22/04/2026
रोटरी जळगावतर्फे पर्यावरण संवर्धनासाठी नन्नवरे, डॉ. महाजन, वाणी, राणे, फालक यांचा गौरव
येथील रोटरी क्लब जळगावतर्फे पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शहरातील पाच मान्यवरांचा सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला. गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर रोटरी क्लब बडोदा ग्रीनचे प्रेसिडेंट इलेक्ट कौस्तुभ गोखले यांची प्रमुख अतिथी व वक्ते म्हणून तर सहप्रांतपाल डॉ. अपर्णा भट - कासार, प्रेसिडेंट एन्क्लेव्ह जितेंद्र ढाके, अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, मानद सचिव सुभाष अमळनेरकर यांची विशेष उपस्थिती होती.
रोटरी कॅलेंडरप्रमाणे असलेल्या पर्यावरण महिन्यानिमित्त समर्पण संस्था व पर्यावरण शाळेचे संस्थापक राजेंद्र नन्नवरे, आर्यन फाऊंडेशनच्या डॉ. रेखा महाजन, ग्रीन सिटी फाऊंडेशनचे विजय वाणी, वनविभागाचे सेवानिवृत्त अधिकारी राजेंद्र राणे, वन्यजीव संरक्षक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक यांचा कौस्तुभ गोखले यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते कौस्तुभ गोखले यांनी रोटरी क्लब बडोदा ग्रीन या पर्यावरणाला समर्पित असलेल्या क्लबने केलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
क्लबने गावे दत्तक घेऊन सीएसआरच्या माध्यमातून पर्यावरण व वेस्ट मॅनेजमेंट विषयी ग्रामस्थांना प्रशिक्षण देत सहभागी करून घेतल्याचे सांगितले. मीयावाकी जंगल, चौपाल कॅफे, इको फर्निचर या नवीन संकल्पनाबद्दल देखील त्यांनी माहिती दिली. शाळेतील विद्यार्थी व नागरिकांसाठी स्पर्धा आयोजित करून अवघ्या अडीच तासात ६५० किलोपेक्षा जास्त ई - वेस्ट मटेरियल संकलित केल्याचे गोखले यांनी सांगितले.
त्यांच्या क्लबने केलेल्या काही उपक्रमांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मध्ये दखल घेतली आहे. आपल्या छोट्याशा कृतीतूनही पर्यावरणासाठी मोठी मदत होत असते असे त्यांनी शेवटी सांगितले. आभार प्रदर्शन सुभाष अमळनेरकर यांनी केले. कार्यक्रमास रोटरी इलाईटचे अध्यक्ष संदीप झंवर, रोटरी स्टार्सचे अध्यक्ष विपुल पटेल, रोटरी ग्रीन सिटीचे अध्यक्ष धनश्री ठाकरे यांच्यासह विविध रोटरी क्लबचे अध्यक्ष, सचिव व पर्यावरण समिती प्रमुख तसेच रोटरीचे डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स यांची उपस्थिती होती.