यात आली. भारतानेही हुशारीने middle east मधील करन्सी बंद करतांना त्या सर्व देशांस स्वतःची करन्सी बनविण्यास आणि सेंट्रल बँक सिस्टिम उभी करण्यास मदत केली. पुढे अमेरिकेने पेट्रोडॉलर करार केल्यावर जेव्हा सोन्याशी इंटिरलिंक असलेले डॉलर छापणे अवघड होऊ लागले तेव्हा 1971 मध्ये सोन्याशी असलेले लिंकिंग बंद केले आणि वाटेल तेव्हढे डॉलर छापणे सुरु केले. पुढे सर्वच देशांनी त्यांचे अनुकरण केले. 1944 ते 1971 पर्यंत जग भरातल्या 44 देशांनी ( ज्यात अमेरिका धार्जीणे 40 देश ) अमेरिकेशी bretton woods system या नावाचे लँडमार्क मोने्टोरी ऍग्रीमेंट केले होते ज्यात अमेरिकन करन्सी सोन्याशी 35$ per 1 gold ounce या rate ने peg केली होती. पुढे निक्सन ने peg system बंद केल्यावर त्या करन्सी ला टॉयलेट पेपर एवढीही किंमत असायला नको होती परंतु आपल्या धटिंगणशाहिच्या जोरावर अमेरिकेने त्याची दादागिरी चालवून निव्वळ कागद छापून स्वतःची संपत्ती,(crude ऑइलची व त्या अनुषंगाने पेट्रोडॉलर ची इतर देशांना गरज असल्यामुळे)इतर देशांचे आर्थिक शोषण करून वाढवली. ब्राझील, रशिया, इंडिया, चीन या उदयोनमुख देशाच्या अर्थ व्यवस्थांनी स्वतःच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराकरिता स्वतःचे चलन ( ब्रिक्स )तयार करायचे ठरवल्यावर आणि त्यात इराण सारख्या भारताला नेहमी आर्थिक,राजकीय ( काश्मीर सारख्या मुद्द्यावरही),सामरिक मदत करणाऱ्या देशाचा प्रवेश झाल्यावर अमेरिका आणि त्याची पिल्लावळ घाबरली. जर जगाला petrodollar ची गरज पडली नाही आणि डॉलर चा डोलारा कोसळला तर अमेरिका आणि त्यांच्या पिल्लावळ देशांनी विकत घेतलेल्या अमेरिकेच्या खरबो डॉलर च्या treasury बॉण्ड्स ना कवडिचीही किंमत राहणार नाही हे यां सर्वांनाच कळून चुकले होते. क्रमश : सिद्धार्थ सोनाळकर, जळगांव.

14/03/2026

प्राचीन भारतीय गणित आणि π (पाय) चे ज्ञान

भारताची प्राचीन परंपरा ही विज्ञान, तत्त्वज्ञान आणि गणिताच्या समृद्ध ज्ञानाने परिपूर्ण आहे. प्राचीन भारतीय गणितज्ञांनी अनेक महत्त्वपूर्ण संकल्पना शोधून काढल्या आणि जगाला दिल्या. शून्याची संकल्पना, दशमान पद्धती (Decimal system), बीजगणित, भूमिती आणि खगोलशास्त्र या क्षेत्रांत भारताने मोठे योगदान दिले आहे. या ज्ञानामुळे जगातील गणिताच्या विकासाला मोठी दिशा मिळाली.

भारतीय गणिताची परंपरा वैदिक काळापासूनसुरू झालेली दिसते. वैदिक साहित्यातील **शुल्बसूत्रांमध्ये** (Sulba Sutras) भूमितीचे अनेक नियम दिलेले आहेत. यामध्ये यज्ञवेदी तयार करण्यासाठी आवश्यक असलेले मोजमाप, त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ यांची मांडणी यांचे सविस्तर वर्णन आढळते. या ग्रंथांमध्ये पायथागोरसच्या प्रमेयासारखी संकल्पना देखील आढळते.

भारतीय गणितज्ञांमध्ये **आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य आणि वराहमिहिर** यांचे नाव विशेष उल्लेखनीय आहे. त्यांनी खगोलशास्त्र आणि गणित यांचा परस्पर संबंध सांगत अनेक सूत्रे मांडली. विशेषतः आर्यभट्ट यांनी इ.स. 499 मध्ये लिहिलेल्या **आर्यभटीय** या ग्रंथात गणित आणि खगोलशास्त्राचे अत्यंत महत्त्वाचे सिद्धांत दिले आहेत.

π (पाय) बद्दल प्राचीन भारतीय ज्ञान

वर्तुळाचा परिघ आणि व्यास यांचे प्रमाण म्हणजे **π (पाय)**. आजच्या आधुनिक गणितात π ची किंमत सुमारे **3.14159…** इतकी मानली जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्राचीन भारतीय गणितज्ञांना या संख्येचे अचूक ज्ञान खूप पूर्वीपासून होते.

**आर्यभट्टांनी** π चे अत्यंत अचूक मूल्य दिले होते. त्यांनी सांगितले की:

> “१०० मध्ये ४ घालून ८ ने गुणावे आणि त्यात ६२००० जोडावे. त्या संख्येचा २०००० ने भाग घेतल्यास वर्तुळाचा परिघ मिळतो.”

या गणनेतून π चे मूल्य **3.1416** इतके मिळते, जे आधुनिक मूल्याच्या अतिशय जवळ आहे. त्या काळातील साधनांच्या मर्यादा लक्षात घेतल्यास हे अत्यंत अद्भुत गणितीय ज्ञान मानले जाते.

यानंतरच्या काळात **भास्कराचार्यांनी** आपल्या **सिद्धांत शिरोमणी** या ग्रंथात वर्तुळ, त्रिकोण आणि इतर भूमितीय आकृत्यांबद्दल सविस्तर माहिती दिली. भारतीय गणितज्ञांनी π चा उपयोग खगोलशास्त्रीय गणनांमध्ये, ग्रहांच्या गतीच्या मोजमापात आणि वास्तुशास्त्रातही केला.

