29/08/2026
*मोशीतील कचरा डेपो दुर्घटनेनंतर कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर; रोटरी वाल्हेकरवाडीचा ‘प्रोजेक्ट निर्मला’तून पुढाकार*
पिंपरी चिंचवड : वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि त्यातून दिवसेंदिवस वाढणारी कचऱ्याची समस्या ही पिंपरी चिंचवड, मोशी आणि चाकण परिसरासमोरील गंभीर समस्या बनली आहे. मोशी कचरा डेपो परिसरातील दुर्घटनेने या प्रश्नाचे गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि कचरा निर्मिती कमी करण्यासाठी नागरिक, संस्था आणि उद्योगांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज निर्माण झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीने कचरा कमी करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले असून, महिलांचे आरोग्य आणि पर्यावरण संरक्षण यांचा संगम साधणारा ‘प्रोजेक्ट निर्मला’ राबविण्यात येत आहे.
मिस्तुबा कंपनीच्या CSR सहकार्याने चाकण आणि पिंपरी चिंचवड परिसरातील सुमारे ४० शाळांमध्ये सॅनिटरी पॅड इन्सिनरेटर मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. वापरलेल्या सॅनिटरी पॅडची योग्य विल्हेवाट लावताना निर्माण होणारा कचरा कमी करणे आणि महिलांना स्वच्छ व सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या उपक्रमाचा विस्तार करत आज चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटरी पॅड इन्सिनरेटर मशीन उपलब्ध करून देण्यात आले.
वाढत्या शहरीकरणामुळे घरगुती कचरा वाढत आहे, तर चाकण परिसरातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे कचरा व्यवस्थापनाचे आव्हानही वाढत आहे. त्यामुळे केवळ कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावणे हा कायमस्वरूपी उपाय नसून कचरा निर्माण होण्यापासूनच तो कमी करणे आणि योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
कचऱ्याची समस्या ही केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित राहत नाही. अस्वच्छ परिसराचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर आणि मानसिक स्वास्थ्यावरही होतो. परिसर स्वच्छ आणि व्यवस्थित असेल तर आनंदी, सुरक्षित आणि संतुलित वातावरण निर्माण होते.
यावेळी सह आयुक्त रणजित पाटील साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चासकर साहेब PSI डोगरे मॅडम, PSI खामकर मॅडम
LIB चे श्री सागर आढारी, श्री संतोष उभे
हवालदार शीतल दौडकर मॅडम, प्रियंका पवार मॅडम ग्राम सुरक्षा दल व शांतता कमिटीचे प्रकाश मिर्झापुरे उदय वाडेकर रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष अमित औटी, सेक्रेटरी शुशांक भुमकर, मिस्तुबा कंपनीचे संतोष वाल्हेकर, रोटरीयन वसंत ढवळे, गणेश बोरा, प्रोजेक्ट डायरेक्टर संदीप वाल्हेकर, हर्षदा भुमकर, राजश्री ढवळे आणि स्वाती औटी उपस्थित होते.
मोशी दुर्घटनेसारख्या घटना आपल्याला कचरा व्यवस्थापनाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याचा संदेश देतात. शहर वाढत असताना कचरा वाढू नये, यासाठी ‘कचरा कमी करणे’ हीच पहिली पायरी असली पाहिजे. या विचारातून रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी विविध सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवत आहे.