20/07/2026
"देणाऱ्याचे हात हजारो.. दुबळी माझी झोळी..!
: देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या कारभारावर नागरिकांचा सवाल
_शब्दांकन: आप्पासाहेब भिमराज ढूस, देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर_
१९५४ मध्ये ग.दि. माडगूळकरांनी 'सीमा' चित्रपटासाठी लिहिलेल्या गीतातील ओळ आहे:
"पोटापुरता पसा पाहिजे.. नको पिकाया पोळी.. देणाऱ्याचे हात हजारो.. दुबळी माझी झोळी."
देणारा मोठा आहे, पण घेणारा मात्र हतबल आहे, हेच या ओळींचे मर्म. गेल्या काही दिवसांत देवळाली प्रवरा नगरपरिषदेत घडणाऱ्या घटनांनंतर हीच ओळ वारंवार आठवते.
महाविकास आघाडीच्या वतीने नुकतेच नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात "विकासासाठी भीक मांगो आंदोलन" करण्यात आले. या आंदोलनात मांडण्यात आलेल्या मुद्द्यांमुळे शहरातील मूलभूत प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.
१. आषाढी वारीच्या वेळी पाणीटंचाई आणि प्रशासनाचे मौन..
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या लहान-मोठ्या नऊ दिंड्या राहुरी फॅक्टरी परिसरात मुक्कामी होत्या. शनिवारचा दिवस म्हणजे गावचा आठवडे बाजार आणि महावितरणचा लोडशेडिंगचा दिवस. नेमके त्याच दिवशी नगरपरिषदेने "कोरडा दिवस" पाळला.
परिणाम: घरातील लोकांसाठी पाणी नव्हते, वारकऱ्यांसाठी पाणी नव्हते, शौचालयासाठीही पाणी शिल्लक राहिले नाही. नागरिकांसह आम्ही तातडीने मुख्याधिकाऱ्यांना आणि नगराध्यक्षांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. अखेर एक तास वाट पाहून परिस्थितीचे फेसबुक लाईव्ह करण्यात आले.
याची दखल घेऊन राहुरी नगरपरिषदेने अर्ध्या तासात टँकर पाठवून दोन दिवस पाणीपुरवठा केला. मात्र याबद्दल आभार मानण्या ऐवजी देवळाली प्रवरा नगराध्यक्षांनी तब्बल आठ दिवसांनी सोशल मीडियावर "आम्ही पारनेर पर्यंत पाणी देतो" असे स्पष्टीकरण दिले. "टँकर बुक होते, दिंड्यांनी स्वतःचे टँकर ठेवायला हवेत" असेही त्यांनी म्हटले.
प्रश्न असा आहे: पाणीपट्टी १८०० रुपयांवरून ३००० रुपये केली असताना पूर्ण वेळ, पूर्ण दाबाने पाणी देण्याची जबाबदारी कुणाची?
२. विकासकामांना ब्रेक: क्रीडा संकुलाचा प्रस्ताव फेटाळला..
राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजित दादा पवार यांच्या स्मरणार्थ शहरात भव्य क्रीडा संकुल उभारण्याची मागणी श्रद्धांजली सभेत आम्ही केली. ग्राम सुधारणा मंडळाने जागा द्यावी.. आणि, नगरपरिषदेने उभारणी करावी, निधीसाठी धावपळ आम्ही करू, असे लेखी आश्वासनही देण्यात आले. नागरिकांनी एकमुखी पाठिंबाही दिला.
प्रस्ताव होता: कारवाडी जवळील पिण्याच्या पाण्याचा नगरपरिषदेचा बंद पडलेला तलाव, जी गावची जागा ग्राम सुधारणा मंडळाच्या ताब्यात आहे, तिथे क्रीडा संकुल. त्यासाठी नगरपरिषदेच्या डिपी प्लॅन मधील "पाण्याचे टॅंक" आरक्षण "क्रीडा संकुल" मध्ये बदलण्याची विनंती नगराध्यक्षांनी फेटाळून लावली. त्यामुळे दादांच्या नावाने केलेल्या प्रेमाबद्दलच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
३. मूलभूत सुविधा रखडल्या..