विशेष म्हणजे **केरळ गणित शाळेचे गणितज्ञ**, विशेषतः **माधव संगमग्राम**, यांनी π साठी अनंत श्रेणी (infinite series) वापरून अत्यंत अचूक मूल्य काढले होते. हे कार्य युरोपमधील गणितज्ञांच्या शोधांपूर्वीच झाले होते.
निष्कर्ष

प्राचीन भारतीय गणित हे अत्यंत प्रगत आणि वैज्ञानिक होते. शून्य, दशमान पद्धती आणि π सारख्या महत्त्वाच्या संकल्पनांमुळे भारताने जागतिक गणिताला मोठे योगदान दिले. भारतीय गणितज्ञांनी केवळ सिद्धांत मांडले नाहीत, तर त्यांचा वापर खगोलशास्त्र, वास्तुशास्त्र आणि दैनंदिन जीवनातही केला. त्यामुळे प्राचीन भारतीय गणित ही भारताच्या वैज्ञानिक परंपरेची एक अमूल्य देणगी मानली जाते.

13/03/2026
07/03/2026

*भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रणेते पद्मविभूषण डॉ. सी डी देशमुख*

संयुक्त महाराष्ट्र निर्माण होण्याची प्रक्रिया वेग धरत असताना आणि त्यासाठी मराठी माणसांचा निर्धार आंदोलनाच्या रूपाने ज्वालाग्राही बनत असताना त्याला एक नैतिकतेची आणि त्यागाची किनार सी डी यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळातील अर्थमंत्रीपदाच्या राजीनाम्याने जोडली आणि सी डी हे आख्या महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत बनले ही गोष्ट आता नवीन पिढीला फारशी माहीत असण्याचे कारण नाही !

अगदी त्यांच्या गावातील, ज्या गावात आजही त्यांचे पिढीजात घर आहे आणि ज्या दगडी शाळेत त्यांनी ओट्यावर बसून दगडी पाटीवर आयुष्यातील पहिली मुळाक्षरे गिरविली त्या गावातील नवीन पिढीपैकी कितीजणांना हा इतिहास किंबहुना सी डी हे नाव माहीत असेल हा प्रश्नच आहे !

त्यांच्या या गावाचे नाव आहे तळे! रायगड जिल्ह्यातील एक खेडे!!

अर्थात तळेकरांनी सी डी आमच्या गावचे सुपुत्र आहेत असा डंका फारसा पिटला नाही. आणि सी डी मराठी चौथी नंतर रोह्याला गेले, त्यांचे संपूर्ण कुटुंब तेंव्हा रोह्याला स्थायिक झाले त्यामुळे त्यांच्यावर रोहेकरांनी जास्त हक्क सांगणे हे ही संयुक्तिक आहे!

तरीही माणूस आपले मूळ गाव कधीच विसरत नाही! सी डी हे तर आपल्या मतांशी आणि मातीशी किती प्रामाणिक होते हे त्यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळातील अर्थमंत्रीपदाच्या राजीनाम्याने सिद्धच केले होते ! असा माणूस आपल्या गावाला विसरणे शक्यच नव्हते. आपल्या 'कोर्स ऑफ माय लाईफ' या आत्मचरित्रात आपल्या बालपणीचा हा सगळा वृत्तांत तपशिलात लिहून त्यांनी आम्हा तळेकरांची छाती अभिमानाने कायमची फुलवून टाकली! आणि आपल्या इंग्लंड मधील घराला 'रोहा' असे नाव देऊन त्यांनी आपले रोह्यावरील प्रेमही अधोरेखित केले!

हे सगळं आज लिहिण्याचं कारण म्हणजे हे डॉ. चिंतामण द्वारकानाथ देशमुख म्हणजेच सी डी यांची आज दोन ऑक्टोबर ही पुण्यतिथी आहे !

त्या निमित्त आमच्या गावातील नव्या पिढीला कोकणातील आपल्या या छोट्याशा गावात आपल्या कर्तुत्वाने आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त केलेले, ज्यांचे अर्थशास्त्रातील कर्तृत्व सर्व जगाने मान्य केले होते असे त्या काळातील भारतातील सर्वात बुद्धिमान व्यक्तिमत्त्व रहात होते हे कळावे हा आहे.

सी डी यांचा जन्म १४ जानेवारी १८९६ या मकर संक्रांतीच्या दिवशी नाते या त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे प्राथमिक चौथी पर्यंतचे शिक्षण तळे येथे झाले आणि त्यानंतर त्यांचे वडील रोहे येथे वकिली व्यवसाय करण्यासाठी स्थायिक झाल्याने त्यांचे पुढील शिक्षण रोहे येथे झाले.

नंतर ते शिक्षणासाठी मुंबईला गेले आणि तेथूनच त्या वेळच्या मॅट्रिकच्या परीक्षेत पहिली जगन्नाथ शंकरशेट स्कॉलरशिप मिळवून ते मुंबई विद्यापीठात पहिले आले. त्याकाळी बोर्डाची परीक्षा विद्यापीठ घेत असे.

त्यावेळची एक गोष्ट प्रसिद्ध आहे... मॅट्रिक चा रिझल्ट लागला हे सांगावयास आलेल्या गुरुजनांना आपला रिझल्ट विचारण्या आधीच त्यांनी प्रश्न केला ..who is second? या त्यांच्या अतुलनीय यशाबद्दल राम गणेश गडकरी यांनी 'आनंद वर्धापन' ही कविता लिहिली होती. त्यानंतर मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला.

नंतर उच्च शिक्षणासाठी ते १९१५ मध्ये इंग्लंड मध्ये गेले.. १९१७ साली वनस्पती शास्त्र, भूगर्भ शास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय घेऊन त्यांनी पदवी मिळविली. पैकी वनस्पतीशास्त्र हा त्यांचा मुख्य विषय होता. अर्थात विद्यापीठात या तिन्ही विषयांत विशेष प्रविण्याचे पदक..फ्रॅंक स्मार्ट नावाचे पारितोषिक.. मिळवून ते सर्वप्रथम आले.

१९१८ साली ते आय सी एस ला बसले आणि सर्वप्रथम आले. त्या परीक्षेला बसणारे बहुतांश ब्रिटिश तरुण असत हे येथे लक्षात ठेवले पाहिजे. त्या परीक्षेत वाईट हस्ताक्षरासाठी त्यांचे तब्बल साठ मार्क कापण्यात आले होते आणि तरीही ते त्या परीक्षेत सर्वप्रथम आले होते हे लक्षात घेता त्यांच्या बुद्धिमत्तेची झेप किती होती याची आपण कल्पना करू शकतो !

