31/08/2025
सपोर्ट ग्रुप सेशन
दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत, आपल्या, स्व. देवचंद कांबळे फाऊंडेशन आणि माईंड गार्डिअन यांच्या संयुक्त विद्यमाने सपोर्ट ग्रुप सेशन, हा उपक्रम खूप चांगल्या प्रकारे संपन्न झाला.
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मानसिक आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त उपक्रमांची गरज लक्षात घेऊन, सदर उपक्रम प्रथमच आयोजित केला होता.
यावेळी माईंड गार्डिअन तर्फे सायकॉलॉजिस्ट व थेरपिस्ट सिद्धी देशपांडे यांनी सपोर्ट ग्रुप सेशन बाबत माहिती दिली व संचालन केले. सर्वांची औपचारिक ओळख झाल्यावर, सिद्धी यांनी चर्चेसाठी नातेसंबंध (relationships) असा विषय सुचविला, ज्यावर एकमत होऊन लगेचच चर्चेला सुरुवात झाली.
विद्यार्थी तसेच आयटी, फोटोग्राफी, एच आर, वकीली यांसारख्या विविध क्षेत्रातील आणि २० ते ५२ च्या वयोगटातील, एकूण ११ जण यावेळी चर्चेत सहभागी झाले होते. असे असूनही प्रत्येकाने आपली मते अतिशय मुद्देसूद मांडून चर्चेत सहभाग घेतला. सत्राची वेळ दीड तास घोषित केली होती तरी, दोन तास सहज गेले.
सत्राच्या शेवटी प्रत्येकाने, इतरांकडून, नातेसंबंधांबाबतचे नवे दृष्टिकोन समजले, अशी प्रतिक्रिया दिली. पुढील सपोर्ट ग्रुप सेशन मधे सहभागी होण्यास आवडेल, असेही मत प्रत्येकाने व्यक्त केले. या ११ पैकी ६ जणांनी अश्या प्रकारच्या सत्रात पहिल्यांदाच सहभागी झाल्याचे आवर्जून सांगितले. ‘एकमेकांना आपुलकीने व सहानुभूतिपूर्वक ऐकून किंवा खूप काही न बोलता, आपण एकमेकांना फक्त उपस्थित राहूनही धीर देऊ शकतो’, असेही या सपोर्ट सेशनच्या माध्यमातून काहींनी अनुभवले.
सिद्धी यांनी सत्र संपल्याचे व वेगळा विषय घेऊन लवकरच पुनः भेटू, असे सांगून सत्राची सांगता केली.