26/08/2025
धन्यवाद दैनिक दिलासा …🙏🏻
कोण होणार गंगाखेडची सुपर वूमन स्पर्धेत सौ. सुवर्णमाला मोतीपवळे प्रथम :
भोलारामजी कांकरिया बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजन : सौ. श्रद्धा बोरफळकर द्वितीय
परभणी,दि.26(प्रतिनिधी) : भोलारामजी कांकरिया बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट गंगाखेड यांच्यावतीने आयोजित केलेल्या ‘कोण होणार गंगाखेडची सुपर वुमन’ या स्पर्धेत सौ. सुवर्णमाला मोतीपवळे यांनी मानाचा किताब मिळाला, तर सौ. श्रद्धा बोरफळकर या उपविजेत्या ठरल्या.
भोलारामजी कांकरिया बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गंगाखेडात सोमवारी (दि.25) महिलांसाठी ‘कोण होणार गंगाखेडची सुपर वूमन?’ ही भव्य आणि ऐतिहासिक स्पर्धा आयोजित करण्यात आली. महिलांना व्यासपीठ मिळवून द्यावे, त्यांच्यातील कलागुण, विचारसंपदा, आत्मविश्वास, ऐतिहासिक व सामाजिक जाणीव जनतेपर्यंत पोहोचाव्यात या प्रमुख उद्देशाने संयोजन समितीने ही स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी परिक्षक म्हणून चित्रपट दिग्दर्शक गोपी मुंडे, एपीआय सौ. दीपाली गित्ते व सौ. ज्योती मुदगलकर यांनी परीक्षकांची जबाबदारी पार पाडली. परीक्षकांनी केवळ व्यक्तिमत्त्व सादरीकरण नव्हे तर स्पर्धकांचे सामान्य ज्ञान व प्रश्नोत्तर यावरूनही परीक्षण केले.
या स्पर्धेत गंगाखेड व परिसरातील तब्बल 25 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध ऐतिहासिक आणि देवीस्वरूप व्यक्तिमत्त्वांचे रूप साकारले. सावित्रीबाई फुले, राजमाता जिजामाता, राणी पद्मावती, सुनीता विलियम्स, जनाबाई, हिरकणी, काली माता, लता मंगेशकर अशा अजरामर व्यक्तिमत्त्वांची आणि देवीस्वरूपांची जिवंत झलक प्रेक्षकांसमोर उभी करण्यात आली. प्रत्येक सादरीकरणाने प्रेक्षकांना थक्क केले, तर महिलांच्या आत्मविश्वासाने सभागृह दणाणून गेले.
स्पर्धेत केवळ अभिनय आणि वेशभूषाच नव्हे, तर परीक्षकांनी स्पर्धकांचे सामान्य ज्ञान व प्रश्नोत्तरे घेऊन त्यांच्या बौद्धिक क्षमतेचीही कसोटी पाहिली. यामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. याशिवाय प्रेक्षकांसाठीही क्विझ कॉन्टेस्ट आणि ‘लकी ड्रॉ’ चे आयोजन करण्यात आले होते. यात महिलांनी आणि उपस्थित नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यामुळे कार्यक्रमात केवळ स्पर्धकच नव्हे, तर प्रत्येक प्रेक्षक हसतमुख आणि सहभागी राहिला.
या भव्य स्पर्धेत विजेती म्हणून सौ. सुवर्णमाला मोतीपवळे यांना मानाचा किताब मिळाला, तर उपविजेती सौ. श्रद्धा बोरफळकर ठरल्या. विजेत्या स्पर्धकांना उमदेवर, पैठणी, ट्रॉफी, सन्मानपत्र आणि भरघोस बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, सर्व सहभागी महिलांना सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन त्यांच्या योगदानाला दाद देण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन पूजा दर्डा यांनी केले. या उपक्रमाचे मुख्य आयोजन बी.के.बी.सी. ट्रस्टच्या सचिव सौ. मंजुताई दर्डा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. मंगल अच्छा, सिद्धार्थ दर्डा, शुभम अच्छा, ऋषभ दर्डा, अमर करंडे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास महिला वर्गाने प्रचंड प्रतिसाद दिला. गंगाखेड आणि आसपासच्या भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या. या उपक्रमामुळे महिलांना स्वतःची ओळख निर्माण करण्याची, आत्मविश्वासाने स्वतःला मांडण्याची आणि समाजात प्रेरणादायी ठरण्याची संधी मिळाली.
दरम्यान, बी.के.बी.सी. ट्रस्टचे पदाधिकारी म्हणाले की, अशा उपक्रमांतून स्त्रियांना त्यांची प्रतिभा सादर करण्याची संधी मिळते. स्त्री हीच खरी युगनिर्माती आहे. तिच्यातील सामर्थ्य व संस्कार पुढच्या पिढ्यांचे भविष्य घडवतात. त्यामुळे स्त्रियांच्या प्रत्येक योगदानाला मान देणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे, असे यावेळी सांगण्यात आले. या भव्य उपक्रमामुळे गंगाखेडमध्ये स्त्रीशक्तीचा एक अद्वितीय सोहळा अनुभवायला मिळाला. कोण होणार गंगाखेडची सुपर वूमन? या स्पर्धेने प्रत्येक महिलेला अंतःकरणातून स्पर्श केला व समाजमनावर एक अविस्मरणीय ठसा उमटवला.