आय सी एस झाल्यावर देशकार्यासाठी काम करायचे हे ठरवून ते लोकमान्यांच्या भेटीला गेले. लोकमान्य तेंव्हा इंग्लंड मध्येच होते. दूरदृष्टीच्या लोकमान्यांनी त्यांना नागरी सेवा न सोडण्याचा सल्ला दिला. देश लवकरच स्वतंत्र होत असल्याने आपल्या सारख्या देशप्रेमी प्रशासकांची देशाला पुढे आवश्यकता लागणार आहे असे सांगून त्यांनी सी डी यांचे मन वळविले.

मध्यभारत आणि बेरार म्हणजे आत्ताच्या विदर्भाचा काही भाग या विभागाचे प्रशासक म्हणून सी डी यांनी आपल्या आय सी एस कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्या क्षेत्रात जवळपास बावीस वर्षे त्यांनी कर्तव्याचा एक अत्युच्च दर्जा निर्माण केला.

१९३१ साली ते गोलमेज परिषदे साठी नेमलेल्या तीन सचिवांपैकी एकमेव भारतीय वंशाचे सचिव होते. महात्मा गांधी यांच्या सहवासात दिवसाला दोनशे पाने भरतील एव्हढा मजकूर सारांशाने फक्त वीस पानात बसवून ते सरकारला दररोज सादर करीत आणि हे काम त्यांना मनापासून आवडे. गंमत म्हणजे सी डी तेंव्हा इंग्लंड मध्ये सुट्टीवर आपल्या कुटुंबा सोबत होते, परंतु त्यांच्या तोलामोलाची दुसरी व्यक्ती गोलमेज सारख्या ब्रिटिश सरकारच्या आणि भारतीय नेत्यांच्या दृष्टीने अतिमहत्वाच्या परिषदेचे सचिवपद भूषविण्यास ब्रिटिश सरकारला सापडली नाही आणि ते काम सी डी यांच्यावर सोपविले गेले.

१९३५ साली इंडिया ऍक्ट आला. भारतीय राज्य घटनेचा मूलाधार म्हणून या कायद्याचे महत्व आहे. याच कायद्याने रिझर्व्ह बँक स्थापन झाली. या कायद्यात केंद्र आणि राज्य यांच्यातील आर्थिक व्यवहार कसे असावेत या बद्दलच्या कायदेशीर तरतुदी आहेत. मध्य भारत आणि बेरार यांचे अर्थ सचिव म्हणून काम करीत असताना सी डी यांनी जी टिपणे ब्रिटिश सरकारला पाठविली होती त्याबरहुकूम या तरतुदी आहेत.. ही गोष्ट सी डी यांच्या अर्थशास्त्राच्या सखोल ज्ञानाची साक्ष आहे.

पुढे १९३९ साली ते रिझर्व्ह बँकेत सरकार नियुक्त संचालक म्हणून रुजू झाले. १९४१ साली डेप्युटी गव्हर्नर आणि मग १९४३ साली ते रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर बनले. त्यावेळी रिझर्व्ह बँक खासगी होती. सरकारने तिच्या राष्ट्रीयीकरणाचा घाट घातला. तसे केल्यास रिझर्व्ह बँकेच्या स्वातंत्र्यावर तो घाला ठरेल आणि तिला अर्थविषयक निर्णय निःपक्षपातीपणे घेता येणार नाहीत या रास्त शंकेमुळे या राष्ट्रीयीकरणास सी डी यांनी तीव्र विरोध केला, परंतु राष्ट्रीयीकरणाच्या बाजूने सर्व भारतीय आहेत हे लक्षात घेऊन कोणतीही कटुता न ठेवता त्यांनी नंतर हे राष्ट्रीयीकरण सक्षम पणे पार पाडले !

फाळणी नंतर रिझर्व्ह बँकेच्या मालमत्तेचीही वाटणी होणे अपरिहार्य होते. त्यासाठी दोन्ही देशांच्या मान्यतेने स्वतंत्र करार केला गेला. त्यात जी कलमे, अटी, शर्ती होत्या त्याचे पालन दोन्हींकडून आवश्यक होते.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून फाळणी नंतर रिझर्व्ह बँकेच्या मालमत्तेची आणि संचित नफ्याची प्रमाणबद्ध वाटणी करून त्यातील पाकिस्तानचा हिस्सा ठरविणे आणि तो त्यांच्यापर्यंत पोहोचविणे हे अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीचे त्याचप्रमाणे लोकक्षोभाला निमंत्रण देणारे असे काम होते आणि ते जिकिरीचे काम सी डी यांनी निष्णातपणे केले. अगदी टेबल खुर्च्या यांचीही व्यवस्थित वाटणी केली गेली. पाकिस्तानला त्यांचा योग्य हिस्सा हप्त्या हप्याने दिला गेला. शेवटच्या हप्त्या पैकी बासष्ठ कोटी रुपये पाकिस्तानला देऊ नयेत कारण त्यांनी काश्मीर वर हल्ला करून त्या करारातील अटींचा भंग केला आहे असे वल्लभभाई पटेल यांचे आणि बहुतांश भारतीयांचे मत होते.

परंतु महात्मा गांधी यांनी तो द्यावा असे म्हटले ! हा मुद्दा पुढे त्यांच्या हत्येला जबाबदार ठरणार होता !! परंतु सी डी हे कोणाच्याही.. अगदी गांधी किंवा पटेल यांच्या दबावाखाली येण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यांच्या न्यायनिष्ठुर स्वभावाला जागून एकदा जो करार झाला आहे त्यानुसार हे पैसे द्यावेच लागतील असा त्यांनी पवित्रा घेतला आणि ते पैसे दिले जातील हे त्यांनी पहिले.

सी डी हे त्यावेळी पाकिस्तानच्या अपेक्स बँकेचे म्हणजे रिझर्व्ह बँकेचे म्हणूया.. अर्थात तेंव्हा पाकिस्तानच्या रिझर्व्ह बँकेची अधिकृत स्थापना झाली नव्हती.. तिचेही सी डी अध्यक्ष होते.

