19/06/2025
काल रात्री चितमपल्ली कुटुंबातून कॉल आला..."आजोबांचं निधन झालं आहे... उद्या अंत्यविधी आहे, दुपारी 1 वाजता"...
मी शांतपणे ते ऐकलं... थोडं बोलणं झालं... आणि कॉल संपला...
थंड, शांत बसले... दाटून आलं... मनातही आणि आभाळातही...
बाहेर दाटलेलं आभाळ धो धो पाऊस ओतत होतं... उद्या दुपारी अंत्यविधी आहे... काय करू... कशी जाऊ...?
दहा बारा तासांचा प्रवास... रस्त्यांची अवकळा, पावलोपावली ठप्प आणि अवघडलेली वाहतूक... अपुरा वेळ....आणि त्यात रात्र... नाईलाज त्या रात्री इतकाच गडद आहे, हे स्पष्ट दिसत होतं...
पावसाकडे एकटक बघत त्यांच्या भेटींच्या आठवात गेले...
तुमच्यामुळे कधीकाळी अरणीशी भेट झाली...♥️
त्या नावाने मी आनंदाने , भरभरून जगते आहे, हे तुम्हाला भेटून सांगण्याची इच्छा फार तीव्र होती...
भेटण्यासाठी खूप धडपड केली... खूप प्रयत्नांनी मार्ग सापडला... भेट ठरली... तीही काहीशा वेळासाठीची...
पहिल्या भेटीपूर्वी डॉ. निनाद शहा, (Honorary Wildlife Warden, Solapur) यांना तुमच्या माहितीखातर पाठवलेल्या introduction मध्ये "अरणी" हे नाव फार हौशीने लिहीलं होतं... त्यांनीही ते जसंच्या तसं तुमच्यापर्यंत पोहोचवलं... अशाप्रकारे पहिली भेट त्या नावासोबतच झाली...🪻🌿
जेमतेम अर्धा तास भेट घेता येईल, अशा मानसिकतेतून गेलेलो आम्ही 3 - 4 तासांनी घराबाहेर पडलो... इतके जास्त बोलण्यात रमलो...♥️🌿
हा फोटो आजवर कधीच कुठे पोस्ट केला नाही... कारण तुम्ही पहिल्या भेटीत ओघाओघात बोलून गेलेली ती व्यथा कानात आत्ताही गुणगुणतेय... "भेटायला येणारे शक्यतो फोटोच्या अपेक्षेने येतात गं...मला जाणवतं ते...
आपल्या लहान लेकरांना आजुबाजूला उभं करून फोटो काढून निघून जातात...
माझ्याशी गप्पा मारायला या रे...जंगलांबद्दल बोलायला या रे..."🌿
आणि मग त्या दिवशी तुमचा निरोप घेऊन निघताना काढलेला हा फोटो....जो तुम्ही स्वखुशीने काढू दिलात... आणि तुम्ही मोडी लिपीत केलेल्या त्या सह्या... थरथरत्या हातांनी... एक नव्हे तर चार चार सह्या दिलात... पहिल्याच भेटीत मला आपलं मानलंत... हे सगळंच जादुई आणि न विसरण्यासारखंच...🌿♾️♥️✨🌿🪻🍃🐾🐾
मागच्या वर्षी एकाएकी फार घालमेल झाली.... तुम्हाला भेटणं गरजेचंच आहे, असं वाटू लागलं... कॉल केला असता, "अगं ये ये...नक्की ये भेटायला", असं खूप उत्सूर्तपणे बोललात...
यावेळी मात्र तब्बेत खूप खालावलेली होती....तरीही तुम्ही नेहमीप्रमाणे खूप वेळ दिलात...खूप बोलणं झालं...
यावेळी काही प्रश्न घेऊन आले होते.... काहींची उत्तरं मिळाली; काही अनुत्तरित ठेऊन ती आज अखेर तुम्ही माझ्यावरच सोडून दिलीत...