रस्ते आणि चिखल: नुकत्याच झालेल्या पावसामुळे प्रसादनगर भागात रस्त्यावर पाणी आणि चिखल साचला. मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांना याबत कळवूनही "आर्थिक परिस्थिती बेताची आहे" असे उत्तर मिळाले. "आम्ही मुरूम आणतो, तुम्ही फक्त जेसीबी आणि ट्रॅक्टर द्या" हा आमचा पर्यायही अध्यक्षांकडून नाकारला गेला.
सार्वजनिक शौचालय: प्रसादनगर मधील सार्वजनिक शौचालयासाठी जानेवारीत आमचे आंदोलन झाले. निधी उपलब्ध झाला, लेखी आश्वासनही मिळाले. तरीही निविदा वारंवार नामंजूर करून गेल्या सहा महिन्यांपासून शौचालय बंद आहे. एकीकडे शौचालय बंद आणि दुसरीकडे उघड्यावर बसण्यास मनाई. नागरिकांनी जायचे कुठे?
स्मारक आणि जागा: प्रसादनगर येथील एकर दगडखान जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी आम्ही लेखी मागणी करूनही कोणतीही प्रतिक्रिया नाही.
४. निधी असूनही कामे अडवणूक?
1. सोलर लाईट: आमदार हेमंत ओगले यांनी प्रभाग २, ४ आणि ७ साठी दलित वस्ती सुधार योजनेतून सुमारे एक कोटींचा निधी दिला. मात्र निविदा वारंवार पुढे ढकलून अद्याप लाईट बसवण्यात आलेल्या नाहीत.
2. रस्ता मजबुतीकरण: विधान परिषद सदस्य प्राजक्ता तनपुरे यांच्या निधीतून नगर-मनमाड महामार्ग ते साई मंदिर ते दळे-वरखडे वस्ती रस्त्यासाठी निधी मागितला आहे.
3. ८ एकर जागा: माजी मंत्री आमदार बच्चू कडू अक्षय कर्डिले, हेमंत ओगले, आणि नगरसेविका पल्लवी ढूस यांच्या पुढाकाराने आम्ही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे ६०-७० वर्षांपासून बंद असलेली प्रसादनगर मधील ८ एकर दगडखान जागा क्रीडा संकुल, घरकुल, गार्डन आदी लोकोपयोगी कामासाठी मागितली आहे. ती लवकरच नगरपरिषदेला मिळणार आहे.
या सर्व संधी असूनही नगराध्यक्ष सहकार्याची भूमिका घेतील का, हा प्रश्न आहे.
निष्कर्ष: झोळी दुबळी की इच्छाशक्ती?..
"आम्ही पाण्याचे राजकारण करतो" असा आरोप नगराध्यक्षांनी आधीच केला होता. आता ३००० रुपयांचे बिल हातात आल्यावर नागरिकांना त्याचा अर्थ कळू लागला आहे.
एकीकडे हिंदू धर्माचा पुरस्कार आणि दुसरीकडे वारीतील वारकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवणे, ही विसंगती आहे. आम्ही मीटर द्वारे विकत घेत असलेले पाणी मुळा धरण ते देवळाली पर्यंतच्या पाईप लाईन मधून बाहेर गावांसाठी लाखो लिटर पाणी वाया जाते, ते चालते. पण गावातील लोकांनी कोरडा दिवस पाळावा, हा हट्ट कितपत योग्य आहे?
निधी आहे, जागा आहे, लोकांचा पाठिंबा आहे. फक्त निर्णय घेण्याची इच्छाशक्ती हवी. अन्यथा "देणाऱ्याचे हात हजारो.. दुबळी माझी झोळी" ही म्हण देवळाली प्रवरा शहराच्या कारभाराला तंतोतंत लागू पडेल.
नगराध्यक्षांनी विरोधकांसोबत संवाद ठेवावा व रखडलेली कामे मार्गी लावून शहराच्या विकासाला प्राधान्य द्यावे, हीच नागरिकांची अपेक्षा आहे.
धन्यवाद.!
---
Deolali Pravara Municipal Council Appasaheb Dhus Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Bacchu Kadu Vaibhav Dhus Shivaji Ghadge Devendra Fadnavis Prasad Dhus Pratik Phulpagar प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र प्रहार संघटना महाराष्ट्र राज्य Mosin Rafik Shaikh Raja Ram Kheware Maharashtra Live Hemant Ogale Adv Sachin P Kolsepatil Ravi Shete Patil Vishwas Patil #दिंडी #पाणी