पाकिस्तानी नोटांवर सही असणारा हा एकमेव भारतीय माणूस होता ही अद्भुत आणि विलक्षण गोष्ट फारशी कुणाला ठाऊक असण्याची शक्यता नाही. एक एप्रिल अठ्ठेचाळीस पर्यंत ते पाकिस्तानच्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या अधिकृत पदावर होते. पाकिस्तानची स्वतंत्र रिझर्व्ह बँक त्यानंतर अस्तित्वात आली.

त्यांच्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदाच्या कारकिर्दीत बँकिंग कंपनीज ऍक्ट, आय एफ सी आय यांची स्थापना सी डी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या दूरदृष्टी मुळे झाली. येथेच त्यांनी संख्याशास्त्र विभाग स्थापन केला आणि रिझर्व्ह बँकेचे मासिक वार्तापत्र.. ज्यात देशाचा आर्थिक आढावा घेतला जातो ते चालू केले.. ही त्यांची दूरदृष्टी आज बँकर नीट समजू शकतील!

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना त्यांनीच भारतात सर्वप्रथम पाचशे रुपयांच्या चलनी नोटा रद्द करून प्रस्थापितांना जोरदार धक्का दिला होता!!

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून त्यांनी १९४९ पर्यंत काम करून स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यानंतर इंग्लंड मध्ये स्थायिक होऊन आपल्या कुटुंबासोबत जीवन व्यतीत करावे ही त्यांची इच्छा होती. त्यांची प्रथम पत्नी रोझीना ही ब्रिटिश होती आणि त्यांना एकत्र संसार करण्याची फारशी संधी मिळाली नव्हती. त्यांना एक कन्यारत्न झाले, तिचे नाव ठेवले गेले प्रीमरोझ. तिला ते किकी या टोपण नावाने हाक मारत.

दुर्दैवाने त्यांच्या पत्नीचे १९४९ मध्येच निधन झाले आणि सी डी यांचे इंग्लंडला स्थायिक होण्याचे रद्द झाले.

दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुनर्निर्माणावर मूलभूत काम करण्यासाठी १९४४ साली 'ब्रेटन वूड्स' येथे जी जागतिक परिषद भरली होती त्यामध्ये सी डी यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यावेळी केनेशीयन अर्थव्यवस्थेचे जनक सर जॉन मेनार्ड केन्स या सारख्या महान अर्थतज्ञ व्यक्ती बरोबर त्यांनी काम केले आणि त्यांच्या त्या क्षेत्रातील ज्ञानाने त्यानी केन्स यांना प्रचंड प्रभावित केले.

या परिषदेचे जगाच्या दृष्टीने अतिशय महत्व होते, कारण या परिषदेत घेतलेल्या निर्णयांचा अतिशय दूरगामी परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि पर्यायाने सर्व देशांवर होणार होता. या परिषदेपूर्वी ब्रिटिश पाऊंड हे चलन जागतिक व्यापारातील सर्वात प्रभावी चलन होते. या परिषदेनंतर त्याची जागा अमेरिकन डॉलर घेणार होता. त्यांच्या विनिमयाच्या दरातील तफावतीचा फटका युरोप सहित अनेक देशांना बसणार होता. तसेच अमेरिकेला मात्र लाभ होणार होता. या सगळ्याचा मेळ घालून जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा नीट उभी राहील हे पाहणे महत्वाचे होते. ज्या देशांकडे डॉलरची गंगाजळी कमी होती त्यांची आयात आणि एकूणच अर्थव्यवस्था आक्रसणार होती.

त्याशिवाय जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणे निधी साठी मोठा निधी जमा करणे भाग होते. त्याचे संकलन आणि विनियोग याच्या अटी शर्ती ठरविणे होते. कल्पना करा या कामासाठी किती व्यामिश्र प्रज्ञा आवश्यक होती ! आणि केन्स सारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या अर्थतज्ञाला, जो त्यावेळी जर अर्थशास्त्रात नोबेल पारितोषिक असते तर त्याचा डोळे मिटून पहिला दावेदार असता.., त्याला प्रभावित करणे किती अशक्य कोटीतील होते हे लक्षात घ्या ! हे शिवधनुष्य सी डी यांनी पेलले आणि जागतिक अर्थतज्न व्यक्तींमध्ये केर्न्स यांच्या खालोखालचे स्थान पटकाविले. सी डी यांची प्रज्ञा किती उत्तुंग होती याचे हे उत्तम उदाहरण आहे !!

इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँकेची स्थापना याच परिषदेत झाली. त्यात सी डी यांचा बहुमोल वाटा होता. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे पाहिले संस्थापक अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक होण्यासाठी केन्स यांनी सी डी यांची शिफारस केली होती. त्या नंतर आजपर्यंत कोणीही युरोपियनेतर व्यक्ती त्याची अध्यक्ष झालेली नाही हे लक्षात घ्या.. परंतु सी डी यांनी हे पद चक्क नाकारले ! ते म्हणाले 'माझ्या देशाला माझी जास्त गरज आहे' !!

नंतर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक या दोन्ही आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या आणि महत्वाच्या संस्थांच्या संचालक मंडळावर संचालक म्हणून त्यांनी १९४६ ते १९५६ असे दहा वर्षे काम केले.

१९५० साली ते नियोजन मंडळाचे सदस्य बनले. आणि त्याच वर्षी पंजाब मधून राज्यसभेवर निवडून येऊन ते भारताचे अर्थमंत्री बनले.

स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून त्यांना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असतानाच विचारणा झाली होती, मात्र त्यांनी स्वतः सी राजगोपालाचारी किंवा गोपालस्वामी अय्यंगार यांची नावे सुचविली. अखेर मे १९५० मध्ये मात्र नेहेरूंच्या आग्रहाखातर त्यांनी स्वतंत्र भारताचे अर्थमंत्री पद स्वीकारले.

१९५२ साली पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी कुलाबा मतदार संघातुन, आजचा रायगड, अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा लढवून जिंकली. मात्र काँग्रेसची अधिकृत उमेदवारी घेतली नाही. राजकारण हे आपले ध्येय नाही हे बहुधा त्यांनी तेंव्हाच मनोमन ठरविले असावे !