गप्पांदरम्यान आजच्या काळातील जंगलांची दयनीय अवस्था, जंगलांवरील अतिक्रमण, त्याबाबतचा आकस, आदिवासी बांधवांची फरफड, माणसं आणि वन्यजीव यांच्यातील तणाव या अशा बऱ्याचशा बाबींवर बोलताना त्यांच्या मनाची घालमेल, गहिवर आणि आतलं वादळ शमवण्यासाठी पायाची सातत्याने होणारी टकटक...सगळंच आता नजरेसमोरून धावतंय...🌿
मध्यंतरी, त्यांचं लिखाण कसं अशास्त्रीय होतं, वगैरे अशा आशयाच्या काही पोस्ट्स वाचण्यात आल्या...
आणि त्या वाचून वाटलं, जिथे गावं- खेडी, आपापल्या जमिनी - जंगलं सोडून शहराकडे झुकतायत, materialistic जगणं वाढतंय; त्याच सर्वसामान्य माणसाला जंगलांच्या पुन्हा प्रेमात पाडणं, तिथल्या मातीची ओढ लावणं, पारंपरिक ज्ञानात रमवणं, यासारखं देखणं आणि अवघड काम फारच कमी जणांना जमलं...🌿
जे जंगलं अंतर्बाह्य निरागस भावनिकतेतून जगले, ज्यांनी जंगलांना सर्वस्व मानलं...अगदी शेवटच्या काळातही त्याच आठवणी उशाशी बाळगल्या... आणि त्याच आठवणींची रानफुलं आज अंतःकाळात त्यांना पांघरली जातील; असं सुगंधी, pure, खोल आणि भरीव जगणं असं किती जणांना जमलं...? 🌿
जंगल हे त्यांचं भावविश्व होतं...❤️
सत्यातलं...आणि काहीसं कल्पनेतलं... त्यांना ते त्यावेळी जसं दिसलं, भावलं, जाणवलं, तसं... जसं कसंही...
पण लिखाणातून ते नितांतसुंदरच होतं... ओढ लावणारं... असाल तिथून त्या जंगलात नेऊन ठेवणारं...
तुम्ही कित्येकांच्या मनात केव्हाचेच रुजलेले आहात...
निसर्गनियमाप्रमाणे तुम्ही जगाचा निरोप घेतला असलात, तरीही तुम्ही सदैव असाल, आम्हा सर्वांच्या मनात... तुमच्या सुंदर लेखणीतून, तुमच्या पुस्तकांमधून...
जंगलातल्या वाटा चालताना, पाऊस अंगावर घेताना, ऋतुंची कुस बदलताना, वन्यप्राण्यांना न्याहाळताना, जंगलातल्या पाड्यांवर रमताना, तुम्ही त्या त्या क्षणांमध्ये असाल... चिरकाल...🌿✨
"तू तुझे जंगलातले अनुभव लिहत जा... खूप वाचनही कर... आणि ‘अरणी’ हे पुस्तक पूर्ण झाल्यावर कळव नक्की..." हे तुमचे शेवटच्या भेटीतले शब्द...
आता ते कसं, कुठे कळवावं, हा एकच कधीही न सुटू शकणारा पेच...
🌿🌿🌿 आजन्म कृतज्ञ राहीन तुम्ही घालून दिलेल्या त्या ‘अरणी’ च्या भेटीसाठी...🌿✨♾️🙏🏽🙏🏽🙏🏽
आज एका नव्या अथांग प्रवासाला निघालेले तुम्ही,
तुम्हाला जिथे वाटेल, आवडेल त्या जंगलात विसावा घ्या... पुन्हा पुन्हा भरभरून जगा त्या रानवाटा...🌿🌿
जंगलांच्या गाभ्यातून उमडणाऱ्या नितळ झऱ्यातून यावी अशी पवित्र भावपूर्ण आदरांजली - तुम्हीच लिहिलेल्या एका कथेच्या आकंठ प्रेमातून निर्माण झालेल्या...अरणीकडून...🌿🌿🌿🪻🪻🪻✨✨✨♾️
#अरण्यमहर्षी_मारुतीचितमपल्ली 🌿🐾
#रानवाटा 🐾
#अरणी 🐾