08/03/2026
सातपुड्यातलं युवा संवाद शिबीर...
जल जंगल जमिनीशी तादात्म्य पावलेल्या लोकांशी संवाद...
सातपुड्यात नर्मदा नदीच्या काठावर , धडगाव तालुक्यातील अति दुर्गम असलेल्या उडद्या पाड्यात यंग फॉउंडेशन च्या माध्यमातून युवा संवाद शिबिराचे आयोजन करण्यात आले....
शिबिर म्हटले की ,बौध्दिक विषय ,तज्ज्ञ वक्ते ,मिनीट टू मिनीट वेळेचे नियोजन ,वेळेनुसार सर्व बाबी करणे असे बरेच काही ठरलेले असते . सातपुड्यात मात्र यंग फाऊंडेशनच्या शिबिरात या सर्व गोष्टींना फाटा दिला जातो . आम्ही कोणत्याही वक्त्याला बोलवत नाही ,एखाद्या वक्त्याला बोलवलच तर त्याला शिबिरातील युंवाचे म्हणणे ऐकण्यासाठी बोलवतो . शिबिराचे वेळापत्रक नसते , कडक नियम नसतात . स्थानिक लोकच साधन व्यक्ती म्हणून शिबिरार्थींशी संवाद साधायला येतात. आदिवासी भागातील दुर्गम पाड्यावर पायी चालत भेट देणं , पाड्यातील लोकांशी संवाद साधत तेथील संस्कृती ,समस्या ,त्यांचे जगणे असे बरेच काही अनुभवत ,निरिक्षण करत व सर्वांनी आपले अनुभव मांडत चर्चा करत ,सर्व समजुन घेतले जाते. शिबिरात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील युवा आलेले असतात त्यांना ऐकमेकांशी बोलायला पाड्यात, जंगलात फिरताना वेळही मिळतो. शिबिरात कोणालाही काही सांगायची वेळ येत नाही आपापली कामे आटोपून सर्वजण अनुभवकथन करायला एकत्र येतात.महाराष्ट्रभरातील 25जणांनी या शिबिरात सहभाग नोंदवला.
सातपुड्याच्या दुर्गम भागात ,मध्यप्रदेश सिमेवरील नर्मदा नदीच्या काठावर उदड्या पाड्यात,अत्यंत तुटपुंजे संसाधने ,पुरेशा सोईसुविधा नसलेल्या या भागात नेटवर्क व वीज नसतांना शिबिरार्थींनी पाच दिवस एक वेगळाच अनुभव घेतला .रस्ते ,वीज , नेटवर्क , पुरेसे पाणी नसलेल्या खापरमाळ, उडद्या,सादरी या पाडयांना शिबिरार्थींनी चार कि.मी .पायी चालत भेट दिली . अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत मुलभुत सोईसुविधा नसतांनाही ,कसेबसे जगणारे आदिवासी बघून , दुर्गम भागातील दाहक परिस्थिती अनुभवली .निसर्गपुजक असलेल्या आदिवासींचा कोणताही धर्म नाही ,ते जल- जंगल - जमिनीची पुजा करतात , निसर्ग देवतेला छताची गरज नसते , जंगलातील प्राणी ,झाडे, दगड ,डोंगर आदिंची पुजा करुन पारंपारीक सण उत्सव साजरा केले जातात , लग्न पध्दती ,पारंपारीक शेती , वनऔषधी असे बरेच काही उडद्या पाड्यातील आदिवासी बांधवानी गप्पागोष्टी करत सांगीतले. उडद्या ते नर्मदा नदी काठावरील सादरी पाड्यात पायी चालत व पौर्णिमेच्या रात्री नदीतून बोटीने प्रवास करत , जल जंगल जमीनीची माहीती घेत सातपुड्याचा कणखर पणाही शिबिरार्थींनी अनुभवला. नर्मदेत डुबकी मारत सर्व सीमारेशांना तिलांजली देत निर्मळपणे वाहणाऱ्या नदीची ऊर्जा सर्वच जणांनी अनुभवली.
आदिवासींचे प्रश्न ,समस्या या सोबतच त्यांची संस्कृती समजुन घेण्यासाठी चार दिवसांचे शिबिर पुरेसे ठरत नाही , म्हणून सातपुड्यात शिबिर संपल्यानंतरही अनेक जण येत राहतात. जे शिबिरात येऊ शकले नाहीत पण ज्यांना सातपुड्यात यायचे असेल ते कधीही येऊ शकतात . आपले स्वागतच असेल . शहरी शिक्षित वर्गाने जल- जंगल - जमिनीशी तादात्म पावलेल्या आदिवासींशी संवाद साधत ,त्यांच्याकडून खूप काही शिकून घेत ,सर्व सीमा रेषांना तिलांजली देत नितळपणे वाहणाऱ्या नदीकडून ऊर्जा घेत जगणं समृद्ध करावं इतकच !!सातपुड्यात जरुर या!- - संदिप देवरे