अर्थमंत्रीपदी असताना त्यांनी केलेले आणि सर्वांच्या ध्यानात राहिलेले काम म्हणजे विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण. त्यातून एल आय सी ची स्थापना झाली आणि या त्यांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. तसेच इंपेरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण करून त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया या आजच्या सर्वात मोठ्या सरकारी बँकेची स्थापना केली !

परंतु याशिवाय देशाच्या अर्थव्यवस्थेचा ढाचा मजबूत पायावर उभा असावा म्हणून हा पाया ज्या पंचवार्षिक योजनांवर उभा आहे त्या पंचवार्षिक योजनांची दूरदृष्टीने आखणी करण्याचे महत्वाचे परंतु दुर्लक्षित असे काम सी डी यांनी केले आणि हे त्यांचे योगदान अविस्मरणीय असे आहे.

पहिल्या पंचवार्षिक योजनेत महत्वपूर्ण योगदान आणि दुसरी पंचवार्षिक योजना तर त्यांनी जवळपास एकहाती तयार केली.

अर्थशास्त्राच्या अभ्यासकांना आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या अभ्यासकांना दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे महत्व वेगळे सांगावयास नको. नेहरूंची समाजवादी विचारसरणी लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्राचा विलक्षण वेगाने विस्तार करून देशाच्या विकासाला एक निर्णायक दिशा देणारी ही पंचवार्षिक योजना नेहरूंची स्वप्नवत योजना म्हणून ओळखली जाते. परंतु तिचे खरे उद्गाते हे सी डी होते हे फारच थोड्या.. ते ही त्या क्षेत्रातील लोकांनाच माहीत होते ! स्वतः सी डी यांची मते ही भांडवलशाही आणि समाजवाद यांची योग्य सांगड घालण्याची होती.. नेहरूंच्या भोळ्या समाजवादावर ते फारसे भाळले नव्हते.. आणि त्यांनी सादर केलेल्या १९५२ ते १९५६ मधील पाच आणि एक हंगामी अशा सहाही अर्थसंकल्पांत त्याचे प्रतिबिंब दिसते. नॅशनल सॅम्पल सर्व्हे त्यांच्याच काळात सुरू झाला.

'समाजकल्याण' या शीर्षा खाली मागास जाती आणि अति दारिद्र्य सोसणाऱ्या जनतेसाठी अर्थसंकल्पात खास तरतूद सर्वप्रथम करणारे ते पहिले अर्थमंत्री. अर्थात यामागे तेंव्हा त्यांच्या पत्नी नसलेल्या परंतु काँग्रेस मधील तरुण आणि लढाऊ खासदार दुर्गाबाई यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न कारणीभूत होते हे मान्य केलेच पाहिजे. त्यांनी केंद्रीय सांख्यिकी संघटना ही संस्थाही आपल्या करकीर्दीतच स्थापन केली.

त्यांचे संस्कृत भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. शाकुंतलाचे मराठी मधून समश्लोकी समवृत्त केलेले भाषांतर हे आजही सर्वोत्तम मानले जाते. रवींद्रनाथांच्या कवितांचेही संस्कृत भाषांतर त्यांनी केले. स्वतःही संस्कृत मधून अनेक कविता केल्या. लोकसभेत एक आख्खी चर्चा त्यांनी आणि साम्यवादी नेते हिरेन मुखर्जी यांनी संस्कृत मध्ये घडवून आणली होती!! आज हे कल्पनातीत वाटते.. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात मधून मधून संस्कृत सुभाषिते पेरण्याची प्रथा त्यांनीच सुरू केली.

आपल्या अर्थमंत्री पदाच्या काळात पंडित नेहरू यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी पाच वेळा आपला राजीनामा पाठवून दिला होता पैकी चार वेळा विशिष्ट मुद्द्यांवर सहमती होऊन तो फेटाळला गेला आणि पाचव्या वेळेस अत्यन्त नाईलाजाने स्वीकारला गेला.

तात्विक मतभेद असले तरी नेहरू आणि सी डी यांचे अत्यन्त मैत्रीचे संबंध होते. दुर्गाबाई यांच्याबरोबर आपण विवाहबद्ध होत आहोत हे त्यांनी सर्वप्रथम नेहरुंना सांगितले, जे ऐकून नेहरूंनी आनंदाने उडीच मारली.. तेच सी डी यांच्या लग्नात करवले होते..आणि विवाह नोंदणीच्या वेळेस सही करणारे प्रथम साक्षीदार !!

१९५६ हा भाषावार प्रांतरचनेच्या जडण घडणीचा काळ होता. त्याला महाराष्ट्रातून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या रूपाने एक आव्हान दिले गेले होते. पंडित नेहरू हे मुंबई ही केंद्रशासित करण्याचा निर्णय झाला आहे असे मुंबईतील एका सार्वजनिक सभेत म्हणाले. हा निर्णय केंद्रीय कॅबिनेट मध्ये न घेता त्यांनी घेतला ही गोष्ट घटनाबाह्य आहे आणि म्हणून तो निर्णय रद्द झाला नाही तर मी राजीनामा देईन असे सी डी यांनी निक्षून सांगितले. नेहरू हे आपण म्हणजेच मंत्रिमंडळ या खाक्यात कारभार चालवीत हे सर्वश्रुत होते. त्यांना वाटले आपण सी डी यांना शांत करू. त्यांनी निर्णय मागे घेण्यास नकार दिला आणि सी डी यांनी तडकाफडकी आपला अर्थमंत्री पदाचा राजीनामा नेहरूंकडे पाठविला.

तो नेहरूंच्या टेबलाच्या खणात काही महिने पडून होता. जेणेकरून सी डी आज ना उद्या शांत होतील असा नेहरूंचा कयास होता, परंतु सी डी यांनी मी आता अर्थमंत्री म्हणून कामच करणार नाही, कार्यालयात जाणार नाही.. असा पवित्रा घेतल्यावर नेहरू यांनी नाईलाजाने तो स्वीकृत केला!

या राजीनाम्यावर भाष्य करताना लोकसभेत सी डी यांनी केलेले भाषण हे स्वाभिमान म्हणजे काय, तत्वपालन, त्याग, मोहाला बळी न पडणे म्हणजे काय याचे उत्तम उदाहरण होते. नेहरू यांना त्यांच्या तोंडावर हुकूमशहा, घटनाबाह्य निर्णय घेणारा पंतप्रधान आणि महाराष्ट्रद्वेष्टा म्हणण्याचे धाडस त्याकाळात.. ज्या काळात नेहरू म्हणजेच सरकार आणि लोकशाही अशी सर्वसाधारण मानसिकता होती..त्या काळात हे धाडस करणे ही गोष्ट किती मोठी होती याचा आपण फक्त विचार करू शकतो! त्या दिवसापासून सी डी हे मराठी अस्मितेचे प्रतीक बनले ते आज पर्यंत.

या वेळची आणखी एक आठवण सांगणे अपरिहार्य आहे. मंत्रिमंडळातील जेष्ठ सदस्य गोविंद वल्लभ पंत हे मूळचे मराठी. पेशवे काळात हे घराणे उत्तरप्रदेश मध्ये स्थलांतरित झालेले. सी डी यांच्या प्रक्षोभक भाषणात अडथळा आणून ते म्हणाले, 'शहाणपणा आणि बुद्धिमत्ता महाराष्ट्राला केंव्हाच सोडून गेली आहे' पंतांचा रोख स्वतःच्या घराण्याच्या इतिहासावर होता.. क्षणाचाही विलंब न लावता सी डी उत्तरले..'परंतु स्वाभिमान आणि सद्सद्विवेकबुद्धी मात्र अजूनही महाराष्ट्रात वस्तीला आहे'! महाराष्ट्राच्या खासदारांचा पक्षश्रेष्टींच्या दबावात राहण्याचा गुण तेंव्हापासूनचा आहे.. काँग्रेसच्या एखाद दोन खासदारांचा अपवाद वगळता कोणीही त्या भाषणात टाळ्या वाजविल्या नाहीत. सर्व लोकसभा सुन्न होऊन ते स्फोटक भाषण ऐकत होती. नेहरू खिन्नपणे खाली मान घालून डोके हलवीत होते !!

हाच मराठी बाणा हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल अनिल टिपणीस यांनी पाकिस्तानचे तात्कालीन अध्यक्ष मुशर्रफ यांना सॅल्युट करणे नाकारून पुढे काही दशकांनी जुलै २००१ मध्ये पुन्हा एकदा दाखविला..दोघेही चांद्रसेनीय कायस्थ हा ही एक योगायोग..

सी डी यांची दुसरी इनिंग इथून सुरू होते! त्यांच्या विद्वत्तेचे, द्रष्टेपणाचे, देशाला ज्यांचा अभिमान वाटावा आणि ज्या चिरकाल टिकतील अशा संस्था स्थापनेचा एक शिल्पकार म्हणून घडणारे हे दर्शन अधिकच विस्मयजनक ठरते.

सी डी यांचा राजकारण हा खरेतर विषयच नव्हता. ते एक ज्ञानयोगी आणि कर्मयोगी असे ज्ञानोपासक होते. शिकणे आणि शिकविणे हा त्यांचा पिंड होता आणि हे करताना समाजाला शिक्षित करून ते समाजोन्नत्तीचे कार्यच करीत होते. त्यामुळे मंत्रीमंडळातील राजीनाम्या नंतर त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आणि आपल्या आवडत्या क्षेत्राकडे ते वळले.

सी डी मंत्रिमंडळातून पायउतार होताच त्यावेळचे शिक्षण मंत्री अबुल कलम आझाद यांनी त्यांची शिफारस नव्याने स्थापन होऊ घातलेल्या युनिव्हर्सिटी ग्रँटस कमिशनचे पहिले अध्यक्ष म्हणून केली आणि नेहरूंनी ती तात्काळ मान्य केली. देशाच्या उच्चशिक्षणाचा पाया घालणाऱ्या या यु जी सी किंवा विद्यापीठ अनुदान आयोगाचे पाहिले अध्यक्ष म्हणून १९५६ ते १९६१ या कालावधीत काम करताना त्यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या व्यवस्थापनाचा, नीतीचा आणि दूरदर्शी धोरणांचा पाया घातला, ज्यावर आजची महाविद्यालये आणि विद्यापीठे उभी आहेत हे सत्य आहे. हे करताना यु जी सी कडून त्यांनी मासिक एक रुपया एवढे मानधन घेतले !!

त्यानंतर १९६२ पासून दहा वर्षे दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी काम पाहिले.

१९५२ साली केम्ब्रिज विद्यापीठाने त्यांना मानद सभासदत्व दिले. प्रिस्टन, लेस्टर, पुणे, दिल्ली, नागपूर, अलाहाबाद, उस्मानिया इत्यादी विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट दिली.

१९५९ साली त्यांना रॅमन मॅगेसेसे अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.

एकूण ३४ विविध संस्थांमध्ये ते सक्रिय होते. पैकी इंडिया इंटरनॅशनल सेंटर, नॅशनल बुक ट्रस्ट, रोझ सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय फलोत्पादक संघ यांचे ते संस्थापक अध्यक्ष होते. भारतातील सर्वोच्च प्रशासन संस्था असलेल्या हैदराबाद येथील भारतीय सार्वजनिक प्रशासन संस्थेचे ते १९५१ ते १९६७ अशी १५ वर्षे अध्यक्ष होते... भारतीय सांख्यिकी संस्थेचे ते १९४५ पासून दोन दशके अध्यक्ष होते!

१९७५ मध्ये त्यांना पद्मविभूषण या दुसऱ्या क्रमांकाच्या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्यांना बागकामातही विलक्षण रुची आणि गती होती. वनस्पती शास्त्रात त्यांनी पदवी घेतली हे त्याचे कारण असावे! आपल्या हैदराबाद येथील रचना या बंगल्यात, पुण्याच्या योजना बंगल्यात, इंग्लंड मधील रोहा या घरी तसेच आपल्या १ विलिंग्डन क्रिसेंट या दिल्लीतील मंत्रिपदाच्या काळातील बंगल्यात त्यांनी निर्माण केलेल्या बागा या फार सुंदर आहेत. हैद्राबाद येथील डी डी कॉलनीतील रचना बंगल्यात तर विद्यापीठातील बॉटनीचे विद्यार्थी नियमित भेट देत असतात. त्याच बरोबर नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया इंटरनॅशनल सेंटर या त्यांनी स्थापन केलेल्या जागतिक दर्जाच्या संस्थांच्या आवारातील बगीचे हे सी डी यांनी जागतिक दर्जाचे निर्माण करून घेतले आहेत. आजही त्या संस्थांचे फोटो पाहिले तर त्यांची संरचना आणि परिसर किती सुंदर आहे याची प्रचिती येते !

या माणसाचे कर्तृत्व केवळ अफाट म्हणावे असेच आहे. ते एका लेखात बसण्याची शक्यता नाहीच. तरीही आजच्या पिढीला सी डी कळावेत म्हणून केलेला हा लेखन प्रपंच आहे..

दोन ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी भारतमातेचा हा सुपुत्र स्वर्गवासी झाला आणि दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या इतिहासाचा एक चालता बोलता साक्षीदार पडद्याआड गेला.

आज त्यांच्या या अफाट कर्तृत्वाचा आवाका पाहिला की अचंबित व्हायला होते. त्यांचे यथोचित स्मारक वगैरे व्हावे अशा मागण्या होतीलही. परंतु त्यांनी निर्माण केलेल्या असंख्य संस्था हेच त्यांचे चिरस्मारक असणार आहे.

एक खंत मात्र जरूर वाटते..आज कोणीही उठून अमुक तमुक यांना भारतरत्न द्या म्हणून मागणी करतो आणि तसे ते दिलेही जाते !!

ज्याने आपल्या प्रगाढ विद्वत्तेचा आपल्या देशासाठीच उपयोग केला आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणे निधी सारख्या बलाढ्य संस्थेचे संस्थापक अध्यक्षपदही नाकारले त्या अर्थयोग्याला त्याच्या जन्माच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानंतर तरी भारत सरकारने मरणोत्तर 'भारत रत्न' हा किताब द्यावा ही अपेक्षा व्यक्त करणे चुकीचे होणार नाही !!
..सुनील कुळकर्णी, तळे
२ ऑक्टोबर २१/२२/ १४ जानेवारी २३/ १४ जानेवारी २६

07/03/2026

आज डॉ. विनय देशमुख यांचा जन्मदिन. डॉ. विनय हे आमच्या तळ्याचे सुपुत्र. तळ्यातील यू पी एस सी ची परीक्षा पास होणारे पहिले आणि एकमेव व्यक्ती. त्यांच्या विषयी लिहिलेला हा लेख आज त्यांच्या जन्मदिना निमित्त..

गोष्ट आहे ऑगस्ट दोन हजार तेराची. दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर उत्साहात सुरू होते. अचानक काही भाविक माशांच्या दंशाने जखमी होऊ लागले. त्यांना तेथे असलेल्या स्वयंसेवक व पोलिसांच्या मदतीने जवळच्या इस्पितळात दाखल केले जाऊ लागले. जवळपास छपन्न भाविक या दंशाने प्रभावित झाले. सगळीकडे एक प्रकारचे भीतीचे वातावरण तयार झाले. सर्व टीव्ही चॅनेलना एक ब्रेकिंग न्यूज मिळाली. बातमी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. मुख्यमंत्री कार्यालय तत्परतेने कामाला लागले.

मंत्रालयाच्या मुख्य दरवाजात एक घरंदाज दिसणारी परंतू हाफ पॅन्ट, टी शर्ट आणि पायात पाण्यात चालतील असे रबरी बूट घालून एक मध्यमवयीन व्यक्ती उभी होती. त्या व्यक्तीला मुख्यमंत्र्यांची तातडीने भेट हवी होती! साशंकतेनेच दरवाज्यावरच्या पहारेकरी पोलिसांनी त्यांना सहाव्या मजल्यावर सोडले. तेथेही तेच.. दारा वरील पोलीस त्यांना आत सोडेना. मुख्यमंत्री इतर मंत्र्यांबरोबर आपत्कालीक बैठकीत आहेत थांबावे लागेल असे तो सांगू लागला. त्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांना फोन लावला. ताबडतोब त्यांना आत सोडण्यात आले. आपला फोन आला तेंव्हा मी समुद्रातच गेलो होतो. तातडीने बोलावल्याने मला अशा वेशात यावे लागले असे त्या व्यक्तीने सांगितले.

मुख्यमंत्री आणि इतर उपस्थित मंत्र्यांना त्यांनी गिरगाव चौपाटीवर काय, कसे आणि कोणामुळे हे घडले असावे याचे विस्तृत विवेचन केले. जेलिफिश असे ज्यांना म्हटले जाते ते हे अपृष्ठवंशीय प्राणी असतात आणि प्रवाहाबरोबर ते असे वाहून येऊ शकतात आणि त्यांच्या दंशाने मनुष्य हानीची शक्यता नाही हे त्यांनी समजावून सांगितले.

मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि लगेच मुख्यमंत्री टीव्ही चॅनेल समोर बाईट द्यायला उत्साहाने निघाले!!

ही व्यक्ती म्हणजे केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन केंद्र (सी एम एफ आर आय) या संस्थेतील वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. विनय देशमुख ही होती.

आज ते आपल्यात नाहीत. एकोणीस जून वीस रोजी वयाच्या अडूसष्ठव्या वर्षी हृदय विकाराच्या धक्क्याने त्यांचे मुंबई येथे आकस्मिक निधन झाले. हे काही जाण्याचे वय नव्हते. महाराष्ट्र एका अत्यन्त अभ्यासू, उमद्या वैज्ञानिकास मुकला.

सागरी मत्स्यविज्ञान क्षेत्रात डॉ. विनय यांचे नाव अत्यन्त आदराने घेतले जाते. दोन हजार पंधरा सोळा मध्ये महाराष्ट्र सरकारने पर्ससीन नेट मासेमारी सद्यस्थिती आणि उपाय या विषयावर डॉ. सोमवंशी आणि डॉ. विनय देशमुख यांची द्वि सदस्यीय समिती नेमली. महाराष्ट्रात एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून ही पर्ससीन नेट मासेमारी चालू आहे. मूलतः त्यांना खोल समुद्रात मासेमारीची परवानगी होती, परंतू या पर्ससीन नेट मासेमारी करणाऱ्या बोटी थेट किनाऱ्याजवळ मासेमारी करू लागल्या आणि पारंपरिक मासेमारांवर उपासमारीची वेळ आली. मच्छीमारांच्या अनेक आंदोलनानंतर सरकारने ही द्विसदस्यीय समिती नेमली.

डॉ. देशमुख व डॉ. सोमवंशी यांनी प्रचंड मेहेनत घेऊन आपला अहवाल सरकारला सादर केला, त्यात या पर्स सीन नेट मासेमारी करणाऱ्या बोटींची संख्या तात्काळ ४९४ वरून १८२ वर आणावी आणि त्यांना खोल समुद्रातच मासेमारी करण्याची परवानगी द्यावी अन्यथा त्यांची परवानगी तात्काळ रद्द करण्याची शिफारस केली. किनाऱ्या पासून तेरा नॉटिकल माईल्स पर्यंतचा समुद्री पट्टा हा पारंपरिक मासेमारीसाठी राखीव ठेवला. महाराष्ट्रातील मासेमारी करणाऱ्या सात जिल्ह्यातील ७२० किलोमीटर च्या किनाऱ्यावरील ४५६ गावांतील मच्छीमार या शिफारशींमुळे डॉ. विनय देशमुख यांचे कायम ऋणी राहतील.

डॉ. विनय देशमुख यांनी एम एस सी नंतर केंद्र सरकारच्या (UPSC) परिक्षांद्वारे आय ए एस दर्जाची परीक्षा देऊन केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन केंद्र (सी एम एफ आर आय) या संस्थेत वैज्ञानिक म्हणून प्रवेश मिळविला. त्यांनी डॉक्टरेट ही मिळविली. त्यांच्या नावावर ३९ रिसर्च पेपर्स आहेत. यांत्रिक बोटींची मासेमारी यावर त्यांनी सखोल संशोधन केले आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील मौसमी पाऊस आणि त्याचा मत्स्य उत्पादनावरील परिणाम यावरचा त्यांचा मराठीतील लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे. कोळंबी आणि झिंगे यांच्या सम्पूर्ण जीवनचक्राबद्दलचे त्यांचे पेपर्स आजही अभ्यासले जातात. निवृत्ती नंतर केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन केंद्र (सी एम एफ आर आय) येथे फॅकल्टी मेम्बर म्हणूनही त्यांनी काम पाहिले तसेच समुद्राशी संलग्न असलेल्या विषयात काम करणाऱ्या अनेक सार्वजनिक आणि खासगी उपक्रमांचे मानद सल्लागार म्हणूनही ते काम पहात होते.

साध्या पारंपरिक मच्छीमार बोटींना जवळपास शंभर भाग असतात आणि त्यांची सर्व नावे त्यांच्या बोटीतील जागांसह त्यांना पाठ होती. कोळी समाजातील कोणताही पुढारी किंवा नेता किंवा अगदी सामान्य कोळी त्यांचे हे ज्ञान पाहून थक्क होत असे, आणि निःशंक पणे त्यांचे मार्गदर्शन घेत असे. त्यांनी महाराष्ट्र टाइम्स सारख्या प्रख्यात दैनिकात अनेक लेख लिहिले. टीव्ही वर बाईट्स दिल्या. आपल्याला असलेली माहिती हातची राखून न ठेवता तिचा उपयोग व्हावा म्हणून ती सढळ हस्ते वाटणारा हा खरा लोकांचा आपला वैज्ञानिक होता!

रविवारी पिशवी घेऊन दादर फिश मार्केटला त्यांची हमखास हजेरी असायची. नुसती मासे खरेदी हा उद्देश नसायचा तर कोळणींबरोबर माशांची उपलब्धता, सध्या कोणत्या जातीचे मासे कमी किंवा जास्त मिळतात त्याबाबत कोळी बांधवांचे काय मत आहे, इतर काही प्रश्न आहेत का अशा अनेक गोष्टींचा या रविवार दौऱ्यात उहापोह व्हायचा. महाराष्ट्रातील मासेमारी करणाऱ्या सर्व चारशे छपन्न खेड्यांना त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली होती. कोळी बांधवांशी चर्चा केल्या होत्या. वातानुकूलित खोलीत बसून हातात आलेल्या माहितीवर विश्वास ठेवून निष्कर्ष काढणारा तो वैज्ञानिक नव्हता तर फिल्ड वर्क करून कोळी बांधवांच्या पारंपरिक ज्ञानाला सुद्धा तपासून घेऊन आपल्या रिसर्च मध्ये स्थान देणारा हा जमिनीशी घट्ट नाते असलेला वैज्ञानिक होता.

त्यांचे गाव तळे. दर सुट्टीत ते तळ्याला असणारच. गणपतीला निदान एक दिवस तरी ते येणारच. निवृत्ती नंतर त्यांचे तळे येथील येणे जाणे वाढले होते. आम्हाला त्यांचा सहवास मिळत होता. त्यांच्याकडून मत्स्यविज्ञान या विषयाची माहिती आम्ही अधाशासरखी ऐकत होतो.

अत्यंत साधा माणूस. एक हाफ शर्ट आणि खाली पायजमा अशा वेशात हा माणूस तळ्याच्या रस्त्यावर फिरत असायचा. मितभाषी स्वभाव .. त्यामुळे कोणालाही त्याने आपले मोठेपण स्वतःहून सांगितले नाही. त्यांच्या साध्या राहाणीमुळे कोणालाही ते कळणे शक्यच नव्हते!

तळे येथील अनेक लोकांना ते या लेखामुळे कदाचित कळेलही. परंतू आता खूप उशीर झालाय... खूपच उशीर झालाय!!

या उच्च विद्या विभूषित आणि वाचनाची प्रचंड आवड असलेल्या आमच्या लाडक्या व्यक्तिमत्वाची कायम स्वरुपी आठवण म्हणून आता त्यांच्या नावाचे वाचनालय तळे येथे सुरू झाले आहे. त्या वाचनालयाला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा..त्याचा पुरेपूर वापर करावा हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
.....सुनील कुळकर्णी, तळे, पुणे
५ जानेवारी २६

Address

Flat No. 2, Priyadarshani Apt, Samarth Colony
Jalgaon
425001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when pune ckp community posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share